विश्लेषण : अल्झायमर्स रोखणे आता दृष्टिपथात? नवीन औषधाविषयी आशादायक बाबी कोणत्या? | A new Alzheimer drug offers hope shows promising results in trial print exp scsg 91 | Loksatta

विश्लेषण : अल्झायमर्स रोखणे आता दृष्टिपथात? नवीन औषधाविषयी आशादायक बाबी कोणत्या?

अल्झायमर्स हा मेंदूच्या क्रियाशीलतेशी संबंधित एक आजार आहे. मेंदूतील काही पेशी हळूहळू निकामी होत जाण्यामुळे हा आजार उद्भवतो.

विश्लेषण : अल्झायमर्स रोखणे आता दृष्टिपथात? नवीन औषधाविषयी आशादायक बाबी कोणत्या?
नुकत्याच करण्यात आलेल्या एका औषध चाचणीनंतर अल्झायमर्स प्रतिबंध दृष्टिपथात आल्याचे चित्र आहे.

-भक्ती बिसुरे

वृद्धत्वाकडे झुकत चाललेल्या बहुतांश नागरिकांना धडकी भरवणारा आजार असे अल्झायमर्सचे वर्णन करता येईल. या आजारात मेंदूच्या पेशींचे हळूहळू नुकसान होते आणि त्याचा परिणाम म्हणून रुग्ण गोष्टी विसरू लागतो. या आजाराचे पर्यावसान कालांतराने स्मृतिभ्रंशामध्ये होते. हा आजार बरा करणारे कोणतेही औषध सध्या अस्तित्वात नाही, त्याच्या वाढीचा वेग फक्त रोखता येतो. नुकतीच आलेली एक बातमी मात्र समस्त मानवजातीसाठीच दिलासादायक आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका औषध चाचणीनंतर अल्झायमर्स प्रतिबंध दृष्टिपथात आल्याचे चित्र आहे.

संशोधन काय?

‘रॉयटर्स’ने याबाबतचे सविस्तर वृत्त नुकतेच प्रकाशित केले आहे. ईआयएसएआय आणि बायोजेन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून करण्यात आलेल्या लेकॅनेमॅब या औषधाच्या चाचणीतून दिसलेले निष्कर्ष अत्यंत आश्वासक असल्याने अल्झायमर्स आणि डिमेन्शियासारख्या आजारांची लक्षणे दिसण्यापूर्वीच त्यास प्रतिबंध करणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. अल्झायमर्ससारख्या आजारामध्ये येणारे परावलंबित्व पाहता ही बातमी समस्त मानवजातीसाठीच अत्यंत दिलासादायक आहे. लेकॅनेमॅब हे एक प्रतिपिंड (अँटीबॉडी) असून त्याद्वारे ॲमिलॉईड या विषारी प्रथिनांच्या गुठळ्यांना लक्ष्य करून त्या नष्ट केल्या जातात. ज्या नागरिकांच्या मेंदूत ॲमिलॉईड साठून राहते त्यांना अल्झायमर्सचा धोका उद्भवण्याची शक्यता असते. तब्बल १८०० रुग्णांवर करण्यात आलेल्या चाचणीतून आजार निर्माण करणारी परिस्थिती रोखणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५५ ते ८० वर्ष वयोगटातील नागरिकांमध्ये या औषधाच्या चाचण्या करण्यात आल्या असून ॲमिलॉईड हे प्रथिन साठून राहण्याचा धोका नष्ट झाल्यास बहुतांश नागरिकांना डिमेन्शिया, अल्झायमर्स कधीही उद्भवण्याची शक्यता नसल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

अल्झायमर्स म्हणजे काय?

अल्झायमर्स हा मेंदूच्या क्रियाशीलतेशी संबंधित एक आजार आहे. मेंदूतील काही पेशी हळूहळू निकामी होत जाण्यामुळे हा आजार उद्भवतो. या आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे विसराळूपणा सुरू होतो. त्याचे प्रमाण वाढत जाते आणि स्मरणशक्तीवर गंभीर परिणाम होतात. सहसा वयाच्या साठीनंतर या आजाराची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. विशेषत: जगण्याच्या उत्तरार्धातील गोष्टींचा या रुग्णांना विसर पडतो. त्यामुळे जुन्या गोष्टी लक्षात आहेत, मात्र अलीकडच्या काळातील काही गोष्टी विसरल्याची तक्रार या रुग्णांचे कुटुंबीय करतात. स्वत:बद्दल, कुटुंबाबद्दल गोष्टी विसरणे, माणसे विसरणे, स्थळकाळाचे भान नाहीसे होणे, संवाद कमी होणे, संभ्रम, पुन्हा पुन्हा तेच तेच बोलणे किंवा एकच क्रिया वारंवार करणे अशा गोष्टी या आजारात होतात. खाणेपिणे, आंघोळ, झोप अशा अनेक बाबींवर या आजाराचा थेट परिणाम होतो. त्यातून बहुसंख्य रुग्ण परावलंबी होतात. समज, आकलन, संवादाची क्षमता, निर्णय क्षमता, कार्यक्षमता कमी होते. घराबाहेर पडल्यानंतर घरचा पत्ता विसरणे, स्वत:चे नाव, कुटुंबाची माहिती सांगता न येणे असे काही त्रास या रुग्णांमध्ये सर्रास दिसून येतात.

अल्झायमर्स का होतो?

मेंदूच्या कार्यातील बिघाड हे या आजाराचे प्रमुख कारण आहे. या आजाराच्या सुरुवातीला मेंदू आक्रसत जातो आणि मेंदूची कार्यक्षमता धोक्यात येते. मेंदूतील सुक्ष्म तंतू एकमेकांमध्ये गुंतल्याने एक प्रकारचे जाळे तयार होते. त्यातून ॲमिलॉईड या विषारी प्रथिनाचे प्रमाण वाढते. या प्रथिनांचा थर रक्तवाहिन्यांमध्ये जमण्यास सुुरुवात होते आणि रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. त्याचे पर्यावसान अल्झायमर्सव्यतिरिक्त इतर गुंतागुंती निर्माण होण्यातही होण्याची शक्यता असते.

अल्झायमर्सला प्रतिबंध कसा करावा?

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते जीवनशैलीतील काही बदलही अल्झायमर्सच्या वाढीस कारणीभूत आहेत. मधुमेह, उच्चरक्तदाब, रक्तातील कोलेस्ट्रॉल, धूम्रपान हे घटक अल्झायमर्ससारख्या आजारांची शक्यता वाढवतात. त्यामुळे या बाबींवर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरते. आहारात फळे, भाजीपाला, मासे यांचे योग्य प्रमाण राखल्यास या आजाराला काही प्रमाणात प्रतिबंध करणे शक्य आहे. मेंदूला चेतना देणारे खेळ, संगीत, सामाजिक उपक्रमांतील सहभाग, संवादातील सहभाग यांमुळे मेंदू क्रियाशील राखण्यास मदत होणे शक्य आहे.

सध्या औषध आहे का?

अल्झायमर्स या आजारावर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही. तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांचे परावलंबी होणे लांबणीवर टाकण्यासाठी काही औषधे देतात, मात्र त्यांचा उपयोग आजार बरा करण्यासाठी फारसा होत नाही. मेंदूचा ताबा घेऊन त्याला जवळजवळ निकामी करणाऱ्या या आजाराला कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यासाठीही अद्याप औषध नाही. त्यामुळेच रॉयटर्सतर्फे देण्यात आलेल्या वृत्ताने काहीसा दिलासा देणारी परिस्थिती निर्माण झाली असली तरी हे संशोधन प्रत्यक्षात येऊन त्याचा मानवजातीला उपयोग होण्यास आणखी काही काळ जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण : भारतीय केळ्यांना मागणी का?

संबंधित बातम्या

विश्लेषण : पर्यावरणासाठी केली जात आहेत टायर्स पंक्चर, जगभरात सुरू आहे आंदोलन, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या
Red Eyes Cause : डोळे लाल होतात, याला कारणीभूत आहेत या गोष्टी, तुमच्यात ‘अशी’ लक्षणं आहेत का?
विश्लेषण : आपल्या देशात किती प्रकारच्या बँका आहेत? त्यांचे काम कसे चालते?
विश्लेषण : स्वतंत्र ‘जामीन कायदा’ का हवा?
Hair Care Tips: लहान वयात केस पांढरे झालेत? जाणून घ्या कारणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती

व्हिडिओ

ताज्या बातम्या
निर्माते राज कुमार बडजात्या यांची ‘ही’ होती शेवटची इच्छा; आठवण सांगताना सचिन पिळगांवकरांना अश्रू अनावर
“हेच त्यांचे देशप्रेम का? राज्यावरील बेगडी प्रेम त्यांच्या…”; मोदी भेटीनंतर CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला! ‘मविआ’च्या मोर्चावरही बोलले
“पंतप्रधान मोदींची पत्रकार परिषद नाही, तर मुलाखत होते”, सुषमा अंधारेंची खोचक टीका; म्हणाल्या, “भाजपाच्या एकाही विद्वानाने…”
…अन् मित्र हातात कापलेलं शीर घेऊन काढू लागले सेल्फी; धक्कादायक घटनेने पोलीसही चक्रावले
कुराण, इस्लामचा संदर्भ देत सुषमा अंधारेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल, म्हणाल्या “जर हिंदू असतील तर…”