Shaivism in Pakistan-Occupied Kashmir: भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला (ASI) पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील गिलगिट येथील एका खडकावर संस्कृत कोरीव लेख सापडला आहे. हा कोरीव लेख ब्राह्मी लिपीत लिहिलेला असून तो अंदाजे चौथ्या शतकातील आहे. भारतीय पुरातत्त्व शिलालेख विभागाचे संचालक के. मुनिरत्नम रेड्डी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, हा कोरीव लेख महेश्वरलिंगाच्या स्थापनेसंदर्भातील आहे. कोणी एका पुष्पसिंह नावाच्या माणसाने आपल्या गुरूंच्या पुण्यस्मृती प्रित्यर्थ महेश्वरलिंगाची स्थापना केली होती. या व्यक्तीच्या गुरूंच्या नावाचाही उल्लेख या कोरीव लेखात करण्यात आलेला आहे. परंतु, ते नाव स्पष्ट दिसत नाही. अशाच प्रकारचा एक कोरीव लेख काही महिन्यांपूर्वी पेशावर येथे सापडला होता. तो संस्कृत भाषेत आणि शारदा लिपीत लिहिलेला होता. या लेखात बुद्धधारिणी मंत्राचा संदर्भ होता. गिलगिट हा भाग पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतो, या ठिकाणाला शैव परंपरेचा समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहास आहे. गिलगिट हे प्राचीन रेशीम मार्गावरील एक महत्त्वाचे केंद्र होते. गिलगिटचे स्थान (काश्मीरमध्ये) दक्षिण आशिया व मध्य आशिया आणि चीनशी जोडणाऱ्या मार्गावर होते. या स्थानामुळे या भागात सांस्कृतिक आणि धार्मिक देवाणघेवाणीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. गिलगिटमधील शैव परंपरा इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकांत विशेषतः कुषाण आणि गुप्त साम्राज्यांच्या काळात अधिक विकसित होत गेल्याचे दिसून येते. अलीकडेच सापडलेल्या महेश्वरलिंगचा उल्लेख असलेल्या संस्कृत कोरीव लेखाने या भागातील शैव उपासनेचे अस्तित्व सिद्ध केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर या भागातील शैव संप्रदायाची परंपरा नेमकं काय सांगते? याचा घेतलेला हा आढावा.

अधिक वाचा: Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?

pune Dasnavami celebrations loksatta news
आनंदाश्रमातील दासनवमी उत्सवाची शंभरीकडे वाटचाल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
shirdi sai baba darshan prasad
Shirdi Sai Baba Trust: शिर्डीत मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांचा त्रास, साईबाबा संस्थानानं भोजन प्रसादाबाबत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
Gods Guns and Missionaries The Making of Modern Hindu Identity Hindu
‘हिंदू कोण’ याचा शोध
Jitendra Awhad
Namdeo Shastri : “समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट”, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया चर्चेत
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Loksatta kutuhal Stone of Ghrishneshwar temple
कुतूहल: घृष्णेश्वर मंदिराचा पाषाण
maha Kumbh Mela and flow of techniques in Hindu religion culture society structure
‘कुंभमेळा’ आणि हिंदू धर्म-संस्कृती-समाज रचना यांतील तंत्र प्रवाह!

काश्मीरमधील शैव परंपरेचा इतिहास

सध्या काश्मीर म्हटलं की, आपल्या डोक्यात पाकिस्तान, दहशतवादी असेच चित्र उभे राहते. परंतु, या भूमीला गेल्या हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. १२ व्या शतकात लिहिलेल्या कल्हणाच्या ‘राजतरंगिणी’ या ग्रंथातून काश्मीरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा विस्तृत आढावा मिळतो.

आठव्या शतकापूर्वी काश्मीर बौद्ध धर्माच्या अभ्यासाचे केंद्र मानले जात होते. इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा प्रभाव काश्मीरमध्ये पोहोचला होता. नंतरच्या काही शतकांत विशेषतः कनिष्काच्या राज्यकाळात काश्मीर हा भाग बौद्ध सर्वस्तिवाद, गांधार कलाकृती आणि महायान बौद्ध परंपरा यांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला होता. बौद्ध धर्माबरोबरच नाग पूजेसारख्या स्थानिक श्रद्धा आणि प्राचीन शैव आगमांची बीजेही रुजली या भूमीत. काश्मीरमध्ये शैव परंपरेच्या प्रारंभिक कालखंडाबद्दलचा संपूर्ण इतिहास ज्ञात नाही. काही अभ्यासकांनी शिवपूजेचे प्राचीन पुरावे हडप्पा कालखंडापासून आढळतात, असे नमूद केले आहे. काश्मीरमधील शिवपूजा स्थानिक होती की, ती इतर कुठून आली यावर ठोस विधान करणे कठीण आहे. कल्हणाने काश्मीरमध्ये अशोकपूर्व काळातही शिवपूजेचे अस्तित्व होते असे म्हटले आहे. कुशाणांच्या नाण्यांवर महेश्वराच्या प्रतिमा आढळतात. आठव्या शतकाच्या आधीचे संदर्भ अपुरे असले तरी कल्हणाच्या ‘राजतरंगिणी’ ग्रंथात शिवमंदिरांच्या स्थापनेचे विपुल उल्लेख आढळतात.

कर्कोटा राजवंशाचा प्रभाव

सातव्या शतकात कर्कोटा राजवंशाने काश्मीरवर राज्य केले. या काळात शैव परंपरेला मोठा राजश्रय मिळाला. सम्राट ललितादित्य यांनी शिव ज्येष्ठरुद्राचे मंदिर उभारले आणि त्याच्या देखभालीसाठी जमिनी व गावांचे अनुदान दिले होते. त्यांच्या मंत्र्यांनीही शिवमंदिरे उभारून परंपरेला बळ दिले. कर्कोटा राजवंशानंतर आलेल्या उतपला राजवंशानेही शैव परंपरेला राजाश्रय दिला. काश्मीरमधील सुरुवातीची शैव परंपरा पाशुपत पंथाशी संबंधित होती. पशुपती, पशू आणि पाश या तिन्हीही कल्पना या संप्रदायाने स्वीकारल्या आहेत. पशुपती म्हणजे परमेश्वर, पशू म्हणजे जीव आणि मल, कर्म, माया, रोधशक्ती व बिंदू असा पंचविध पाश आहे. या परंपरेने योगसाधना आवश्यक मानली. परंतु, परमेश्वराची भक्ती व ध्यान यांस प्राधान्य दिले आहे.

भक्ती किंवा तत्त्वविचार नसेल, तर कर्मकांड व्यर्थ होय आणि भक्ती व तत्त्वचिंतन असेल, तर बाह्यकर्मकांड असले किंवा नसले तरी सारखेच, असे मानले आहे. या परंपरेतील तत्त्वज्ञान द्वैतवादी असले तरी आठव्या-नवव्या शतकापासून काश्मीर शैव तत्त्वज्ञानाने अद्वैत तत्त्वज्ञानाचा अवलंब केला. हे तत्त्वज्ञान त्रिक शास्त्र म्हणून ओळखले जाते. शैव संप्रदायाच्या द्वैतवादी, विशिष्टाद्वैतवादी व अद्वैतवादी अशा ज्या तत्त्वज्ञानदृष्टया तीन शाखा आहेत. त्यातील ही अद्वैत्ववादी शाखा होय. या संप्रदायाला अद्वयवादही म्हणतात. हा संप्रदाय अष्टांगयोगमार्गी आहे.

त्रिक शैव तत्त्वज्ञानाचा विकास

त्रिक शास्त्र हे काश्मीरमधील शैव तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. याची सुरुवात आठव्या शतकात वसुगुप्त यांनी केली. राजतरंगिणी या ग्रंथात वसुगुप्त यांना सिद्ध म्हटले आहे. वसुगुप्त यांनी ‘शिवसूत्र’ या ग्रंथात अद्वैत तत्त्वज्ञानाची तत्त्वं सोप्या शैलीत मांडली आहेत. नंतर सोमानंद, उत्कलदेव आणि अभिनवगुप्त यांनी या तत्त्वज्ञानाचा विस्तार केला. अभिनवगुप्त यांनी ‘तंत्रलोक’ हा ग्रंथ लिहून शैव तत्त्वज्ञान आणि तांत्रिक परंपरेचे विस्तृत विवेचन केले. त्रिक शास्त्र तीन शिव (ईश्वर), शक्ती (ऊर्जा), अनु (जीव) या तीन तत्त्वांवर आधारित आहे. हे तत्त्वज्ञान शैव परंपरेत आत्म्याचा आणि ब्रह्माचा संबंध समजावून सांगते. त्रिक परंपरेत स्पंद सिद्धांत महत्त्वाचा आहे.

शैव परंपरेतील तांत्रिक दृष्टिकोन

काश्मीरमधील शैव परंपरेत तांत्रिक पद्धतींना महत्त्वाचे स्थान आहे. कुलाचार आणि त्रिकाचार या परंपरांमध्ये ध्यान आणि साधनेद्वारे आत्मानुभव मिळवणे महत्त्वाचे मानले जाते. शैवयोगात संसारात राहूनही ध्यान व साधना करून मोक्षप्राप्ती साधता येते असा दृष्टिकोन आहे.

अधिक वाचा: Maha Kumbh Mela 2025: औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित का? 

राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव

ललितादित्य आणि अवंतिवर्मन यांच्या काळात शैव परंपरेला प्रचंड राजाश्रय मिळाला. मंदिरबांधणी, साहित्यनिर्मिती आणि तत्त्वज्ञानाचा प्रसार यासाठी या राजांनी प्रयत्न केले. बौद्ध आणि शैव परंपरांमधील संवाद आणि वादविवादही याच काळात झाले.

शैव परंपरेची वैशिष्ट्ये

काश्मीरमधील शैव परंपरेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिचा सर्वसमावेशक आणि उदार दृष्टिकोन. जाती, धर्म, लिंग यावर आधारित कोणतेही बंधन या परंपरेत नव्हते. शैव परंपरेने बौद्ध, जैन आणि इतर हिंदू तत्त्वज्ञानांशी संवाद साधून स्वतःची ओळख निर्माण केली. काश्मीरमधील शैव तत्त्वज्ञान हे केवळ धार्मिक परंपरा नसून एक संपूर्ण जीवनशैली होती.

अभिनवगुप्त: शैव परंपरेचा महान तत्त्वज्ञ

अभिनवगुप्त यांचे कार्य काश्मीरमधील शैव परंपरेचा कळस मानले जाते. त्यांनी ‘तंत्रलोक’, ‘ईश्वरप्रत्यभिज्ञा’ आणि ‘अभिनवभारती’ यांसारखे ग्रंथ लिहून तत्त्वज्ञान, साहित्य आणि तंत्रविद्या यांचा एकत्रित अभ्यास मांडला. त्यांच्या योगदानामुळे शैव परंपरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. काश्मीरमधील शैव तत्त्वज्ञानाचा प्रभाव फक्त भारतापुरता मर्यादित राहिला नाही. दक्षिणेकडील शैव परंपरांवरही काश्मीर शैव तत्त्वज्ञानाचा प्रभाव जाणवतो. आधुनिक काळातील बौद्धिक वादविवाद आणि साहित्य निर्मितीवरही या परंपरेचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. काश्मीरमधील शैव परंपरा ही भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाचा अमूल्य भाग आहे. तिचा अभ्यास केल्याने भारतातील विविध परंपरांचे अद्वितीय स्वरूप समजते.

Story img Loader