Ayushman Card AI Detection : तुमच्या आरोग्याशी निगडीत असलेली आयुष्यमान भारत योजना आता अधिक तंत्रज्ञानसक्षम होणार आहे. सरकारी योजनांमधील कामकाज अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी केंद्र सरकार एआयचा सक्रियपणे वापर करत आहे. यातच आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (AB-PMJAY) होणारे गैरव्यवहार ओळखण्यासाठी आणि ते रोखण्यासाठीदेखील केंद्र सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या (NHA) राष्ट्रीय फसवणूक प्रतिबंधक विभागामार्फत (NAFU) या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. दररोज येणाऱ्या ४० हजारांहून अधिक विमा दाव्यांचे मूल्यांकन करून गैरव्यवहार, जादा बिलिंग आणि बनावट लाभार्थी ओळखण्याचे काम एआयच्या मदतीने केले जात आहे.

एआय गैरव्यवहार कसे ओळखतो?

  • बहुभाषिक OCR (Optical Character Recognition) तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी दर्जाच्या वैद्यकीय कागदपत्रांचे स्कॅनिंग होते. यामध्ये उपचारांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले आहे का याची पडताळणी केली जाते.
  • ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटर व्हिजन तंत्रज्ञान पुढे एक्स-रे, सीटी स्कॅन आणि एमआरआय अहवालांचे विश्लेषण करतो. यामध्ये रोगाचे निदान आणि रुग्णालयाने केलेला विमा दावा यामध्ये सुसंगती आहे का हे तपासले जाते.
  • डिस्चार्ज समरीत केलेले फेरफार, बनावट स्वाक्षऱ्या तसेच डीपफेक किंवा बदल केलेली वैद्यकीय कागदपत्रे एआयचे अल्गोरिदम सहज ओळखू शकतात
  • रुग्णालयांना रुग्णाचा बेडवरील फोटो अपलोड करणे बंधनकारक असते. एकाच आयसीयू रुग्णाचा फोटो वेगवेगळ्या नावांनी वापरून अधिक विमा रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला तर एआय तो लगेच ओळखतो.
  • रुग्णाच्या मृत्यूनंतर दाखल केलेले विमा दावे किंवा रोगाचे निदान होण्यापूर्वीच दाखल झालेले दावे एआय संशयास्पद ठरवतो. तसेच जिओ-टॅगिंगच्या मदतीने एकाच रुग्णावर एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी शस्त्रक्रिया झाल्याचा दावा केल्यास तोही एआयच्या मदतीने लक्षात येतो.
  • रक्त तपासणीसह इतर वैद्यकीय अहवालांचे विश्लेषण केले जाते. यावरून त्यांना महागड्या उपचारांची खरोखर गरज होती का याची एआय पडताळणी करते.
  • किरकोळ आजाराचे निदान होऊनही जर मोठ्या शस्त्रक्रियेचा किंवा महागड्या उपचारांचा दावा केला तर ते देखील एआय लगेच ओळखते.

एआय प्रत्येक विमा दावा आणि रुग्णालयाचा ‘रिस्क स्कोअर’ ठरवते. संशयास्पद दावे पुढील तपासणीसाठी मानवी लेखापरीक्षकांकडे पाठवले जातात, त्यामुळे कामातील प्रक्रिया पारदर्शक होण्यास मदत होते.

डिजिटल सुरक्षा यंत्रणेत महत्त्वाचे स्तंभ कोणते?

  • भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर यांच्या सहकार्याने BODH प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला. हा प्लॅटफॉर्म भारतीय आरोग्यविषयक माहितीच्या आधारे एआय मॉडेल्समधील अचूकता तपासतो.
  • महाराष्ट्रासह काही राज्यांनी AI-आधारित KMS 2.0 एआय प्रणाली स्वीकारली आहे. या प्रणालीमुळे एकाच उपचारासाठी वारंवार दाखल होणारे दावे रोखणे आणि अनेक रुग्णालयांमधील बनावट विमा दाव्यांचा मागोवा घेणे शक्य होते.
  • रुग्णाला दाखल करताना आणि डिस्चार्ज देताना आधारवर आधारित बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे, त्यामुळे दुसऱ्याच्या नावाने उपचार घेणे किंवा खोटे लाभार्थी ओळखणे सोपे होते.
  • एआय आणि मानवी तपासणीचा समन्वय : सामान्य विमा दाव्यांची प्रक्रिया एआयद्वारे केली जाते. मात्र, संशयास्पद दावे आढळल्यास ते तातडीने राष्ट्रीय फसवणूक प्रतिबंधक विभाग (NAFU) आणि राज्यस्तरीय फसवणूक प्रतिबंधक विभागांकडे (SAFU) सखोल तपासणीसाठी पाठवले जातात.

एआय प्रणालीचा परिणाम काय होतो?

  • एआयमुळे गैरव्यवहार शोधण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि प्रतिबंधात्मक झाली आहे.
  • संशयास्पद दावे ओळखण्यासाठी पूर्वी हाताने (मॅन्युअल) प्रक्रिया केली जात होती, जी खूप वेळखाऊ होती. पण, एआयमुळे हे दावे तत्काळ ओळखले जात आहेत.
  • या प्रणालीच्या मदतीने आतापर्यंत ६३० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे फसवे विमा दावे रोखण्यात यश आले आहे.
  • संशयास्पद नसलेल्या विमा दाव्यांची मंजुरी एआयकडून स्वयंचलितपणे दिली जात असल्याने दाव्यांना निकाली काढण्याचा कालावधी २० दिवसांवरून अवघ्या ४ तासांपर्यंत कमी झाला आहे.
  • योजना सुरू झाल्यापासून एकूण रुग्ण दाखल होण्याच्या तुलनेत सिद्ध झालेल्या गैरव्यवहारांचे प्रमाण केवळ ०.१८ टक्के आहे. मात्र, एआयच्या तपासणीत गैरव्यवहार उघड झाल्यानंतर शेकडो रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. अनेक रुग्णालयांचे मान्यतापत्र (एम्पॅनलमेंट) निलंबित करण्यात आले आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.

योजनेत एआयचा वापर केल्याने काय फायदे झाले?

एआयमुळे गैरव्यवहार लवकर ओळखणे शक्य झाले असून फसवे दावे मोठ्या प्रमाणात रोखले जात आहेत, त्यामुळे तपासणी आणि पडताळणीची प्रक्रिया अधिक वेगवान झाली आहे. परिणामी, सरकारी निधीचा योग्य लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने पोहोचत आहे.