Audrey Truschke Pashupati Seal: सिंधु-सरस्वती किंवा हडप्पा संस्कृती म्हटल्यावर सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते प्रामुख्याने ध्यानमुद्रेत बसलेला योगी आणि त्याच्या बाजूला असलेले प्राणी या मृण्मयमुद्रेचं. या मुद्रेवरचा योगी कोण? हा मुद्दा गेल्या १०० वर्षांपासून चर्चेत आहे. या मुद्रेसंदर्भात अभ्यासकांनी अनेक तर्क-वितर्क केले आहेत. त्यातच या मुद्रेचा संबंध पशुपतीशी जोडला गेला आणि हे गृहीतक मोठ्या प्रमाणात मान्य झाले. परंतु, अलीकडेच अमेरिकन इतिहासकार ऑड्री ट्रश्के यांनी X वर या मुद्रेच्या विश्लेषणाला आव्हान दिले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला.

केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय विरुद्ध अमेरिकन इतिहासकार

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आपल्या X वरील एका पोस्टमध्ये या मुद्रेचा उल्लेख “भारताच्या अखंड सांस्कृतिक सातत्याचे एक अत्यंत प्रभावी प्रतीक” असा केला होता. मंत्रालयाने म्हटले आहे की, या मृण्मय मुद्रेवर मूलबंधासनात बसलेली एक आकृती दिसते. या मुद्रेवर दिसणारी ‘योग, शिवभक्ती आणि आध्यात्मिक विचाराची परंपरा आजही भारतातील मंदिरे, योगपरंपरा आणि संस्कृतीत अबाधित आहे. इतिहासकार ऑड्री ट्रश्के यांनी सांस्कृतिक मंत्रालयाचा हा दावा खोडून काढताना म्हटले की, “ही प्रतिमा हिंदू देवता असलेल्या शिवाचे प्रतिनिधित्व करत नाही, तर ही प्रतिमा प्रोटो-एलामाइट प्रतिमाशैलीतून स्वीकारलेली असण्याची अधिक शक्यता” आहे. म्हणजेच ही देवता शिव नसून युरेशियन परंपरेतील प्राण्यांचा अधिपती असू शकते, असे मत ऑड्री ट्रश्के यांनी व्यक्त केले आहे.

ऑड्री ट्रश्के यांच्या या मतप्रदर्शनानंतर अनेक भारतीय इतिहासकार, लेखक आणि भाष्यकारांकडून त्यांचा निषेध करण्यात आला. ट्रश्के यांच्यावर भारतीय इतिहासाच्या स्वदेशी आकलनाला नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Indus Valley Pashupati Seal
Indus Valley Pashupati Seal

मुद्रा का महत्त्वाच्या?

हडप्पा संस्कृतीशी संबंधित विविध स्थळांवर आजवर झालेल्या उत्खननात हजारो मृण्मय मुद्रा सापडल्या आहेत. प्रामुख्याने ‘स्टिएटाइट’ (मऊ दगड) पासून तयार करण्यात आलेल्या या मुद्रा चौकोनी आणि आयताकृती अशा वेगवेगळ्या आकारांत सापडतात. या मुद्रांचा वापर केवळ व्यापारासाठीच नाही, तर प्रशासकीय कामे, ओळख पटवणे, मालावर मालकीची खूण करणे आणि धार्मिक विधींसाठीही केला जात असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. या मुद्रांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यावर कोरलेली प्राण्यांची चित्रे, विविध आकृतिबंध आणि अद्याप न उलगडलेली हडप्पाकालीन लिपी.

वाद जुनाच…

आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ ट्रश्के यांनी एक शोधनिबंधही (Academic Article) शेअर केला आहे. यात हडप्पा काळातील कलाशैली आणि त्यांच्या समकालीन शेजारील संस्कृतींमधील परस्पर संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

दरम्यान, ट्रश्के यांनी उपस्थित केलेला प्रश्न पुरातत्त्व आणि इतिहास अभ्यासकांसाठी नवीन नाही. यापूर्वीही अनेक इतिहासकार आणि संशोधकांनी हडप्पा मुद्रेवरील ‘त्या’ आकृतीची ओळख ‘शिव’ म्हणून पूर्णत: पटवता येऊ शकते का, यावर अनेकदा शंका उपस्थित केल्या आहेत. आता भारत सरकार विरुद्ध अमेरिकन इतिहासकार या नव्या वादामुळे हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जॉन मार्शल यांचे गृहितक

या वादाची पाळेमुळे शतकाहून अधिक जुनी आहेत. ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ जॉन मार्शल यांनी १९२० च्या दशकात मोहेंजोदारो येथील उत्खननात सापडलेल्या या मुद्रेवरील आकृतीची ओळख शिवाचे प्रारंभिक रूप म्हणजेच प्रोटो-शिव (Proto-Shiva) किंवा पशुपती (प्राण्यांचा अधिपती) अशी केली होती. जॉन मार्शल यांनी या आकृतीला ‘प्रोटो-शिव’ म्हणण्यामागे तीन मुख्य कारणे देण्यात आली होती. ही आकृती योगमुद्रेत बसलेली आहे, तिच्या अवतीभोवती प्राणी आहेत आणि तिच्या डोक्यावर त्रिशूळासारखे शिरोभूषण आहे.

जॉन मार्शल यांच्या गृहितकवर आक्षेप

मात्र, इतिहासकार रुचिका शर्मा यांनी हे विश्लेषण चुकीच्या गृहितकांवर आधारित असल्याचे म्हटले आहे. “त्या आकृतीच्या डोक्यावर दिसणारे शिरोभूषण त्रिशूळ नसून पाणम्हशीची शिंगे आहेत,” असा प्रतिवाद शर्मा यांनी केला आहे. या संदर्भात शर्मा यांनी इतिहासकार डोरिस श्रीनिवासन यांच्या संशोधनाचा दाखला दिला आहे. श्रीनिवासन यांनी ‘Archives of Asian Art’ (१९७५-७६) या आपल्या पुस्तकात लिहिताना स्पष्ट केले होते की, उपलब्ध पुरावे मार्शल यांच्या त्रिमुखी प्रोटो-शिव कल्पनेच्या पूर्णपणे विरोधात जातात. मोहेंजोदारोच्या मुद्रेवरील ही आकृती म्हणजे शिव नसून, ती बहुधा ‘दैवी वृषभ-मानव’ (Divine Bull-Man) किंवा ‘प्रजननक्षमता आणि समृद्धीशी संबंधित’ एखादी स्थानिक देवता असावी, असे मत श्रीनिवासन यांनी व्यक्त केले आहे.

वैदिक रुद्र आणि शिवाचे गुणधर्म

रुचिका शर्मा यांनी श्रीनिवासन यांचा संदर्भ देऊन आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. नंतरच्या काळातील शिवाचे गुणधर्म हडप्पा काळापर्यंत मागे घेऊन जाणे चुकीचे आहे. “वैदिक काळातील ‘रुद्र’ हा ना योगी होता, ना पशुपती. उलट ती एक विध्वंसक शक्ती होती, तो प्राण्यांचा रक्षक नव्हे तर संहारक म्हणून दर्शवला गेला आहे, असे मत रुचिका शर्मा यांनी मांडले आहे. त्यांच्या युक्तिवादानुसार, शिव हा ‘योगी’ आणि ‘पशुपती’ आहे ही वैशिष्ट्ये इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकानंतर (म्हणजेच हडप्पा संस्कृतीच्या हजारो वर्षांनंतर) इतिहासामध्ये दिसू लागतात. त्यामुळे मुद्रेवरील हा पशुपती एखादा ‘शमन’ (तांत्रिक किंवा जादूगार), स्थानिक देवता, किंवा पूर्णपणे वेगळेच प्रतीक असू शकते.

जॉन मार्शल यांच्या पात्रतेवर प्रश्न आणि वास्तव

या वादात रुचिका शर्मा यांनी जॉन मार्शल यांच्या व्यावसायिक पात्रतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ते प्रशिक्षित पुरातत्त्वज्ञ नव्हते असा दावा केला. मात्र, ऐतिहासिक नोंदींनुसार हा दावा चुकीचा ठरतो. जॉन मार्शल यांनी ग्रीसच्या प्रसिद्ध क्रिट बेटावरील ‘क्नॉसॉस’ येथे ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ आर्थर इव्हान्स यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्त्वशास्त्राचे रीतसर प्रशिक्षण घेतले होते. इतकेच नव्हे तर, १९०२ साली भारताच्या पुरातत्त्व विभागाचे (ASI) महासंचालक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय उत्खननांमध्ये थेट सहभाग घेतला होता.

John Marshall
जॉन मार्शल

देवदत्त पट्टनायक यांचे वेगळे विश्लेषण: पुरुष, स्त्री की ट्रान्सजेंडर?

प्रसिद्ध पुराणकथा अभ्यासक आणि लेखक देवदत्त पट्टनायक यांची भूमिका या वादात सांस्कृतिक मंत्रालय आणि इतिहासकार ट्रश्के या दोघांपेक्षाही वेगळी आणि अधिक गुंतागुंतीची आहे. २०२२ साली’The Hindu’ मध्ये लिहिताना त्यांनी स्पष्ट केले होते की, आता अनेक आधुनिक अभ्यासक हडप्पा मुद्रेचा शिवाशी असलेला थेट संबंध मान्य करत नाहीत. लोकप्रिय पुस्तकांमध्ये जरी त्या आकृतीला ‘प्रोटो-शिव’ म्हटले जात असले, तरी अभ्यासकांमध्ये मतैक्य नाही.

पट्टनायक यांनी तशाच दोन वेगवेगळ्या मुद्रांकडे लक्ष वेधले आहे.

१. पहिली (दिल्ली): यात ती आकृती प्राण्यांनी वेढलेली आहे आणि ती ‘उर्ध्वलिंगी’ (ताठ लिंग असलेली) दिसते. हे रूप नंतरच्या काळातील शिवाचे तांत्रिक रूप असलेल्या ‘लकुलीश’ प्रतिमांशी जोडता येऊ शकते.

२. दुसरी (इस्लामाबाद): यात आजूबाजूला प्राणी दिसत नाहीत, पण आकृतीवर खालील दिशेला असलेला त्रिकोण दिसतो, जो ‘योनीचे’ (स्त्रीत्वाचे) सूचक मानला जातो.

या परस्परविरोधी वैशिष्ट्यांमुळे पट्टनायक एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतात, “ही प्रतिमा नेमकी पुरुषाची आहे, स्त्रीची आहे की कदाचित एखाद्या ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) व्यक्तिमत्त्वाची?” तसेच, मुद्रेवरील आकृतीला असलेली शिंगे ही शिवाच्या मुख्य प्रवाहातील रूपाशी अजिबात जुळत नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मात्र, असे असले तरी या आकृतीची वैशिष्ट्यपूर्ण बैठक दुर्लक्षित करता येत नाही, हे पट्टनायक मान्य करतात. आज योगपरंपरेत ज्याला ‘सिंहासन’ किंवा ‘भद्रासन’ मुद्रा म्हटले जाते, हुबेहूब त्याच मुद्रेत ही आकृती बसलेली आहे.

“शिव किंवा हिंदू धर्माशी संबंध नाही” – जागतिक संशोधक

लंडनमधील SOAS विद्यापीठातील नॉर्वेजियन पीएचडी संशोधक अलेक्झांडर एंगेस्कॉग यांनीही या वादात उडी घेत, मोहेंजोदारो येथील या ‘सील ४२०’ (मुद्रेचा क्रमांक) बद्दल आपले मत मांडले. आपल्या पदवी प्रबंधाचा संदर्भ देत त्यांनी थेट निष्कर्ष काढला की, “या मुद्रेचा शिव, योग किंवा हिंदू धर्माशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही.”

पुरातत्त्व की राजकारण? ‘पशुपती’ नावावरून जुंपली

आता हा वाद केवळ इतिहास किंवा पुरातत्त्वशास्त्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याला राजकीय आणि अस्मितेचे स्वरूप आले आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या इतिहासकारांचे म्हणणे आहे की, ही मुद्रा हडप्पा काळापासून आजच्या हिंदू परंपरांपर्यंत चालत आलेल्या अखंड ‘संस्कृतीच्या सातत्याचा’ (Civilizational Continuity) जिवंत पुरावा आहे. याउलट, रुचिका शर्मा यांच्यासारख्या टीकाकारांच्या मते, ज्या संस्कृतीची लिपी अजून उलगडलेली नाही, तिच्यावर नंतरच्या काळातील धार्मिक ओळख बळजबरीने लादणे चुकीचे आहे.

पशुपती म्हणजेच प्राण्यांची अधिपती

या वादावर लेखक हिंदोल सेनगुप्ता यांनी ट्रश्के यांच्यावर कडाडून टीका केली. ट्रश्के यांच्या ‘लॉर्ड ऑफ अ‍ॅनिमल्स’ (Lord of Animals) या शब्दाला उत्तर देताना त्यांनी ‘X’ वर लिहिले आहे की, “पशुपती या शब्दाचा मूळ अर्थच मुळात ‘प्राण्यांचा अधिपती’ (Lord of Animals) असा होतो, हे या हिंदूविरोधी व्यक्तीला कोण सांगणार?” दोन प्राचीन संस्कृतींमध्ये साम्य आढळले, म्हणजे एकाने दुसऱ्याची नक्कल केली असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.

सिंधू संस्कृतीशी समकालीन

ट्रश्के यांनी मुद्रेवरील प्रतिमा ही युरेशियन परंपरेतील ‘प्राण्यांच्या अधिपती’ची असावी असे म्हटले आहे. प्रोटो-एलामाइट संस्कृती आजच्या नैऋत्य इराणमध्ये साधारण इ.स.पू. ३२०० ते इ.स.पू. २७०० या काळात विकसित झाली. ही संस्कृती सिंधू संस्कृतीच्या आरंभीच्या टप्प्यांशी काही प्रमाणात समकालीन होती. पश्चिम आशिया, इराण, मध्य आशिया आणि सिंधू प्रदेश यांच्यातील व्यापारसंबंध लक्षात घेतले, तर प्रतीकांची देवाणघेवाण किंवा प्रतिमाशैलीचा प्रभाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बहुअर्थी पुरातत्त्वीय परंपरा

परंतु, सिंधु संस्कृतीकालीन मुद्रांचा संबंध पूर्णपणे बाह्य प्रभावांशी जोडणे तितकेच धोकादायक आहे. सिंधू संस्कृतीची स्वतःची स्वतंत्र प्रतीकपरंपरा असण्याची शक्यता मोठी आहे. त्यामुळे या आकृतीला शिव किंवा प्रोटो-एलामाइट देवता अशा एकरेषीय ओळखीत बंदिस्त करण्याऐवजी तिला बहुअर्थी पुरातत्त्वीय प्रतिमा म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते.