Ujjain Vaishya Tekri Excavation; Stupa Larger Than Sanchi? भारतीय भूमीत जन्माला आलेल्या बौद्ध धर्माने शांतीच्या मार्गाचा अवलंब करत संपूर्ण जगाच्या इतिहासावर आपली पकड मजबूत केली. गौतम बुद्धांच्या शिकवणीतून विकसित झालेल्या बौद्ध परंपरेच्या इतिहासात स्तूपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातही सम्राट अशोकनिर्मित स्तूपांची महती विशेष आहे. यात अग्रणी ठरतो तो सांचीचा बौद्ध स्तूप. सांचीच्या स्तूपाची भव्यता, शिल्पसौंदर्य, स्थापत्य पाहताक्षणीच लक्ष वेधून घेते. या अद्वितीय इतिहासात भर घालण्याऱ्या सांचीपेक्षाही मोठ्या अशोककालीन(?) स्तूपाचे उत्खनन करण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे.

मध्य प्रदेश सरकारचा पुढाकार

उज्जैनमध्ये जवळपास नऊ दशकांपूर्वी झालेल्या उत्खननात ‘वैश्य टेकडी’ नामक एका विशाल टेकडीखाली मौर्यकालीन स्तूपाचे अवशेष असल्याचे संकेत मिळाले होते. याच टेकडीचे पुन्हा उत्खनन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, हा स्तूप प्रसिद्ध सांची स्तूपापेक्षाही आकाराने मोठा असण्याची शक्यता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने व्यक्त केली आहे. सम्राट अशोक, उज्जैन आणि मौर्यकालीन इतिहास यांना जोडणाऱ्या या स्थळाचे रहस्य आता नव्या शास्त्रीय उत्खननातून उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तब्बल ९० वर्षांनंतर उत्खनन

मौर्यकालीन सम्राट अशोकाशी संबंधित स्मारकांचे उत्खनन आणि पुनर्स्थापना करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने पुढाकार घेतला असून, त्याची सुरुवात उज्जैनमधील वैश्य टेकडीच्या नव्याने होणाऱ्या उत्खननापासून केली जात आहे. जवळपास ९० वर्षांच्या खंडानंतर येथे पुन्हा उत्खनन होणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या स्थळाच्या उत्खनन आणि पुनर्स्थापनेच्या कामाला गती देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे स्थळ त्यांच्या उज्जैन मतदारसंघात येते.

स्थळाला कोणतीही हानी न पोहोचवता पुनर्स्थापन

मौर्य साम्राज्याच्या काळात उज्जैन हे एक महत्त्वाचे शहर होते. सम्राट होण्यापूर्वीपासून अशोकाचा उज्जैनशी संबंध असल्याची माहिती मुख्यतः श्रीलंकन बौद्ध परंपरेतील महावंससारख्या नंतरच्या ग्रंथांतून पुढे येते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या भोपाळ मंडळाचे अधीक्षक पुरातत्त्वज्ञ डॉ. शिवाकांत बाजपेयी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “या स्थळाच्या उत्खननासाठी आम्ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या महासंचालकांकडे प्रस्ताव पाठवला आहे. उत्खननातून अर्थपूर्ण निष्कर्ष हाती येण्यासाठी किमान तीन वर्षे लागतील आणि संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी आणखी अनेक वर्षे लागू शकतात. स्तूपाची पुनर्स्थापना करणे हेही अत्यंत मोठे आणि आव्हानात्मक काम असेल. स्थळाला कोणतीही हानी न पोहोचवता त्याचे पुनर्स्थापन करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.”

सांची स्तूपापेक्षाही मोठा स्तूप

प्रसिद्ध सांची स्तूपापेक्षाही मोठा स्तूप या ठिकाणी असण्याची शक्यता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने व्यक्त केली आहे. मात्र, ही बाब निश्चितपणे सिद्ध करण्यासाठी अधिक सखोल अभ्यासाची आवश्यकता आहे. वैश्य टेकडीकडे पुन्हा लक्ष केंद्रित होण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. तत्कालीन ग्वाल्हेर संस्थानाच्या पुरातत्त्व विभागाने १९३८-३९ साली केलेल्या पहिल्या उत्खननातूनच ही प्रचंड टेकडी नैसर्गिकरीत्या तयार झालेली नसून एका विशाल स्तूपाचे अवशेष असल्याचे स्पष्ट झाले होते.

उंची १०० फूट

विक्रम संवत १९९५ अर्थात १९३८-३९ या वर्षासाठी प्रसिद्ध झालेल्या ग्वाल्हेर संस्थानाच्या पुरातत्त्व विभागाच्या वार्षिक प्रशासकीय अहवालात मूळ उत्खननाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्या टेकडीखाली पुरातत्त्वज्ञांना नेमके काय आढळले, याचे सविस्तर वर्णन त्यात आहे. उत्खनन अहवालात वैश्य टेकडीचे वर्णन मोठा स्तूप असे करण्यात आले होते. स्तूपाच्या पायाचा व्यास सुमारे ३५० फूट आणि त्याची उंची किमान १०० फूट असल्याचा अंदाज नोंदवण्यात आला होता. सांची येथील स्तूपाची उंची सुमारे ५४ फूट आहे.

‘वैश्य टेकडी’च्या नावामागील इतिहास

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अधिकाऱ्यांच्या मते, या टेकडीचे ‘वैश्य टेकडी’ हे नाव सम्राट अशोकाच्या राणीशी संबंधित आहे. ती वैश्य किंवा व्यापारी समुदायातून आली होती, अशी परंपरागत मान्यता आहे. श्रीलंकन बौद्ध साहित्यपरंपरेत अशोकाचा विदिशेतील देवीशी संबंध आणि महिंद-संघमित्रा यांचा जन्म यांची कथा येते. अशोक उज्जैनचा उपराज्यपाल असताना त्याने येथे राजवाडा बांधला होता, असेही मानले जाते. मात्र, या स्थळाचे सर्वप्रथम उत्खनन करणाऱ्या पुरातत्त्वज्ञांनी ‘उत्खननातून या परंपरागत कथेला मान्यता देणारे पुरावे सापडले नाहीत’, अशी नोंद केली आहे.

व्यापारी मार्गांवर स्तूप

उज्जैन हे प्राचीन व्यापारमार्गांचे प्रमुख केंद्र होते. उत्तर भारतातून नर्मदा खोरे व पश्चिम किनाऱ्याकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गांवर उज्जयिनीचे स्थान महत्त्वाचे होते. बौद्ध मठ व स्तूप व्यापारी मार्गांच्या जवळ विकसित होत असल्याचे मध्य भारतातील Sanchi Survey Project मधूनही दिसते.

उज्जैन आणि माळव्याचे ऐतिहासिक महत्त्व

उज्जैन आणि माळवा प्रदेशात बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळातील अस्तित्वाचे स्वतंत्र आणि भक्कम पुरावे आढळतात. पीटर स्किलिंग (Peter Skilling) यांनी आपल्या ‘Stūpas, Aśoka and Buddhist Nuns: Early Buddhism in Ujjain and Malwa’ या शोधनिबंधात स्तूपपरंपरा, सम्राट अशोकाशी जोडलेल्या लोककथा आणि विशेषतः बौद्ध भिक्षुणी संघाचा वावर या आधारे या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले आहे.

बौद्ध परंपरेच्या पुनर्मूल्यांकनास मदत

या पार्श्वभूमीवर, वैश्य टेकडीकडे केवळ एका मोठ्या स्तूपाचे अवशेष म्हणून पाहणे मर्यादित ठरेल. त्याऐवजी, इ.स.पूर्व तिसऱ्या ते दुसऱ्या शतकात माळव्यात विकसित झालेली बौद्ध धार्मिक केंद्रे, भिक्षू-भिक्षुणींचे समुदाय, प्राचीन व्यापारी मार्ग आणि त्यांना मिळालेला राजाश्रय याचे परस्परसंबंध समजून घेण्यासाठी ही टेकडी अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे वैश्य टेकडीचे हे नवीन संशोधन उज्जैनला सांची-विदिशाच्या बौद्ध वर्तुळाशी नव्याने जोडेलच, शिवाय माळव्याच्या आरंभीच्या बौद्ध इतिहासाचे अधिक व्यापक आणि समग्र पुनर्मूल्यांकन करण्यासही मोठी मदत करेल.

९० वर्षांपूर्वीच्या अहवालात काय म्हटले होते?

या स्मारकाचा भव्य आकार पाहून उत्खनन करणारे पुरातत्त्वज्ञ अचंबित झालेच, परंतु या स्मारकाच्या अनोख्या बांधकामामुळे या वास्तूला विशेष महत्त्व प्राप्त झाले. एरवी पाहायला मिळणाऱ्या सलग अन् ठोस विटांच्या रचनेला फाटा देत, या स्मारकाची उभारणी एका वेगळ्याच कल्पकतेने केली होती. त्याच्या विशाल गाभ्यामध्ये स्थानिक काळसर मुरूम घट्ट दाबून भरला गेला होता, तर बाहेरील बाजूने चिखलाच्या गाऱ्यात विटा रचून त्याला एक भक्कम आवरण दिले होते.

वास्तूचा कालखंड निश्चित करणारा पुरावा

या स्तूपाच्या उभारणीत वापरण्यात आलेल्या विटांचा आकारही तितकाच विलक्षण अन् भव्य होता. उत्खनन अहवालानुसार, काही विटा तर तब्बल २२¼ × १८¼ × ३¾ इंच अशा महाकाय आकाराच्या होत्या, तर दुसऱ्या प्रकारच्या विटा २२¼ × १५¼ × ३¾ इंच मापाच्या आढळल्या. पुरातत्त्वज्ञांच्या दृष्टीने विटांचा हा विशिष्ट आकार केवळ बांधकामाचा भाग नव्हता, तर या वास्तूचा कालखंड निश्चित करणारा एक महत्त्वपूर्ण पुरावा होता.

संयमित ऐतिहासिक नोंद

विटांच्या या भव्य आकारावरून ही वास्तू मौर्यकालीन, म्हणजेच थेट इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातील असावी असा ठोस अंदाज बांधण्यात आला. उत्खननात हाती आलेल्या दोन प्राचीन नाण्यांनी [एक आहत (Punch-marked) आणि दुसरे ओतीव अवंती नाणे (Cast Avanti coin)] या निष्कर्षाला अधिकच बळ दिले. या पुराव्यांच्या आधारे पुरातत्त्वज्ञांनी या स्तूपाचा संबंध थेट सम्राट अशोकाशी असण्याची शक्यता अधोरेखित केली; मात्र कोणताही घाईगडबडीचा दावा न करता, अशोकाने उभारलेल्या अनेक स्तूपांपैकी हा एक असू शकतो, अशी संयमित ऐतिहासिक नोंद त्यांनी केली.

निसर्गालाही नवा आकार

प्राचीन काळातील या कुशल बांधकामांनी स्तूपाच्या निर्मितीबरोबरच त्याच्या सभोवतालच्या निसर्गालाही नवा आकार दिला होता. स्तूपाचा प्रचंड गाभा उभारण्यासाठी लागणारा अथांग मुरूम स्थानिक परिसरातूनच उकरून काढण्यात आला. या उत्खननातून स्तूपाभोवती एका सुबक, चौकोनी खंदकासारखी रचना आपोआप तयार झाली; तरीही वास्तूचे सौंदर्य जपण्यासाठी खंदक आणि स्तूप यांच्यात एक सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते. या खंदकावर पश्चिमेच्या बाजूने असलेल्या रस्त्याचे अवशेष सापडले असून, अहवालानुसार, पश्चिमेकडील शहरातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ही विशेष सोय करण्यात आली असावी.

ऐतिहासिक ठेवा गमावला

परंतु, काळाच्या ओघात वैश्य टेकडीने मोठा ऐतिहासिक ठेवा गमावला. अहवालातील खेदजनक नोंदीनुसार, स्तूपाचे बाह्य आवरण जवळपास पूर्ण नष्ट झाले असून, उर्वरित अवशेषांवरून त्याची मूळ उंची आणि भव्यता मोजणे अशक्य झाले आहे. असे असले तरी, या स्तूपाच्या पायाशी वापरलेले अभियांत्रिकी कौशल्य थक्क करणारे आहे. स्तूपाचा पाया एखाद्या मोठ्या वाडग्यासारख्या आकारात तयार करण्यात आला होता. ही एक अत्यंत असामान्य अभियांत्रिकी रचना होती. या विशिष्ट आकारामुळे वरच्या अवाढव्य बांधकामाला केवळ भक्कम आधारच मिळाला नाही, तर प्रचंड वजनामुळे निर्माण होणारा ताण आणि दाब संपूर्ण रचनेवर समान रीतीने विभागून नियंत्रित करणे शक्य झाले.

वाडग्याच्या आकाराचा पाया

अहवालात या बांधकामाविषयी अधिक स्पष्टता देताना नमूद केले आहे, की हा वाडग्यासारखा पाया केवळ आधारच देत नव्हता, तर वरून येणाऱ्या भरपूर मोठ्या भराव आणि रचनेच्या तिरप्या दाबाला समर्थपणे पेलत होता. हा भराव तळाशी कमालीचा रुंद आणि वर सरकताना हळूहळू निमुळता होत गेला होता, ज्यामुळे वास्तूची स्थिरता अधिकच भक्कम झाली होती.

तब्बल ४० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव

इतर तत्कालीन स्तूपांच्या तुलनेत या स्तूपाची आज शिल्लक असलेली उंची पायाच्या विस्ताराच्या मानाने थोडी कमी भासते. परंतु, काळाच्या ओघात आणि पावसाच्या पाण्यामुळे स्तूपाचा वरचा भाग वाहून गेल्याने ही तफावत निर्माण झाली असण्याची दाट शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, या ऐतिहासिक ठेवायचे गूढ उकलणे केवळ उत्खननापुरते मर्यादित राहिलेले नाही. हे संशोधन पुढे नेण्यासाठी केंद्र सरकार आणि ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाला’ (ASI) प्रथम या परिसरातील आवश्यक भूभाग अधिग्रहित करावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर, उज्जैन जिल्हा प्रशासनाने वैश्य टेकडीभोवतालची खाजगी जमीन संपादित करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव सादर केला असून, या जमीन अधिग्रहासाठी तब्बल ४० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

Reference/संदर्भ

  • Skilling, P. (2011). Stūpas, Aśoka and Buddhist Nuns: Early Buddhism in Ujjain and Malwa. Bulletin of the Asia Institute, 25.
  • Lahiri, N. (2015). Ashoka in Ancient India. Harvard University Press.
  • Shaw, J. (2013). Buddhist Landscapes in Central India: Sanchi Hill and Archaeologies of Religious and Social Change, c. Third Century BC to Fifth Century AD. Routledge.
  • Ray, H. P. (2017). Archaeology and Buddhism in South Asia. Routledge.