Asaduddin Owaisi Akola Sabha रविवारी १८ फेब्रुवारी रोजी अकोल्यात एमआयएमची सभा पार पडली. या सभेचे प्रमुख वक्ते असदुद्दीन ओवैसी होते. ओवैसी यांनी केलेल्या भाषणात बाबरी मशिदीपासून ते आजच्या राजकारणातील चालू घडामोडींपर्यंत अनेक विषयांचा संदर्भ होता. त्यातच त्यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे हे जो कुर्ता घालतात तो बाबराने भारतात आणला असा उल्लेख केला. याशिवाय भारतातील ‘कांदा’ औरंगजेबाची तर स्त्रियांचा लेहंगा हा नूरजहाँचे देणं असल्याचेही त्यांनी म्हटले. याच पार्श्वभूमीवर आज भारताची सांस्कृतिक ओळख ठरलेला ‘कुर्ता’ खरंच बाबराने भारतात आणला का हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

अधिक वाचा: ज्ञानवापी मशिदीचे सत्य ‘या’ ब्रिटिश विद्वानाने आणले समोर? काय सांगते त्याचे संशोधन?

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!
Firing at Sand Ghat Clan wars erupted from disputes over supremacy
यवतमाळ : रेती घाटावर गोळीबार; वर्चस्वाच्या वादातून टोळीयुद्ध भडकले

कुर्ता या शब्दाचा अर्थ

सध्या कुर्ता हा दक्षिण आशियाई संस्कृतीचा अविभाज्य भाग ठरला आहे. भारत असो वा पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका किंवा अफगाणिस्तान कुर्ता हा कुठल्याही महत्त्वाच्या, सणासुदीच्या प्रसंगी आवश्यक मानला जातो. भारतात तर लग्न- धार्मिक विधी अशा मंगलमय क्षणी किंवा दुःखद प्रसंगीही आपल्या सांस्कृतिक परंपरेचा मान राखत आबालवृद्धांपर्यंत कुर्ता परिधान केला जातो. ‘कुर्ता’ या शब्दाचा उगम नेमका कुठला या विषयी अभ्यासकांमध्ये मतभिन्नता आहे. काहीजण कुर्ता या शब्दाचे मूळ उर्दू भाषेत मानतात. तर काहीजण कुरतु किंवा कुर्तक या संस्कृत शब्दापासून कुर्ता शब्द निर्माण झाल्याचे मानतात. कुर्ता या शब्दाचा पर्शियनमध्ये अर्थ कॉलर नसलेला शर्ट असा आहे.

भारतातील कुर्त्याचे कर्ते नेमके कोण?

जगातील चार प्राचीन संस्कृतींमध्ये भारत, चीन, पर्शिया, आणि मेसोपोटेमिया यांचा समावेश होतो. या चारही संस्कृतींमध्ये प्राचीन काळांपासून व्यापारी, सांस्कृतिक देवाणघेवाण होती. पर्शियन संस्कृतीत अंगरखे (tuni) वापरण्याची परंपरा बाबरचा जन्म होण्यापूर्वी हजारो वर्षे आधीची आहे. पर्शिया- इराण हे प्राचीन भारताच्या वायव्य दिशेला पसरलेले साम्राज्य होते. ज्या वेळेस कुषाण हे मध्य आशियातून भारतात वायव्य मार्गे स्थलांतरित झाले त्याच कालखंडात त्यांनी कुर्ता सदृश्य पोशाख भारतात आणल्याचे अभ्यासक मानतात. बाबरचा जन्म हा १४८३ मध्ये झाला. तर त्याने १५ व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतावर आक्रमण केले, बाबर भारतात येऊन ६०० वर्षे लोटली. दुसऱ्या बाजूला कुशाण हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात होते, म्हणजेच आजपासून २३०० वर्षांपूर्वी भारतीय इतिहासात त्यांचे अस्तित्त्व होते. या साम्राज्याने सिंधू खोरे, अफगाणिस्तान, काश्मीर या भागात राज्य स्थापन केले होते. मूलतः त्यांचे मूळ मध्य आशियातील असून यू-एची (किंवा युची असेही म्हणतात) नामक वंशापासून त्यांची उत्पत्ती आहे. यू-एची वंशाने स्थलांतर केल्यावर त्यांच्या पाच शाखा निर्माण झाल्या. मराठी विश्वकोशात नमूद केल्याप्रमाणे, “बाल्खच्या आसपास स्थायिक झालेल्या यू-एची वंशाच्या एका शाखेला कुशाण असे नाव होते. या शाखेतील कुजुल कडफिसेस याने बॅक्ट्रिया प्रदेशातील यू-एची वंशाच्या इतर चार शाखांना जिंकून आपली सत्ता प्रबळ केली. नंतर त्याने पार्थियनांचा पराभव करून काबूल व वायव्य सीमाप्रांत यांवर आपले राज्य पसरविले”. पुढे हेच कुशाण भारताच्या मुख्य भूमीतही स्थायिक झाले, त्यांनी भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला. ते महायान बौद्ध आणि शैव या दोन तत्त्वज्ञानांना मानणारे होते, किंबहुना त्यांच्या नंतरच्या पिढ्यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या नावांचा त्याग करून वासुदेव सारख्या भारतीय नावांचा स्वीकार केल्याचे अभिलेखीय पुरावे उपलब्ध आहेत. एकूणच त्यांच्या मध्य आशियातून स्थलांतर होऊन भारतीयाकरणाच्या प्रक्रियेने सांस्कृतिक देवाणघेवणीत पोशाख हा देखील महत्त्वाचा ठरला.

अधिक वाचा: ज्ञानव्यापी आणि शाही इदगाह मशीद: ‘हा’ अधिनियम हिंदू याचिकाकर्त्यांना का रोखू शकला नाही?

कुशाणांच्या काळातील वेशभूषा

रोशेन अलकाझी यांनी एन्शंट इंडियन कॉस्ट्यूम या ग्रंथात कुशाण पोशाखांची पाच प्रकारांमध्ये विभागणी केली आहे, यात;
(i) स्थानिक लोक परिधान करत असलेले पोशाख ज्यात अंतरिया, उत्तरिया आणि कायबंध यांचा समावेश होत होता.
(ii) हरमचे संरक्षक आणि सेवक सामान्यतः स्वदेशी आणि शिवलेले कानकुका, लाल-तपकिरी रंगाचे पोशाख परिधान करत होते.
(iii) विदेशी कुषाण राज्यकर्ते परिधान करत असलेले पोशाख.
(iv) इतर परदेशी व्यापारी परिधान करत असलेले पोशाख.
(v) संमिश्र पोशाख. इत्यादींचा समावेश होता.

पाचवी श्रेणी विदेशी आणि देशी वस्त्रांचे मिश्रण होती. ही शेवटची श्रेणी खूप महत्त्वपूर्ण आहे, या कालखंडात पोशाखांचे स्वरूप कसे बदलत गेले हे त्यावरून कळते, या कालखंडात भारतीयांच्या पोशाखांमध्ये कापून शिवलेल्या कपड्यांचा समावेश झाला, मुख्यतः हा बदल उत्तर आणि वायव्य भारतात दिसून येतो. कुषाणांनी आणलेला पोशाख हा घोडेस्वारांसाठी अधिक योग्य होता, जो त्यांच्या भटक्या संस्कृतीतून विकसित झाला होता. पोशाखातील हा बदल अफगाणिस्तान, तक्षशिला, मथुरा येथे दिसतो. हा पोशाख बहुतेक सिथियन आणि इराणी-पार्थियन वंशांनी स्वीकारला होता. यात मान बाहेर काढण्यासाठी गळ्याकडे एक भाग होता, साधा किंवा विस्तृतपणे सुशोभित केलेला लांब बाही असलेला अंगरखा, असे याचे स्वरूप होते, हा पहिला प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारात क्लोज-फिटिंग गुडघ्याच्या-लांबीचा अंगरखा (tunic) कधीकधी चामड्याचा केलेला असायचा आणि त्याच्याबरोबर लहान झगा किंवा लोकरीचा कोट किंवा काफ्तान घालता येत असे, धातूच्या किंवा चामड्याच्या पट्ट्याने हा पोशाख घट्ट बांधला जात असे. तिसऱ्या पोशाखाच्या प्रकारात चुगा वापरला जात असे. चुगा कोट सारखा होता. याशिवाय अंगरख्या खालचा पायजमा हा उन्हाळ्यात ताग, रेशीम किंवा मलमल पासून तयार केलेला असे, परंतु हिवाळ्यात तो लोकरीपासून तयार केला जात होता. त्याचे स्वरूप सैल किंवा पायघोळ अशा स्वरूपात होते, हा पायजमा पायातील बुटांमध्ये गुंफण्याची सोय होती.

१. कुशाण राजा २. राजा कनिष्क ३. द्वारपाल (गांधार कला). कुशाण कालीन पोशाख (प्रतिमा सौजन्य: एन्शंट इंडियन कॉस्ट्यूम-रोशेन अलकाझी २०११)

अशा स्वरूपाचे शिवलेले पोशाख जरी कुशाणांच्या प्रभावामुळे भारतात आले तरी भारताला वस्र -अलंकाराची मोठी परंपरा आधीपासूनच असल्याचे येथे विसरून चालत नाही. किंबहुना या प्राथमिक कुर्त्याच्या स्वरूपात जो बदल घडून आला त्याचे श्रेय स्थानिकांकडेच जाते. जे नंतरच्या अजिंठासारख्या लेणीतील चित्रामध्येही दिसून येते.

अजिंठ्यातील नृत्यांगना (प्रतिमा सौजन्य: विकिमिडीया)

अधिक वाचा: औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर !

मध्ययुगीन कालखंडातील बदल

मध्ययुगीन कालखंडात कुर्ता-पायजमा हा राजेशाही पोशाख झाला. मुघल काळात त्याचे अनेक प्रकार निर्माण झाले. अनारकली कुर्त्यांना त्या काळात लोकप्रियता मिळाली. पायजम्यामध्ये चुरीदार, सलवार, झिलजा, घरारा आणि फरशी यांसारखे अनेक प्रकार याच कालखंडात निर्माण झाल्याचे मानले जाते. राजपूत, मुघल आणि निजाम स्त्रिया स्लीव्ह-लेस कुर्ता (शॉट-स्लीव्ह जॅकेट) परिधान करणे पसंद करत होते, त्याचप्रमाणे चुरीदार-कुर्ता हा त्यांचा आवडीचा पोशाख होता.

आधुनिक कुर्ते

पारंपारिकरित्या कुर्ते कापूस, खादी किंवा रेशीमापासून तयार केले जात होते परंतु आता लिनेन आणि रेयॉन सारख्या कापडांचा देखील वापर कुर्ता तयार करण्यासाठी केला जातो. विशेष म्हणजे कापूस, खादी याचे श्रेय भारताकडे तर रेशमाचे श्रेय चीनकडे जाते. कालांतराने भारतातील प्रत्येक राज्यात घरातील पोशाख प्रादेशिक संस्कृतीनुसार हळूहळू बदलत गेला. आता आपल्याकडे मुक्तसरी कुर्ता, पठाणी कुर्ता, लखनवी कुर्ता, बंगाली कुर्ता, पंजाबी कुर्ता आदी विविध प्रकारचे कुर्ते आहेत आणि त्याच्या खाली पायजामा, मुंडुस, धोती किंवा जीन्स घालण्याची परंपरा आहे.

एकूणच इतिहास पाहता कुर्ता घालायची पद्धत भारतात कुषाण काळातच आली होती. कुषाण आणि बाबर यांच्यात जवळपास १५०० वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे कुर्ता भारतात नेमका कोणी आणला याविषयी येथे वेगळे सांगायला नको.