Adolf Hitler हुकूमशहा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर जर्मनीच्या हिटलरचं नावच सर्वात आधी येतं. खरंतर अनेक हुकूमशहा जगात होऊन गेले पण हुकूमशहा हे बिरुद खऱ्या अर्थाने चिकटलं ते हिटलरलाच. हुकूमशाही शब्दाला हिटलरशाही असंही म्हटलं जाऊ लागलं. दुसऱ्या महायुद्धात त्याने आपण युद्धाच्या जोरावर जग जिंकू शकतो हे दाखवून दिलं होतं. आता या हिटलरची आठवण होण्याचं कारण म्हणजे त्याची डीएनए टेस्ट समोर आली आहे.
हिटलर बाबत काय चर्चा होत असतात?
हुकूमशहा हिटलरबाबत कायम चर्चा होत असतात की त्याने लग्न केलं नाही. तो महिलांपासून दूर पळायचा. त्याच्या शारिरीक कमतरतांमुळेच त्याने लग्न केलं नाही. अशा सगळ्या हिटलर बाबत कायमच होत असतात. दरम्यान आता हिटलरची डीएनए टेस्ट समोर आली आहे. जी पाहिल्यानंतर लक्षात येतं की या सगळ्या चर्चा म्हणजे निराधार नाहीत. या चर्चांमागे एक कारण होतं ते टेस्ट पाहिल्यावर कळतं. ३० एप्रिल १९४५ ला हिटलरने त्याच्या बर्लिन बंकरमध्ये आत्महत्या केली. हिटलरच्या मृ्त्यूनंतर ८० वर्षांनी Hitler’s DNA : Blueprint of Dictator नावाच्या एका डॉक्युमेंट्रीद्वारे त्याच्या डीएनचे निकाल जगासमोर आले. बीबीसी हिस्ट्री एक्स्ट्रा नावच्या रिपोर्टमध्ये नोंद केल्यानुसार या डॉक्युमेंट्रीमध्ये हे सांगण्यात आलं आहे की हिटलरचा DNA त्यांनी कुठून आणि कसा मिळवला. डीएनए चाचणीनंतर जो निकाल समोर आला त्यातून हिटलर महिलांपासून दूर का पळायचा त्याचं कारण समोर आलं आहे.

हिटलरचा डीएनए कसा मिळाला?
टूरी किंग आणि अॅलेक्स जेके यांनी अॅडॉल्फ हिटलरच्या डीएनच्या नमुन्याचा अभ्यास केला. यातून निष्कर्ष समोर आले ते चकित करणार होते. हिटलरच्या रक्तातून त्याचा डीएनए मिळवण्यात आला आणि त्यानंतर ही चाचणी करण्यात आली. हिटलरने आत्महत्या का केली? हे जाणून घेणं हा या चाचणीचा प्रमुख उद्देश होता. हिटलरच्या रक्ताच्या नमुन्यांतून त्याचा डीएनए घेण्यात आला. हिटलरचं रक्त लागलेला एक कापडी तुकडा एका सोफ्याच्या कापडाचा तुकडा होता. हिटलरने ज्या सोफ्यावर बसून स्वतःवर गोळी झाडली त्याच सोफ्यावर त्याचं रक्त पडलं होतं. त्याने आत्महत्या केल्यानंतर त्या ठिकाणी जाण्याची संमती काही निवडक लोकांना देण्यात आली होती.लेफ्टनंट कर्नल रोसवेल, पी. रोसेनग्रेन यांचाही त्यात सहभाग होता. रोसेनग्रेन यांनी ज्या सोफ्यावर हिटलरचं रक्त सांडलं होतं त्याचा सोफ्याच्या कापडाचा तुकडा कापला होता. त्यांनी हा तुकडा अमेरिकेत आणला आणि तो सुरक्षित ठेवला. त्यानंतर त्यांनी हा कापडाचा तुकडा त्यांच्या मुलाला दिला. त्यानंतर हा तुकडा गेटिसबर्ग पुराणवस्तू संग्रहालयाला देण्यात आला. या तुकड्यासह रोसेनग्रेन यांच्या मुलाने एक प्रतिज्ञापत्रही दिलं होतं ज्यात या कापडी तुकड्यावर असलेलं रक्त हे हिटलरचं आहे हे स्पष्ट करण्यात आलं होतं. आज तक ने हे वृत्त दिलं आहे.

पत्रकार आणि वंशावळ तज्ज्ञांची कशी मदत झाली?
यानंतर हिटलरच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुना असणं डीएनए चाचणीसाठी गरजेचं होतं. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हिटलरच्या जवळच्या नात्यातलंही कुणी नव्हतं. हिटलरचा मुलगा किंवा मुलगी कुणीही नाही त्याने लग्नच केलं नाही त्यामुळे तोही प्रश्न नव्हता. साधारण दहा वर्षांपूर्वी एका अभ्यासात जीन पॉल मुल्डर्स नावाच्या एका पत्रकाराने आणि मार्क वर्मीरन नावाच्या एका वंशावळ तज्ज्ञाने युरोपात राहणाऱ्या हिटलरच्या कुटुंब वंशातील पुरुष वंशजांचा शोध लावला होता. त्यामधला एक डीएनए मिळवला गेला. त्यानंतर दोन्ही डीएनए मेळ खात होते. त्यामुळे डीएनए हिटलरचाच होता हे स्पष्ट झालं.
हिटलर महिलांपासून दूर का पळायचा?
हिटलरच्या डीएनए चाचणीत हे आढळून आलं की हिटलरच्या जीनमध्ये एक प्रसिद्ध डिलीशन होतं. कल्मॅन सिंड्रोम किंवा हायपोगोनैडोट्रोपिक हायपोगोनैडिज्म यांच्याशी संबंधित कल्मैन सिंड्रोम होता. त्यामुळे त्यांचं खासगी आयुष्य प्रभावित झालं होतं. हिटलरला महिलांविषयी वाटणारं आकर्षण वाटेनासं झालं होतं. हिटलरने त्याची प्रेयसी इव्हा ब्राऊनसह कधीही शरीरसंबंध प्रस्थापित केले नव्हते. हिटलर कायम हे सांगायचा की माझं आयुष्य जर्मनीला वाहिलेलं आहे. माझ्या आयुष्यात पत्नीला काहीही स्थान नाही. प्रत्यक्षात त्याच्या शारिरीक कमतरतांमुळे आणि कल्मैन सिंड्रोममुळे त्याला महिलांमध्ये रुची नव्हती आणि तो जर्मनीला सर्वस्व वाहिलं आहे असा दावा करत ही कमतरता लपवत होता. त्या एका सिंड्रोममुळेच हिटलरने लग्न केलं नाही किंवा प्रेयसीपासून मूल जन्माला घातलं नाही.
हिटलरचे मित्र कुबिजेक काय म्हणाले होते?
हिटलरचे एकमेव मित्र कुबिजेक यांची हिटलरची मैत्री किशोर वयातच झाली होती. १९०८ मध्ये हिटलर आणि कुबिजेक एकाच खोलीत वास्तव्यास होते. हिटलरबाबत कुबिजेक यांनी असं म्हटलं आहे की माझ्या मित्राला (हिटलर) अनेक मैत्रिणी होत्या. पण त्याने कधीही कुणाशी शरीर संबंध ठेवले नाहीत. १९२० ते १९३० या दशकात हिटलरच्या सर्वात विश्वासू व्यक्तींपैकी एक असलेले अन्स्ट हनफस्टँगल यांनी असं लिहिलं होतं की मी हिटलरला मागच्या दहा वर्षांमध्ये अंघोळीच्या कपड्यांमध्ये पाहिलेलं नाही. असा दावा करण्यामागे एक कारण होतं ते म्हणजे हिटलरला ज्यांनी स्नानगृहात अंघोळ करताना पाहिलं होतं त्या सैनिकांनी हनफस्टँगल यांना हे सांगितलं होतं की हिटलरचे प्रायव्हेट पार्ट अविकसित होते. त्यामुळे त्याला त्यांची लाज वाटत असे. डीएनए चाचणीत हीच बाब समोर आली की हिटलरमध्ये कल्मैन सिंड्रोम होता. तसंच शरीर संबंध ठेवण्याची क्षमता त्याच्यात नव्हती. त्यामुळेच हिटरलच्या आयुष्यात महिला आल्या पण तो त्यांच्यापासून दूर पळत असे.

