AI in translation industry: मध्यरात्रीचा गडद अंधार, टेबलावर एक चहाचा वाफाळलेला कप आणि नजरेसमोर केवळ संगणकाचा प्रकाश. अनेक वर्षांपासून भाषांतराची कामं करत असलेला अनुवादक काही क्षणासाठी थांबतो. एका वाक्यात आईच्या डोळ्यातलं पाणी आणि सुस्कारा दोन्ही आहे. त्या वाक्यातल्या शब्दांना प्रतिशब्द तर माहिती आहेत, पण त्या हुंदक्यांचं भाषांतर कसं करावं? इतकी वर्ष विविध भाषांमध्ये काम करत असलेला अनुवादक त्या भावना त्या भाषेत नेमक्या मांडताना सावधपणे चोहोबाजूंनी विचार करून लिहीत असतो. नेमकं याच क्षणी, जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात बसलेलं ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) एका सेकंदात १०,००० हजार शब्दांचा फडशा पडत आहे.
गेल्या काही वर्षांत हे जग झपाट्याने बदललं आहे. व्यवसाय, पुस्तके आणि डिजिटल विश्वात AI चा बोलबाला आहे. एका क्लिकवर इंग्रजीचं मराठी किंवा तमिळचं हिंदी होतंय. वेळ वाचतोय, पैसे वाचतायत. पण, या चकाकत्या तंत्रज्ञानाच्या झळा एका साध्या, संवेदनशील प्रश्नाला जन्म देत आहेत – मशीन शब्दांचा अर्थ तर सांगेल, पण त्यामागची भावना समजेल का? आणि आयुष्यभर शब्दांशी नातं जोडून पोट भरणाऱ्या माणसांचं आता काय होणार?
आपण जेव्हा म्हणतो, ‘उंटावरून शेळ्या हाकणे’, तेव्हा त्याचा अर्थ कामात प्रत्यक्ष न उतरता दुरून सल्ले देणे असा असतो. पण, मशीन त्याचा अनुवाद करेल -”Driving goats from atop a camel” ऐकणाऱ्याला वाटेल हा कोणता नवा पशुपालनाचा प्रकार आहे?
हसण्यावारी नेण्यासारखा हा प्रकार असला तरी तो भाषेचं मूळ सत्य सांगून जातो. मराठीत आपण जेव्हा म्हणतो, “त्याच्या पोटात पाय आहेत,” तेव्हा कोणत्याही डॉक्टरला तिथे पाय सापडणार नाहीत! कारण भाषा केवळ व्याकरणाचे नियम आणि शब्दकोशातले शब्द नसतात; ती हजारो वर्षांचा इतिहास, सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ, राजकीय घडामोडी आणि नैसर्गिक बदलांच्या परिणामांनी घडते.
आजचे AI मॉडेल्स व्याकरणिकदृष्ट्या अगदी चोख आणि चकचकीत वाक्ये रचू शकतात. पण, जेव्हा नाजूक उपरोध एखादा हळुवार टोमणा किंवा कवितेतली न बोललेली कळ व्यक्त करायची असते, तेव्हा मशीनचे अल्गोरिदम अडखळतात. जाहिराती असोत वा कादंबऱ्या, तिथे शब्दांपेक्षा शब्दांमागचा ‘टोन’ महत्त्वाचा असतो. मशीन वाक्य बिनचूक देईलही, पण त्यात प्राण कसा फुंकणार?
याविषयी बोलताना ‘काइटफिश एआय’चे (KiteFishAI) संस्थापक अनुज गुप्ता म्हणतात,
“AI भाषांतराचा मोठा भाग नक्कीच वेगवान करेल, पण माणसाची गरज संपवू शकणार नाही. कारण खरी लढाई फक्त वाक्य जुळवण्याची नाही, तर त्या संस्कृतीचा आत्मा टिकवून ठेवण्याची आहे.”
बारा कोसांवर बदलते भाषा: भारताची अनोखी भूलभुलैया
आपल्या भारतात भाषांतराची परीक्षा साधीसुधी नाही. इथे दर काही कोसांवर भाषा आपला रंग बदलते. घटनेने २२ भाषांना मान्यता दिली असली, तरी प्रत्यक्षात शेकडो बोलीभाषा, लहेजे आणि रोजच्या बोलण्यातली मिसळ (जशी हिंग्लिश किंवा मराठी-इंग्रजीची सरमिसळ) आहे. पाश्चिमात्य भाषांच्या तुलनेत अनेक भारतीय भाषांचा डिजिटल डेटा आजही तुटपुंजा आहे. पण, याच आव्हानाला एका वरदानात बदलण्यासाठी आज भारतात अनोखे प्रयोग सुरू आहेत:
- ‘भाषिणी’ (BHASHINI) च्या माध्यमातून खेड्यापाड्यातील एका शेतकऱ्याला सरकारी योजनांची माहिती त्याच्या बोलीभाषेत मिळावी यासाठी काम सुरू आहे.
- आयआयटी मद्रासचे ‘एआय४भारत’ (AI4Bharat) सर्व २२ भाषांमधील भिंती पाडण्यासाठी मोफत आणि प्रभावी साधने तयार करतंय.
- ‘सर्व्हम एआय’ (Sarvam AI) आपण रोज जसं बोलतो, त्या बोलीभाषेला आणि संवादाला समजून घेणारे मॉडेल्स घडवतंय.
- तर ‘अनुवादिनी’ (Anuvadini) द्वारे इंजिनिअरिंग, वैद्यकीय अशा क्लिष्ट शिक्षणातील पुस्तके प्रादेशिक भाषांत आणून ज्ञानाची कवाडे उघडी केली जात आहेत.
विचार करा, दूरवरच्या खेड्यातल्या एका आजारी माणसाला डॉक्टरांच्या सूचना जर त्याच्या स्वतःच्या भाषेत आणि अचूक समजल्या, तर ते केवळ भाषांतर नसेल; ते जीवनदान ठरेल! मात्र, अशा संवेदनशील ठिकाणी AI वर आंधळा विश्वास ठेवून चालत नाही; तिथे माणसाची अनुभवी नजर हवीच.
पोटापाण्याचा प्रश्न आणि नवं वळण
या साऱ्या गदारोळात मूळ भीती आहे ती रोजगाराची. एका अभ्यासानुसार भारतातील लाखो कर्मचाऱ्यांच्या कामावर AI चा थेट प्रभाव पडू शकतो. जे काम साचेबद्ध, रोजचं आणि कंटाळवाणं होतं, ते आता AI सेकंदांत करू शकतं. सहाजिकच, भाषांतरकारांना मिळणारे मानधन आणि वेळ यावर दबाव वाढतो आहे. पण, नाण्याला दुसरी बाजूही आहे. इतिहास साक्षी आहे, जेव्हा कॅमेरा आला तेव्हा चित्रकार संपले नाहीत, तर कलेला एक नवा दृष्टिकोन मिळाला. तसेच काहीसे इथेही घडत आहे.
भाषांतरकाराचे काम आता संपत नाहीये, तर ते अधिक समृद्ध होतंय. कालपर्यंत एका पानावर डोके खाजवणारा भाषांतरकार आता एका ‘संपादका’च्या, एका ‘सांस्कृतिक समीक्षका’च्या भूमिकेत जातोय. AI कच्चा मसुदा तयार करेल आणि माणूस आपल्या अनुभवाने, कल्पकतेने त्याला सजवेल. कोणता शब्द तांत्रिकदृष्ट्या बरोबर असूनही संदर्भानुसार कसा चुकला आहे, हे सांगण्याची ताकद फक्त मानवी मेंदूत आहे.
शेवटी, नातं माणसाशीच!
भविष्य हे ‘माणूस विरुद्ध मशीन’ या भांडणाचं नाही, तर ‘माणसाच्या साथीने मशीन’ या सहवासाचं आहे. AI कडे गतीचा प्रचंड वेग आहे, तर माणसाकडे आत्मीयतेची ऊब. माहितीचा महापूर सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला AI ची गती हवी आहे, पण त्या माहितीतला विश्वास आणि आपुलकी टिकवून ठेवण्यासाठी माणसाचा हात हवा आहे. मशीन कितीही शहाणी झाली, तरी डोळ्यांतले भाव ओळखून शब्दांना हळुवार स्पर्श करण्याचे कसब नेहमी माणसाकडेच राहील. शेवटी भाषा माणसाने माणसाशी जोडण्यासाठी निर्माण केली आहे आणि तो धागा कधीही तुटू शकत नाही.
