Actress Ananya Raj Death Cause : प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या राज हिचे महिनाभरापूर्वी गाढ झोपेतच निधन झाले. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही अनन्याच्या कुटुंबियांनी तिच्या निधनाची कोणालाही कुणकुण लागू दिली नाही. त्यांनी ही माहिती अत्यंत गोपनीय ठेवत अभिनेत्रीवर अंत्यसंस्कार केले. या घटनेला महिनाभराचा कालावधी लोटल्यानंतर कुटुंबियांनी अत्यंत जड अंतकरणाने अनन्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली. तसेच तिच्या मृत्यूचे कारणही सांगितले. अचानक समोर आलेल्या या माहितीमुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून बॉलिवूड विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोण होती अनन्या राज? तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? कुटुंबियांनी या घटनेची माहिती महिनाभरानंतरच का दिली? त्याविषयी…

अनन्याच्या कुटुंबियांची पोस्ट काय?

अनन्याच्या कुटुंबियांनी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून भावुक पोस्ट शेअर करत तिच्या निधनाची माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, हा अनन्याचा परिवार आहे. अत्यंत दुःखाने आम्हाला सांगावे लागत आहे की १५ जुलैच्या सकाळी अनन्याचे निधन झाले आणि ती झोपेतच अतिशय शांतपणे हे जग सोडून गेली. गेल्या वर्षभराहून अधिक काळ अनन्या शारीरिक आणि मानसिक समस्यांशी झुंज देत होती. या कठीण काळात तिने परिस्थितीशी खंबीरपणे सामना केला आणि एका योद्ध्याप्रमाणे लढा दिला. कुटुंबियांनी अनन्याचे वर्णन मजबूत इच्छाशक्ती असलेली मुलगी म्हणून केले. तिने आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या राणीसारखी जगली. अनन्याची उणीव आम्हाला नेहमीच भासेल, असे म्हणत तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी सर्वांनी प्रार्थना करावी. तसेच, या कठीणी काळात आमची गोपनीयता जपावी, असे भावुक आवाहन त्यांनी पोस्टमधून केले. यादरम्यान अनन्याच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूचे ठोस कारण सांगितले नसले तरी शारीरिक आणि मानसिक समस्यांमुळे तिचे निधन झाल्याचे पोस्टमध्ये नमूद केले.

कोण होती अभिनेत्री अनन्या राज?

२२ ऑक्टोबर १९९१ रोजी मुंबईत जन्मलेल्या अनन्या राज हिने हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच प्रादेशिक सिनेमातही आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर तिने विविध चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून तिचे ग्लॅमरस व्यक्तिमत्त्व, प्रवासाची आवड आणि निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवण्याची आवडही दिसून येत होती. अनन्याने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘7 Hours to Go’ या बॉलिवूड चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. या चित्रपटामुळे तिला हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळण्यास सुरुवात झाली होती. तिने हिंदी चित्रपटांबरोबरच काही प्रादेशिक सिनेमातही काम केले होते. तेलुगू चित्रपट ‘Thaggede Le’ मध्ये अनन्याने भूमिका साकारली होती. याशिवाय ‘Madrasi Gang’ या त्रिभाषिक प्रकल्पाचाही ती भाग होती. त्यामुळे हिंदीपुरते मर्यादित न राहता विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी तिला मिळाली.

म्युझिक व्हिडिओमध्येही केले काम

चित्रपटांसोबतच अनन्या राजने म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले होते. T-Series, Zee Music आणि Times Music या लोकप्रिय संगीत कंपन्यांनी सादर केलेल्या म्युझिक व्हिडिओमध्ये ती झळकली होती. अभिनयासोबतच अनन्या राजला पाण्यात आणि समुद्रकिनारी वेळ घालवण्याची विशेष आवड होती. सोशल मीडिया पोस्टवरून तिचे हे प्रेम अनेकदा दिसून आले. एप्रिल महिन्यात अनन्याने स्पेनमधील सुट्टीदरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. उन्हात टिपलेल्या या फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत होती. तिच्या या ग्लॅमरस अंदाजाची चांगलीच चर्चा झाली होती. यापूर्वी अनन्याने अलिबागमधील पूलमध्ये घालवलेल्या वेळेचा व्हिडिओही शेअर केला होता. सोशल मीडिया पोस्टमधून तिला पोहणे आणि पाण्याजवळ वेळ घालवणे किती आवडत होते, हे दिसून येत होते. अनन्या राजच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तिच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळत होते. काही पोस्टमध्ये ती अगदी साध्या, सहज आणि आपुलकीच्या अंदाजात दिसत होती, तर काही फोटोंमध्ये तिचा आत्मविश्वासपूर्ण लूक पाहायला मिळत होता.

Actress Ananya Raj Death Reason
अभिनेत्री अनन्या राज हिचे वयाच्या ३५ व्या वर्षी निधन झाले.

टाइम्स स्क्वेअरवरही दिसला स्टायलिश अंदाज

न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरसारख्या प्रसिद्ध ठिकाणी आपला खास अंदाज दाखवण्यासाठी अनन्याने काळ्या रंगाचा ड्रेस, कुरळे केस आणि स्टायलिश पोशाख परिधान केला होता. फॅशन आणि ग्लॅमरसोबतच अनन्या आपल्या देशी अंदाजाचेही प्रदर्शन करण्यास मागे हटत नव्हती. तिने घागरा-चोली परिधान केलेले अनेक फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले होते. या फोटोंसोबत अनन्याने “Will I find my Soul in Dance?” असा प्रश्नही चाहत्यांना विचारला होता. या पोस्टमधून नृत्याविषयीची तिची आवडही व्यक्त झाली होती. अनन्या राजला नवीन ठिकाणी फिरणे आणि वेगवेगळ्या शहरांचा अनुभव घेणे आवडत होते. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरील पोस्टमध्ये विविध पर्यटनस्थळांचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळत होते. लंडनमधील तिच्या सुट्टीदरम्यान शेअर केलेली पोस्ट ही तिच्या प्रवासाच्या आवडीचे आणखी एक उदाहरण आहे. विविध देश आणि शहरांना भेट देत तेथील अनुभव सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करण्याची तिची शैली होती. अशा विविध गोष्टींमध्ये अनन्याचा सहभाग दिसून येत होता. तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून तिचे ग्लॅमरस व्यक्तिमत्त्व जितके दिसत होते, तितकाच तिचा साधा आणि मनमोकळा स्वभावही चाहत्यांना जाणवत होता.

शारीरिक आणि मानसिक समस्यांमुळे मृत्यू होऊ शकतो का?

अनन्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यामुळे मृत्यू झाल्याचे तिच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले. त्यामुळे या समस्या नेमक्या कशामुळे उद्भवतात, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तज्ज्ञांच्या मते, शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा परस्परांशी खूप जवळचा संबंध आहे. काही परिस्थितींमध्ये मानसिक ताण, गंभीर मानसिक आजार किंवा शारीरिक आजार यामुळे मृत्यूचा धोका वाढू शकतो. मात्र, ताण आला म्हणून थेट मृत्यू होतो, असे सरसकट म्हणणे योग्य नाही. मृत्यूचा धोका कोणत्या आजारामुळे, किती काळ, किती तीव्रतेने आणि व्यक्तीच्या आधीच्या आरोग्यस्थितीनुसार असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मानसिक आणि शारीरिक आरोग्य एकमेकांवर परिणाम करतात. मानसिक समस्या शारीरिक आजारांना वाढवू शकतात आणि गंभीर शारीरिक आजारांमुळेही नैराश्य, चिंता किंवा इतर मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, मानसिक ताणामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या व्यक्तींमध्ये दीर्घकाळचा ताण अधिक धोकादायक ठरू शकतो, तर गंभीर मानसिक आजार असलेल्या व्यक्तींचे आयुर्मान सामान्य लोकसंख्येपेक्षा सरासरी १० ते २० वर्षांनी कमी होऊ शकते. यातील बहुतांश अकाली मृत्यू मानसिक आजारामुळे थेट होत नाहीत. त्यात हृदयरोग, श्वसनाचे आजार, संसर्गजन्य आजार आणि इतर टाळता येण्याजोग्या शारीरिक आजारांचा मोठा वाटा असतो.

शारीरिक मानसिक आरोग्य जपण्यासाठी काय करावे?

शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे एकमेकांशी जोडलेले असते. चांगले आरोग्य राखण्यासाठी फक्त व्यायाम किंवा फक्त ताण कमी करणे पुरेसे नाही. त्यासाठी झोप, आहार, व्यायाम, मानसिक संतुलन, सामाजिक संबंध आणि नियमित आरोग्य तपासणी या सर्वांचा समतोल महत्त्वाचा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या समस्येपासून दूर राहण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, झोपेला प्राधान्य, व्यसनापासून दुरावा, स्क्रीन टाइम नियंत्रित करणे, तसेच आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकाच दिवसात जीवनशैली बदलण्याची गरज नाही. रोज एक-दोन चांगल्या सवयी सुरू करून त्या सातत्याने पाळणे अधिक प्रभावी ठरते. शरीराला कोणताही त्रास नसणे म्हणजे ते पूर्णपणे निरोगी असल्याचे अनेकांना वाटते. मात्र, उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या काही समस्या सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे देत नाहीत. मानसिक आजार हे शरीराला आतून पोखरून मृत्यूकडे नेऊ शकतात, तर शारीरिक आजार मनाचे खच्चीकरण करून जगण्याची इच्छा संपवू शकतात. त्यामुळे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक समस्या वेळेवर ओळखून मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.