नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या दक्षिण गोलार्धातील देशातून आणलेल्या चित्त्यांच्या संवर्धनाचे आव्हान अजूनही भारतासमोर असल्यामुळे, आता उत्तर व दक्षिण गोलार्धात विभागलेल्या केनिया या देशातून चित्त्यांची नवीन तुकडी आणण्यासंदर्भात पावले प्रगतीपथावर आहेत. चित्ता प्रकल्पाला १७ सप्टेंबर रोजी दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात येणाऱ्या चित्त्यांच्या तिसऱ्या तुकडीकडे सर्वांचे लक्ष आहे.

चित्ते केनियातूनच का?

नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी तब्बल आठ चित्त्यांचा दोन वर्षांत मृत्यू झाला. भारतात जन्मलेल्या चित्त्यांच्या पाच बछड्यांचा मृत्यू झाला. हे दोन्ही देश दक्षिण गोलार्धातील आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या व्यवस्थापन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रश्न निर्माण झाला. चित्ता संवर्धनात भारताला म्हणावे तसे यश आले नाही. त्यामुळे केनियातून चित्ते आणण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. फेब्रुवारीमध्येच केनियातून भारतात चित्ते आणण्यात येणार होते. करार अंतिम टप्प्यात असतानाच तो मोडीत निघाला. दरम्यान, केनियासोबत नव्याने सामंजस्य करार करण्यात येत आहे.

चित्त्यांसाठी नवा अधिवास कोणता?

गुजरातमधील बन्नी या गवताळ प्रदेशात चित्त्यांसाठी प्रजनन केंद्र तयार करण्यात येत असून केनियातून याठिकाणी चित्ते आणले जातील. ५०० हेक्टर परिसरात हे प्रजनन केंद्र तयार करण्यात येत आहे आणि या ठिकाणी १६ चित्ते राहू शकतात. सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या सह्या झाल्यानंतर हिवाळा हा स्थलांतरणासाठी योग्य ऋतू असल्याने केनियातून हिवाळ्यात चित्ते आणले जातील. मात्र, स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला आहे. बन्नी ही पाळीव जनावरांसाठी कुरण जमीन आहे आणि हजारो पशुपालक याठिकाणी त्यांची जनावरे चराईसाठी आणतात. त्यावरच त्यांची उपजीविका असल्यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी पट्टे मागितले आहेत.

हेही वाचा : “CBI ची तुलना पिंजऱ्यातल्या पोपटाशी…”, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पुन्हा केली ‘त्या’ उक्तीची आठवण; नेमकं काय घडलं होतं तेव्हा?

गांधीसागरचे काय?

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान हे भारतात स्थलांतरित करण्यात आलेल्या चित्त्यांसाठी पहिले घर ठरले. मात्र, याठिकाणी बिबट्यांची संख्या जास्त आणि शिकार कमी असल्यामुळे चित्ते स्थिरावण्यात अडचणी आहेत. त्यामुळे चित्त्यांसाठी दुसरा अधिवास गांधीसागर अभयारण्यातील ६४ चौरस किलोमीटर परिसरात तयार करण्यात येत आहे. याठिकाणी देखील बिबट्यांची संख्या अधिक असल्यामुळे बिबटे येथून दुसरीकडे स्थलांतरित करण्याची माेहीम सुरू करण्यात आली. मात्र, बिबटे आणि शिकार याचे आव्हान कायम असल्यामुळे अजूनही हे अभयारण्य चित्त्यांसाठी पूर्णपणे तयार नाही.

आतापर्यंत किती चित्त्यांचा मृत्यू?

भारतात सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून आठ (पाच मादी, तीन नर) तर फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते (सात नर, पाच मादी) आणले. या दोन वर्षाच्या कालावधीत त्यातील आठ चित्त्यांचा (तीन मादी आणि पाच नर) मृत्यू झाला. यातील काहीचा संसर्गामुळे, काहींचा आपसातील लढाईमुळे, तर अलीकडेच झालेला मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे कारण समोर आले. मात्र, या सर्व कारणांवर संशोधक आणि तज्ज्ञांनी प्रश्न उभे केले आहेत. याच कालावधीत भारतात १७ बछड्यांनी जन्म घेतला. त्यापैकी पाच बछड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता भारतातील चित्त्यांची संख्या २४ इतकी आहे.

हेही वाचा : Odisha : ओदिशातली सुभद्रा योजना नेमकी काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढदिवशी योजनेचा शुभारंभ

चित्त्यावर ‘वेबसिरीज’ कशासाठी?

चित्ता प्रकल्पाअंतर्गत भारतात आणलेल्या चित्त्यांवर आता ‘वेबसिरीज’ तयार करण्यात येत आहे. केंद्राकडून या ‘वेबसिरीज’ला मान्यता देण्यात आली असल्याचीदेखील चर्चा आहे. त्यासाठी ‘शेन फिल्म्स अँड प्लॅटिंग प्रोडक्शन’ या निर्मिती संस्थेला कुनो राष्ट्रीय उद्यान आणि गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात चित्रीकरणाची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. चित्ता प्रकल्प यशस्वी करण्यासाठी भारताने केलेले प्रयत्न या ‘वेबसिरीज’च्या माध्यमातून जगाला कळावे, या उद्देशाने ती तयार करण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यात चित्ता प्रकल्पाला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत आणि याच महिन्यात या ‘वेबसिरीज’चे चित्रीकरण सुरू होणार असल्याची माहिती आहे.

rakhi.chavhan@expressindia.com