मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने राजधानी दिल्लीत १० ऑक्टोबर रोजी आंदोलनाची हाक दिली होती. त्यांच्या या मागणीच्या समर्थनार्थ मुंबईतील क्रांती मैदान परिसरातही आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेता इम्रान खान यानेही सहभाग घेतला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने त्याची बरीच चर्चा रंगली झाली. यादरम्यान अनेकांनी इम्रान खान यांच्या भूमिकेचे समर्थन केले असून काहींनी त्याच्या कृतीवर तीव्र आक्षेपही घेतला. यावरून समाजमाध्यमांवर वादविवाद रंगला असतानाच आता भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनीही त्यात उडी घेतली. इम्रान खान हा ‘ओसीआय कार्डधारक’ असूनही आंदोलनात सहभागी झाल्याने त्याची भारतातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली, त्याविषयी…

किरीट सोमय्या यांचा नेमका दावा काय?

किरीट सोमय्या यांनी १० ऑक्टोबर रोजी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांना लिहिलेले एक पत्र शेअर केले आणि त्यासोबत काही प्रश्नही उपस्थित केले. “परदेशी नागरिक असलेला इम्रान खान हा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झाला होता. पोलिसांची परवानगी नसतानाही मुंबईत हे आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी इम्रान खानला ताब्यात घेतले आहे. एखाद्या परदेशी नागरिकाला भारतात अशा प्रकारच्या बेकायदेशीर गोष्टी करण्याची परवानगी दिली जाऊ शकते का? तसेच परदेशी नागरिक असूनही त्याला भारतातील राजकीय आंदोलनात सहभागी होता येते का? या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे,” असे किरीट सोमय्या यांनी आपल्या पत्रात नमूद केले.

किरीट सोमय्या यांनी काय आरोप केले?

यादरम्यान पोलिसांची भेट घेतल्यांतर किरीट सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना इम्रान खान याच्याबाबत खळबळजनक दावा केला. “इम्रान खान हा मूळ भारतीय नागरिक नसून अमेरिकन आहे; पण भारतात राहूनही तो ज्याप्रमाणे राजकीय सक्रियता दाखवत आहे, ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. यापूर्वीही इमरान खानने भारतातील आंदोलनांच्या स्वरूपाबाबत भाष्य केले होते. कोणताही विदेशी नागरिक अशा प्रकारच्या आंदोलनात भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे इमरान खानची तातडीने भारतातून हकालपट्टी केली जावी याकरिता आम्ही कायद्यानुसार कारवाई करत आहोत,” असे सोमय्या म्हणाले. तसेच कधी शबाना आझमी तर कधी नसीरुद्दीन शाह… ही माणसे एका सुनियोजित कटाचा भाग आहेत, असा आरोपही त्यांनी केला. पोलिसांनी इम्रान खानविरोधात चौकशी सुरू केली असून लवकरच त्याला समन्स पाठवले जाणार असल्याची माहितीही किरीट सोमय्या यांनी दिली.

ओसीआय कार्ड नेमके काय आहे?

ओसीआय म्हणजेच ‘Overseas Citizen of India’ हे भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना भारताशी कायमस्वरूपी जोडून ठेवण्यासाठी भारत सरकारद्वारे दिले जाणारे एक विशेष ओळखपत्र आहे. भारतीय राज्यघटनेनुसार भारतात दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाही. त्यामुळे देशातील एखाद्या नागरिकाने दुसऱ्या देशातील नागरित्व स्वीकारल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते. अशा व्यक्तींना आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना भारतात पुन्हा राहता यावे आणि आर्थिक व्यवहार यावेत याकरिता नागरिकत्व कायदा, १९५५ अंतर्गत २००५ मध्ये ओसीआय योजना सुरू करण्यात आली होती. अभिनेता इम्रान खान मूळ अमेरिकन नागरिक असून त्याचा जन्म विस्कॉन्सिन राज्यातील मॅडिसन शहरात झाल्याचे सांगितले जाते; पण त्याला ओसीआय कार्ड नेमके कोणत्या पात्रतेच्या आधारे मिळाले याची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

ओसीआय कार्डधारकांना कोणकोणते अधिकार?

ओसीआय या कार्डच्या नावामध्ये ‘सिटिझन’ (नागरिक) असा शब्द असला, तरी त्यामुळे संबंधित व्यक्तीला भारताचे पूर्ण नागरिकत्व मिळत नाही. ओसीआय कार्डधारक हे मुळात परदेशी नागरिकच असतात; मात्र, भारताशी असलेल्या त्यांच्या नात्यामुळे त्यांना देशात काही विशेष सवलती आणि अधिकार दिले जातात. ओसीआय कार्डधारकांना लागू असलेल्या नियमांच्या अधीन राहून भारतात येण्यासाठी आयुष्यभरासाठी वैध असलेला, तसेच अनेकदा ये-जा करण्यासाठी व्हिसा दिला जातो. त्याशिवाय, शिक्षण, मालमत्ता आणि काही व्यावसायिक कामांसाठीही त्यांना ठरावीक सवलती आणि सुविधा दिल्या जातात. असे असले तरीही ओसीआय कार्डधारकांना भारतातील कोणत्याही निवडणुकांमध्ये मतदान करता येत नाही. त्याशिवाय लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकाही लढवता येत नाहीत. भारतीय नागरिकांसाठी राखीव असलेल्या इतर राजकीय अधिकारांचाही त्यांना वापर करता येत नाही.

OCI कार्डधारकाला आंदोलनात सहभागी होता येते का?

ओसीआय कार्डधारकांचे अधिकार आणि त्यांच्यावरील निर्बंध यांची तरतूद नागरिकत्व कायदा, १९५५ तसेच केंद्र सरकारने वेळोवेळी जारी केलेले नियम आणि अधिसूचनांमध्ये करण्यात आली आहे. त्यातील नियमांमध्ये सार्वजनिक आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रत्येक कार्डधारकाने स्वतंत्र पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले नाही. मात्र, याचा अर्थ सर्व प्रकारच्या राजकीय हालचालींना आपोआप कायदेशीर मंजुरी मिळते, असाही होत नाही. भारतीय नागरिकत्व कायद्याच्या कलम ७ बी नुसार, भारतीय नागरिकांना मिळणारे सर्व अधिकार ओसीआय कार्डधारकांना मिळत नाहीत. मात्र, मतदान करणे किंवा निवडणुकीला उभे राहणे यावर असलेली बंदी म्हणजे केवळ एखाद्या आंदोलनात शांततेने हजर राहणे बेकायदेशीर ठरते, असा त्याचा थेट अर्थ होत नाही. संविधानाच्या अनुच्छेद १९ नुसार, भारतीय नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य तसेच शस्त्रांशिवाय शांततेत एकत्र येण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, या अधिकारांवर वाजवी निर्बंधही घालता येतात. हे घटनात्मक अधिकार प्रामुख्याने भारतीय नागरिकांसाठी आहेत. ओसीआय कार्डधारक हा परदेशी नागरिक असल्याने त्याला भारतीय नागरिकांप्रमाणे या अधिकारांचा दावा करता येत नाही.

अभिनेता इम्रान खानची भारतातून होणार हकालपट्टी?

इम्रान खानने मुंबईतील आंदोलनात सहभाग घेतल्याने ओसीआय कार्डधारकांचे अधिकार, आंदोलनाचा हक्क आणि हद्दपारीचे नियम सध्या चर्चेत आले आहेत. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी इम्रानची थेट भारतातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. नियमांनुसार, ओसीआय कार्डधारक हा परदेशी नागरिकच असतो. त्यामुळे त्याला परदेशी नागरिक आणि स्थलांतरविषयक भारतीय कायद्यांचे पालन करावे लागते. नागरिकत्व कायद्याच्या ‘कलम ७ ड’ मध्ये काही विशिष्ट कारणांवरून ओसीआय नोंदणी रद्द करण्याची तरतूद आहे. त्यामध्ये देशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा यांच्याशी संबंधित कारणांचाही समावेश आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल झाली किंवा तिने व्हिसाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप झाला एवढ्यावरूनच त्याचा गुन्हा सिद्ध होत नाही. तसेच त्याला भारतातून हद्दपार करणे योग्य ठरत नाही. त्यासाठी संबंधित कायदेशीर तरतुदी आणि प्रकरणातील तथ्यांच्या आधारे निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे इम्रान खान यांना भारत सोडून जावे लागणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.