US Venezuela conflict अमेरिकेने व्हेनेझुएला या देशावर अचानक मोठा हवाई हल्ला केला, त्यामुळे व्हेनेझुएला देशात मोठी खळबळ उडाली. या हल्ल्याच्या काही तासानंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकन सैन्यांनी ताब्यात घेतले. अमेरिकेच्या डेल्टा फोर्सच्या सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतले. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ४० जणांचा मृत्यू झाला. मादुरो सरकारमुळे अमली पदार्थ आणि गुन्हेगार मोठ्या प्रमाणात अमेरिकेत पाठवले गेले, असा आरोप अमेरिकन प्रशासनाने केला आहे. मादुरो यांच्या अटकेनंतर अमेरिकेतील लाखो व्हेनेझुएलियन नागरिक अडचणीत सापडले आहेत. अमेरिकेतील सहा लाख नागरिकांवर हद्दपारीचे संकट ओढवले आहे. त्यामागील नेमकं कारण काय? जाणून घेऊयात…
व्हेनेझुएलात नक्की काय घडलं?
अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर रात्रीच्या वेळी हल्ला केला. अमेरिकन सैन्यांनी कारवाई केल्यानंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला रात्री त्यांच्या बेडरूममधून अमेरिकन सैन्यांनी ताब्यात घेतले. दरम्यान, निकोलस मादुरो यांना ताब्यात घेण्यात आले तेव्हा ते कराकसमधील अतिशय कडक सुरक्षा असलेल्या एका लष्करी संकुलात झोपलेले होते. मात्र, तरीही अमेरिकन सैन्यांनी त्यांना ताब्यात घेतलं.
व्हेनेझुएलामधून अमेरिकेत मोठी ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दुसरीकडे- व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेचे ड्रग्ज तस्करीचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. यादरम्यान त्यांनी व्हेनेझुएलावर अनेक निर्बंधदेखील लादले आहेत. निकोलस मादुरो यांच्या डोळ्यावर काळी पट्टी आणि हातात बेड्या घालून त्यांना अमेरिकेत नेण्यात आले.
मादुरो यांच्या अटकेचा व्हेनेझुएलातील नागरिकांवर परिणाम
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवल्याचा तेथील नागरिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’ने (डीएचएस) अलीकडेच जाहीर केले की, अमेरिकेत ‘टेम्पररी प्रोटेक्टेड स्टेटस’ (टीपीएस) अंतर्गत राहणाऱ्या व्हेनेझुएलाच्या नागरिकांना आता निर्वासित (रेफ्युजी) दर्जासाठी अर्ज करावा लागणार आहे. ट्रम्प यांनी स्थलांतर धोरण आधीच कडक केले आहेत. परिणामी सुमारे सहा लाख व्हेनेझुएला नागरिकांना पर्यायी कायदेशीर दर्जा न मिळाल्यास हद्दपारीचा सामना करावा लागू शकतो. अशातच आता त्यांना निर्वासित दर्जासाठी अर्ज करावा लागणार आहे. विविध अहवालांनुसार, सध्या अंदाजे आठ लाख व्हेनेझुएलातील नागरिक निर्वासित जीवन जगत आहेत.
‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत, ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’चे सचिव क्रिस्टी नोएम यांनी जो बायडेन प्रशासनाच्या काळातील व्हेनेझुएला नागरिकांसाठीचे टीपीएस संरक्षण रद्द करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन केले. नोएम यांनी सांगितले की, या निर्णयामुळे अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्याचे पालन करणे शक्य होईल. तसेच मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर व्हेनेझुएला कालच्या तुलनेत आज अधिक स्वतंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्याकडे आधी टीपीएस संरक्षण होते, त्यांना आता निर्वासित दर्जासाठी अर्ज करण्याची संधी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘टेम्पररी प्रोटेक्टेड स्टेटस’ (टीपीएस) म्हणजे काय?
‘टेम्पररी प्रोटेक्टेड स्टेटस’ हा एक इमिग्रेशन कार्यक्रम आहे. याद्वारे संघर्ष, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या देशांतील नागरिकांना हद्दपारीच्या भीतीशिवाय अमेरिकेत कायदेशीररित्या राहण्याची आणि काम करण्याची परवानगी मिळते. टीपीएसमुळे कायमस्वरूपी वास्तव्य किंवा नागरिकत्वाचा मार्ग उपलब्ध होत नाही. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीद्वारे या कार्यक्रमाचे पुनरावलोकन, मुदतवाढ किंवा तो रद्द केला जाऊ शकतो.
धोरणात्मक बदलामुळे वाद?
धोरणातील या बदलामुळे विशेषतः व्हेनेझुएला समुदायाचे वास्तव्य असलेल्या भागात वाद निर्माण झाला आहे. मियामीच्या महापौर आयलीन हिगिन्स यांनी हे संरक्षण काढून घेणे बेजबाबदार, धोकादायक आणि चुकीचे असल्याचे सांगत टीका केली आहे. असुरक्षित कुटुंबांच्या रक्षणासाठी त्यांनी फेडरल सरकारला टीपीएस पुन्हा लागू करण्याची विनंती केली आहे. त्याच वेळी, व्हेनेझुएलाच्या स्थलांतरितांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
अमेरिकेतील काही व्हेनेझुएला नागरिकांनी मादुरो यांची सत्ता गेल्याचा आनंद साजरा केला (फ्लोरिडा आणि शिकागोमध्ये सार्वजनिक सेलिब्रेशन झाले), तर काहींनी या धोरण बदलामुळे इमिग्रेशन कारवाईबद्दल भीती आणि चिंता व्यक्त केली आहे. काही वकिलांच्या मते, निर्वासित दर्जा हा अमेरिकेत राहण्यासाठी एक संभाव्य मार्ग आहे, मात्र ‘असायलम’ आणि निर्वासित यंत्रणेत आधीच अर्जांचा मोठा ढीग साचलेला आहे. केवळ पात्र ठरल्याने संरक्षणाची खात्री मिळत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
अमेरिकेची व्हेनेझुएलातील तेल साठ्यांवर नजर?
निकोलस मादुरो यांना ताब्यात घेण्याच्या लष्करी कारवाईनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिकन तेल कंपन्यांना व्हेनेझुएलामध्ये पुन्हा प्रवेश मिळवून देणे आणि तिथल्या अफाट कच्च्या तेलाच्या संसाधनांचा वापर करण्याची वॉशिंग्टनची इच्छा आहे. ‘ओपेक’नुसार, व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वांत मोठा प्रमाणित तेल साठा आहे. हा साठा अंदाजे ३०३.२२१ अब्ज बॅरल इतका आहे. या बाबतीत व्हेनेझुएला सौदी अरेबिया (२६७.२०० अब्ज बॅरल) व इराणच्याही पुढे आहे. असे असूनही तिथले उत्पादन अत्यंत खालावलेले आहे.
‘थर्ड ब्रिज’ या जागतिक संशोधन संस्थेचे पीटर मॅकनॅली यांच्या मते, व्हेनेझुएला सध्या दररोज सुमारे १० लाख बॅरल तेलाचे उत्पादन करतो. १९९९ मध्ये जेव्हा मादुरो यांचे पूर्ववर्ती ह्युगो चावेझ सत्तेवर आले होते, तेव्हा हे उत्पादन प्रतिदिन सुमारे ३५ लाख बॅरल इतके होते. ते म्हणतात, “दुर्लक्ष, खराब पायाभूत सुविधा, गुंतवणुकीचा अभाव आणि भ्रष्टाचार यांमुळे देशाची उत्पादन क्षमता कमी झाली आहे.” ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात २०१९ मध्ये लादलेल्या अमेरिकन निर्बंधांमुळे ही घसरण अधिकच वाढली आहे. पुढच्याच वर्षी उत्पादन ३,५०,००० बॅरल प्रतिदिन या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचले.
ट्रम्प म्हणाले, “आपल्या सभोवताली सुरक्षित देश असणे आवश्यक आहे आणि आपल्याकडे ऊर्जा असणेही खूप महत्त्वाचे आहे.” जमिनीतून मोठ्या प्रमाणावर तेल बाहेर येत असल्याचे नमूद करीत त्यांनी असा दावा केला की, अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये जो काही खर्च केला आहे, तो पूर्णपणे वसूल केला जाईल. ‘साइट गेस्टियन प्रायव्हेट बँक’चे जॉन प्लासार्ड यांनी ‘एएफपी’ला सांगितले, “ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की, काराकसद्वारे निर्बंधांखाली निर्यात केलेले तेल हे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून चोरलेले तेल आहे.”
ट्रम्प यांचा असा दावा आहे की, यातील बरेचसे तेल ह्युगो चावेझ यांच्या राष्ट्रीयीकरणापूर्वी अमेरिकन उपकरणे आणि गुंतवणुकीचा वापर करून काढले गेले होते. अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट अमेरिकन खंडातून चीनला मागे ढकलणे हेदेखील आहे. त्यामध्ये पनामा कालव्यावर चीनचा प्रभाव मर्यादित करणे समाविष्ट आहे. या कालव्यातून व्हेनेझुएलाच्या तेलाची मोठी वाहतूक होते.
तेलाच्या किमतींवर याचा काय परिणाम होईल?
विश्लेषकांचे म्हणणे आहे की, जागतिक बाजारपेठेत आधीच पुरेसा पुरवठा आहे. व्हेनेझुएलातील उलथापालथीचा तेलाच्या किमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही. या आठवड्यात केवळ किरकोळ वाढ अपेक्षित आहे. प्लासार्ड म्हणाले, “बंदरांच्या आसपासची रसद विस्कळीत होऊ शकते.” ते पुढे म्हणाले की, बाजाराला कदाचित इराणला ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यांची अधिक चिंता वाटू शकते, कारण इराण जास्त तेलाचे उत्पादन करतो.
