72 Tigers Dead थायलंडमधील एका खाजगी पर्यटन केंद्रात अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत किमान ७२ वाघांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे वन्यजीव अधिकारी आणि प्राणी कल्याण संस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. चोनबुरी प्रांतातील एका पार्कमध्ये या मृत्यूंच्या घटना घडल्याची माहिती आहे. या पार्कमध्ये शेकडो वाघांचे प्रजनन केले जाते. या पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांना वाघांना जवळून पाहण्याची, त्यांच्याबरोबर फोटो काढण्याची आणि स्पर्श करण्याची संधी दिली जाते. एक प्रकारे हा तेथील व्यवसायच आहे. मात्र, वाघांच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण? कोणत्या विषाणूच्या प्रसाराने वाघांचा मृत्यू झाला? माणसांना या विषाणूचा धोका आहे का? सविस्तर जाणून घेऊयात…

७२ वाघांच्या मृत्यूचे कारण काय?

७२ वाघांचा मृत्यू वेगाने पसरणाऱ्या विषाणूजन्य संसर्गामुळे झाला आहे. हा संसर्ग ‘फेलाइन पॅन्युकोपेनिया’ किंवा ‘फेलाइन डिस्टेंपर’ असल्याचा संशय आहे. हा अत्यंत संसर्गजन्य रोग असून तो कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या मोठ्या प्राण्यांसाठी (वाघ, सिंह इ.) प्राणघातक ठरू शकतो. थाई नॅशनल पार्क, वन्यजीव आणि वनस्पती संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यांनी परिसराचे विलगीकरण केले आहे आणि उर्वरित प्राण्यांची चाचणी केली जात आहे. या घटनेमुळे थायलंडमधील ‘टायगर टुरिझम’ उद्योगाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या पार्कमधील प्रजननाच्या पद्धती, पशुवैद्यकीय मानके आणि प्राण्यांच्या कल्याणाबाबत कायमच टीका होत आली आहे. जे पार्क पर्यटकांना वाघांना खाऊ घालण्याची, कुरवाळण्याची किंवा त्यांच्याबरोबर फोटो काढण्याची परवानगी देतात, तिथे वाघांची संख्या खूप जास्त असते आणि त्यामुळे त्यांचे अनुवांशिक व्यवस्थापन आणि रोग नियंत्रणाबाबत प्रश्न निर्माण होतात. वन्यजीव प्रेमींचे असे म्हणणे आहे की, अति प्रजनन आणि प्राण्यांची संख्या जास्त असल्यामुळे संसर्ग वेगाने पसरण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाघांच्या या मृत्यूंसाठी निष्काळजीपणा, अपुरे लसीकरण प्रोटोकॉल किंवा निकृष्ट प्रतिबंधात्मक उपाय कारणीभूत आहेत का, याचा तपास अधिकारी करत आहेत.

फेलाइन डिस्टेंपर व्हायरस म्हणजे काय?

फेलाइन डिस्टेंपर व्हायरस याला ‘फेलाइन पॅन्युकोपेनिया व्हायरस’ (एफपीव्ही) म्हटले जाते. हा अत्यंत संसर्गजन्य आणि अनेकदा जीवघेणा विषाणूजन्य रोग आहे. याचे नाव ‘डिस्टेंपर’ असले तरी हा कुत्र्यांमध्ये होणाऱ्या ‘कॅनाइन डिस्टेंपर’पेक्षा वेगळा विषाणू आहे. एफपीव्ही हा ‘पार्बोव्हायरस’ कुटुंबातील आहे. हा विषाणू शरीरातील वेगाने विभाजित होणाऱ्या पेशींवर, विशेषतः हाडांमधील मज्जा, आतडे आणि विकसित होणाऱ्या गर्भावर हल्ला करतो. हा विषाणू अस्थिमज्जेला हानी पोहोचवून पांढऱ्या रक्तपेशींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करतो; या स्थितीला ‘पॅन्युकोपेनिया’ म्हणतात. यामुळे संक्रमित प्राण्यांची रोगप्रतिकारशक्ती अत्यंत कमकुवत होते आणि ते इतर दुय्यम संसर्गांना बळी पडतात.

हा आजार संक्रमित प्राण्यांशी थेट संपर्क, त्यांचे पिंजरे, अंथरूण आणि अन्नाची भांडी यांसारख्या दूषिततेमुळे पसरतो. हा विषाणू वातावरणात अनेक महिने जिवंत राहू शकतो, त्यामुळे निवारा केंद्रे किंवा प्रजनन केंद्रांसारख्या गर्दीच्या ठिकाणी हा संसर्ग रोखणे कठीण होते. संक्रमित वाघांना ताप, सुस्तपणा, उलट्या, निर्जलीकरण आणि भूक न लागणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. लहान पिल्ले याला लवकर बळी पडतात आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यूचे प्रमाण जास्त असते. यावर कोणताही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार नाही. मात्र, वेळेवर पशुवैद्यकीय मदत मिळाल्यास, जसे की सलाईन, दुय्यम संसर्ग टाळण्यासाठी प्रतिजैविके आणि विलगीकरण आदींमुळे जीव वाचण्याची शक्यता वाढते. लसीकरण हाच या रोगाला रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

हा विषाणू कसा पसरतो?

फेलाइन पॅन्युकोपेनिया विषाणू प्रामुख्याने लाळ, नाकातील द्रव, लघवी आणि विष्ठा यांसारख्या संक्रमित शारीरिक द्रवांच्या थेट संपर्कातून किंवा दूषित वातावरणातून पसरतो. संक्रमित प्राण्यांद्वारे हा विषाणू मोठ्या प्रमाणात बाहेर टाकला जातो आणि तो पिंजरे, खाऊ घालण्याची भांडी आणि काळजी घेणाऱ्यांच्या कपड्यांवरही अनेक महिने टिकून राहू शकतो. या विषाणूचे साध्या स्वच्छतेने निर्मूलन करणे शक्य नसते. संक्रमित प्राणी लक्षणे दिसण्यापूर्वीच विषाणू पसरवण्यास सुरुवात करू शकतात.

बंदिस्त अवस्थेत असलेले प्राणी एकमेकांच्या जवळ असतात, त्यामुळे संक्रमणाचा धोका वेगाने वाढतो. सामायिक जागा, सांडपाण्याची सामायिक व्यवस्था, पाण्याचे साठे आणि विविध पिंजऱ्यांमध्ये एकाच उपकरणांचा वापर केल्यामुळे हा संसर्ग वेगाने पसरू शकतो. टुरिस्ट पार्क किंवा प्रजनन केंद्रांमध्ये हा विषाणू एका पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात पोहोचू शकतो. वाघांच्या पिल्लांची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसल्यामुळे ती अधिक असुरक्षित असतात. जर लसीकरण अपूर्ण असेल किंवा सुरक्षा नियम कमकुवत असतील तर संसर्ग वेगाने पसरून अनेक प्राण्यांना बाधित करू शकतो.

हा विषाणू माणसांवर परिणाम करू शकतो का?

फेलाइन पॅन्युकोपेनिया विषाणू माणसांमध्ये पसरत नाही. हा पार्बोव्हायरस प्रामुख्याने पाळीव मांजरी आणि वाघ, सिंह व बिबट्या यांसारख्या वन्य प्राण्यांना संक्रमित करतो. हा विषाणू विशिष्ट प्रजातींपुरताच मर्यादित आहे, म्हणजेच तो माणसांना संक्रमित करण्याची क्षमता ठेवत नाही. मात्र, असे असले तरी माणूस या विषाणूचे वाहक ठरू शकतात. याचा अर्थ असा की, जर एखादी व्यक्ती संक्रमित प्राण्याला किंवा दूषित वस्तूंना (पिंजरे, कपडे इ.) स्पर्श करते, तर ती नकळतपणे आपल्या कपड्यांवर, बुटांवर किंवा हातांवरून हे विषाणू एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याकडे नेऊ शकते. परंतु, हा विषाणू मानवी शरीरात वाढू शकत नाही.

यावर उपचार काय?

वाघांमधील फेलाइन पॅन्युकोपेनियावर कोणताही विशिष्ट अँटीव्हायरल औषधोपचार नाही. ‘सपोर्टिव्ह केअर’ आणि विलगीकरणच यात प्रमुख भूमिका निभावतात. संक्रमित वाघांना निर्जलीकरण टाळण्यासाठी सलाईन देणे, इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखणे आणि उलट्या नियंत्रित करण्यासाठी पशुवैद्यकीय उपचारांची गरज असते. प्राण्याची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असताना होणारे जीवाणूजन्य संसर्ग रोखण्यासाठी ब्रॉड-स्पेक्ट्रम प्रतिजैविके दिली जातात.

गंभीर प्रकरणांमध्ये जर पांढऱ्या रक्तपेशींची संख्या खूपच कमी झाली, तर पोषण आहार आणि प्लाझ्मा किंवा रक्त पुरवले जाते. वैद्यकीय उपचारांइतकेच कडक सुरक्षा नियम पाळणे महत्त्वाचे आहे. आजारी प्राण्यांना वेगळे ठेवणे, पार्बोव्हायरसवर प्रभावी असलेल्या जंतुनाशकांनी परिसर निर्जंतुक करणे आणि उर्वरित वाघांवर बारीक लक्ष ठेवल्यास हा संसर्ग अधिक पसरणार नाही.