चाचणीचे स्वरूप काय?
भारताने ओडिशाच्या किनार्‍यावरील चांदीपूर येथून अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या अग्नी – ३ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. उत्पादन प्रकल्पातून यादृच्छिक पद्धतीने हे क्षेपणास्त्र घेऊन ते फिरत्या लाँचरवरून प्रक्षेपित करण्यात आले. निर्देशानंतर स्वयंचलित पद्धतीने द्विस्तरीय घन-चलित क्षेपणास्त्राने उड्डाण केले आणि बंगालच्या उपसागरातील पूर्वनिश्चित लक्ष्य क्षेत्रात अचूक प्रवेश केला. या प्रक्षेपणात सर्व कार्यात्मक व तांत्रिक निकषांची पडताळणी करण्यात आली. मोहिमेची सर्व उद्दिष्टे पूर्ण झाल्याचे संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) म्हटले आहे.

स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अर्थात एसएफसीकडे धोरणात्मक शस्त्रप्रणाली हाताळण्याची जबाबदारी आहे. नियमित प्रशिक्षण सरावाचा भाग, असे या चाचणीचे स्वरूप होते. पूर्व किनार्‍यावरील रडार तसेच अन्य प्रणालींद्वारे १७ मीटर लांबीच्या क्षेपणास्त्राची विविध निकष आणि मार्गक्रमणावर देखरेख ठेवून पडताळणी करण्यात आली. लक्ष्याच्या ठिकाणी घडामोडी टिपल्या गेल्या.

चाचण्यांचे महत्त्व काय?

क्षेपणास्त्रांप्रमाणे चाचणीत अनेक घटक, टप्पे समाविष्ट असतात. यात प्रगत प्रारूपीकरण (मॉडेलिंग) आणि सदृशीकरण (सिम्युलेशन) साधनेही समाविष्ट आहेत. संरचनात्मक (स्ट्रक्चरल), प्रणोदन (प्रॉपल्शन), इलेक्ट्रॉनिक, मार्गदर्शन देखभाल आणि तैनात अशा वेगवेगळ्या श्रेणींत क्षेपणास्त्र चाचणी केली जाते. प्रत्येक उपप्रणाली मग ती प्रणोदन, दिशादर्शन किंवा पेलोड असो क्षेपणास्त्र प्रणालीच्या प्रभाविततेत महत्त्वाची भूमिका बजावते. मोहिमेच्या यशाची खात्री करण्यासाठी प्रत्येक उपप्रणालीला कठोर चाचणी व प्रमाणीकरण आवश्यक ठरते. सध्याच्या युद्धजन्य आणि अनिश्चित जगात जेव्हा गरज पडेल, तेव्हा कामगिरीस सज्ज असावे लागते. भात्यातील क्षेपणास्त्रांची सराव चाचणी त्याचाच भाग होय.

अग्नीचा आजवरचा प्रवास कसा?

अग्नी – ३ भारताच्या विश्वासार्ह किमान प्रतिबंधक धोरणाचा महत्त्वाचा घटक आहे. अग्नी मालिकेतील १ ते ३ ही क्षेपणास्त्रे पूर्वीच सैन्यदलांच्या भात्यात समाविष्ट झाली आहेत. अग्नी – ३ हे त्याच्या श्रेणीतील अत्याधुनिक आणि अचूक क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जाते. ते दीड टन वजनाचा भार (पेलोड) ३,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत वाहून नेण्यास सक्षम आहे. एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत अग्नी – १ या ८०० किलोमीटऱच्या मारक क्षमतेने सुरू झालेला प्रवास अग्नी – ५ द्वारे साडेपाच हजार किलोमीटरवर पोहोचला. अग्नी – २ हे दोन हजार किलोमीटर, अग्नी – ३ हे तीन हजार तर अग्नी – ४ हे चार हजार किलोमीटरपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. अग्नीच्या पहिल्या आवृत्त्यांसाठी रस्ता व रेल्वेतून डागण्याची यंत्रणा विकसित झाली. अग्नी -३ ची चाचणी फिरत्या लाँँचरवरून करण्यात आली. अग्नी – ६ आणि अग्नी – ७ द्वारे आठ ते १० हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याची तयारी आहे. पुढील आवृत्त्या समाविष्ट करण्यासाठी चाचण्या प्रगतिपथावर असताना सैन्यदलाच्या भात्यातील अग्नी-३ च्या चाचणीतून सराव केला जात आहे. क्षेपणास्त्रांच्या नियमित चाचण्या आणि सुधारणांमधून देशाची प्रतिबंधक शक्ती विश्वासार्ह व आधुनिक ठेवण्याची इच्छा अधोरेखित होते.

दबावतंत्रात प्रभावी

लांब पल्ल्याची आण्विक सक्षम क्षेपणास्त्रे सामरिक शस्त्रे मानली जातात. त्यांचे असणे हे जरब किंवा प्ररोधन (डिटरन्स) निर्माण करण्यासाठी पुरेसे असते. भारताच्या अण्वस्त्रे आणि नियंत्रण चौकटीचा स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड महत्त्वाचा भाग आहे. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड देशाच्या अणू शस्त्रागार आणि वितरण प्रणालींची देखभाल, तैनात व संरक्षण करण्यासाठी जबाबदार आहे. त्वरित प्रक्षेपण, अचूकता व अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता यामुळे आधुनिक युद्धात क्षेपणास्त्रे पसंतीची शस्त्रे बनली आहेत. दूरवर प्रभाव पाडण्याचे सामर्थ्य ती देतात. शक्ती संतुलनात महत्त्वाची ठरतात. सामरिक क्षेपणास्त्र शक्तीचे सूचक ठरतात. त्यातून राजकीय, सामरिक लाभ होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय भूराजनीतीत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे दबाव तंत्रासाठी प्रभावी ठरतात. रशिया, अमेरिका, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या बळावर जगात आपला दबदबा राखतात. एकीकडे भारताने अग्नी क्षेपणास्त्राची मारक क्षमता विस्तारून सामरिक समानता साधण्याची तयारी चालविली आहे. तर दुसरीकडे, खोलवर हल्ला करण्याची क्षमता बळकट करण्यासाठी नवीन रॉकेट-क्षेपणास्त्र दल अर्थात रॉकेट-मिसाइल फोर्स स्थापन करण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे.