When Pakistan Shot Down Gujarat CM’s Plane: गुरुवारी एअर इंडियाच्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी तब्बल ६० वर्षांपूर्वी गुजरातच्याच एका मुख्यमंत्र्याचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता. या दुर्घटनेसाठी कोणताही तांत्रिक बिघाड कारणीभूत नव्हता; तर पाकिस्तानच्या लढाऊ विमानाने केलेला हल्ला कारणीभूत होता. त्याच घटनेचा घेतलेला हा आढावा.
जवळपास ६० वर्षांपूर्वी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री बळवंतराय मेहता यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता. बळवंतराय मेहता यांना पंचायती राज व्यवस्थेचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे विमान दुर्घटनेत झालेला त्यांचा मृत्यू हा काळजाला चटका लावणारा प्रसंग होता.
१९६५ हे वर्ष भारत पाकिस्तान युद्धाच्या तणावाखाली होते. ऑगस्टमध्ये सुरू झालेलं भारत-पाकिस्तान युद्ध सप्टेंबरपर्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचलं होतं. २२ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने बिनशर्त शस्त्रसंधीची मागणी करणारा ठराव संमत केला. भारताने हा ठराव तत्काळ स्वीकारला, मात्र पाकिस्तानने त्यावर प्रतिसाद देण्यास उशीर केला, अखेर २३ सप्टेंबरला संमती दर्शवली. परंतु, त्यापूर्वी मात्र गुजरातने आपला मुख्यमंत्री गमावला होता.
१९ सप्टेंबर १९६५ रोजी दुपारच्या सुमारास गुजरातचे मुख्यमंत्री बळवंतराय मेहता मिथापूरकडे निघाले होते. हे ठिकाण कच्छच्या आखाताजवळ आहे. त्यांच्या बरोबर विमानात त्यांची पत्नी सरोजबेन, इतर तीन सहकारी आणि दोन पत्रकारही होते. शिवाय गुजरात सरकारचे मुख्य वैमानिक आणि भारतीय हवाई दल व रॉयल एअर फोर्सचे माजी वैमानिक जहांगीर हे विमान चालवत होते. म्हणजेच एकूण आठ जण असलेल्या ‘बीचक्राफ्ट’ विमानाने मिथापूरच्या दिशेने उड्डाण केले होते. परंतु, भविष्यात नेमकं काय वाढून ठेवलाय याची पुसटशीही कल्पना त्यांना तेव्हा नव्हती.
पाकिस्तान एअर फोर्सचा फ्लाइंग ऑफिसर कैस हुसेन आणि फ्लाइट लेफ्टनंट बुखारी यांनी अमेरिकन बनावटीच्या F-86 सेबर लढाऊ विमानातून कराचीजवळील मरीपूर एअरबेसवरून उड्डाण केलं होतं. इंधनाच्या अडचणीमुळे बुखारीला परतावं लागलं. मात्र, हुसेन याने पुढे कूच केली होती. त्याचवेळी पाकिस्तानच्या हवाई नियंत्रण कक्षाकडून एक अज्ञात विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीजवळ फिरत आहे, असा संदेश कैस हुसेनला देण्यात आला. हुसेन २०,००० फूट उंचीवरून गस्त घालत होता. तर, भारतीय विमान ३,००० फूट उंचीवर होते. पाकिस्तानच्या ग्राउंड कंट्रोलने हुसेनला हल्ला करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, बीचक्राफ्टच्या (जहांगीर यांनी) पायलटने समोरून येणाऱ्या पाकिस्तानी सेबर फायटरला पाहिलं. त्यांनी समोरच्या पाकिस्तानच्या लढाऊ विमानाला हे नागरी विमान असल्याच्या सूचना देण्याचा प्रयत्न केला. भारतीय विमानाकडून मदतीचा संकेत देण्यात आला होता, असे असतानाही कैस हुसेन याने गोळीबार सुरू केला. पहिल्या फटक्यात भारतीय विमानाचा डावा पंख जायबंदी झाला, तर दुसऱ्या फटक्यात उजव्या इंजिनाने पेट घेतला. काही क्षणांतच हे विमान भारत-पाकिस्तान सीमेजवळ कच्छच्या भागात कोसळले.
गोळीबार केल्यानंतर मला मिशन पूर्ण केल्याचं समाधान आणि अभिमान वाटला, असे कैस हुसेन याने एका मुलाखतीत सांगितले.
मग माफी का मागितली?
विमान पाडल्यानंतर हुसेन कराचीकडे वेगाने परतले. “मी मरीपूर बेसवर परत आलो तेव्हा विमानाच्या टाक्यांमध्ये एक थेंब इंधनही उरलेलं नव्हतं. वरिष्ठ अधिकारी आणि स्क्वॉड्रनमधील सहकाऱ्यांनी माझं स्वागत केलं. त्या संध्याकाळी ऑल इंडिया रेडिओवर त्या विमानातील प्रवाशांची नावं जाहीर झाली…,” असं हुसेन यांनी सांगितलं. तेव्हाच त्यांना समजलं की, त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि अन्य सामान्य नागरिक असलेलं विमान पाडलं आहे. आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या इतिहासातील हा एक अत्यंत दुर्मीळ प्रसंग होता. युद्धजन्य परिस्थितीत एका राजकीय नेत्याचा अशा प्रकारे हवाई हल्ल्यात मृत्यू होणं हे दुर्मीळ होतं.
हुसेन यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं, ते एक नागरी विमान होतं, तर गोळीबार करण्याचा आदेश का देण्यात आला होता. ते विमान सीमेलगत होतं आणि इतर काही हेतू असू शकतो, या संशयाने हा आदेश देण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले.
४६ वर्षांनंतर कैस हुसेन यांनी मागितली माफी!
जवळपास ४६ वर्षांनी २०११ साली निवृत्त झालेल्या कैस हुसेन यांनी एका पाकिस्तानी संरक्षण मासिकात १९६५ मधील त्या घटनेबाबत एक लेख वाचला. त्या लेखात त्यांच्या गोळीबारामुळे एका उच्चपदस्थ राजकारण्यासह निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असे म्हटले होते. भूतकाळाच्या आठवणींनी अस्वस्थ झालेल्या आणि मन:शांतीच्या शोधात असलेल्या हुसेन यांनी त्या विमानाचे वैमानिक जहांगीर इंजिनिअर यांची मुलगी फरीदा सिंग हिचा शोध घेतला, मुंबईतील पत्ता शोधला आणि ईमेलद्वारे दिलगिरी व्यक्त केली.
त्या ईमेलमध्ये हुसेन यांनी आपल्या कृत्याबद्दल खंत व्यक्त केली. मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलं की, युद्धाच्या काळात त्यांनी केवळ मिळालेल्या आदेशांचे पालन केलं होते.
“मी द्वेषापोटी काहीही केलं नाही. ते युद्धाचं वातावरण होतं. मी लढाईचे नियम पाळले आणि दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी केली.” पत्राच्या शेवटी दुर्घटनेत प्रियजन गमावलेल्या सर्व आठ कुटुंबीयांना आपली संवेदना व्यक्त केली.
“क्षणभर वाटलं की मी गोळी न झाडता परत आलो असतो तर बरं झालं असतं… पण मी एक सैनिक होतो. आणि सैनिकाला आदेश पाळावेच लागतात,” असंही हुसेन यांनी नंतर एका मुलाखतीत म्हटलं.
त्यानंतर फरीदा सिंग यांनी अत्यंत संयम आणि माणुसकीला साजेसं उत्तर दिलं. त्यांनी पत्रात वडिलांच्या मृत्यूचा त्यांच्यावर दूरगामी परिणाम झाल्याचे स्पष्ट लिहिले. परंतु, त्यांनी कधीही वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीचा द्वेष केला नाही. युद्धात कधी कधी चांगली माणससुद्धा भयानक गोष्टी करायला प्रवृत्त होतात. आपण सगळे एका मोठ्या राजकीय खेळाचे प्यादे होतो, असं फरीदा यांनी लिहिलं.
बळवंतराय मेहता यांच्या ‘बीचक्राफ्ट’ या नागरी विमानासह १९६५ च्या युद्धात पाकिस्तानी हल्ल्यात इतर चार विमानांतील अनेकांचेही बळी गेले होते.
राजकीय नेतृत्वाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा आहे जितका तो सहा दशकांपूर्वी होता. बळवंतराय मेहता यांचा मृत्यू हा केवळ एक विमान अपघात नव्हता, तर युद्धजन्य गोंधळात घेतलेला एक चुकलेला निर्णय होता, ज्यामुळे मुख्यमंत्र्याचे प्राण घेतले. कैस हुसेन यांनी दिलगिरी व्यक्त केली, परंतु वेळ गेलेली होती.
आता, ६० वर्षांनी, विजय रुपाणी यांचा हवेत झालेला मृत्यू एक वेगळं, पण तितकंच धक्कादायक वळण घेऊन आला आहे. या वेळी शांततेच्या काळात, तंत्रज्ञानाच्या अपयशामुळे इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यासारखी स्थिती आहे.