एका आंब्याच्या झाडावरून होणारा वाद आपण नेहमीच ऐकतो. किमान महाराष्ट्रात तरी एका झाडाच्या मालकी हक्कावरून भाऊबंदकीत होणाऱ्या वादाची चर्चा नेहमीच होत असते. परंतु चक्क एका आंब्याच्या फळावरून झालेल्या आणि त्यानंतर ४० वर्षे चाललेल्या खटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही घटना १९८४ साली उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील लोरहिया घाटा गावात घडली होती. दोन लहान मुलांच्या भांडणातून सुरु झालेल्या या प्रकरणाने खून आणि नंतर ४० वर्षांचा खटला पाहिला.

नेमकं काय घडलं होत?

डब्बू आणि रुद्र नावाचे दोन मित्र खेळत असताना, डब्बूची नजर एका पडलेल्या आंब्यावर गेली. रुद्र बाजूलाच होता, त्याने सांगितले तो आंबा त्याचाच आहे. यावरून दोघांमध्ये भांडण झाल. डब्बूने त्या आंब्यावर मालकी हक्क सांगितला. तो म्हणाला, हे शेत माझ्या वडिलांच्या मालकीचं आहे. त्यामुळे या आंब्यावर हक्क माझाच आहे. खरंतर भांडण दोन लहान मुलांमधलं होत, ज्यांची आज वय ५० पेक्षा अधिक आहेत. परंतु घडलं काही वेगळंच… अचानक डब्बूच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला आणि शेतात काम करणारे त्याचे वडील विश्वनाथ आवाजाच्या दिशेने धावले. न्यायालयीन कागदपत्रांमध्ये म्हटले आहे की, ते ज्यावेळी तेथे पोहचले त्यावेळी रुद्रचे वडील आणि काही इतर डब्बूला लाठीने मारत होते, त्यामुळे त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आवाज ऐकून जवळच काम करणारे त्यांचेच भाऊही धावत आले. त्यांनाही मारहाण झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात विश्वनाथ यांचा जीव गेला होता.

अधिक वाचा: Mughal Architecture एसीचा शोध लागण्यापूर्वी मुघलांनी आपले दरबार कसे थंड ठेवले?; कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते?

जन्मठेपेची सजा

आरोपी म्हणून रुद्रचे वडील अयोध्या सिंग आणि इतर चौघांना अटक करण्यात आली. ४ एप्रिल १९८६ रोजी, गोंडा जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने पाचही संशयितांना खून, दंगल आणि बेकायदेशीर एकत्रिकरण यासह इतर संबंधित आयपीसी कलमांखाली दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींनी त्याच वर्षी अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील दाखल केले. अपील दाखल होताच या पाचही जणांची जामिनावर सुटका करण्यात आली. अलाहाबाद हायकोर्टाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीत २०१७ साली म्हणजेच आरोपींनी अपील केल्यानंतर ३० वर्षांनी पहिल्यांदाच सत्र न्यायालयाच्या आदेशावर हे प्रकरण सूचीबद्ध केले गेले. तोपर्यंत रुद्रचे वडील अयोध्या सिंह आणि काका लालजी सिंह यांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर २०२२ मध्ये, उच्च न्यायालयाने मान बहादूर सिंग, भरत सिंग आणि भानू प्रताप सिंग या तिन्ही आरोपींना कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा कायम ठेवली, ते अद्याप जिवंत आहेत. परंतु २४ जुलै २०२४ रोजी सर्वोच्च नायायालयाने शिक्षेत घट करून उर्वरित आरोपींना सात वर्षांची शिक्षा सुनावली. एकूणच हा खटला ४० वर्षे चालल्यामुळे चर्चेत आहे.

आंब्यावरून झालेले युद्ध, प्रेम, मतभेद

आंबा हे भारतातील सर्वात प्रसिद्ध फळ आहे. राजापासून ते सामान्य माणसापर्यंत आंबा हे फळ सर्वांचेच लाडके आहे. आंब्याला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. आंबा या फळाला भारतीय साहित्य, पुराकथा, कला यात विशेष महत्त्व आहे. भारतात आंब्यांच्या जाती आणि त्यांना देण्यात आलेली नावं, विशेषणे अनेक आहेत. या नावांचा आणि विशेषणांचा अर्थ शोधायचे ठरवले तर प्रत्येक नाव आपल्या व्युत्पत्तीची स्वतंत्र कथा सांगते. अल्फान्सो हे नाव पोर्तुगीज गव्हर्नरच्या नावावरून आले आहे, केसर हे केसरावरून आलेलं नाव आहे आणि लंगडा हे अपंग शेतकऱ्याच्या नावावरून नाव दिले गेले आहे. याशिवाय, आपल्याकडे हरामजादा आहे, जो दिसायला चांगला आहे आणि चौसा आहे ज्याचं नाव शेरशाह सूरीने बिहारमध्ये हुमायूनवर विजय मिळवल्यानंतर ठेवलं. आंबा फळ भारतीय संस्कृतीत पवित्र मानले गेलं आहे असं पत्रकार सोपान जोशी म्हणतात. त्यांनी त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘मँगीफेरा इंडिका’ या पुस्तकात या फळाचा इतिहास नोंदवला आहे.

आंबा हे तर प्रेमाचं प्रतीक ..

भारतीय पौराणिक कथांमध्ये आंब्याचे विपुल संदर्भ सापडतात. हिंदू आणि बौद्ध या दोन्ही परंपरांमध्ये हे फळ प्रजनन, समृद्धी आणि भक्तीशी संबंधित आहे. गणरायाने आपल्या भावाला हरवल्यानंतर त्याला बक्षीस म्हणून आंबा हे फळ मिळाले इथपासून ते आंब्याच्या झाडाखाली ध्यान करणाऱ्या बुद्धापर्यंत पौराणिक कथा आणि साहित्यात आंबा हा फळांचा राजा आहे. परंपरागतरित्या आंब्याचे फूल प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. पौराणिक संदर्भानुसार कामदेव आपल्या बाणांना फुललेल्या (मोहोर) आंब्याच्या फुलांचे तेल लावतो. याच संदर्भात इतिहासकार सोहेल हाश्मी सांगतात, आंब्याचे फूल हे प्रेमाला चालना देते. उसाच्या रसात या फुलांचा रस मिसळून एक मादक पेय तयार करण्यात येते. त्या पेयाला बौर असे म्हणतात. जे प्रेमात वेडे झाले आहेत किंवा एकूणच ज्यांना वेड लागलं आहे अशांसाठी हिंदीत बौराना ही संज्ञा म्हणूनच वापरली जाते.

अधिक वाचा: दख्खनमधील ‘या’ गुलामाने केला होता मुघलांचा पराभव

मुघल आणि आंबे

मुघल आंब्यांसाठी वाट्टेल ते करायला तयार होते याचे संदर्भ तत्कालीन कागदपत्रांमधून मिळतात. बाबराला एका आंब्याच्या पेटीच्या बदल्यात इब्राहिम लोदीचा पराभव करण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. बाबराचा मुलगा हुमायून यालाही आंब्याचा भारी मोह होता. त्यामुळे त्याच्या आवडीच्या आंब्यांना हुमायून पसंद किंवा इमाम पसंद म्हणूनही ओळखले जाते. अशाच प्रकारची गोष्ट चौसा आंब्याचीही आहे. शेरशाह सूरीने हुमायूनच्या सैन्याचा चौसा नावाच्या बिहारी गावात पराभव केल्यावर त्या आंब्याचे नाव चौसा ठेवले. अकबराने आंब्यांना नवीन उंची प्रदान केल्याचे मानले जाते.

एक लाखाची आंब्याची बाग

हाश्मी यांनी सांगितले की, अकबराने तब्बल एक लाख आंब्याची झाडे असलेली बाग लावली, त्यामुळे मोठ्या संख्येने आंब्याच्या लागवडीचे पूर्णवेळ व्यवसायात रूपांतर झाले. मुघल काळापर्यंत आंब्याची लागवड भारतीय उपखंडापुरतीच मर्यादित होती. हाश्मी यांच्या मते, अकबराच्या काळात फक्त रसाळ आणि मांसल असे फक्त दोन प्रकारचे आंबे होते. पोर्तुगीज जनरल अफान्सो डी अल्बुकर्क याच्या काळात या फळाचा युरोपियनांना अधिक जवळून आस्वाद घेता आला. अफान्सोने भारतातच आंब्याच्या विविध प्रकारांची लागवड केली. या लागवडीतून निर्माण झालेले फळ हे अधिक मांसल आणि गोड होते. ते पिळून आणि चोखण्याऐवजी चिरून खाण्यास दिले जाऊ शकत होते. त्या विकासाबरोबरच मोठ्या प्रमाणावर आंब्याची आणि त्याच्या कलमांची परदेशात निर्यात सुरु झाली.

दशेरीची कथा

१९ व्या शतकाच्या मध्यात लखनऊमधील नवाबाने दशेरी गाव ओलांडणाऱ्या आंबा शेतकऱ्यांवर कर लावला होता. याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी गावातील आंबे एका ठिकाणी टाकून दिले, या आंब्याच्या ढिगाऱ्याच्या ठिकाणी कालांतराने एक झाड वाढले. या झाडाच्या फळांच्या चवीने नवाब इतका मोहीत झाला की, त्याने त्या झाडाचे रक्षण करण्यासाठी सैनिक तैनात केले आणि पुनर्लागवड टाळण्यासाठी खाल्लेल्या दशेरीच्या सर्व बिया नष्ट केल्या. परंतु गावातील एका शेतकऱ्याला एक बी चोरण्यात यश आले आणि अशा प्रकारे हा आंबा देशभरात पसरल्याचे सांगितले जाते.

आंबा रसिकांचे आवडते फळ

आंब्याविषयी वाटणारे प्रेम हे प्रख्यात उर्दू कवी मिर्झा गालिबही व्यक्त करतात. गालिब आपल्या पत्रांमध्ये त्यांना आंब्याविषयी वाटणारी ओढ व्यक्त करतात. ते म्हणतात, ‘आंबा हे देवाने पाठवलेले फळ आहे. त्यांचं आंब्यावर इतकं प्रेम होत की, वयाच्या ६० वर्षी ते एकाच वेळी १० किंवा १२ पेक्षा जास्त आंबे खाऊ शकत नाहीत याची खंत त्यांनी एका पत्रात व्यक्त केली आहे.