Glaucoma AI Detection News Marathi: पुणे जिल्ह्यातील सासवडमधील ७१ वर्षीय शिवा यांना नुकतेच मधुमेहचे (डायबिटीज) निदान झाले होते. मधुमेहाने डोळ्यांच्या दृष्टीवर देखील परिणाम होतो. मधुमेह आणि वाढत्या वयामुळे डोळ्यांच्या दृष्टीवर होणारा परिणाम वेळीच ओळखण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर यशस्वी ठरत आहे. शिवा यांनी एका फिरत्या नेत्र तपासणी शिबिरात डोळे तपासले. शिवा यांच्यासह इतर ३० जणांचा तपासणी अहवाल पुण्यातील डॉ. परिक्षित गोगटे यांच्या क्लिनिकमध्ये पाठवण्यात आला. तिथे रेटिना स्पेशलिस्ट डॉ. सुप्रिया फडके यांनी त्या अहवालांची एआय टूलचा वापर करून तपासणी केली. त्यांनी मशिन लर्निंग आणि डीप लर्निंग अल्गोरिदमच्या सहाय्याने रेटीनल इमेजेस (डोळ्याच्या पडद्यांची छायाचित्रे) व डोळ्यांचा डेटा तपासला. एआय टूलचा वापर करून डॉ. फडके ह्या जवळपास ९० टक्के नेत्ररोगांचे निदान अचूक करतात. यावेळीही त्यांनी शिवाला ग्लुकोमा म्हणजेच काचबिंदू होण्याची सुरूवात झाल्याचे निदान एआय टूलचा वापर करून केले.
“ज्या भागांमध्ये नेत्ररोगतज्ज्ञांची व फंडस इमेजिंग तंत्रज्ञानाची कमतरता आहे, त्या भागात फिरते नेत्र तपासणी शिबिर उपक्रम महत्वाचे ठरत आहेत. फंडस इमेजिंग हे नेत्ररोगाचे निदान करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून डोळ्याच्या पडद्याचे हाय रिजोल्यूशन फोटो काढले जातात”, असे डॉ. गोगटे म्हणाले. लॅन्सेट प्रायमरी केअर जर्नलमध्ये या संदर्भात एक अभ्यास अहवाल प्रकाशित झाला आहे.
अभ्यास अहवाल महत्वाचा का आहे?
मध्यम व कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये काचबिंदूचे (ग्लुकोमा) प्रमाण अधिक आहे. या देशांमधील नागरिकांना असलेल्या काचबिंदूचे निदान खूप उशीरा होते. त्यामुळे अनेकांना दृष्टी गमवावी लागते. अशा देशांमध्ये या नवीन अभ्यास अहवालाचा फायदा होणार आहे. “एआय कमी खर्चिक असलेल्या फंडस कॅमेराचा वापर करतो. फंडस कॅमेरा डोळ्याच्या आतील बाजूचे छायाचित्र टिपतो. ही प्रक्रिया प्रशिक्षित असलेल्या नॉन फिजिशियन स्टाफ मेंबर्सना देखील करता येते. त्यामुळे नेत्ररोगाशी संबंधित विशेष सेवा क्षेत्रांवर काचबिंदूच्या रुग्णांचा ताण पडणार नाही. ज्या भागांमध्ये नेत्ररोग तज्ज्ञ कमी आहेत तिथे याचा फायदा होईल. मोठी लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये जास्तीत जास्त काचबिंदू रूग्णांचे निदान लवकर करता येईल”, असे अभ्यास अहवालात सहभागी असलेल्या प्रमुख अफोन्सो लिमा कॅब्रिता (नेत्ररोगचिकित्सक विभाग, यूनिदादे लोकल दे साऊदे सांता मारिया, लिस्बॉन, पोर्तुगाल) यांनी सांगितले.
काचबिंदू काय आहे? त्याची तपासणी का केली पाहिजे?
काचबिंदू म्हणजेच ग्लुकोमा हा डोळ्यांशी संबंधित एक आजार आहे. डोळ्याच्या समोरील बाजूस एक द्रवपदार्थ तयार होतो. त्यामुळे डोळ्यावर दबाव येऊन ऑप्टिक नर्व्हचे नुकसान होते. ऑप्टिक नर्व्ह या डोळ्यांना दिसणारी माहिती डोळ्याच्या पडद्यापासून (रेटिना) मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. या आजारामुळे जगात अनेकांची दृष्टी गेलेली आहे. शेवटच्या टप्प्यात काचबिंदूचे निदान झाल्याने डोळे गमवावे लागल्याचे प्रमाण अधिक आहे. काचबिंदूचे निदान लवकर झाल्यास डोळ्यांची दृष्टी वाचवता येऊ शकते.
जगातील एकूण काचबिंदू रूग्णांपैकी २० टक्के काचबिंदूचे रूग्ण भारतात आहेत. काचबिंदूने ग्रस्त असलेला भारत हा जगात दुसरा देश आहे. भारतात जवळपास दहा लाख वीस हजार लोकांनी काचबिंदूने दृष्टी गमावली आहे. एकूण दृष्टी गमवावी लागलेल्या आजारांमध्ये काचबिंदूने दृष्टी गमवावी लागली, याचे प्रमाण ५.५ टक्के आहे. एका अहवालानुसार, भारतात ९० टक्के काचबिंदू झालेल्या रूग्णांचे निदानच होत नाही.
काचबिंदूचे (ग्लुकोमा) निदान का होत नाही?
काचबिंदूचे निदान अनेकदा होत नाही, त्यामुळे नियमित नेत्र तपासणी केली पाहिजे, असा सल्ला डॉ. गोगटे देतात. “नॉर्मल टेन्शन ग्लुकोमा हा काचबिंदूचा एक प्रकार आहे. यात डोळ्यांवरील दबावाची नोंद कमी होते, परंतु, ऑप्टिक नर्व्हचे नुकसान झालेले असते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी गमवावी लागते. ऑप्टिक नर्व्हला होणारा रक्त पुरवठा कमी असल्याने तसेच नर्व्ह स्ट्रक्चर अशक्त झाल्यास असे होते. कधीकधी डोळ्यांवर खूप दबाव असतो. पण ऑप्टिक नर्व्हचे नुकसान होत नाही. तसेच दृष्टीही जात नाही. या कारणांमुळे काचबिंदूचे निदान होण्यात अडथळे येतात”, असे डॉ. गोगटे यांनी सांगितले.
एआय टूलचा वापर केल्याने काय समोर आले?
एआय टूलचा वापर करून पोर्तुगालमध्ये २०२३ मध्ये एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यास संशोधनात वयोगट ५५ ते ६५ मधील ६७१ नागरिकांचा सहभाग होता. या नागरिकांचे डोळे एआय टूलचा वापर करून तपासले गेले. डोळ्यांच्या आतील बाजूच्या छायाचित्रांचा सहा काचबिंदू तज्ज्ञांकडून स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात आला. एआय टूलने ७८ टक्के काचबिंदूचे निदान केले, तर ९५ टक्के काचबिंदू नसल्याचे एआयने सांगितले. एआयने दिलेला अहवाल हा नेत्ररोगतज्ज्ञांनी दिलेल्या अहवालाशी मिळताजुळता होता.
एआयचा वापर केल्याने उपचार खर्च कमी होईल?
“एआयचा वापर करून नेत्र तपासणी केल्यास तपासणीचा खर्च कमी होईल. तसेच गरज नसताना काही वेळा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते. ते टाळता येईल. दरम्यान, प्रत्येक तपासणीत एआय अचूक ठरले असे नाही. एआय मध्ये अजून विकास होईल. तसेच त्याची रोगाचे निदान करण्याची क्षमता वाढेल. एआयचा वापर करून वेळीच काचबिंदू झाल्याचे कळेल. त्यामुळे दृष्टी गमावण्याचा धोका टाळता येईल.”, असे लिमा कॅब्रिता म्हणाल्या.
