Understanding the the right age for sexual maturity: ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ (WHO) ने केलेल्या ताज्या संशोधनातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे; ती म्हणजे योग्य लैंगिक शिक्षण मिळाल्यास मुलांमधील धाडसी प्रयोगांची प्रवृत्ती कमी होऊन जबाबदार लैंगिक संबंधांचे वय येईपर्यंत थांबण्याची समज विकसित होते.
WHO चे संशोधन
‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (WHO) केलेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की, लैंगिक शिक्षण दिल्यानंतर मुलांमध्ये धाडसी लैंगिक प्रयोग करण्याची प्रवृत्ती कमी होते; जबाबदार लैंगिक संबंध ठेवण्याचं वय होईपर्यंत थांबण्याचं सामंजस्य त्यांच्यात निर्माण होतं. म्हणूनच वयात आल्यानंतर मुलामुलींना लैंगिक शिक्षण देणं गरजेचं आहे आणि शाळेतूनच हे शिक्षण मिळालं तर ते योग्य ठरू शकतं.
पालकांनाही खूप प्रश्न पडतात, शंका येतात
माझ्याकडे लैंगिक समस्याग्रस्त मंडळी जशी येतात. तसचे विविध वयोगटातील तरुण- तरुणीही येतात, त्याचबरोबर मुलांच्या पालकांचाही समावेश असतो. खास करून पौगंडावस्थेत असलेल्या मुलांचे पालक अधिक येतात. पौगंडावस्था हे वयच असं असतं की, त्यावेळेस मुलांना खूप प्रश्न पडतात आणि पालकांनाही. ते तेवढ्यावरच थांबत नाही. तर मुलांच्या बारीकसारिक गोष्टींनीही पालकांच्या मनात प्रश्न किंवा संशय निर्माण होतो. त्यांचे निराकरण करणे महत्त्वाचे असते.

लैंगिक शिक्षणाची मुलांना गरज काय?
एकदा असेच एक पालक आले. त्यांच्या मुलाच्या शाळेत लैंगिक शिक्षणाचे वर्ग घेतले जाणार होते. त्यांचा मुलगा १४ वर्षांचा होता. आणि या वयात लैंगिक शिक्षण दिल्याने मुलाच्या मनावर त्याचे विपरीत परिणाम तर होणार नाहीत ना, अशी शंका त्यांना होती. शिवाय त्याचं अभ्यासावरचं लक्ष कमी होईल, अशी भीतीही त्यांना वाटत होती. शिवाय, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लैंगिक शिक्षणाची त्याला गरज तरी काय, असाही एक मूलभूत प्रश्न त्यांना पडला होता.
लैंगिकता ही वाईट गोष्ट हा गैरसमज
समुपदेशन करताना मी म्हटलं होतं की, लैंगिकता ही एक नैसर्गिक गोष्ट आहे; शरीरातील इतर क्रियाप्रक्रियांप्रमाणे सामान्य व गरजेची. वाढीच्या वयात लैंगिकतेबद्दल चुकीच्या गोष्टी ऐकण्याने लैंगिकता म्हणजे एक गैर, पतित गोष्ट आहे असा समज आपण करून घेतो. अनेकदा पालक, शिक्षक व धार्मिक उपदेशक लैंगिकतेच्या विरोधात मुलांची मानसिकता तयार करतात. याची परिणती लैंगिकतेचा दांभिक तिरस्कार करणाऱ्या व्यक्तीच्या रूपात होते.
…त्यातून विकृतीचा उगम होतो
निसर्गत: उमलणाऱ्या निरागस कामऊर्जेबद्दल आपल्या मनात शत्रूपणाची आत्मघातकी भावना निर्माण होते. निसर्गाशी लढून जिंकणं अशक्य आहे; अशा वेळी मग त्यात विकृतीचा उगम होतो. स्त्रियांशी टिंगल करणे, अश्लील साहित्य वाचणे, चोरून ब्ल्यू फिल्म पाहाणे, समलिंगी संबंध ठेवणे, बलात्कार करणे ही या विकृतींची काही उदाहरणे. या विकृतींचा प्रतिबंध करायचा असेल तर योग्य वयात, योग्य व्यक्तींकडून, योग्य असं लैंगिक शिक्षण दिलं जाणं गरजेचं आहे.
शाळेत लैंगिक शिक्षण मिळणे योग्यच
तुमच्या मुलाच्या शाळेत लैंगिक शिक्षणाचे वर्ग घेतले जाणार आहेत, ही फार चांगली गोष्ट आहे, असं सांगून मी म्हटलं की, ही सुवर्णसंधी दवडू नका. तुम्ही तुमच्या मुलाला स्वत: हे शिक्षण देऊ शकाल असे वाटत नाही. त्यामुळे त्याची शाळा जर अशा प्रकारचे प्रशिक्षण देत असेल तर त्याला आवर्जून पाठवा. मुख्य म्हणजे त्याचं वयही या ज्ञानासाठी अगदी योग्य आहे.
नैसर्गिक आकर्षण वाटू लागतं
साधारणपणे वयाच्या १३-१४ व्या वर्षी मुलामुलींमध्ये लैंगिकतेचा उगम होतो. मुलींना (काही वेळा तर त्याही आधी) मासिक पाळी सुरू होते व मुलांमध्ये पुरुषत्वाची लक्षणं दिसू लागतात. याच सुमारास अगदी नैसर्गिकपणे मुलामुलींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागतं. त्यांच्या शरीरात एक नवीन गरज हळूहळू आकार घेऊ लागते.
मग अश्लील साहित्याची वाट धरली जाते
लैंगिक इच्छा, विचार, स्वप्न, उत्तेजना व त्यांचे शरीरावर उमटणारे परिणाम याची तीव्र जाणीव त्यांना होऊ लागते. या वेळी पालक, शिक्षक या अधिकृत सूत्रांकडून जीवनाच्या या नवीन पैलूंची शास्त्रोक्त माहिती मिळणंच योग्य. असं न झाल्यास मग आपली जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी मुलं अपरिपक्व मित्र, अश्लील साहित्य, ब्ल्यू फिल्म अशा माध्यमांची वाट धरतात. या मार्गांनी मिळवलेली अर्धवट व चुकीची माहिती मुलांवर विपरीत परिणाम घडवू शकते.
लैंगिक शिक्षणाने सामंजस्य निर्माण होतं
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (W.H.O.) ने केलेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की, लैंगिक शिक्षण दिल्यानंतर मुलांमध्ये धाडसी लैंगिक प्रयोग करण्याची प्रवृत्ती कमी होते; जबाबदार लैंगिक संबंध ठेवण्याचं वय होईपर्यंत थांबण्याचं सामंजस्य त्यांच्यात निर्माण होतं. योग्य माहिती मिळाल्यामुळे फाजील कुतूहल, घातक प्रयोग करण्याची उत्सुकता व गैरसमजांमुळे आलेला न्यूनगंड यांना आळा बसतो व लैंगिकतेचा एक सहज – स्वाभाविक असा स्वीकार व्यक्तीमध्ये निर्माण होतो. त्यामुळे निश्चिंत मनाने मुलाला या वर्गांना पाठवायला हरकत नाही, असा सल्ला मी त्या पालकांना दिला होता.
