सुशांत मोरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रो रेल्वे, वातानुकूलित बेस्ट बस, ॲप आधारित वातानुकूलित टॅक्सी यातून सुखद आणि झटपट प्रवासाच्या पर्यायांबरोबरत मुंबई उपनगरीय लोकलही काळानुरूप बदलत आहे. रेल्वे मंत्रालय, मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी वातानुकूलित अर्थात एसी लोकल सेवेत आणल्या. मात्र, विनावातानुकूलित लोकलच्या तिकिट दराच्या तुलनेत वातानुकूलित गाड्यांचे तिकिट अधिक असल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठच फिरवली. त्यामुळे तिकीट दरात ५० टक्के कपात करून प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू झाला. मात्र पास दरात कपात न करणे, सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून वातानुकूलित लोकल चालविणे इत्यादी कारणांमुळे प्रवाशांची नाराजीही ओढवून घेतली आहे. त्यातच ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग झाल्यानंतर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होईल, असे सातत्याने मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत होते. ही वाढ सामान्य लोकल फेऱ्यांऐवजी वातानुकूलित लोकलची करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील लोकलप्रवासी खवळले आहेत. त्यातूनच कळवा स्थानकात एसी लोकल रोखून धरण्याचा प्रकार घडला. एसी लोकल अजून प्रवाशांच्या पचनी का पडत नाही, याविषयीचा आढावा –

वातानुकूलित लोकलची सुरुवात कशी?

मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरून दररोज ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. हा प्रवास करताना लोकलमधून पडून शेकडो प्रवाशांचे मृत्यू होतात. हे अपघात रोखण्यासाठी सामान्य लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा पर्याय समोर आला. मात्र हा प्रयोग फसला आणि आरामदायी प्रवासासोबतच अपघात रोखण्यासाठी वातानुकूलित लोकल सेवेत आणल्या. पहिली वातानुकूलित लोकल डिसेंबर २०१७मध्ये दाखल झाली आणि त्याची संख्या हळूहळू वाढत गेली. सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात सहा वातानुकूलित लोकल असून दररोज ६६ फेऱ्या सीएसएमटी-कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळ्यासाठी होतात तर पश्चिम रेल्वेकडे पाच वातानुकूलित लोकल असून चर्चगेट-विरार दरम्यान दररोज ४८ फेऱ्या होतात.

हार्बर, ट्रान्स हार्बर प्रवाशांची वातानुकूलित फेऱ्यांकडे पाठ का?

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर १७ डिसेंबर २०२० पासून आणि जानेवारी २०२१ पासून ठाणे ते वाशी, पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरही वातानुकूलित लोकल धावली. पाठोपाठ सीएसएमटी ते पनवेल, गोरेगावही सेवेत आली. परंतु सुरुवातीपासून या सर्व मार्गावरील लोकल गाडीला प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. हार्बर, ट्रान्स हार्बरवरील प्रवाशांनी वातानुकूलित प्रवासासाठी अधिक पैसे मोजण्यास नकारच दिला. परिणामी ट्रान्स हार्बर आणि हार्बरवरील वातानुकूलित लोकल बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अखेर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरच वातानुकूलित लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि याच मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ़ करण्यात आली. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित फेऱ्यांमध्येही ही वाढ़ कायम राहिली.

विश्लेषण : दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरण घोटाळा नेमका काय आहे? मनीष सिसोदिया यांचा या घोटळ्याशी काय संबंध, घ्या जाणून

वातानुकूलित लोकलच्या पासऐवजी केवळ तिकीट दर कपातीचा निर्णय फसला का?

मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वेवर सामान्य लोकलचे दररोज तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांपेक्षा पास काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. १०० टक्के प्रवाशांमध्ये ८० ते ९० टक्के प्रवासी पासधारक आहेत. हीच स्थिती काहीशी वातानुकूलित लोकलचीही आहे. तरीही रेल्वे बोर्डाची मंजुरी घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने पास दराऐवजी तिकीट दरात कपात केली. तिकीट दरातील कपातीनंतर प्रवासी वातानुकूलित लोकलकडे जरी वळत असले तरी त्याचे प्रमाण कमीच आहे. पास दरात कपात केल्यास सामान्य लोकलचा प्रवासी मोठ्या संख्येने वातानुकूलित लोकलकडे वळू शकला असता. मात्र पास दर कमी करणे परवडणारे नाही, असा दावा रेल्वेने केला आणि पास दर कमी करण्यास नकार दिला. पास काढून वातानुकूलित लोकलचा प्रवास करणे हे प्रवाशांना परवडणारे नाही. सामान्य लोकलसाठी मासिक, त्यानंतर त्रैामासिक, साप्ताहिक आणि एका वर्षाच्या पासाची सुविधा आहे. वातानुकूलितसाठी या पास सुविधा देतानाच एका आठवड्याचा आणि पंधरा दिवसांचाही पास उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र कमी फेऱ्या आणि पास दर जास्त असल्यामुळे या पास सेवेला प्रतिसाद कमीच आहे.

रेल्वेला पास दरातील कपात का परवडणार नाही?

पासदरात कपात करणे सध्या परवडणार नसल्याचे रेल्वेकडूून वारंवार स्पष्ट करण्यात आले. त्यामागील अनेक कारणेही देण्यात आली. यात मोबाईल ॲप आधारित टॅक्सीसह अन्य परिवहन सेवांशीही तुलना करण्यात आली. चर्चगेट ते बोरीवलीपर्यंतचा वातानुकूलितचा मासिक पास १,७७५ रुपये आणि विरारपर्यंतचा पास २,२०५ रुपये आहे. सीएसएमटी ते कल्याणपर्यंत पाससाठी २ हजार १३५ रुपये मोजावे लागतात. गर्दीच्या वेळी मोबाईल ॲपआधारित टॅक्सीने दक्षिण मुंबई ते कल्याणपर्यंत एका दिशेने प्रवास केल्यास ८०० ते ९०० रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त मोजावे लागतात. चर्चगेट ते बोरीवलीपर्यंतही प्रवासासाठी साधारण एवढीच रक्कम खर्च करावी लागते. त्यामुळे वातानुकूलित लोकलशी तुलना केल्यास प्रवाशांना पास काढून प्रवास करणे परवडणारे असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. सध्या बेस्टच्या बस महानगरापर्यंत येत असल्या तरीही त्या मोजक्याच असून अनेक मार्गांवर थेट सेवाही नाहीत, तेथे बस बदलाव्या लागतात. त्यामुळे प्रवासाचा होणारा मनस्ताप वेगळाच. वातानुकूलित लोकल चालवण्यासाठी विजेचा वापर सामान्य लोकलपेक्षा अधिक होतो. पास दराचे गणित केल्यास ७० पैसे प्रतिकिलोमीटर रक्कम प्रवाशांना मोजावी लागत असून हा प्रवास स्वस्तच असल्याचा दावा रेल्वेकडून केला जात आहे.

विश्लेषण: क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

सामान्य लोकलच्या वाढीव फेऱ्यांचे स्वप्न अशक्य?

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल चालवताना काही फेऱ्या पूर्णपणे नवीन तर काही सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून चालवण्यात येत आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज ४८ लोकल फेऱ्या होत असून यामध्ये अप आणि डाउन मार्गावर सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी २७ फेऱ्या होतात. मध्य रेल्वेवरही एकूण ६६ फेऱ्यांपैकी गर्दीच्या वेळी १३ फेऱ्या होत आहेत. महत्वाची बाब म्हणजे फेब्रुवारी २०२२ मध्ये ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका सेवेत आल्यानंतर आणखी १०० फेऱ्या वाढतील, असा दावा मध्य रेल्वेने केला होता. मात्र ही मार्गिका होताच सामान्य लोकलच्या अवघ्या दोन फेऱ्यांची भर पडली असून वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढवण्यावरच भर दिला जात आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलचा प्रवास न परवडणाऱ्या सामान्य प्रवाशांची कोंडी होत आहे. परिणामी अन्य लोकल फेऱ्यांसाठीची गर्दीही वाढत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ac local in mumbai ticket rates more passengers central railway print exp pmw
First published on: 20-08-2022 at 08:21 IST