Why heart risk does not end after a stent: पंजाबमधील जालंधर येथे बॅडमिंडन खेळत असताना एका ४५ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. तिथे उपस्थित असलेल्या दोन डॉक्टरांच्या प्रसंगावधान आणि तातडीच्या उपचारांमुळे तो थोडक्यात बचावला. ही एक घटना नाही. अलीकडे अशा घटनांचे प्रमाण वाढतच आहे. जीवनशैलीत झालेले बदल, दीर्घकाळ बसून काम करणे, अपुरी झोप, सततचा मानसिक ताण, असंतुलित आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव या सगळ्यांचा एकत्रित परिणाम हृदयावर होतो. विशेषतः भारतीयांमध्ये पोटाभोवती साचणारी चरबी आणि मेटाबॉलिक असमतोल यामुळे धोका अजून वाढतो. परिणामी वय वर्षे ६० नंतर दिसणारा आजार वयाच्या तिशीतच भेडसावू लागला आहे. किंबहुना अचानक येणार्‍या हार्ट अटॅकमुळे होणार्‍या मृत्यूदरातही वाढ झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ५ वर्षांत ४ हृदयविकाराचे झटके अनुभवलेल्या आणि नंतर पूर्णत: बर्‍या झालेल्या रुग्णाच्या अनुभवातून नेमकं काय समजतं, याचाच घेतलेला हा आढावा.

हा अनुभव डॉक्टर शेट्टी यांच्याकडे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणार्‍या रुग्णाचा आहे. वयाच्या ५०व्या वर्षी त्याला पहिला हृदयविकाराचा झटका आला. सुदैवाने तो या प्रसंगातून वाचला. हा झटका तुलनेने सौम्य होता. त्याच्या कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज आढळले होते. डॉक्टरांनी तातडीने उपचार करत अरुंद झालेली रक्तवाहिनी खुली केली आणि रक्तप्रवाह पूर्ववत करण्यासाठी स्टेंट बसवला. अनेक रुग्णांप्रमाणेच त्याचाही समज आला की, ब्लॉक झालेली रक्तवाहिनी दुरुस्त झाली म्हणजे आता आयुष्य पुन्हा पूर्वीसारखे सामान्य होईल. परंतु, दुर्दैवाने पुढील पाच वर्षांचा काळ हा त्याच्यासाठी परीक्षेचा होता. ही वर्षे त्याला हृदयरोगाच्या हट्टी आणि गुंतागुंतीच्या स्वरूपाची जाणीव करून देणारी ठरली. त्याच्या वेगवेगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये पुन्हा तीन नवीन ब्लॉकेजेस तयार झाले होते. शेवटी त्याच्या शरीरात आठ स्टेंट्स बसवावे लागले. या सर्वाचा परिणाम म्हणजे या रुग्णाने स्वतःच्या जीवनशैलीत कमालीचा बदल केला. त्याला पुन्हा त्रास झाला नाही, त्यामुळे शिस्तबद्ध जीवनशैली हाच उपचार असा त्याचा समज झाला. इथेच हृदयरोगाबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज समोर येतो. हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहावे लागतात. आयुष्यात एकदाच घेतलेले वैद्यकीय उपचार संपूर्ण आयुष्यासाठी पुरेसे आहेत, अशी अपेक्षा ठेवणे धोकादायक ठरू शकते.

हृदयरोगाविषयीचा पारंपरिक समज

कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज हा केवळ रक्तवाहिन्यांमधील ‘प्लंबिंग’चा प्रश्न नाही. अनेक दशकांपर्यंत हृदयरोगाचे वर्णन साध्या ब्लॉकेजच्या समस्येसारखे केले जात होते. म्हणजे, रक्तवाहिनी अरुंद होते, रक्तप्रवाह कमी होतो, हृदयविकाराचा झटका येतो आणि मग ते ब्लॉकेज काढून रक्तवाहिनी पुन्हा खुली केली जाते.

आधुनिक हृदयरोगशास्त्र काय सांगते?

परंतु, आधुनिक हृदयरोगशास्त्र या आजाराचे पूर्णत: भिन्न विश्लेषण करते. स्टेंट एखाद्या ब्लॉकेजवर उपचार करू शकते; पण ते ब्लॉकेज निर्माण करणारी मूळ प्रक्रिया बरी करू शकत नाही. कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचा आजार. हा आजार दीर्घकालीन स्वरूपाचा असतो आणि तो संपूर्ण धमन्यांच्या प्रणालीवर परिणाम करतो. ब्लॉकेजवर उपाय म्हणून ज्या रक्तवाहिनीत स्टेंट बसवला जातो ती रक्तवाहिनी खुली राहत असली तरी, हा आजार शरीरातील इतर रक्तवाहिन्यांमध्ये शांतपणे पसरू शकतो. तेच त्या रुग्णाच्या बाबतीत झाले.

पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णाने डॉक्टरांना अपेक्षित असलेले जीवनशैलीतील जवळजवळ सर्वच आदर्श बदल स्वीकारले. त्याने धूम्रपान सोडले. आहार आणि व्यायामाशी त्याने कोणतीही तडजोड न करता ते त्याच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाले. त्याचे एलडीएल म्हणजेच ‘लो-डेन्सिटी लायपोप्रोटीन’ कोलेस्टेरॉल ४० mg/dL च्या खाली आणण्यात आले. औषधे घेण्याबाबतही तो अत्यंत काटेकोर होता. एलडीएलची पातळी दीर्घकाळ नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याला इंजेक्शनद्वारे दिली जाणारी, कोलेस्टेरॉल कमी करणारी अत्याधुनिक उपचारपद्धतीही देण्यात आली. याशिवाय त्याला दाह कमी करणारी औषधे आणि रक्तातील गुठळ्या होण्याचा धोका कमी करणारी अँटी-प्लेटलेट औषधेही देण्यात आली. या सर्व बदलांमुळे त्याच्या आरोग्यात नक्कीच सुधारणा झाली. परंतु, या उपायांनी हृदयविकाराचा धोका पूर्णपणे शून्यावर आणता आला नाही.

स्टेंट विषयीचा गैरसमज

वारंवार येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यांबाबतचा एक मोठा गैरसमज म्हणजे, हे झटके नेहमीच स्टेंट निकामी झाल्यामुळे येतात. प्रत्यक्षात बहुतेक वेळा तसे नसते. काही मोजक्याच रुग्णांमध्ये उपचार केलेल्या भागात पुन्हा समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. रक्तवाहिनी हळूहळू पुन्हा अरुंद होऊ शकते. या प्रक्रियेला ‘रेस्टेनोसिस’ असे म्हणतात. आणखी एका दुर्मिळ प्रसंगी स्टेंटच्या आत रक्ताची गाठ तयार होऊ शकते. स्टेंट थ्रोम्बोसिसचा म्हणजेच स्टेंटमध्ये रक्ताची गाठ तयार होण्याचा धोका अँजिओप्लास्टीनंतर पहिल्या महिन्यात सर्वाधिक असतो. कारण स्टेंट मूलत: रक्तवाहिनीच्या आत बसवलेला शरीराबाहेरचा घटक असतो. त्यामुळे शरीर त्याभोवती रक्ताची गाठ तयार करून व्यक्त होऊ शकते. याच कारणामुळे या प्रक्रियेनंतर रुग्णांना रक्त पातळ करणारी दोन औषधे दिली जातात. आधुनिक औषध-स्रवणारे स्टेंट्स आणि सध्याच्या प्रगत रक्त पातळ करणाऱ्या औषधांमुळे पहिल्या महिन्यात स्टेंट थ्रोम्बोसिसचा धोका साधारणतः १ टक्क्याच्या आसपास असतो. मात्र, रक्त पातळ करणारी औषधे मध्येच थांबवली गेली किंवा ती अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरली नाहीत, तर हा धोका वाढू शकतो. काही परिस्थितींमध्ये तो ३ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. पण अनेकदा मोठा धोका स्टेंटमध्ये नसून शरीरातील इतर रक्तवाहिन्यांमध्ये लपलेला असतो.

नवीन ब्लॉकेजेस, ज्यांची कुणालाही आधी कल्पना येत नाही

अशा प्रकारे पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटनांपैकी फारच कमी प्रमाण थेट स्टेंट बसवलेल्या जागेशी संबंधित असते. त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक वेळा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी रक्तवाहिन्यांच्या पूर्वी निरोगी वाटणाऱ्या भागांमध्ये नवे ब्लॉकेजेस तयार होतात. कारण कोरोनरी आर्टरी डिसीज हा एका जागेपुरता मर्यादित नसतो. धमन्यांच्या संपूर्ण जाळ्यात प्लाक्स म्हणजेच चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर घटकांचे थर तयार झालेले असू शकतात. त्यापैकी काही इतके मोठे असतात की, तपासणीत ते स्पष्ट दिसतात; तर काही इतके लहान असतात की अँजिओग्रामदरम्यानही त्यांच्याकडे विशेष लक्ष जात नाही. काळानुसार यापैकी एखादा प्लाक अस्थिर होऊ शकतो, फुटू शकतो आणि त्यामुळे पुन्हा नवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

म्हणून अनेक प्रकरणांमध्ये पुन्हा हृदयविकाराचा झटका येणे म्हणजे आधी केलेली प्रक्रिया अपयशी ठरली, असा अर्थ होत नाही. उलट, हा आजार अजूनही शरीरात सक्रिय आहे, याचा तो पुरावा असतो. कोलेस्टेरॉल नीट नियंत्रणात नसलेले, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा किंवा धूम्रपान सुरूच ठेवणारे रुग्ण सर्वाधिक धोक्यात असतात. मात्र, डॉक्टरांचा सल्ला काटेकोरपणे पाळणाऱ्या रुग्णांमध्येही कधी कधी शरीराची जैविक प्रक्रिया अपेक्षेपेक्षा अधिक कठीण आणि गुंतागुंतीची ठरू शकते.

अगदी काटेकोरपणे काळजी घेणारे रुग्णही धोक्यापासून पूर्णपणे मुक्त का नसतात?

कोलेस्टेरॉल आक्रमक पद्धतीने कमी करणे, रक्त पातळ करणारी औषधे घेणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आणि जीवनशैलीत आवश्यक बदल करणे, या सर्व उपायांमुळे हृदयरोगाचा धोका जवळपास ९० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. मात्र, उरलेल्या १० टक्के धोक्यांवर वैद्यकशास्त्राने अजूनही पूर्ण नियंत्रण मिळवलेले नाही. काही रुग्णांमध्ये अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस म्हणजेच रक्तवाहिन्यांमध्ये चरबी आणि कोलेस्टेरॉलचे थर साचण्याची आनुवंशिक प्रवृत्ती असते. काही रुग्णांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दाहक प्रक्रिया जास्त प्रमाणात सक्रिय असते. मधुमेह आणि मूत्रपिंडाचे आजार यांसारख्या स्थितींमुळे उपचार सुरू असूनही रक्तवाहिन्यांचे नुकसान वेगाने होत राहू शकते. संशोधकांचे लक्ष आता ‘लायपोप्रोटीन (ए)’ या घटकाकडेही अधिक प्रमाणात वळत आहे. हा आनुवंशिक स्वरूपाचा कोलेस्टेरॉलशी संबंधित कण आहे. पारंपरिक कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात असली, तरीही हा घटक हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो, असे दिसून येत आहे. अशा रुग्णांसाठी उपचार म्हणजे धोका पूर्णपणे संपवण्याची प्रक्रिया नसते; तर तो धोका सतत कमी करत राहण्याचा दीर्घकालीन प्रयत्न असतो.

उपचारांचा मार्ग सातत्याने सुरू ठेवण्याचे महत्त्व

दिलासादायक बाब अशी की, जे रुग्ण औषधे नियमितपणे घेतात, एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी अत्यंत कमी ठेवतात, धूम्रपान टाळतात आणि संबंधित जोखीम घटक नियंत्रणात ठेवतात, त्यांना वारंवार हृदयविकाराचे झटके येत नाहीत. हृदयविकाराच्या झटक्यानंतरचा सुरुवातीचा काळ सर्वाधिक चिंताजनक असतो. मात्र, जसजसा काळ पुढे जातो, तसतसा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. पहिल्या वर्षानंतर, उपचारांचे काटेकोर पालन करणाऱ्या रुग्णांमध्ये पुन्हा झटका येण्याचे प्रमाण साधारणपणे दरवर्षी १ ते २ टक्क्यांपर्यंत कमी होते. म्हणूनच डॉक्टर दीर्घकालीन प्रतिबंधावर भर देतात.