Yuvraj Mehta death Asphyxia: मृत्यू हा वेगवेगळ्या कारणामुळे होवू शकतो, त्या कारणांविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. अशीच एक घटना ग्रेटर नोएडा येथे घडली. पाण्याने भरलेल्या खड्ड्यात एसयूव्ही कोसळली आणि त्यात असलेल्या २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा मृत्यू झाला, युवराज मेहता असे या मृत युवकाचे नाव आहे. पाण्यात अडकलेल्या युवराज मेहताने जवळपास ९० मिनिटे जीव वाचविण्यासाठी झुंज दिली. बुडत असलेल्या वाहनाच्या छतावर चढण्यात तो यशस्वीही झाला होता. त्याने मोबाईलचा टॉर्च चालू करून मदतीसाठी आवाजही दिला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत असताना त्याने वडिलांना फोनही केला… मात्र, त्याचा जीव वाचवण्यात यश आले नाही. तब्बल दीड तासाहून अधिक काळ तो पाण्यात होता. पोस्टमॉर्टेम (शवविच्छेदन) रिपोर्टमध्ये त्याचा अ‍ॅस्फिक्सिया आणि त्यानंतर झालेल्या हृदयविकारामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर अ‍ॅस्फिक्सिया म्हणजे काय हेच समजून घेण्याचा प्रयत्न.

अ‍ॅस्फिक्सिया म्हणजे काय?

अ‍ॅस्फिक्सिया ही एक वैद्यकीय अवस्था आहे. या अवस्थेत शरीराला, विशेषतः मेंदू व हृदयासारख्या अत्यावश्यक अवयवांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यावर श्वसनसंस्था नीट कार्य करू शकत नाही आणि शरीरातील पेशींमध्ये ऊर्जा निर्माण होण्याची प्रक्रिया खंडित होते. याचा थेट परिणाम मज्जासंस्था, हृदय व इतर महत्त्वाच्या अवयवांवर होतो.

…तर मृत्यू होऊ शकतो

या स्थितीत सुरुवातीला व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो, छातीत जडपणा जाणवतो, अस्वस्थता वाढते, घाम येतो आणि हृदयाचे ठोके वाढतात. ऑक्सिजनचा अभाव कायम राहिल्यास मेंदूच्या पेशींना गंभीर इजा पोहोचते, व्यक्ती बेशुद्ध पडते आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यूही होऊ शकतो.

घुसमटून मृत्यू

अ‍ॅस्फिक्सियाला मराठीत श्वासरोध किंवा घुसमट होणे असेही म्हणतात. ही अवस्था अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. उदा. श्वसनमार्गात अडथळा निर्माण होणे, पाण्यात बुडणे, छातीवर तीव्र दाब येणे, विषारी वायू श्वासाद्वारे शरीरात जाणे किंवा गंभीर अपघातामुळे छातीच्या पोकळीला इजा होणे इत्यादींचा समावेश होतो. वैद्यकीय दृष्टिकोनातून अ‍ॅस्फिक्सियाचे विविध प्रकार आहेत. कारण व परिस्थितीनुसार त्यांचे स्वरूप वेगवेगळे असते आणि उपचार पद्धतीही त्यानुसार बदलतात. त्यामुळे अ‍ॅस्फिक्सिया ही केवळ श्वास घेण्याची अडचण नसून, ती संपूर्ण शरीरावर परिणाम करणारी गंभीर व जीवघेणी अवस्था मानली जाते.

यांत्रिक श्वासरोध (Mechanical Asphyxia)

एखाद्या वस्तूमुळे, अपघातामुळे पडलेला दाब किंवा कोणतेही शारीरिक बल श्वसनमार्गात अडथळा निर्माण करते किंवा छाती-फुफ्फुसांची हालचाल थांबवते. अशा परिस्थितीत शरीराला आवश्यक असलेला ऑक्सिजन मिळत नाही आणि कार्बन डायऑक्साइड साचू लागतो. या अवस्थेला यांत्रिक श्वासरोध (Mechanical Asphyxia) असे म्हणतात.

आघातजन्य श्वासरोध (Traumatic Asphyxia)

हा यांत्रिक श्वासरोधाचाच एक प्रकार आहे. छातीच्या पोकळीला (थोरॅसिक कॅव्हिटी) झालेल्या तीव्र आघातामुळे श्वसनक्रियेत अडथळा येतो आणि श्वासरोध होतो. या अवस्थेत हृदयातील रक्त शिरांमधून उलट दिशेने मान आणि मेंदूकडे ढकलले जाते.

दाबजन्य श्वासरोध (Compressive Asphyxia)

हा यांत्रिक श्वासरोधाचा एक प्रकार आहे. छाती किंवा पोटावर बाह्य स्वरूपाचा तीव्र दाब पडल्यामुळे श्वसनक्रियेत अडथळा येतो आणि श्वासरोध होतो.

अ‍ॅस्फिक्सियाचा शरीरावर कसा परिणाम होतो?

अ‍ॅस्फिक्सियामुळे शरीरावर विविध प्रकारे परिणाम होतात. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो:

एखादी वस्तू श्वसनमार्गात अडकली असेल तर ..

एखादी वस्तू श्वसनमार्गात अडकली असेल, तर ऑक्सिजन ऊतींपर्यंत पोहोचू शकत नाही आणि शरीरात कार्बन डायऑक्साइड साचू लागतो. श्वास जोरात घेण्याचा प्रयत्न करताना डोळे बाहेर येणे, त्वचेचा रंग बदलणे, खोकला येणे अशी लक्षणे दिसू शकतात. या अवस्थेत रक्तदाब आणि हृदयाचे ठोके झपाट्याने वाढतात तसेच रक्ताचा pH कमी होतो. शेवटी रक्तदाब कमी होतो आणि हृदयाची गती मंदावते.

बुडताना होणारा मृत्यू (Drowning)

बुडून मृत्यू होण्याच्या बहुतांश घटनांमध्ये पाणी घशात जातानाच स्वरपटल (व्होकल कॉर्ड्स) अचानक आकुंचन पावतात आणि श्वसनक्रिया थांबते. डॉक्टरांच्या मते अशा परिस्थितीत फुफ्फुसांमध्ये प्रत्यक्ष पाणी गेलेले नसले तरीही व्यक्तीचा मृत्यू श्वासरोधामुळे होऊ शकतो. अनेक प्रकरणांत, काही काळानंतर घशातील स्नायू सैल होतात आणि पाणी फुफ्फुसांत प्रवेश करते. गोडे पाणी (फ्रेशवॉटर) फुफ्फुसांत गेल्यावर ते शरीरात वेगाने शोषले जाते. त्यामुळे रक्तातील प्लाझ्मा पातळ होतो आणि लाल रक्तपेशी फुटू लागतात, या प्रक्रियेला हिमोलायसिस असे म्हणतात.

अ‍ॅस्फिक्सियामुळे हृदयविकार (हार्ट फेल्युअर) कसे होते?

डॉक्टरांच्या मते, अ‍ॅस्फिक्सियामुळे हृदयाच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने हायपॉक्सिया होतो. त्यामुळे पेशींमधील ऊर्जा निर्मिती मंदावते, कॅल्शियमचे प्रमाण अनियंत्रितपणे वाढते, पेशींना इजा होते आणि अखेरीस पेशींचा मृत्यू होतो.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या अवस्थेत शरीराची स्ट्रेस रिस्पॉन्स प्रतिक्रिया वेगात होते. ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता (अरिदमिया) निर्माण होते. यामुळे रक्त पंप करण्याच्या हृदयाच्या क्षमतेवर प्रचंड ताण येतो आणि शेवटी कार्डिअक अरेस्ट होऊन हृदय निकामी होते. या प्रक्रियेमुळे कॅटेकोलामाइन्सचा तीव्र प्रमाणात स्राव होतो, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, हृदयाच्या स्नायूंच्या कार्यक्षमतेत बिघाड होतो तसेच माइटोकॉन्ड्रियाचे नुकसान होते. या सर्व परिणामांमुळे अखेरीस हृदयाचा स्नायू रक्त प्रभावीपणे पंप करण्यास अपयशी ठरतो.

हृदयप्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले, तर शरीराला पुन्हा ऑक्सिजन मिळू लागतो. मात्र, विरोधाभासाने या ऑक्सिजनच्या पुनर्प्रवाहामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण आणि दाह (इन्फ्लेमेशन) निर्माण होतो. यामुळे पेशींना अधिक इजा पोहोचते आणि पेशींचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढू शकते.