जोडीदाराच्या शोधात आफ्रिकेतील रानकुत्रे चार हजार किलोमीटरपेक्षाही अधिक अंतर पार करू शकतात, हे नव्या संशोधनाने दाखवून दिले आहे. ‘इकॉलॉजी’ या नियतकालिकात हा अभ्यास प्रकाशित झाला. झांबियातून निघालेल्या तीन रानकुत्र्यांनी आठ महिन्यांत ४,१२६ किलोमीटरचा प्रवास केल्याची नोंद झाली. या भ्रमंतीने एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली. ती म्हणजे वन्यजीवांच्या संवर्धनासाठी केवळ संरक्षित क्षेत्रे पुरेशी नसतात. तर त्यांना जोडणारे नैसर्गिक मार्गही तितकेच महत्त्वाचे असतात. पण वाढती मानवी वस्ती, रस्ते आणि शिकाऱ्यांचे सापळे हेच मार्ग धोकादायक बनवत असतील, तर या प्रजातीचे भवितव्य किती सुरक्षित आहे?

हजारो किलोमीटरच्या भटकंतीची गरज का भासली?

आफ्रिकेतील रानकुत्र्यांचे सामाजिक जीवन कळपाभोवती केंद्रित असते. कळपामध्ये प्रजनन प्रामुख्याने प्रभावी नर आणि मादी जोडीपुरते मर्यादित असते. त्यामुळे दोन-तीन वर्षांचे तरुण प्राणी कळप सोडून जोडीदार आणि स्वतःचे क्षेत्र शोधण्यासाठी बाहेर पडतात. हा केवळ स्थलांतराचा प्रवास नसतो. तर तो प्रजातीच्या पुढील पिढीच्या निर्मितीशी थेट जोडलेला असतो. म्हणूनच एखाद्या रानकुत्र्याला एका संरक्षित क्षेत्रात सुरक्षित ठेवणे पुरेसे नाही. त्याला दुसऱ्या कळपापर्यंत पोहोचण्यासाठी शेकडो, कधी हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागू शकतो. या प्रवासातील प्रत्येक नैसर्गिक अडथळा त्याच्या प्रजननाच्या संधीवर परिणाम करू शकतो.

संरक्षित क्षेत्रे असूनही मार्गिकांचा प्रश्नच?

झांबियातील चार कळपांनी मिळून ९,८६३ किलोमीटरचा प्रवास केला. या प्राण्यांनी नद्या ओलांडल्या, मोठे रस्ते पार केले, ग्रेट रिफ्ट व्हॅलीच्या उतार-चढावातून मार्ग काढला आणि शहरे व सरोवरे टाळत पुढे वाटचाल केली. म्हणजेच वन्यजीवांसाठी आखलेल्या संरक्षित क्षेत्रांच्या सीमा त्यांच्या हालचालींना लागू होत नाहीत. याच ठिकाणी संवर्धनाचे पारंपरिक मॉडेल अपुरे ठरते. एका अभयारण्याभोवती कुंपण उभारले, तेथे अधिवास सुरक्षित केला आणि भक्ष्य उपलब्ध करून दिले, तरी त्या प्राण्याला जोडीदारासाठी दुसऱ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचता आले नाही, तर त्याचा काय उपयोग? वन्यजीव मार्गिका म्हणून ओळखले जाणारे हे जोडमार्ग त्यामुळे केवळ नकाशावरील हिरवे पट्टे नसतात. ते विविध लोकसंख्यांमध्ये जनुकीय देवाणघेवाण, प्रजनन आणि दीर्घकालीन अस्तित्वासाठी आवश्यक असतात.

हजारो किलोमीटरची वाट सुरक्षित आहे का?

संशोधनाने आशेची एक बाजू दाखवली असली, तरी दुसरी बाजू अधिक अस्वस्थ करणारी आहे. या भ्रमंतीदरम्यान अनेक वन्य कुत्रे शिकाऱ्यांनी लावलेल्या तारांच्या सापळ्यांमध्ये अडकून मृत्युमुखी पडले. झांबियातून मोझांबिकपर्यंत सुमारे २,३०० किलोमीटर प्रवास केलेल्या एका मादीचा जून २०२२मध्ये सापळ्यात मृत्यू झाला. प्रश्न त्यामुळे केवळ ‘वन्य कुत्रे किती लांब जाऊ शकतात,’ हा राहत नाही. तर ते ज्या मार्गाने जातात, तो मार्ग त्यांच्यासाठी किती सुरक्षित आहे, हा खरा प्रश्न आहे.

लोकसंख्या वाढली की जंगलासाठी जागा कुठे उरणार?

झांबियाची मानवी लोकसंख्या २०१०पासून सुमारे ५० टक्क्यांनी वाढली आहे. शेती, रस्ते, वसाहती आणि इतर मानवी गरजांसाठी जमिनीचा वापर बदलत असताना वन्यजीवांच्या पारंपरिक मार्गांवर दबाव वाढणे स्वाभाविक आहे. देशाच्या जवळपास ४० टक्के भूभागाला काही ना काही संवर्धनात्मक दर्जा असला तरी त्याचा अर्थ प्रत्येक वन्यजीव मार्गिका सुरक्षित आहे, असा होत नाही. संरक्षणाची अंमलबजावणी, स्थानिक समुदायांचा सहभाग, शिकारीविरोधी यंत्रणा आणि सातत्याने उपलब्ध होणारा निधी या सर्व गोष्टी आवश्यक ठरतात. एखादी छोटी लोकसंख्या संकटात आली, तर जवळच्या दुसऱ्या लोकसंख्येशी तिचा संपर्क असल्यास नैसर्गिक पुनर्वसनाची शक्यता राहते. मात्र कॉरिडॉरच नष्ट झाले, तर प्रत्येक लोकसंख्या स्वतंत्र आणि अधिक असुरक्षित होऊ शकते.

केवळ जंगल वाचवायचे की जंगलांमधील वाटाही?

या अभ्यासाचे वैशिष्ट्य म्हणजे रानकुत्र्यांच्या भ्रमंतीचे केवळ अनुमान नव्हे, तर जीपीएस कॉलरच्या माध्यमातून प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले. या प्राण्यांनी मानवी हस्तक्षेपाने बदललेल्या भूभागातूनही मार्ग शोधला. त्यामुळे पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतील काही महत्त्वाच्या लोकसंख्या अजूनही परस्पर जोडलेल्या असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. ही बाब संवर्धनासाठी महत्त्वाची आहे. कारण एकदा मार्गिका तुटल्यानंतर ती पुन्हा जोडणे अत्यंत खर्चिक आणि गुंतागुंतीचे ठरू शकते. त्याऐवजी अस्तित्वात असलेले मार्ग ओळखून ते आधीच सुरक्षित करणे अधिक व्यवहार्य ठरते. आफ्रिकेतील रानकुत्र्यांच्या ४,१२६ किलोमीटरच्या प्रवासाने संवर्धनाची व्याख्याच मोठी करण्याची गरज अधोरेखित केली आहे. वन्यजीवांना एका अभयारण्यात बंदिस्त करून त्यांचे अस्तित्व टिकणार नाही. त्यांच्या नैसर्गिक हालचाली, प्रजनन आणि स्थलांतराच्या गरजा लक्षात घेऊन संपूर्ण भूदृश्याचे नियोजन करावे लागेल.
rakhi.chavhan@expressindia.com