प्रेम, प्रणय, राग, लोभ या भावना मानवी भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत. माणूस कितीही व्यवहारी असला तरी मनाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात या भावनांचा एक बंद पेटारा असतो. या भावनांचे स्वरूप व्यक्तीसापेक्ष असले तरी त्यांची होणारी अभिव्यक्ती ही परिणामकारक ठरते हे मात्र नक्की. प्रेमाने जग जिंकता येते, तर शस्त्राने राज्य करता येते हे समीकरण असलं तरी प्रेम किंवा तत्सम भावनेचा वापर शस्त्रासारखा झाला की हुकूमशहा जन्माला येतो. मानवी भावनांचा वापर करून मोठ्या जनसमूहावर राज्य करणे अधिक सोयीचे ठरते. किंबहुना राज्य करण्यासाठी याच भावनांचा शस्त्रासारखा वापर करता येतो, हे दाखविणारे अनेक दाखले इतिहासात आहेत. याचे उत्तम उदाहरण १९ वं शतक गाजवणाऱ्या हुकूमशहांच्या चरित्रातून दिसून येते. स्टॅलिन, मुसोलिनी, हिटलर, खोमेनी यांसारख्या हुकूमशहांनी आपल्या लेखणीतून प्रणय कथा- कवितांपासून ते अध्यात्मिक घोषणापत्रांपर्यंत अनेक बाबींना वाट मोकळी करून दिली. यापैकी अनेक हुकूमशहांना उपजत लेखनशैली नसूनही त्यांना मानवी अंतरंगाला हात घालणारी साहित्यसंपदा निर्माण का करावीशी वाटली याचा घेतलेला हा वेध!
डॅनियल काल्डर यांच्या ‘द इन्फर्नल लायब्ररी’ या पुस्तकात अनेक हुकूमशहांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात लेखक म्हणून केल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या इराकवरील आक्रमणाचा उगम सांगणाऱ्या स्टीव्ह कॉल यांच्या ‘एलिस ट्रॅप’ या पुस्तकात बऱ्याच ठिकाणी सद्दाम हुसेन यांच्या राजकारणाव्यतिरिक्त असलेल्या अनेक आवडीनिवडींचा उल्लेख आढळतो. देशाचा प्रमुख नेता मासेमारी, पोहणे, बुद्धिबळ खेळणे, लेखन करणे अशा अनेक गोष्टींचा छंद जोपासत होता. कॉल यांनी नमूद केल्याप्रमाणे सद्दाम हुसेन यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या फारशा चांगल्या नव्हत्या. त्यांची शैली रूक्ष गद्य होती, इतकेच नाही तर त्यांना लेखनाच्या दृष्टिकोनातून सूचना करणाऱ्या संपादकांच्या सूचनांकडेही त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. हुसेन यांच्या साहित्यिक रचनेपैकी एक जबिबाह आणि राजा (जबिबाह अॅण्ड द किंग) ही प्रणय कादंबरी आहे. २००० साली अज्ञात व्यक्तींनी या कादंबरीचे प्रकाशन घडवून आणले. राजा आणि त्याच्या प्रेमासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सुंदरीची कथा आहे. हा विषय हुसेन यांचा आवडता होता.
शाही कारस्थानं, प्रेम प्रकरणं आणि विश्वासघात
हुसेन यांनी शाही कारस्थान, प्रेम प्रकरणे आणि विश्वासघाताच्या इतरही अनेक कथा लिहिल्या. वरवर पाहता ‘जबिबाह अॅण्ड द किंग’ ही प्रणयकथा असली तरी या कथानकातील पात्रे राजकीय वर्तुळाचे प्रतिनिधित्त्व करताना दिसतात. कथेचा नायक अरब हा खुद्द सद्दाम हुसेन यांचे प्रतिनिधित्त्व करतो, जबिबाह ही दुःखी, गरीब स्त्री आहे, जी अरबच्या प्रेमात आहे. या कथेची नायिका इराकच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करते. जबिबाह विवाहित आहे, तिचा पती क्रूर असून तो ‘युनायटेड स्टेट्स’चे प्रतिनिधित्त्व करतो. शमिल हा या कथानकातील नायक- अरबचा आणखी एक शत्रू आहे, तो इस्रायलचे प्रतिनिधित्त्व करतो. कथानकात जबिबाह आणि अरब यांच्या प्रेमप्रकरणातील खलनायक नायिकेचा क्रूरकर्मा पती असून तो बलात्कारी आहे. कथेनुसार त्याने नायिकेवर १७ जानेवारी रोजी बलात्कार केला. ही तारीख ऐतिहासिक-राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्वाची आहे. या तारखेला १९९१ साली अमेरिकेने इराकी सैन्य कुवेत मधून हिसकावून लावले होते. कथानकाच्या शेवटी राजा बलात्काऱ्याला पकडून जबिबाहाचा प्रतिशोध घेतो, परंतु शेवटी त्याचेही देहावसान होते. विशेष म्हणजे हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर इराकमध्ये सर्वात जात खपाचे पुस्तक ठरले होते.
अधिक वाचा: स्वस्तिक: मांगल्य ते रक्तरंजित इतिहास व्हाया अॅडॉल्फ हिटलर
‘द इन्फर्नल लायब्ररी’ (The Infernal Library: On Dictators, the Books They Wrote, and Other Catastrophes of Literacy) यामध्ये डॅनियल काल्डर हे कॉल यांच्या हुसेन यांच्याविषयीच्या मताला दुजोरा देतात. हुसेन यांचे शब्द आणि रचना यांवर नियंत्रण नव्हते, त्यांच्या लेखनाचा पाया शोधताना संघर्ष करावा लागतो, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आपल्या मताच्या समर्थनार्थ काल्डर यांनी हुसेन यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक हुकूमशाहांची उदाहरणे दिली आहेत. त्यातील एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे हुसेन हे सत्तेवर येण्यापूर्वी दशकभर आधी मुसोलिनी याने ‘कार्डिनल्स मिस्ट्रेस’ ही कादंबरी लिहिली होती. या कादंबरीचे कथानक एका उत्कट प्रेमकथेभोवती फिरते. तसेच प्रेमकथेच्या माध्यमातून कथेचा विषय प्रस्थापित धार्मिक अधिसत्तेला विरोध दर्शवणारा होता. संपूर्ण युरोपीय खंड नाझींबरोबर हादरवून सोडण्याआधी इटालियन हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याने कॅथोलिक कार्डिनल आणि त्याची सुंदर मिस्ट्रेस यांच्यातील प्रेमसंबंधाबद्दल ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. विशेष म्हणजे ही प्रेमकथाही सामन्यांमध्ये लोकप्रिय आहे.
फ्रान्सिस्को फ्रँको बहामोंडे हा स्पॅनिश लष्करी जनरल होता, याने स्पॅनिश गृहयुद्धादरम्यान दुसरे स्पॅनिश प्रजासत्ताक उलथवून टाकण्यासाठी राष्ट्रवादी सैन्याचे नेतृत्व केले होते आणि त्यानंतर १९३९ ते १९७५ पर्यंत हुकूमशहा म्हणून स्पेनवर राज्य केले. स्पेनच्या फ्रँकोने ‘रझा’ हा एक कौटुंबिक मेलोड्रामा लिहिला. देशातील गृहयुद्धाच्या दरम्यान त्याच्या विरोधात विभागल्या गेलेल्या कुटुंबाची ही कथा आहे. या कथेच्या माध्यमातून त्याने आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय मुअम्मर अल-गद्दाफ़ी हा लिबियावर एकूण ४२ वर्षे राज्य करणारा हुकूमशाहा आहे. गद्दाफीनेही अनेक लघुकथा लिहिल्या. या हुकूमशहांच्या संग्रहात कवितांनाही तितकेच महत्त्वाचे स्थान आहे. चीनच्या माओ झेडॉंन यांनीही आयुष्यभर अनेक पद्य- चारोळ्या लिहिल्या. चिनी साहित्यात अनेक ठिकाणी याचे संदर्भ सापडतात. स्टॅलिनने तरुण असताना अनेक कविता लिहिल्या होत्या. सौंदर्य, निसर्गप्रेम व्यक्त करणाऱ्या कविता त्याच्या हुकूमशाही व्यक्तिमत्त्वाच्या अगदीच विपरीत होत्या, हे विशेष.
एकूणच हुकूमशाहा, राज्यकर्ते सत्तेत येण्यापूर्वीच्या आठवणी, महत्त्वाचे प्रसंग लिहून ठेवत असतं, यात काहीच गैर नाही. तरीही त्यांना कादंबरीकार आणि कवी म्हणून गौरवण्याची गरज का भासते? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. कदाचित त्यातील काहीजण स्वतःला संवेदनशील, सर्जनशील समजतं असतीलही; परंतु बहुतांश हुकूमशाहा याचे अनुसरण का करतात? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हिटलरला व्हिएन्ना अकादमी ऑफ फाइन आर्ट्समध्ये प्रवेश नाकारल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे नवीन पत्ता नोंदवताना हिटलरने लेखक म्हणून आपला व्यवसाय नोंदवला होता. परंतु काल्डर यांच्यामते ही एक काल्पनिक गोष्ट होती. लिखाणाच्या माध्यमातून हुकूमशहांनी त्यांच्या क्रूर प्रतिमेतून मुक्त होण्यासाठी साहित्याची कास धरली. साहित्यिक शोध हा व्यक्तिमत्व आणि बौद्धिक सखोलतेचा आभास देण्यासाठी एक सुलभ मार्ग आहे, असे प्रतिपादन काल्डर करतात.
अधिक वाचा: गोखले पूल ज्यांच्या नावे आहे, त्या महात्मा गांधींच्या गुरूंची महती तुम्हाला माहित्येय का?
फ्रँकोची रझा ही कथा देखील रक्तरंजित घटनांची प्रणयप्रधान विकृत आवृत्ती आहे. याशिवाय स्टीव्ह कॉल सद्दाम हुसेनबद्दल लिहितात; त्याने लिहिलेली कादंबरी किंवा त्याने ज्या लेखकांना त्यासाठी नेमले होते, त्यामागे प्रामुख्याने राजकीय हेतू होता. असे असले तरी एक गोष्ट मान्य करावी लागते ती म्हणजे हे सर्व हुकूमशाहा मुक्तहस्त होते. कोणत्याही बंधनाशिवाय त्यांनी लिखाण केले. इतर सामान्य लेखकाला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते, त्या समस्या त्यांना भेडसावल्या नाहीत. दुसरीकडे, त्यांनी सत्ता सोडल्यानंतर त्यांच्या कादंबऱ्या आणि कविता समाजासाठी नाहीशा झाल्या असे प्रथमदर्शनी वाटतं असलं तरी त्यांच्या साहित्याचा आनंद घेणारेही आहेत हे विसरून चालणार नाही. कदाचित त्यांनी लिहिलेले साहित्य आज फारसे उपलब्ध नसले, तरी या हुकूमशहांबद्दल इतर लेखकांनी लिहिलेल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांच्याविषयी जाणून घेणे आजही सामान्य वाचकांकडून तितकेच पसंत केले जाते. आजही हुकूमशहांनी लिहिलेल्या साहित्याला जगभर तेवढीच मागणी आहे आणि असे का हे कोडे अद्याप मनोचिकित्सकांना उलगडलेले नाही!