Abu Salem Mumbai Underworld history: मुंबईच्या गुन्हेगारी जगतात ब्रेड डिलिव्हरी बॉय म्हणून सुरुवात करून अब्जाधीश माफिया झालेल्या अबू सालेमची कहाणी अत्यंत थरारक आहे. दाऊद टोळीत स्वतःचे स्थान निर्माण करण्यापासून ते बॉलीवूडमध्ये दहशत पसरवण्यापर्यंत त्याचा प्रवास कसा राहिला, याचा हा सविस्तर आढावा.
अरुण गवळी आणि अमर नाईक हे मुंबईत राहून दाऊदशी संघर्ष करीत होते, तर मुंबईवर आपले काळे साम्राज्य निर्माण करण्यासाठी दाऊद जंग जंग पछाडत होता. दाऊदचा भाऊ अनीस, छोटा शकील दुबईत राहून गुन्हेगारी सूत्रे हलवित होते. एकेकाळी अगदीच चिल्लर असलेला अबू सालेम अनीससाठी (म्हणजेच दाऊद टोळी) काम करु लागला आणि दाऊद टोळी अधिकच सक्रिय झाली. सालेमने खंडणीसाठी प्रामुख्याने सिनेसृष्टीला लक्ष्य केले. दहशत पसरविण्यासाठी हत्या, गोळीबार घडवून आणले. त्यासाठी पहिल्यांदा त्याने आझमगढमधील तरुणांचा वापर केला.
अनीसशी व्यवहारावरुन खटकल्यानंतर तो स्वतंत्रपणे टोळी चालवू लागला. मात्र पोर्तुगालमध्ये अटक झाल्यावर भारताला त्याचा ताबा मिळाला. तब्बल ७० गुन्हे दाखल असलेला अबू सालेम सध्या नाशिकच्या तुरुंगात आहे. तुरुंगात २५ वर्षे पूर्ण झाल्याने आता आपल्याला जामीनाचा अधिकार आहे, आदी कायदेशीर मुद्यांवर अबू सालेम न्यायालयात भांडतोय.

दाऊद स्वत: दुबईत पळून गेल्यानंतर त्यापाठोपाठ त्याचा भाऊ इक्बाल, इब्राहिम, नुरा हेही दुबईत गेले. टोळीयुद्धाने कहर गाठल्यावर आपलीही चकमकीत हत्या होऊ शकते, असे वाटून छोटा राजनही दाऊदला जाऊन मिळाला. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर छोटा राजनने दाऊदशी फारकत घेतल्यानंतरच्या काळात मुंबईत जोगेश्वरीत वास्तव्याला असलेला अबू सालेम अब्दुल कय्यूम अन्सारी ऊर्फ अकील अहमद आझमी ऊर्फ ‘अबू सामान’ हा दाऊदचा भाऊ अनीसच्या संपर्कात आला आणि अल्पावधीतच अनीसचा खास हस्तक झाला.
अबू सालेम हा मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील ‘सराई मीर’ गावातला. चार भावांमध्ये त्याचा क्रमांक दुसरा होता. वडील व्यवसायाने वकील होते. रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याने गावातच मेकॅनिकची कामे केली. आझमगडमधील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले. ‘इंटर कॉलेज’चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने गाव सोडले आणि नोकरीच्या शोधात तो दिल्लीला गेला. तेथे काही काळ टॅक्सी चालक म्हणून काम केले. काही काळ काँग्रेसचे रोमेश शर्मा यांचा तो चालक होता.
सुरुवात ब्रेड डिलिव्हरी बॉय म्हणून…
१९८४ मध्ये उपजीविकेसाठी तो मुंबईला आला. जोगेश्वरी पश्चिम येथील करीम अपार्टमेंटमध्ये चुलत भाऊ अख्तर यांच्याकडे राहू लागला. नोकरी मिळत नसल्याने वांद्रे आणि अंधेरी दरम्यान काही काळ ‘ब्रेड डिलिव्हरी बॉय’ म्हणूनही काम केले. १९८६ मध्ये अंधेरी पश्चिम येथील एका कपड्यांच्या दुकानातही काम केले. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील आरसा शॅापिंग सेंटरमध्ये चुलत भावाच्या स्वस्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या दुकानातही काही काळ काम केले. याच शॅापिंग सेंटरमध्ये चुलत भावाच्याच पासपोर्ट व व्हिसा मिळवून द्यायच्या कार्यालयातही तो काही वेळ होता. अख्तर हा अंधेरी भागातील दाऊद टोळीचा म्होरक्या सय्यद टोपीसाठी काम करत असे.
अख्तर पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला जाईपर्यंत या कामात त्याचा मुख्य साथीदार म्हणून सालेम काम करीत होता. त्यानंतर सालेमने भूखंडाच्या मालकीचे वाद मिटवण्याचे कामही हाती घेतले आणि आपल्या ‘अशील’ ग्राहकांकडून त्यासाठी पैसे आकारण्यास सुरुवात केली. सालेमचे समोरच्या इमारतीत राहत असलेल्या समीरा जुमानी या १७ वर्षे वयाच्या तरुणीशी सूत जमले. समीराच्या घरातून लग्नाला विरोध झाला. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न केले. ते समीराच्या आई-वडिलांना आवडले नाही.
अल्पवयीन समीराला फूस लावून पळवून नेले, या तक्रारीवरुन सालेमविरुद्ध डी एन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, त्यात त्याला अटकही झाली. जामीनावर सुटल्यावर सालेम समीरासह जोगेश्वरी पश्चिमेतील मिल्लतनगर परिसरात भाड्याने राहू लागला. विवाह झाल्यापासून आपला एकही क्षण आनंदात गेला नाही. अबू सालेम सतत हिंसक आणि प्रचंड शिविगाळ करीत असे, असे तिने नंतर एका मुलाखतीत सांगितले होते. ती आपल्या मुलासह अमेरिकेत वास्तव्याला आहे.
विवाहानंतर अबू सालेमने सांताक्रूझ पश्चिम येथील हसनाबाद लेन येथे व्हिसा व पासपोर्टचे कार्यालय पुन्हा उघडले. त्याच काळात तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त ए. ए. खान यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष पथकाने त्याला अटक केली होती. त्याचवेळी माहीम येथील सोने-चांदीची तस्करी करणाऱ्या अजीज बिलकिया याच्याशी सालेमची दोस्ती झाली. अजीजच्या तो इतका आहारी गेला की, वाट्टेल ते काम करीत असे. एक दिवस अजीजने त्याला मारुती गाडी देऊन भरुचला पाठवले.
साखळी बॉम्बस्फोट- संजय दत्तला हत्यारे पुरवली
पाकिस्तानातून पाठवलेल्या नऊ एके ५६ रायफली, १५ हातबॅाम्ब आणि काडतुसे सालेम घेऊन आला. त्याचे वाटप वांद्रे पश्चिम येथे हनीफ कडावाला, समीर हिंगोली, सिनेअभिनेता संजय दत्त आणि बाबा चौहान यांना सालेमने केले. बॅाम्बस्फोटानंतर बाबा चौहान पकडला गेला आणि त्याचवेळी सालेमने मुंबई सोडली. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये त्याचा हात होता. साखळी बॉम्बस्फोटांतील संशयितांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली, तेव्हा सालेम पत्नीसह आझमगढला गेला. बनावट पासपोर्ट बनवून तो पत्नीसह दुबईला पळून गेला. तेथे मग अनीसच्या हाताखाली काम करु लागला.
आणखी एका माहितगारानुसार, सालेमने दाऊदच्या टोळीचा एक हस्तक जे. के. इब्राहिमसोबत ट्रॅव्हल एजन्सीही सुरू केली. १९८८ मध्ये पैशांच्या वादावरून सहकाऱ्यावर हल्ला केल्यामुळे त्याच्याविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तो त्याच्यावरील पहिला गुन्हा. १९८९ ते १९९३ या काळात सालेमने दाऊद टोळीसाठी चालक म्हणून काम केले. मुंबईतील टोळीच्या विविध म्होरक्यांपर्यंत शस्त्रे, रोख रक्कम व इतर वस्तू पोहोचवण्याचे काम तो करीत असे. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी माल पोहोचवण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे त्याला ‘अबू सामान’ हे टोपणनाव मिळाले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
मार्च १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर दाऊद टोळीतील अनेक नेमबाजांना छोटा राजनच्या टोळीने वा पोलिसांनी चकमकीत ठार केले. अशा वेळी सालेमने दुबईत राहून नवी रणनीति यशस्वीपणे अंमलात आणली. सलीम तुकाराम, सलीम हड्डी हे त्याचे खास नेमबाज. या हस्तकांमार्फत मूळ गावी असलेल्या आझमगडमधील बेरोजगार मुस्लिम तरुणांना मुंबईत बोलावून त्यांच्याकडून गोळीबार घडवून आणत असे. सालेम वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या व्यक्तींची निवड करत असे. एक जण शस्त्र पोहोचवण्यासाठी (सहसा एखादी महिला), दुसरा लक्ष्य (टार्गेट) शोधण्यासाठी आणि तिसरा प्रत्यक्ष काम (हत्या) पूर्ण करण्यासाठी.
एकाच शस्त्राचा जाणीवपूर्वक वापर
अनेक हत्यांसाठी एकाच शस्त्राचा वापर केला जात असे, जेणेकरून ते शस्त्र सापडल्यास पोलिसांना वाटावे की सर्व हल्ल्यांमागे एकच व्यक्ती आहे. गोळीबार करुन संबंधित तरुण दुसऱ्याच दिवशी आझमगडला परत जात असत. या तरुणांना नेमबाजांच्या तुलनेत अत्यंत अल्प मोबदला दिला जात असे. या शिवाय मुंबई पोलिसांकडे त्यांची कोणतीही गुन्हेगारी नोंद नसल्यामुळे पोलिसांनाही मारेकऱ्यांचा शोध घेणे मुश्कील होऊ लागले. यामुळे अबू सालेमचे दाऊद टोळीतील महत्त्व वाढले. अनीसच्या तो खास हस्तक झाला.
उत्तम संभाषण कौशल्यामुळे दाऊदसाठी बॉलीवूडमधील व्यवहार आणि चित्रपट हक्कांबाबत तसेच आर्थिक बाबी हाताळण्याची जबाबदारी सालेमवर सोपवण्यात आली. आकर्षक व्यक्तिमत्त्व असूनही भीतीदायक वाटणारा सालेम लोकांची मने विचलित करण्याची क्षमता ठेवत असे. लोकांना धमकावणारे फोन करण्यासाठी दाऊदच्या टोळीला त्याच्यासारख्याच व्यक्तीची गरज होती. बॉलीवूडमधील बड्या व्यक्तींकडून खंडणी वसूल करण्यासाठी सालेमला पूर्ण मोकळीक देण्यात आली होती. याच काळात त्याने दुबईमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली, जिथे आपल्या ‘बॉस’ला (दाऊदला) प्रभावित करण्यासाठी तो मोठ्या अभिनेत्यांना आमंत्रित करत असे. त्यास नकार देणाऱ्या सिनेकलाकारांना तो धमकावू लागला.
सिनेसृष्टीत दहशत
हिंदी चित्रपटसृष्टीतून खंडणी उकळणे, हा त्याचा आवडता धंदा झाला. खंडणीसाठी नकार दिला तर थेट गोळीबार वा हत्या या सालेमच्या पद्धतीमुळे सिनेसृष्टी हादरली. त्यामुळे काहींनी मुकाट खंडणी देणे पसंत केले. चित्रपटनिर्मितीत काळा पैसा गुंतवणे, बळजबरीने कलाकारांच्या तारखा मिळवणे आणि परदेशातील हक्क बळकावणे यांसारख्या गुन्ह्यात तो पटाईत होता. सुरुवातीला काही काळ त्याने छोटा शकीलच्या इशाऱ्यावरुनही काही काळ काम केले. १९९७ च्या मध्यावर दाऊदचा भाऊ हुमायून याच्या लग्नाची तयारी करण्यासाठी तो पाकिस्तानला गेला होता, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. प्रत्येक वेळी बनावट पासपोर्टचा आधार घेऊन तो तपास यंत्रणांना हुलकावणी देत असे.
१२ ऑगस्ट १९९७ रोजी संगीत क्षेत्रातील दिग्गज गुलशन कुमार यांची हत्या घडवून सालेमने दबदबा निर्माण केला. दाऊदची या हत्येला मान्यता नव्हती. दाऊदचा रोष ओढवण्याच्या भीतीने सालेम दुबईहून पळून गेला. १९९८ मध्ये बाजूला सारले गेल्यानंतर अखेरीस त्याने दाऊदची साथ सोडली. शकीलसोबतचे त्याचे मतभेद आणि दाऊदचा शकीलला असलेला पाठिंबा हे सालेमच्या दाऊदपासून वेगळे होण्यामागचे कारण मानले जाते. २००० मध्ये तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अबू सालेमने ‘मिल्टन प्लास्टिक’च्या मालकाचे अपहरण करण्याचा कट रचला. जानेवारी २००१ मध्ये चित्रपट अभिनेत्री मनीषा कोईराला हिचा वैयक्तिक सचिव अजित दिवानी यांच्यावर गोळ्या झाडल्या.
ऑक्टोबर २००१ मध्ये, आमीर खान, आशुतोष गोवारीकर आणि जमू सुगंध या चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांवर गोळीबारासाठी आलेल्या अबू सालेमच्या चार हस्तकांना ठार मारण्यात पोलिसांना यश आसे. जुलै २००२ मध्ये सालेमने चित्रपट दिग्दर्शक लॉरेन्स डिसूझा यांच्यावर गोळीबार घडवून आणला, परंतु त्यातून ते बचावले. याशिवाय राजीव राय, राकेश रोशन आणि मनमोहन शेट्टी या चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न करुन आपला दबदबा कायम ठेवला. २० सप्टेंबर २००२ मध्ये पोर्तुगालमधील लिस्बन येथे इंटरपोलने अभिनेत्री मोनिका बेदीसह सालेमला अटक केली. त्यानंतर खंडणीचे त्याचे दूरध्वनी थांबले. त्यावेळी संपूर्ण सिनेसृष्टीने सुटकेचा नि:श्वास सोडला.
सालेमने प्लास्टिक सर्जरी करून स्वतःचे रूप बदलले होते, परंतु सीबीआयच्या अधिकाऱ्यांना त्याचा मोबाईल क्रमांक माहीत होता आणि त्यांनी त्याचा मागोवा घेऊन त्याला पकडले. तो अमेरिकेत स्थायिक झाल्याचे समजताच त्यांनी ‘फेडरल ब्युरो ॲाफ इन्व्हेस्टिगेशन’शी (एफबीआय) संपर्क साधला. सलीम या बनावट नावाने सालेम लिस्बेनमध्ये प्रवेश करत असल्याचे एफबीआयच्या निदर्शनास आले आणि त्यांनी पोर्तुगीज प्रशासनाला त्याबाबत सतर्क केले. जेव्हा सालेम लिस्बनमध्ये भारताच्या प्रत्यार्पण प्रयत्नांविरुद्ध कायदेशीर लढा देत होता, तेव्हा तोच ‘सालेम’ आहे याचा एकमेव पुरावा १९९१ मधील त्याच्या अटकेनंतर घेतलेले त्याचे ठसे (फिंगरप्रिंट्स) आणि छायाचित्रे हाच होता.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांच्या खटल्याला सामोरे जाण्यासाठी पोर्तुगाल न्यायालयाने प्रत्यार्पणास फेब्रुवारी २००४ मध्ये मंजुरी दिली. त्याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही या भारत सरकारच्या आश्वासनानंतर पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी नोव्हेंबर २००५ मध्ये त्याला भारताच्या स्वाधीन केले. मोनिका बेदीचेही भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आणि नंतर २००६ मध्ये तिला पासपोर्ट बनावटगिरीप्रकरणी दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली; तिने ती शिक्षा भोगली, परंतु अबू सालेमच्या कोणत्याही व्यवसायात तिचा सहभाग नव्हता, असे तपास यंत्रणांचे म्हणणे होते. दुबईतील एका स्टेज शोदरम्यान एका चित्रपट निर्मात्याने मोनिकाची सालेमशी ओळख करून दिली होती. सालेमने तिला हिंदी चित्रपटांमध्ये काम मिळवून देण्यास मदत केली. त्या बदल्यात, चित्रपटसृष्टीतील माहिती मोनिका सालेमला देत असे.
पोर्तुगालमधील एका कनिष्ठ न्यायालयाने प्रत्यार्पण रद्द केले होते. भारतीय अधिकाऱ्यांनी त्याला फाशीची शिक्षा होऊ शकेल असे नवीन खटले दाखल करून हद्दपारीच्या नियमांचे उल्लंघन केले, असे कारण त्यावेळी देण्यात आले. प्रत्यार्पण आदेश रद्द करण्याच्या या निर्णयाला आव्हान देण्याच्या भारतीय अधिकाऱ्यांच्या कायदेशीर अधिकारावर त्यावेळी पोर्तुगालमधील सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी अबू सालेमला विकासक प्रदीप जैन हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. जैन यांची ७ मार्च १९९५ रोजी जुहू येथील बंगल्याबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी नईम खान हा सरकारी साक्षीदार झाला होता. रियाझ सिद्दीकी हा आणखी एक आरोपी सुरुवातीला सरकारी साक्षीदार झाला होता, परंतु नंतर तो उलटला. मात्र सालेमला २५ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रदीप जैन हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात १६ जून २०१७ रोजी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने अबू सालेम, मुस्तफा डोसा आणि इतर चौघांना दोषी ठरवले. सालेम सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आहे. ‘टाडा’ न्यायालयाने १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०१० मध्ये गँगस्टर अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यात हिंसक हाणामारी झाली होती, ज्यामध्ये एका धारदार चमच्याने सालेमचा चेहरा कापला गेला होता. ७ जून २०१८ रोजी, दिल्लीतील एका न्यायालयाने दिल्लीतील व्यावसायिक अशोक गुप्ता यांच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवले आणि सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. २००२ मध्ये, सालेमने गुप्ता यांना फोन करून दुबईतील एका क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले होते. सालेमने गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबाला धमकावले होते.
अबू सालेम हा अब्जाधीश ‘गँगस्टर’ असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. खंडणी व बॅालीवूडमधील चित्रपटांचे हक्क यामधून जमा झालेल्या रोकड आणि मालमत्ता याचे एकत्रित मूल्य अब्जोवधींच्या घरात असल्याचा अंदाज त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. बॉलीवूड आणि हवालामधील सालेमची गुंतवणूक किमान तीस अब्ज रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे. याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र अलीकडेच सालेमने तुरुंगात २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे आपली सुटका करावी, असा अर्ज थेट सर्वोच्च न्यायालयात केला होता. पोर्तुगाल सरकारने २५ वर्षांनंतर सालेमची सुटका करावी, असे नमूद केले होते, याकडे सालेमने बोट दाखविले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. न्यायालयाने केलेला दंड त्याने न भरता तुरुंगात राहणे पसंत केले असले तरी सर्वोच्च, उच्च न्यायालयात कायदेशीर लढाईसाठी वकील उभे करण्याइतपत बेनामी संपत्ती असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.
सालेमकडे अमेरिकेचा ‘नॉन-इमिग्रंट वर्क व्हिसा’ (बिगर- स्थलांतरित कामगार व्हिसा) होता. याद्वारे तेथील एका मरीन इंजिनिअरिंग कंपनीत देखभाल व्यवस्थापक म्हणून कागदोपत्री तो काम करीत होता. वेगवेगळ्या नावांचा वापर सालेम करत असल्याने, त्याने गुन्हेगारीतून करोडो रुपयांची मालमत्ता कमावली. मात्र ती परदेशात विशेषत: पोर्तुगालमध्ये असावी, असा अंदाज आहे. दिल्ली एनसीआरमध्येही त्याची बेनामी मालमत्ता आहे, असा तपास यंत्रणांचा दावा आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विेभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य पूर्वेत त्याचे निनावी परंतु कायदेशीर व्यवसाय त्याच्या साथीदारांमार्फत चालवले जात आहेत. बॅाम्बस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यांत जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतरही पोर्तुगाल न्यायालयाच्या मदतीने सुटका होईल, अशी त्याला आशा आहे. पोर्तुगालमध्ये त्याचे साथीदार खटला दाखल करण्याच्या तयारीत आहेतच…
(पुढील भागात : मुंबईत एफएसआय घोटाळा करणारा ‘डॅान’ युसुफ पटेल)
