डॉ. उज्ज्वला दळवी
Adipose Tissue Physiology and Metabolism: “सर्जेरावांच्या कामाचं काई खरं न्हाई. कंदी आनलं त बक्कळ पैकं आनत्यात. न्हाई तं म्हैना-म्हैना दातावं माराय दमडी नसत्ये. माजी चूल त पेटाय पायजे! मंग म्याच समजुतीनं घ्येटलं. मायंदाळ पैकं आनलं तरीबी प्वाट भराय, आबरू झाकाय ज्येवडं लागतं त्येवडंच खरचावं. न्येमच क्येला. बाकीचं डबड्यात पुरून वर इट्टूरायाला राखनीला बशिवला. ती माजी लक्षुम्बाय आडचनीला त हुबी ऱ्हायलीच पन ल्योकाचं शेक्षान, ल्येकीचं लगीन समद्यासाटी संगट आली. कुनाफुडं हात न्हाय पशिरला मी!” सुगृहिणी रखमाबाईंनी wealth managementचा मूलमंत्र सांगितला.
चरबीच्या कोठाराची परंपरा कोटी वर्षांपासूनची
समस्त सजीवसृष्टी तोच मूलमंत्र तंतोतंत पाळते. जेव्हा सुगीचे दिवस असतात तेव्हा खाऊन घ्यायचं; त्याच्यातून रोजच्या धावपळीला लागणारी ऊर्जा वापरायची आणि उरलेला माल दुष्काळात वापरायला शरीरात साठवून ठेवायचा. पावसाळ्यासाठी पापड- लोणची- सांडगे- कुरडयांच्या बरण्या भरून ठेवाव्या तसे सगळे प्राणी चरबीच्या पेशी भरून ठेवतात. पोटासाठी वणवणणाऱ्या भटक्या, शोधी-पारधी जमाती अजूनही रानडुक्कर मारला की पोटभर खाऊन घेतात आणि त्या पुण्याईवर पुढच्या काही दिवसांच्या उपासमारीला तोंड देतात. अगदी जंत, गोगलगायी, माशी, उंदीर सगळेजण तशी साठवण करतात. इतकंच नव्हे तर एक शतांश मिलिमीटरएवढ्या आकाराच्या यीस्टच्या कणातही अडीअडचणीसाठी चरबीचा सूक्ष्म थेंब जपलेला असतो. म्हणजे ती चरबीच्या कोठाराची परंपरा कित्येक कोटी वर्षांपासून चालत आली आहे. शरीराचे व्यवहार चालू ठेवायला लागणारी ऊर्जा त्या चरबीतून कशी घ्यायची त्याचे कायदेकानून प्राणीमात्रांच्या डीएनएमध्ये नोंदलेले आहेत.

तान्ह्या मुलांची धगधगती चुलाणी
चरबीचा साठा सांभाळायचं काम खास मेदपेशी (WAT = White Adipose Tissue) करतात. अन्नाचा तुटवडा झाला की, साठवलेली चरबी ऊर्जेसाठी वापरणं हे त्यांचं मुख्य काम. तान्ह्या मुलांच्या मानेच्या मागल्या बाजूला, खांद्यांभोवती आणि पाठीलगत तपकिरी चरबी (BAT= Brown Adipose Tissue) असते. ती एकूण चरबीच्या सुमारे ५% असते. तिच्यात रक्तवाहिन्यांची रेलचेल असते आणि तिच्या पेशींमध्ये झटपट ऊर्जा निर्माण करणारी यंत्रणा (mitochondria) अधिक असते. उष्णता निर्माण करणारी ती धगधगती चुलाणीच असतात म्हणा ना! तान्ह्या मुलांत स्नायू कमी असतात. थंडी वाजली की स्नायूंच्या कामाने, म्हणजेच कुडकुडून उष्णता निर्माण करणं त्यांना शक्य नसतं. त्यांच्या तपकिरी चरबीतून झटपट ऊर्जेचा म्हणजे उबेचा पुरवठा होतो आणि ती ऊब रक्तप्रवाहातून झपाट्याने शरीरभर पसरते.

https://www.physio-pedia.com/Adipose_Tissue#/media/File:AdiposeTissue.png
मान आणि हृदयाजवळची चरबी
प्रौढपणीही आपल्या शरीरात तशी ऊब निर्माण करणारी चरबी, मानेजवळ आणि हृदयाच्या आसपास असते. माणसाच्या वजनाच्या जेमतेम अर्धा टक्का इतकंच तिचं प्रमाण असतं. तिच्यात चुलाणी (mitochondria) जरा कमी असतात. म्हणून तिचा रंग तपकिरी न दिसता भुरकट दिसतो. त्या सतत थंड वातावरणात राहिल्याने आणि नियमितपणे चालण्या- धावण्याचा व्यायाम केल्याने त्या भुऱ्या चरबीचं (BeAT=Beige Adipose Tissue) प्रमाण वाढू शकतं.

https://www.e-enm.org/journal/view.php?
निसर्गमायेचं व्यवस्थापन तेवढ्यावर थांबत नाही
सस्तन प्राण्यांत तो चरबीचा बहुतांश साठा त्वचेखाली असतो. तो जन्मजात, अंगभर स्वेटर शरीराची ऊब जपतो. काही चरबी पोटात साठवली जाते. पोटातल्या अवयवांच्या हालचालीसाठी त्या तेलकट साठ्याचं वंगण होतं. आपल्या पोटाच्या पाठल्या बाजूला साठवलेली चरबी मूत्रपिंडांना तोलून धरते; त्यांना आधार देते.
…डोळ्यांची खोबणी, हदयाभोवती आणि हाडांच्या पोकळीतील चरबी
बेमुदत उपोषण करणाऱ्यांत कधीकधी ती चरबी वापरून संपते आणि मूत्रपिंड खाली सरकतात. त्यांच्या रक्तवाहिन्या, मूत्रनलिका चिंबतात. मोठीच गडबड होते. आतड्यांच्या बाजूला चरबीची झूल (omentum) असते. पोटात कुठे जखम झाली, जंतुलागणीमुळे किंवा इतर काही कारणाने लढाऊ पांढऱ्या पेशींनी युध्द सुरू केलं तर, ती झूल त्या भागाभोवती लपेटली जाते. युध्दक्षेत्र मर्यादित राहातं. शिवाय स्तनांमध्ये, स्नायूंमध्ये, डोळ्यांच्या खोबणीत, हृदयाभोवती, हाडांच्या पोकळीत चरबी कार्यरत असते.

https://www.physio-pedia.com/Adipose_Tissue#/media/File:White_adipose_distribution_in_the_body..jpg
मेदपेशीचे कोठार
सैनिक सीमेवर लढतात. शिवाय तेच सैनिक भूकंप, पूर वगैरे नैसर्गिक प्रकोपांत जनतेच्या मदतीला धावून जातात. अवघड जागी रस्ते, पूल बांधतात. अनावर दंगे आटोक्यात आणतात, आतंकवादी हल्ले परतवून लावतात. त्याचप्रमाणे चरबीच्या पेशी ऊर्फ मेदपेशीही कोठार सांभाळतात, ऊब निर्माण करतात पण त्याशिवाय इतरही अनेक कामं करतात.
मेदपेशींचा पेशापालट
त्या नव्या मेदपेशी बनवतात. जखम झाली तर ती भरून यावी म्हणून पेशा, job description बदलून वण घडवणाऱ्या तंतूपेशींचं (fibroblasts) काम करतात. तसाच पेशापालट करून कधीकधी हृदयालगतच्या मेदपेशी हृदयाच्या स्नायूपेशीही होतात.
मेदपेशींची टपालयंत्रणा
मेदपेशींची स्वतःची खास टपालयंत्रणा आहे. चरबीच्या कोठारात रक्तवाहिन्या असतात. त्यांच्यातून तऱ्हेतऱ्हेचे संदेश पाठवून मेदपेशी मेंदूशी, पँक्रियाशी, मूत्रपिंडांशी आणि इतरही अनेक महत्त्वाच्या केंद्रांशी सतत संपर्कात असतात. भुकेने पोटात कावळे कोकलायला लागले की जठराकडून मेंदूला रासायनिक संदेश (Ghrelin) पोचतो. पुरेसं जेवण झालं की मेदपेशींकडून मेंदूला ‘आता खाणं पुरे,’ असा रासायनिक तृप्त-निरोप्या (Leptin) जातो. तोच लगोलग ‘आता खाणं झालं. आणखी इन्सुलिन नको,’ असं स्वादुपिंडाला(pancreas) कळवतो. चरबीच्या साठ्यात भर टाकायचं इन्सुलिनचं कामही तोच तृप्त-निरोप्या थांबवतो. त्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही.

https://www.physio-pedia.com/Adipose_Tissue#/media/File:Leptin_and_Ghrelin_-_hunger_hormones_(48605648687).png
नाठाळ निरोप्या रक्तातली साखर वाढवतो
- त्याउलट दुसरा एक गुणी निरोप्या (Adiponectin) स्वादुपिंडाला नवं इन्सुलिन तयार करायला प्रोत्साहन देतो; रक्तातली साखरेची पातळी खाली आणायला हातभार लावतो; स्नायूंमध्ये आणि लिव्हरमध्ये इन्सुलिनचं काम वाढवतो. चरबीपासून ऊर्जा निर्माण करायलाही तो मदत करतो.
- निरोगी मेदपेशींकडून निघणारे इतर काही निरोप्ये(srfp-५, Omentin-१) हृदयाची काळजी वाहतात.
- एक नाठाळ निरोप्या(Resistin) इन्सुलिनला कामच करू देत नाही; रक्तातली साखर वाढवतो.
- त्याशिवाय मेदपेशी इस्ट्रोजेन्स ही स्त्री-हॉर्मोन्स आणि अँड्रोजेन्स ही मर्दानी हॉर्मोन्सही तयार करतात. चरबीतून निघणारा एक निरोप्या (Angiotensinogen) शरीरातलं सोडियमचं प्रमाण वाढवतो आणि रक्तवाहिन्यांना अरुंद करून रक्तदाबही चढवतो.
- चरबीमधून निघणारे काही संदेश रक्तवाहिन्यांचं जाळं वाढवतात; काही नव्या मेदपेशी तयार करायचे हुकूम देतात तर काही क्रांतिकारक निरोप्ये पांढऱ्या लढाऊ पेशींना आणि प्रतिकारशक्तीला लढायला प्रोत्साहन देतात
(TNF-alpha, IL-१, IL-६).
१७ कोटी वर्षे प्राणीमात्रांच्या सेवेत
अशी बहुआयामी, बहुअवधानी चरबी गेली सोळा-सतरा कोटी वर्षे प्राणिमात्रांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहिली. अगदी दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत सगळ्या प्राण्यांना जेमतेम गरजेपुरतंच अन्न मिळत होतं. कधी अधिक लाभलंच तर तेव्हा केलेली चरबीची बेगमी नंतर हमखास येणाऱ्या दुर्भिक्ष्याच्या काळात वापरून संपत होती. अंगावर एक औंसभरही जाड चरबी साठत नव्हती. माणूस सडपातळ होता.
वणवण नाहिशी झाली आणि साठवण वाढत गेली…
दहा हजार वर्षांपूर्वी मानव शेतकरी झाला; स्थिरावला; त्याच्या शेतातलं पीक, वळचणीची गुरं, परसातल्या कोंबड्या यांच्यामुळे अन्नाची चणचण आणि त्यासाठीची वणवण नाहीशी झाली. शरीरातल्या साठवणीची गरज खरं तर संपली. पण पुढ्यात अन्नाची लयलूट झाली.
पंचपक्वान्न आली…
स्वास्थ्य लाभल्यावर ‘जाताजाता हाताला लागला तो घास गिळला,’ ही रीत मागे पडली आणि रुचिवैभवाचे प्रयोग सुरू झाले. मीठमसाल्यांनी घासन् घास सुग्रास झाला. खाण्यापिण्याचे चोचले वाढले. एकविसाव्या शतकापर्यंत तर जिव्हालौल्याची परमावधी झाली. दूरदर्शन, यू-ट्यूबवरून चवीपरीचे मोबाईलमधला जादूचा राक्षस टिचकीच्या इशाऱ्याने क्षणार्धात तेलतूप, साखर, मीठ यांच्या माऱ्याने अती रुचकर बनवलेली पंचपक्वान्नं पुढ्यात हजर करायला लागला.
स्थैर्य मिळाल्यामुळे अन्नासाठी मैलोन् मैल होणारी पायपीट टळली. फार तर घरून शेतापर्यंत, ‘पांढरी ते काळी’ चालणं राहिलं. तेही बैलगाडीतून जाणं शक्य झालं. संस्कृती, कला, वाङ्मय यांच्या उपासनेत स्थानबध्दता अपरिहार्य झाली. विसाव्या शतकात इंधनग्राही वाहनं दिमतीला आली. त्यांच्यामागून दूरदर्शन, संगणक, मोबाईल हे सेवक घरात घुसले आणि बडे बाबू बैठकीतच बसले.
भोवतालची परिस्थिती बदलली आणि…
भोवतालची परिस्थिती बदलली. पण डीएनएच्या नोंदवहीतले उपासमारीच्या धोक्याचे इशारे कायम राहिले.
‘जेव्हा लयलूट असेल तेव्हा खाऊन घ्यावं; तृप्त-निरोप्याकडे थोडं दुर्लक्ष करावं म्हणजे दुर्भिक्ष्यकाळासाठी थोडी अधिक बेगमी होते,’ ही आठवणीत बांधलेली वांशिक खूणगाठ देखील होतीच! मेदपेशींनी भूक भागल्याचा तृप्त-संदेश पाठवला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पोटात चार घास अधिक जायला लागले. दुर्भिक्ष्यकाळ आलाच नाही. मग काय? ऊर्जेच्या आयात-निर्यातीच्या गणिताचा बोजवारा उडाला. शरीरातल्या कोठारांत चरबीचे डोंगर साठले.


.png)