scorecardresearch

Premium

एआय नोकऱ्या घालवणार? कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक तोटा

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आधीच अनेकांना नोकऱ्यांवरून कमी केले जात आहे. सध्या तरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीला थांबविणे शक्य नाही. एका अहवालानुसार २०३० पर्यंत पुरुषांपेक्षा महिलांनाच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राचा अधिक फटका बसू शकतो, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे.

jobs worst affected by ai
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे महिला कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Photo – Freepik)

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान कितीही चांगले असले, तरी ते अनेकांच्या नोकऱ्या गिळंकृत करणारे ठरू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यातही मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूट या संस्थेने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार पुढच्या दशकभरात एआयमुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेतच, पण त्याचा सर्वाधिक फटका पुरुष वर्गापेक्षा महिलांना अधिक बसणार आहे. अमेरिकेत जुलै २०२३ मध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. २०३० पर्यंत अमेरिकेत एकूण कामांच्या तासांपैकी एक तृतीयांश तास काम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे स्वयंचलित पद्धतीने केले जाऊ शकते, असेही या अहवालात म्हटले आहे.

महिलांनाच अधिका धोका का?

या अहवालातील संशोधनानुसार, येत्या काही वर्षांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना नव्या क्षेत्रात नोकरी शोधण्याची अधिक गरज भासणार आहे. कारण महिला शक्यतो कमी पगाराच्या नोकऱ्यांवर मोठ्या संख्येने आहेत. ब्लुम्बर्गच्या अभ्यासानुसार हे कमी पगाराचे क्षेत्र स्वयंचलित यंत्रांमुळे आंकुचन पावणार आहे. ग्राहक सेवा, विक्री सहकार्य आणि खाद्यपदार्थ सेवा या सारख्या क्षेत्रातील नोकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा फटका बसणार असून या पदांवर असलेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारापासून वंचित व्हावे लागू शकते.

rashi parivartan 2023
ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ‘या’ राशींचे नशीब पालटणार? ३ ग्रह एकत्र येताच व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता
education department
जातीय संघर्षांबरोबरच पक्षफुटीलाही निमंत्रण!
car testing dummy lady
मोटार अपघाताबाबतच्या सुरक्षा टेस्टिंगमध्ये स्त्री डमी वापरूनही अभ्यास!
womens sexual desire feminist perspectives on sex cultural suppression of female sexuality
ग्रासरूट फेमिनिझम : ‘अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात..’

कृत्रिम बुद्धिमत्तेची उत्पादकक्षम उपयोगिता लक्षात आल्यानंतर आता अनेक व्यवसाय त्याचा वापर करण्याकडे झुकत आहेत. ओपन एआय कंपनीच्या चॅट जीपीटीकडे सध्या अनेकांचा ओढा दिसत आहे. येत्या काही वर्षांत आणखी चांगले एआय उत्पादने बाजारात येण्याची शक्यता आहे. वकील, शिक्षक, वित्तीय सल्लागार आणि आर्किटेक्ट अशा नानाविध क्षेत्रांत तज्ज्ञ असलेल्यांनाही येत्या काळात स्वतःमध्ये तंत्रज्ञानाला अनुसरून बदल घडवावे लागणार आहेत. मॅकिन्से ग्लोबल यांच्या अहवालाच्या मते, नोकरी करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडण्याची शक्यता आहे. पण, त्यामुळे मोठ्या संख्येने पदे घटवली जातील असे सध्या तरी वाटत नाही.

हे वाचा >> ‘एआय’ची दुधारी तलवार

मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटचे भागीदार मायकल चुई यांनी ब्लुम्बर्गशी बोलताना सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता खूप आपत्तीजनक परिणाम करेल, असे आता तरी दिसत नाही. पण एक नक्की की, यामुळे प्रत्येक क्षेत्रातील काम करण्याच्या पद्धतीत मात्र आमूलाग्र बदल होऊ शकतात. गोल्डमन सॅक्स या आणखी एका संशोधन संस्थेने सांगितले की, ‘एआय’च्या आगमनामुळे १५ प्रकारची कामे पूर्णपणे बदलून जाणार आहेत. यामध्ये प्रबंधक (Mangager) स्तरावरील कामे, अभियांत्रिकी आणि कायद्याशी निगडित क्षेत्राचा उल्लेख केलेला आहे.

अमेरिकेतील राज्य नॉर्थ कॅरोलिनामधील ‘केनन-फ्लॅगर बिझनेस स्कूल’च्या अभ्यासानुसार, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ८० टक्के महिला कर्मचाऱ्यांना याचा धोका उत्पन्न होऊ शकतो; तर ६० टक्के पुरुष कर्मचाऱ्यांना याचा त्रास होऊ शकतो. “कृत्रिम बुद्धिमत्तेचा महिला कर्मचाऱ्यांना अधिक फटका बसण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे महिलांचा व्हाइट कॉलर क्षेत्रात असलेला ७० टक्क्यांचा सहभाग. व्हाइट कॉलर जॉब हे व्यवस्थापन, व्यावसायिक कौशल्य, उच्च शिक्षण, आरोग्य सेवा अशा क्षेत्रातील उच्च पदस्थ नोकऱ्यांशी संबंधित आहे; तर ब्लू कॉलर जॉब क्षेत्रात महिलांचा केवळ ३० टक्के वाटा आहे. ब्लू कॉलर जॉब हे असंघटित क्षेत्र, मेहनतीचे काम, मजूर स्तरावरील किंवा शेती क्षेत्राशी निगडित आहेत. पुरुषांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास दोन्ही क्षेत्रात त्यांचा ५० – ५० टक्के एवढा वाटा आहे”, अशी माहिती फॉर्च्यून रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे.

रिव्हेलिओ लॅब्स या विश्लेषक एजन्सीने सांगितले की, जनरेटिव्ह ‘एआय’मुळे दुभाषी, प्रोग्रामर (संगणकीय भाषेचे तज्ज्ञ) आणि टेलिमार्केटर यासारख्या नोकऱ्या प्रभावित होऊ शकतात. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या प्रभावाखाली येणाऱ्या क्षेत्रात तब्बल ७१ टक्के नोकऱ्या सध्या महिलांकडे असल्याचे आढळून आले आहे.

कमी पगार असलेल्या नोकऱ्यांना कसा फटका बसणार?

मॅकिन्से अहवालात म्हटल्याप्रमाणे, ज्या कर्मचाऱ्यांना नव्या नोकऱ्या शोधण्याची गरज लागू शकते, त्यामध्ये कृष्णवर्णीय आणि हिस्पॅनिक कामगार (हिस्पॅनिक म्हणजे अमेरिकेत स्पॅनिश बोलणारे, विशेष करून मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील रहिवासी), महाविद्यालयीन पदवी नसलेले कामगार, सर्वात तरुण आणि वयोवृद्ध कामगार यांचा प्रामुख्याने समावेश होतो. तसेच अन्न आणि उत्पादनाच्या क्षेत्रातील मागणी कमी झाल्यामुळे कृष्णवर्णीय आणि हिस्पॅनिक समुदायातील कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात.

या दशकात अमेरिकेतील जवळपास एक कोटी २० लाख लोक आपला व्यवसाय किंवा नोकरी बदलण्याची शक्यता आहे आणि त्यातही या दशकातील तीन वर्ष संपत आली आहेत. मॅकिन्से संस्थेने फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालातील अंदाजानुसार ही संख्या आता २५ टक्के अधिक असल्याचे कळते आहे.

कमी पगारावर काम करणाऱ्या पुरुष आणि महिला कामगारांना या बदलाचा फटका बसणार असून नवीन उद्योगांमध्ये काम मिळवण्यासाठी त्यांना नवी कौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत. अहवालातील माहितीनुसार, विविध व्यवसायात काम करणाऱ्या कमी पगाराच्या कामगारांना रोजगार गमवावा लागू शकतो. किरकोळ दुकानातील विक्रेते, कॅशिअर्स आणि इतर क्षेत्रातील कमी पगारावर काम करणारे कामगार आणि त्यातही महिला वर्ग सर्वाधिक असुरक्षित गटात मोडत आहे. द वॉश्गिंटन पोस्टच्या माहितीनुसार अमेरिकेत रुपये ३१.२ (३८,२०० डॉलर्स) लाखाहून कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या वर्गातील ८० टक्के कामगारांना या दशकात स्थित्यंरातून जावे लागू शकते.

हे वाचा >> विश्लेषण: स्त्री पुरुषांच्या वेतनात असमानता किती व कशी असते?

शून्य कार्बन उत्सर्जन उपक्रमाचा नोकऱ्यांना फटका

वाढलेले जागतिक तापमान नियंत्रणात आणण्यासाठी ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अनेक देश काम करत आहेत. या उपक्रमाचाही फटका नोकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेने हरितगृह वायूचे उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे, यामुळे ३५ लाख नोकऱ्यांवर गदा येण्याचा धोका निर्माण झाला आहे. मॅकेन्सीच्या अहवालातील माहितीनुसार, इंधन आणि नैसर्गिक वायू उत्पादन क्षेत्र आणि ऑटोमोटिव्ह (वाहने) उत्पादन क्षेत्राला यामुळे मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. परिणामी, या क्षेत्रातील कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणे अटळ आहे.

असे असले तरी याची भरपाई नव्या अक्षय ऊर्जा (Renewable Energy) क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे भरून निघू शकते. या क्षेत्रात नव्याने ४२ लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ब्लुम्बर्गने दिलेल्या माहितीनुसार, ऊर्जा क्षेत्राचे संक्रमण होत असताना सरकार नव्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करत आहे. ज्यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांची मागणी वाढेल. या क्षेत्रात सध्या कामगारांची टंचाई आहे. मॅकेन्सी एजन्सीने सांगितल्यानुसार २०२२ च्या तुलनेत २०३० पर्यंत बांधकाम क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये १२ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

याचा अर्थ ‘एआय’मुळे अनेक क्षेत्रातील नोकऱ्या जाणार असल्या, तरी काही नवीन क्षेत्राची दालने नक्कीच उघडतील. पण, त्यासाठी कामगारांनाही स्वतःच्या कौशल्यामध्ये भर टाकावी लागणार आहे.

कोणत्या उद्योगांना लाभ होईल?

कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवाने योग्य वापर केल्यास याचे अनेक चांगले परिणामही आपल्याला दिसतील. मेकेन्सीच्या अहवालानुसार, एआय क्षेत्रातील प्रगती नव्या संधी निर्माण करेलच, त्याशिवाय विद्यमान व्यवसायांना लाभ होईल. जसे की, व्हाइट कॉलर क्षेत्रातील उच्चपदस्थ कर्मचारी एआयच्या सहाय्याने तांत्रिक कामे चुटकीसरशी करू शकतील, जेणेकरून त्यांना त्यांचा वेळ अधिक सर्जनशील आणि धोरणात्मक कामाकडे वळविता येईल. जे कृत्रिम बुद्धिमत्तेला सध्या तरी करणे शक्य नाही. विधी आणि स्थापत्य अभियंते कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक लाभ घेऊ शकतात. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वच क्षेत्राला लागू पडेल असेही नाही. विशेष करून आरोग्य क्षेत्र आणि कृषी यांसारख्या क्षेत्रात मानवी श्रमालाच अधिक महत्त्व असणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ai is here to steal your jobs how women will be affected more than men kvg

First published on: 22-08-2023 at 14:50 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×