– शफी पठाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या राज्याच्या राजकारणात ‘पाथरवट’ शीर्षकाच्या एका कवितेने मोठी खळबळ उडवली आहे. साताऱ्याच्या एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही कविता वाचली आणि पवार विरोधकांना जणू मोठीच संधी गवसली. तेव्हापासून सुरू झालेला राजकीय टीकेचा धुरळा अद्याप उडतोच आहे. परंतु, इतका गदारोळ घडण्यासारखे ‘पाथरवट’मध्ये असे नेमके काय आहे, ही कविता लिहिणारे जवाहर राठोड कोण आहेत, त्यांचा वाङ्मयीन प्रवास कसा होता, यावर दृष्टिक्षेप.

कवी, शिक्षक की कार्यकर्ता?

जवाहर राठोड यांनी त्यांच्या अल्प आयुष्यात अनेक भूमिका वठवल्या. त्यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील, हदगाव तालुक्यातील कवाना पांगरीचा. येथील लमाण बंजाऱ्यांच्या तांडयावर त्यांचे बालपण गेले. आई-वडील मजुरी करायचे. पण, मुलगा शिकला पाहिजे हा त्यांचा हट्ट. यातूनच त्यांनी जवाहर यांना शिकवले. पुस्तक हाती आले आणि शब्दांशी गट्टी जुळत गेली. मजल-दरमजल करत त्यांनी प्राध्यापक पदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. औरंगाबादच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. जाती व्यवस्थेचे भयाण चटके सहन केल्याने मनातला संताप कवितेच्या रूपाने आकार घेऊ लागला. तिकडे समाजाला जागृ़त करणेही गरजेचे होते, म्हणून जवाहर राठोड कार्यकर्त्याच्या रूपात विविध चळवळींमध्ये सहभागी झाले.

काव्यबीज कसे अंकुरले?

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाचा तो भारावलेला काळ होता. मोतीराम राठोड, बापूराव जगताप अशा विद्रोही कवीमनाच्या नामांतरवादी सहकाऱ्यांसोबत रोज चर्चा झडायच्या. या चर्चांमध्ये कधी पारध्यांच्या पालापासून लमाणाच्या तांडयापर्यंतच्या वेदना असायच्या तर कधी भांडवलवादी व्यवस्थेच्या शोषणाविरुद्धचा हुंकार. त्याचवेळी तिकडे मुंबईत दलित पँथरची चळवळही जोरात होती. वृत्तपत्रातून कळणाऱ्या पँथरच्या बातम्या विषमतावादाविरुद्धच्या लढ्याची प्रेरणा देत होत्या. ही प्रेरणाच पुढे कवितेत परावर्तित झाली.

कवितेचा पिंड काय?

विद्रोह हाच जवाहर राठोड यांच्या कवितेचा मुख्य पिंड होता. आपला समाज शतानुशतकापासून दारिद्र्यात खितपत पडलाय. यामागे वर्णवादी व्यवस्थेचे मोठे षड्यंत्र आहे. हे षड्यंत्र भेदून या निद्रिस्त समाजाला ‘स्व’ची जाणीव करून द्यायची असेल तर त्याला व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह शिकवावाच लागेल, ही जवाहर राठोडांची धारणा होती. याच धारणेचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यसंग्रहाच्या पानापानांवर उमटलेले दिसतात.

‘डोंगराचे ढोल’च्या पुढे काय?

जवाहर राठोड यांच्या नावावर ‘डोंगराचे ढोल’ हा एकमेव कविता संग्रह आहे. पवारांनी वाचलेली ‘पाथरवट’ ही त्यातलीच एक कविता. ९०च्या दशकात हा कविता संग्रह प्रकाशित झाला. या पुस्तकाचे सर्वाधिकार बापूराव जगताप यांच्याकडेच होते. आयुष्याची दाहकता शब्दात बांधण्याचे सामर्थ्य अंगी असूनही राठोड यांचा वाङ्मयीन प्रवास ‘डोंगराचे ढोल’च्या पुढे का जाऊ शकला नाही, याची कथाही फारच विदारक आहे. जवाहर राठोड यांच्या पत्नी अकाली गेल्या. त्यांचा वियोग राठोडांना सहन होऊ शकला नाही. शेकडो आव्हानांना थेट भिडणारा हा हाडाचा कार्यकर्ता मनातील भावनाकल्लोळासमोर मात्र हतबल ठरला आणि उण्या-पुऱ्या ५० वर्षांत त्यांनी देह ठेवला.

‘राठोड-पवार कनेक्शन’ काय?

महाराष्ट्राचे राजकारण शरद पवार नावाची जादू नुकतेच अनुभवायला लागले होते. राज्यभरातील कवी, विचारवंत, पत्रकार यांच्याशी पवारांचा सलोखा वाढत चालला होता. ते ज्या शहरात जायचे तेथे अशा सर्व मंडळींना अगत्याने निमंत्रित करून त्यांच्याशी गप्पा करायचे. औरंगाबादेतही असाच गप्पांचा फड रंगायचा. जवाहर राठोड, मोतीराम राठोड, बापूराव जगताप, फ. मुं. शिंदे ही मंडळी या फडात असायची. तेव्हापासून पवारांवर जवाहर राठोडांच्या कवितेचा प्रभाव होता. त्यांनी साताऱ्यात काही पहिल्यांदा ही कविता वाचून दाखवलेली नाही. याआधीही अनेकदा त्यांनी राठोडांच्या कवितेचा संदर्भ दिलेला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About poet jawahar rathod who wrote patharvat poem recitation by sharad pawar print exp scsg
First published on: 16-05-2022 at 07:59 IST