AI Brain Fry work Productivity : ऑफिसमध्ये लॉग इन करताच सतत एआयकडून काम करून घेताय, त्याची उत्तरं तपासताय, चुका दुरुस्त करताय आणि पुन्हा पुन्हा प्रॉम्प्ट देताय? दिवस संपेपर्यंत थकून गेल्यासारखं वाटतंय? तर अशा स्थितीला फक्त कामाचा ताण नाही तर ‘एआय ब्रेन फ्राय’ (AI Brain Fry) असा शब्द वापरला जात आहे.

एआयमुळे काम सोपं आणि वेगवान होईल अशी सर्व जणच अपेक्षा ठेवतात. मात्र, सतत एआयसोबत काम करताना कर्मचाऱ्यांना त्याचे प्रॉम्प्ट लिहिणे, मिळालेल्या उत्तरांची पडताळणी करणे, चुका शोधून दुरुस्त करणे आणि वेगवेगळ्या एआय चॅटबॉटमध्ये ती माहिती पडताळत राहणे, यामुळे अतिरिक्त मानसिक ताण जाणवू लागला आहे; त्यामुळे एआय वापरूनही काही कर्मचाऱ्यांना आपण पूर्वीपेक्षा कमी उत्पादक झालो आहोत असे वाटू लागते.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका विश्लेषणानुसार, एआयमुळे कर्मचाऱ्यांचं काम करण्याचं स्वरूप बदलत आहे. पूर्वी कर्मचारी स्वतः काम करत होते; आता त्यातील बराच वेळ एआयने तयार केलेलं काम तपासण्यात, त्यात चुका शोधण्यात आणि आवश्यक ते बदल करण्यात जातो, त्यामुळे कामाचा मानसिक ताण कमी होण्याऐवजी तो दुसऱ्या स्वरूपात समोर येत आहे.

यामुळे आता प्रश्न केवळ “एआयमुळे काम किती सोपं झालं?” इतकाच राहिलेला नाही. एआयमुळे कर्मचारी ज्या पद्धतीने विचार करतात आणि काम करतात, तीच बदलत असेल तर ऑफिसमध्ये काम करण्याची पद्धत आणि वातावरणही त्यानुसार बदलायला हवं का हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरत आहे.

‘एआय ब्रेन फ्राय’ म्हणजे नेमकं काय?

‘एआय ब्रेन फ्राय’ हा कोणताही वैद्यकीय आजार किंवा निदान नाही. एआयचा सतत आणि मोठ्या प्रमाणावर वापर केल्यामुळे कामाच्या ठिकाणी जो मानसिक थकवा जाणवतो त्याला एआय़ ब्रेन फ्राय म्हटलं जातं. एआयकडून एखादा ई-मेल लिहून घेणं किंवा एखाद्या कागदपत्राचा सारांश तयार करून घेणं ही समस्या नाही. अडचण तेव्हा वाढते, जेव्हा कर्मचारी एकाच वेळी अनेक एआय टूल्स वापरतो, त्यांची उत्तरं तपासतो, पुन्हा पुन्हा प्रॉम्प्ट बदलतो, वेगवेगळी उत्तरं एकमेकांशी पडताळतो आणि त्यातील नेमकी कोणती माहिती विश्वासार्ह आहे हे ठरवतो, हे कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायी ठरू शकतं.

मार्च २०२६ मध्ये अमेरिकेतील पूर्ण वेळ काम करणाऱ्या १.४८८ कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात आढळून आले की, एआयचा अतिवापर आणि त्यावर सतत देखरेख ठेवण्यामुळे मानसिक थकवा, निर्णय घेताना येणारा ताण आणि चुका वाढू शकतात. एआयची साधनं वाढवत गेल्याने उत्पादकता कायम त्याच वेगाने वाढत नाही, असंही या अभ्यासातून समोर आलं आहे.

जुलैमध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या संशोधनानुसार, एआयमुळे ज्ञानावर आधारित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भूमिकाही बदलत आहे. पूर्वी ते माहिती गोळा करत होते; आता एआयने तयार केलेली माहिती तपासण्यात आणि योग्य-अयोग्य ठरवण्यात त्या कर्मचाऱ्यांचा वेळ जातो. एआय काही सेकंदांत मोठ्या प्रमाणावर काम तयार करत असला, तरी त्यावर देखरेख ठेवण्यासाठी माणसाला सतत विचार करावा लागतो. यातून एक वेगळाच विरोधाभास समोर येतो, कॉम्प्युटरचं काम वेगाने होतंय, पण ते तपासताना माणसाचा मेंदू मात्र अधिक थकतोय.

हाँगकाँगस्थित वर्कस्पेस कंपनी द एक्झिक्युटिव्ह सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पॉल साल्निकोफ यांच्या मते, ‘एआय ब्रेन फ्राय’ ही संकल्पना नवी असली तरी एआयवर आधारित कामाच्या ठिकाणी हा अनुभव आता अनेक जणांना येत आहे.

एआयमुळे कर्मचाऱ्यांची भूमिका फक्त काम करणाऱ्यांपुरती मर्यादित राहत नाही; एआयने तयार केलेल्या कामावर देखरेख ठेवणंही त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग बनत आहे. माहिती सतत पडताळत राहणे आणि गरज पडल्यास त्याचं फॅक्ट चेकही करावं लागतं. साल्निकोफ पुढे म्हणाले, सतत एआयच्या कामावर देखरेख ठेवण्यामुळे हा मानसिक थकवा जाणवतो, त्यामुळे एआयचा वापर किती केला जातो हा मुख्य प्रश्न नसून एआय नेमका कसा वापरला जातो हा प्रश्न आहे.

जेवढा एआयचा वापर अधिक तेवढी उत्पादकता कमी

एआयचा वापर वाढवला की उत्पादकता त्याच प्रमाणात वाढेलच असं नाही, असा इशारा बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या (BCG) संशोधनातून देण्यात आला आहे. योग्य पद्धतीने एआयचा वापर केल्यास कामाचा वेग वाढू शकतो. मात्र, अनेक एआय टूल्स एकदाच वापरल्यामुळे प्रत्येक टूल समजून घेणं, त्या टूलमध्ये वेगळ्या प्रकारे माहिती पडताळणं, मिळालेली उत्तरं तपासणं आणि कोणतं टूल कसं काम करतंय यावर लक्ष ठेवणं; यामुळे मानसिक ओझं जाणवू शकतं.

‘एआय ब्रेन फ्राय’मुळे फक्त थकवा जाणवत नाही तर निर्णय घेताना होणारा मानसिक ताण वाढतो आणि मोठ्या चुका होण्याची शक्यताही वाढते. मार्केटिंग, मानव संसाधन, ऑपरेशन्स आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसारख्या क्षेत्रांत अनेक एआय प्रक्रिया एकाच वेळी हाताळाव्या लागत असल्याने ही समस्या अधिक जाणवू शकते. म्हणजेच एआयमुळे कर्मचारी वरकरणी अधिक काम करताना दिसू शकतो; पण त्याच वेळी विचार, सर्जनशीलता आणि योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारी मानसिक ऊर्जा कमी होऊ शकते.

डेक्सियनचे व्हीपी आणि इंडिया कंट्री हेड कुमार राजगोपालन यांच्या मते, अनेक एआय टूल्सचा सतत वापर करणं, मोठ्या प्रमाणात एआयने तयार केलेली माहिती तपासणं आणि त्याच्या शिफारसींचं विश्लेषण करणं यामुळे मेंदूवर अतिरिक्त ताण येतो. हे दीर्घकाळ सुरू राहिल्यास मानसिक थकवा वाढून चिकित्सक विचार करण्याची आणि योग्य तर्क लावण्याची क्षमता कमी होऊ शकते, त्यामुळे एआयचा जास्तीत जास्त वापर करण्यापेक्षा तो योग्य आणि समजूतदारपणे वापरणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे माणसाची विचारशक्ती वाढू शकते.

एआयमुळे कामाचं स्वरूप कसं बदलतंय?

एआयमुळे कामाचा ताण कमी होईलच असं नाही; अनेकदा एआयमुळे फक्त कामाचा प्रकार बदलतो. एआय यायच्या आधी एखादा रिपोर्ट स्वतः लिहावा लागत होता, आता कर्मचारी एआयकडून अनेक वेगवेगळ्या प्रकारे रिपोर्ट तयार करून घेतात आणि तपासतात. एखाद्या विषयावर स्वतः संशोधन करण्याऐवजी वेगवेगळ्या एआय सिस्टिमने दिलेली माहितींची तुलना करतात. एआयच्या सतत येणाऱ्या शिफारसींचा आढावा घेऊन त्यातील योग्य पर्याय निवडावा लागतो, त्यामुळे एआयने कामाचा काही भार कमी केला तरी तपासणी, तुलना आणि निर्णय घेण्याचं काम वाढू शकतं.

नव्या संशोधनानुसार, एआयच्या वापरामुळे कामाची तीव्रता वाढते आणि कर्मचारी अधिक वेळ कामात गुंतलेले राहू शकतात. मात्र, त्याचा अर्थ कामाचा ताण कमी झाला असं नाही. एआयमुळे जो वेळ वाचतो तो पुन्हा मीटिंग्स, प्रॉम्प्ट्स, कामाची तपासणी आणि अतिरिक्त कामात घालवत असाल तर उत्पादकता वाढण्यासोबतच मानसिक थकवाही वाढू शकतो.

भारतात ८० टक्के कर्मचारी आठवड्यातून अनेकदा एआय वापरतात, तर ४१% कर्मचारी दररोज एआयचा वापर करतात, असं एडीपी रिसर्चच्या People at Work 2026 अहवालात नमूद करण्यात आलं आहे, त्यामुळे भारतातील आयटी, कन्सल्टिंग, बँकिंग, मीडिया आणि प्रोफेशनल सर्व्हिसेससारख्या क्षेत्रांवर एआयमुळे होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम होत आहे.

कंपन्या एआयचा फायदा मोजताना किती कर्मचारी एआय वापरतात, किती कामं ऑटोमेट झाली आणि किती आउटपूट मिळालं याकडे पाहतात. मात्र, कर्मचाऱ्यांवर येणारा मानसिक ताणही इथे चिंतेची बाब आहे. एखादा कर्मचारी दुप्पट काम करत असला, पण त्याच्याकडून चुका वाढत असतील, मानसिक थकवा जाणवत असेल आणि गुंतागुंतीचा विचार करण्याची क्षमता कमी होत असेल तर उत्पादकतेतील खरी वाढ मानता येणार नाही.

मग ऑफिसमध्ये काय बदलायला हवं?

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक कामासाठी एआयवर अवलंबून राहण्याऐवजी त्याचा वापर नेमका कधी करायचा हे ठरवणं गरजेचं आहे. एआयमुळे रोजची सारखी वाटणारी कामं सोपी होऊ शकतात; पण सर्जनशील विचार आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना एआयपासून दूर, शांतपणे काम करण्यासाठी पुरेसा वेळही मिळायला हवा. ऑफिसमध्ये शांत जागा, नैसर्गिक प्रकाश, हिरवळ आणि थोडा वेळ आराम करता येईल अशी व्यवस्था यासाठी उपयोगी ठरू शकते.

एआयमुळे अनेक कामं सोपी होत असतील तर ऑफिसमध्ये फक्त संगणकासमोर बसून काम करण्यापेक्षा चर्चा, टीमवर्क, समस्या सोडवणं आणि नवीन कल्पनांवर विचार करणं यालाही प्राधान्य द्यायला हवं. कोणतं काम एआयकडून करून घ्यायचं आणि कुठे माणसाने स्वतः निर्णय घ्यायचा हे कर्मचाऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. कंपन्यांनी एआयचा वापर योग्य पद्धतीने करण्याचं प्रशिक्षण द्यावं आणि एआयपासून काही काळ दूर राहून काम करण्यासाठीही वेळ द्यावा. शेवटी, कर्मचाऱ्याने किती एआय टूल्स वापरली यावर त्याची उत्पादकता ठरवली जाऊ नये, तर काम किती चांगलं झालं यावर ठरवायला हवी, असेही तज्ज्ञ स्पष्ट करतात.