‘सितारे जमीन पर’ हा अभिनेता आणि निर्माता आमिर खानचा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी २० जूनला हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरातून २५० कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर हा चित्रपट कुठल्या ना कुठल्या मोठ्या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार, अशी आस लावून बसलेल्या प्रेक्षकांचा होरा आमिरने चुकवला. १२० कोटी रुपये देऊन चित्रपट विकत घेण्याची तयारी दाखवलेल्या ओटीटी वाहिनीला नकार देत आमिर खानने हा चित्रपट यूट्यूबवर ‘पे पर व्ह्यू’ माध्यमातून शंभर रुपये किमतीत प्रेक्षकांना उपलब्ध करून दिला. आणि त्यातूनही पुरेशी कमाई झाल्यानंतर हा चित्रपट सध्या सोनी लिव्ह या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाला आहे. थेट ओटीटी वाहिनीला चित्रपट विकून नफा मिळवण्याची संधी असतानाही आमिरने घेतलेला हा ‘पे पर व्ह्यू’ तत्त्वावर चित्रपट दाखवण्याचा निर्णय खरोखरच बॉलिवुडपटांसाठी फायदेशीर आहे का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

‘पे पर व्ह्यू’चा निर्णय कशासाठी?

‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट जगभरात चित्रपटगृहातून प्रदर्शित करण्यात आला आणि या चित्रपटाने देशभरातून १६० कोटींपेक्षा अधिक कमाई केली, तर जगभरातील कमाईचा विचार करता हा आकडा २५० कोटींवर पोहोचला. मात्र, चित्रपटगृहातून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फक्त ६ ते ८ आठवड्यांचा काळ तुमच्याकडे असतो, त्यानंतर लगेचच एखाद्या ओटीटी वाहिनीशी करार करून तो डिजिटली प्रदर्शित केला जातो. चित्रपटगृहातील प्रदर्शन ते ओटीटी प्रदर्शन यामधला ६ ते ८ आठवड्याचा काळ हा कुठल्याही चांगल्या चित्रपटासाठी कमी आहे, असे मत आमिरने व्यक्त केले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचून त्यांनी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी येणे, त्यानंतर मौखिक प्रसिद्धीमुळे तो इतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे यासाठी थोडा अधिक वेळ गरजेचा आहे. पण, आपल्याकडे चित्रपट ओटीटीवर विकण्याची घाई केली जाते.

अर्थात,अनेकदा निर्मात्यांचे पैसे अडकलेले असतात त्यामुळे ओटीटी वाहिन्यांना चित्रपट विकून निर्मितीखर्च आणि जितका मिळेल तितक्या नफ्याचे गणित जमवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपल्यालाही ओटीटी वाहिनीकडून जमाखर्च भागवण्याची संधी आली होती, मात्र प्रत्येक ओटीटी वाहिनीवरील प्रेक्षकांची संख्या ४ ते ५ कोटींच्या घरात आहे. तर यूट्यूबवरची प्रेक्षकसंख्या ५५ कोटींच्या आसपास असून दरदिवशी त्यात भर पडते. दोन्हीकडच्या प्रेक्षकसंख्येतील जमीन-आस्मानाचा फरक लक्षात घेता यूट्यूबवर ‘पे पर व्ह्यू’ पद्धतीने चित्रपट प्रदर्शित करणे आपल्याला अधिक योग्य वाटले, असे आमिरने स्पष्ट केले होते.

‘पे पर व्ह्यू’ खरोखरच फायदेशीर?

परदेशात ‘पे पर व्ह्यू’ किंवा ‘ट्रान्झॅक्शन व्हिडिओ-ऑन-डिमांड’ (टीव्हीओडी) ही बऱ्यापैकी रुळलेली पद्धत आहे. आपल्याकडे ‘टीव्हीओडी’ पद्धतीपेक्षा ओटीटी वाहिन्या ज्या ‘सबस्क्रिप्शन-ऑन-डिमांड’ (एसव्हीओडी) पद्धतीवर आधारित आहेत, त्याचा वापर अधिक केला जातो. ‘पे पर व्ह्यू’ ही पद्धत आपल्याकडे प्रायोगिक स्तरावरच असण्यामागेही काही कारणे आहेत. अनेकदा एखाद्या नावाजलेल्या कलाकाराचा चित्रपट असेल किंवा एखाद्या चित्रपटाने चित्रपटगृहातून हाऊसफुल गर्दी खेचत लोकप्रियता मिळवली असेल, अशा काही ठरावीक चित्रपटांच्या बाबतीत ‘पे पर व्ह्यू’ पद्धत फायदेशीर ठरते. असा बहुचर्चित चित्रपट नाममात्र किंमत देऊन आपल्याला हवा त्या वेळी घरच्यांबरोबर एकत्रित पाहणे हे प्रेक्षकांनाही फायदेशीर ठरते. त्यामुळे अनेकदा चित्रपट ओटीटीवर कधी येतो, याची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जाते.

स्मार्ट टीव्हीचा वाढता वापर, सहज उपलब्ध होणारा इंटरनेट डेटा आणि कनेक्टिव्हिटी यामुळे ‘पे पर व्ह्यू’ आणि ‘सबस्क्रिप्शन-ऑन-डिमांड’ या दोन्ही पद्धतीने घरच्या घरी चित्रपट पाहणे हे प्रेक्षकांना अधिक सयुक्तिक वाटते. मात्र, ‘पे पर व्ह्यू’ पद्धत छोट्या किंवा आशयात्मक, कलात्मक चित्रपटांसाठी तितकीशी उपयोगाची ठरत नाही. अशा चित्रपटांच्या निर्मात्यांना ओटीटी वाहिनीकडून मिळणारी एकरकमी हमी अधिक अर्थपूर्ण ठरते, असे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे. ‘पे पर व्ह्यू’ पद्धतीच्या या मर्यादेमुळे अजूनही चित्रपट निर्माते त्याचा फारसा विचार करताना दिसत नाहीत. ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाने यूट्यूबवर ‘पे पर व्ह्यू’च्या माध्यमातून एरव्ही कुठल्याही चित्रपटाने यूट्यूबवर जितकी सर्वसाधारण कमाई केली असती त्यापेक्षा २० पट अधिक कमाई केली आहे, अशी माहिती आमिर खानने एका जाहीर मुलाखतीत दिली. मात्र, ‘पे पर व्ह्यू’ मधून झालेल्या कमाईपेक्षा ओटीटीला चित्रपट विकून मिळणारी रक्कम ही कितीतरी पटीने अधिक आहे, हेही त्याने मान्य केले.

‘पे पर व्ह्यू’चा प्रयोग जुनाच…

आमिर खानने केलेला ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटासाठी केलेला ‘पे पर व्ह्यू’चा प्रयोग बॉलिवुडपटांसाठी नवीन नाही. याआधी सलमान खानचा ‘राधे : युवर मोस्ट वाँटेड भाई’ हा करोनाकाळात प्रदर्शित झालेला चित्रपट झी प्लेक्स आणि अन्य डीटीएच प्लॅटफॉर्म्सवर पे पर व्ह्यू तत्त्वावर प्रदर्शित करण्यात आला होता. २०२० मध्ये इशान खट्टर-अनन्या पांडे या जोडीचा ‘खाली पीली’ हा चित्रपटही झी प्लेक्सवर रेंटवर उपलब्ध करून देण्यात आला होता. आता ‘बुक माय शो स्ट्रीम’वरही अनेक गाजलेले हॉलिवुडपट रेंटवर पाहता येतात. सध्या आपल्याकडे पे पर व्ह्यूमधून होणारी उलाढाल ५०० कोटींच्या घरात आहे, २०२८ पर्यंत हा आकडा ७४० कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज ‘फिक्की’ संस्थेच्या आर्थिक अहवालात वर्तवण्यात आला आहे. या पद्धतीने चित्रपट निर्मात्यांना थेट पैसे मिळतात, हे महत्त्वाचे आहेच. पण, कोणतीतरी ओटीटी वाहिनी आपला चित्रपट विकत घेईल म्हणून अवलंबून राहणे, चित्रपट ओटीटीवर विकत घेतला गेला नाही तर येणारे नैराश्य या सगळ्यातून सुटकेचा मार्ग म्हणूनही ‘पे पर व्ह्यू’ पद्धतीकडे पाहिले जाते आहे.

काही थोडक्या ओटीटी वाहिन्यांवरचे परावलंबित्व संपवण्याच्या दृष्टीनेच आमिर खानने सुरू केलेला हा ‘पे पर व्ह्यू’चा प्रयोग त्याच्या आगामी ‘लाहोर १९४७’ आणि ‘एक दिन’ या चित्रपटांच्या बाबतीतही पुन्हा आजमावून पाहणार असल्याचेही त्याने जाहीर केले आहे. आमिरसारख्या मोठ्या कलाकाराकडून जर ही पद्धत यशस्वीपणे रूढ झाली, तर भविष्यात ‘पे पर व्ह्यू’चा प्रयोग खरोखरच सर्वसामान्य निर्मात्यांसाठीही फलदायी ठरू शकतो.