पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्याचा प्रचार शिगेला पोहचला असताना, दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला. आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभेतील दहा पैकी सात सदस्य फुटले. या पक्षाचे सर्वात तरुण खासदार आणि स्थापनेपासूनचे सदस्य ३७ वर्षीय राघव चढ्ढा यांनी या दुभंगासाठी पुढाकार घेत आपच्या नेतृत्वाला हा झटका दिला. आता हे सातही सदस्य भारतीय जनता पक्षात सामील झाले. त्यातील तिघांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेटही घेतली. नोव्हेंबर २०१२ मध्ये ‘आप’ची स्थापना झाली. तेव्हापासून प्रशांत भूषण, योगेंद्र यादव अशा अनेक संस्थापक सदस्यांनी पक्षाला रामराम ठोकला असला तरी, एकदम सात खासदारांनी राजीनामे देणे ही सर्वात मोठी नामुष्की मानली जाते.
निष्ठावंतच दुरावले
पक्षात फूट पडणे हे आपल्याकडे नवीन नाही. पक्ष नेतृत्वाशी संघर्ष ही घडामोड ठरलेली. मात्र राघव चढ्ढा यांच्याबरोबर बाहेर पडलेल्या संदीप पाठक यांच्यासारख्या व्यक्ती जेव्हा पक्ष सोडतात, त्यावेळी पक्षांतर्गत लोकशाही, पक्ष नेतृत्त्वाची असलेली पकड याची चर्चा होते. कारण राघव काय किंवा संदीप पाठक हे दोघेही सुरूवातीपासून पक्षात होते. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचे ते निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख. चढ्ढा हे पक्षाचे खजिनदार होते तर पाठक हे संघटन सरचिटणीस. त्या अर्थाने पहिल्या फळीतील कार्यकर्ते. पंजाबमध्ये २०२२ मध्ये आपचे सरकार आणण्यात संदीप पाठक आणि राघव चढ्ढा यांचा मोठा वाटा आहे. चढ्ढा हे प्रभारी होते तर पाठक यांनी उमेदवार निवडीपासून सारी रणनीती आखली होती. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आप निवडणुकीला सामोरा जाईल. मात्र ज्यांनी पंजाबमध्ये पक्षाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली तेच पक्षापासून दूर झाले.
राज्यसभेतील उपनेताही सामील
पक्षाचे राज्यसभेतील उपनेते अशोक मित्तल यांनीदेखील पक्षाची साथ सोडली. विशेष म्हणजे २० ते २२ दिवसांपूर्वी त्यांच्याकडे ही जबाबदारी आली होती. चढ्ढा यांच्याकडून हे पद काढून घेत, मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याच वेळी राघव यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात हार मानलेली नाही असा स्पष्ट इशारा पक्षाला दिला होता. त्यामुळे चढ्ढा काही तरी करतील हे दिसत होते. त्यातच त्यांच्यावर भाजपशी जवळीक साधल्याचा आरोप होत होता. आता पक्ष ध्येयापासून भरकटल्याची टीका करत ते भाजपच्या गोटात गेले. उत्तम संवादकौशल्य, समाजमाध्यमाचा प्रभावी वापर या त्यांच्या जमेच्या बाजू. राज्यसभेत सामान्यांना भेडसावणारे कळीचे मुद्दे त्यांनी मांडले. विविध माध्यमांवर प्रसारीत केल्याने चढ्ढा यांची एक प्रतिमा निर्माण झाली. भाजपसाठी ते फायदेशीर ठरतील. आपच्या राज्यसभेच्या सात पैकी सहा तर दिल्लीतील तीन पैकी एका सदस्याने पक्षाची साथ सोडली. आता आपचे केवळ तीनच राज्यसभा सदस्य उरले आहेत.
फुटीचा पंजाबमध्ये फटका
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेल्या ‘आप’ला फुटीचा फटका पंजाबमध्ये जाणवेल. दिल्लीतील सत्ता गेल्यानंतर पंजाब हेच एकमेव राज्य त्यांच्याकडे आहे. गोवा आणि गुजरातमध्ये विस्ताराचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. आता पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत पंजाब विधानसभेची निवडणूक होत आहे. राज्यसभेतील सदस्य हे जनतेतून थेट निवडून जात नाहीत. त्यामुळे त्यांना जनाधार किती असा प्रश्न उपस्थित केला जाईल. मात्र आम आदमी पक्षाची साथ सोडलेल्यांना पंजाबमधील राजकारणाचे बारकावे माहित आहेत. त्यामुळेच ‘आप’ला या फुटीने धक्का जाणवेल.
राघव चढ्ढा हे केजरीवाल यांचे खास मानले जात. मात्र केजरीवाल व मनिष सिसोदिया हे दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यावरून कारागृहात असताना चढ्ढा त्यांच्यावरील कारवाईबाबत विशेष प्रतिक्रिया दिली नव्हती. तेव्हाच त्यांची पक्ष नेतृत्वाशी नाराजी असल्याचे उघड झाले होते. त्याची परिणती राघव यांच्या पक्ष सोडण्यात झाली. याखेरीज पक्ष फुटीत त्यांना साथ देणारे संदीप पाठक हे दिल्ली आयआयटीत शिकवत होते. ऑक्सफर्ड, केंब्रिजमध्ये त्यांचे उच्च शिक्षण झाले आहे. पंजाबमध्ये ‘आप’ला २०२२ जे प्रचंड यश मिळाले त्याची रणनीती पाठक यांनी आखली होती. जातीय समीकरणे साधत त्यांनी उमेदवारी दिली होती. पक्षाला राज्यातील विधानसभेच्या ११७ पैकी ९२ जागा जिंकता आल्या होत्या. चढ्ढा आणि पाठक यांच्याबरोबर पत्रकार परिषदेत असलेल्या अशोक मित्तल यांच्याशी संबंधित ९ ते १० ठिकाणांवर काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयालयाने छापे टाकले होते.
जालंधरमध्ये जन्मलेले अशोक मित्तल हे मुळचे राजस्थानचे. त्यांचा वडिलांनी मिठाई व्यवसायात नाव कमावले. मात्र अशोक यांनी या व्यवसायापुढे जात वाहन उद्योगात पाऊल ठेवले. पंचवीस वर्षांपूर्वी एका विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. आज येथे ३५ हजार विद्यार्थी आहेत. एकूणच वेगवेगवेळ्या क्षेत्रात यश मिळवलेले हे नेते पक्षात आल्याने पंजाबमध्ये भाजपला विस्ताराची संधी दिसत आहे. पंजाबमधील ‘आप’चे आमदार साथ सोडणार नाहीत याची काळजी आम आदमी पक्षाच्या नेतृत्त्वाला घ्यावी लागेल.
पंजाब भाजपमध्ये नेतृत्व बाहेरचेच
पंजाबमध्ये भाजपचा विशेष जनाधार नाही. काही महिन्यांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही पक्षाला प्रभाव पाडता आला नाही. येथे काँग्रेसचा हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड हे मुळचे काँग्रेसी. तर केंद्रीय मंत्रिमंडळात पंजाबचे एकमेव प्रतिनिधी रवनीतसिंह बिट्टू हेदेखील काँग्रेसमधून आले आहेत. राज्यात पक्षाची विशेष वाढ झाली नाही. अकाली दलाशी राज्यात भाजपशी बराच काळ युती होती. त्यामुळे शहरी भागांतील २० ते २२ जागांवर भाजप लढत. उर्वरित जागा अकाली दलाच्या वाट्याला जात. मात्र ही आघाडी तुटल्यानंतर भाजपने स्वबळावर राज्यात जनधार वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी बाहेरील व्यक्तींना पक्षात प्रवेश दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यसभेतील पंजाबमधील सहा खासदारांच्या प्रवेशाकडे पाहिले जाते. राज्यात भाजपचा एकही लोकसभा सदस्य नाही तर विधानसभेत केवळ दोन आमदारांमुळे अस्तित्व जेमतेम टिकून आहे. त्यातुलनेत राज्यसभेत एकदम सहा जण हे चित्र बाहेरून आलेला फुगवट्यासारखे आहे. पण विस्तारासाठीचे हे धोरण आहे.
संघर्षात भर
राघव चढ्ढा भाजपकडे गेले असले तरी, राज्यसभेतून त्यांना अपात्र ठरविण्यासाठी आपकडून संघर्ष अटळ आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार आपचे दहा पैकी सात सदस्य फुटल्याने त्यांचे सदस्यत्व वाचेल असे प्रथमदर्शनी दिसते. मात्र दिल्लीत पत्रकार परिषदेत हजेरी लावणाऱ्या राघव यांच्यासह संदीप पाठक व अशोक मित्तल यांच्याविरोधात राज्यसभेच्या सभापतींकडे अपात्रतेसाठी आपकडून अर्ज केल्यावर तिढा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. फुटीनंतर आम आदमी पक्षाने भाजपला पंजाबविरोधी ठरविले. पक्षातील राज्यसभेतील गटनेते संजय सिंह यांनी भाजपवर विविध आरोप केले. महिला आरक्षणाबाबतची विधेयके लोकसभेत बारगळल्यानंतर राज्यसभेत मतदानासाठी आलीच नाहीत. मात्र जर ती राज्यसभेत आली असती तर, त्याच दिवशी फूट दिसली असती असे सांगितले जाते. यावरून हे राजकारण पूर्वीच शिजले होते. फक्त नंतर ते उघड झाले. आम आदमी पक्ष विरोधकांच्या इंडिया आघाडीत थेट सामील नाही. मात्र आता भाजपने त्यांचे प्रमुख शिलेदार फोडून धक्का दिल्याने ताकदीने ते प्रत्युत्तर देतील असे अपेक्षित आहे. एकीकडे पश्चिम बंगाल व तमिळनाडूत भाजप स्थानिक पक्षांशी दोन हात करत असतानाच आपला दिलेल्या फुटीच्या धक्क्याने हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.
