कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयमुळे नवनवीन उद्योग उभे राहतील, मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, २०२६ हे वर्ष संपत आले तरी प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी एका बाजूला एआय क्षेत्रात कोट्यवधींची गुंतवणूक केली असतानाच दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात नोकरकपातीला सुरुवात केली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना जाहीर केली आहे. अमेरिका, भारत, कॅनडा आणि ब्रिटनमधील निवडक विभागांतील सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांसाठी ही योजना उपलब्ध आहे. यावरून एक विरोधाभास समोर आला आहे. एआयमुळे भविष्यात रोजगाराच्या नव्या संधी तयार होणाची शक्यता वर्तवली जात असली तरी सध्याच्या अनेक नोकऱ्यांवर त्यामुळे गदा येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे नोकरकपातीचा हा कल केवळ तंत्रज्ञान क्षेत्रापुरताच मर्यादित नाही. बँका, उत्पादन क्षेत्रातील कंपन्या आणि इतर व्यवसायांनीदेखील आपल्या मनुष्यबळाचा नव्याने आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. ऑटोमेशन आणि एआय तंत्रज्ञान हे कंपन्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीचा महत्त्वाचा भाग बनल्याने कर्मचाऱ्यांची गरज बदलत आहे. या पार्श्वभूमीवर एआयमुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या नष्ट होत आहेत की कंपन्या केवळ खर्च कपातीसाठी आणि पुनर्रचनेसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करताहेत, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. उद्योग जगतातील या उलथापालथीवर ‘लेक्सलेगिस. एआय’चे (Lexlegis.ai) संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक साकार यादव यांनी विश्लेषणात्मक भूमिका मांडली आहे.
आयटी कंपन्यांच्या धोरणात नेमका काय बदल?
साकार यादव म्हणाले की, इतिहासातील प्रत्येक तंत्रज्ञान क्रांतीने कंपन्यांना आपल्या मनुष्यबळात बदल करण्यास भाग पाडले आहे. सध्या एआयचा स्वीकार, खर्चावरील नियंत्रण आणि कंपन्यांची पुनर्रचना या तिन्ही गोष्टी एकाच वेळी घडत आहेत, कारण त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. कंपन्या नव्या कौशल्यांनुसार आपल्या टीमची फेररचना करत असून जिथे शक्य आहे तिथे कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण दिले जात आहे, तर नव्या कार्यपद्धतीत बसत नसलेल्या पदांवरील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात आहे. ते पुढे म्हणाले की, कर्मचाऱ्यांना नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना इतर पदांवर संधी उपलब्ध करून देणे, ही आता कंपनीच्या नेतृत्वाची प्रमुख जबाबदारी झाली आहे. ती केवळ ऐच्छिक बाब राहिलेली नाही. या बदलांच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखून आणि कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी गुंतवणूक करून योग्य पद्धतीने संक्रमण घडवून आणणाऱ्या कंपन्या कदाचित भविष्यात अधिक सक्षम ठरतील.
२०२६ मध्ये आतापर्यंत किती नोकऱ्या गेल्या?
Layoffs.fyi या कर्मचारी कपातीची नोंद ठेवणाऱ्या संकेतस्थळाच्या आकडेवारीनुसार, २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ३२८ तंत्रज्ञान कंपन्यांनी एकूण एक लाख ३४ हजार ९१७ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. हा आकडा २०२५ मध्ये संपूर्ण वर्षभरात नोंदवलेल्या १ लाख २२ हजार ६०६ कर्मचारी कपातीपेक्षाही अधिक आहे. म्हणजेच, २०२६ मध्ये दररोज सरासरी सुमारे ४५९ तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. याशिवाय आणखी कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्टने सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छेने नोकरी सोडण्याची योजना आणली आहे. हा आकडा कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येच्या सुमारे २७ टक्के आहे. याशिवाय, बार्कलेज आणि अमेरिकन एक्स्प्रेस या कंपन्यांनीही कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. या निर्णयांमागील कारणांमध्ये एआयचा समावेश असल्याचे कंपन्यांनी सांगितले आहे. मात्र, मायक्रोसॉफ्टच्या योजनेतील ६० हजार कर्मचारी प्रत्यक्षात नोकरी सोडणारच असे नाही. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, इतर तंत्रज्ञान कंपन्यांमधील अशा योजनांना साधारणपणे ३ ते ५ टक्के कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. हाच कल मायक्रोसॉफ्टमध्येही दिसल्यास सुमारे १,८०० ते ३,००० कर्मचारी नोकरी सोडू शकतात.
मायक्रोसॉफ्ट स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय का दिला?
जूनअखेर मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे २ लाख २३ हजार कर्मचारी होते. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ही संख्या ५ हजारांनी कमी होती. जुलैमध्ये कंपनीने सुमारे ४,८०० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. यातील बहुतांश कर्मचारी एक्सबॉक्स विभागातील होते. त्याआधी २०२५ मध्ये कंपनीने १५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. एकीकडे कर्मचारी कपात सुरू असताना, दुसरीकडे मायक्रोसॉफ्टने २०२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण १४५.३ अब्ज डॉलर खर्च करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या खर्चाचा मोठा भाग डेटा सेंटर उभारणीसाठी आणि त्यासंबंधित पायाभूत सुविधांसाठी वापरला जाणार आहे. ब्रिटनमधील बार्कलेज बँकेने २०२६ च्या अखेरपर्यंत सुमारे ५ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे नियोजन केले आहे. ही संख्या बँकेच्या एकूण कर्मचारी संख्येच्या सुमारे ५ टक्के आहे. यापैकी जवळपास १ हजार पदे आधीच कमी करण्यात आली आहेत. दुसरीकडे अमेरिकन एक्स्प्रेसनेही आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे जवळपास ३,५०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याचा अंदाज आहे.
भारतीय आयटी कंपन्यांमध्येही कर्मचारी कपात
एआयमुळे कर्मचारी कपातीचा परिणाम भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावरही दिसत आहे. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एससीएलटेक आणि टेक महिंद्रा या पाच कंपन्यांनी मिळून २०२५-२६ या आर्थिक वर्षात ६,९८१ नोकऱ्या कमी केल्या आहेत. टीसीएसने आपल्या एकूण कर्मचारी संख्येत सुमारे दोन टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, जवळपास १२ हजार २०० कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ येऊ शकते. या कपातीचा सर्वाधिक परिणाम मध्यम आणि वरिष्ठ व्यवस्थापनातील पदांवर होणार असल्याचे कंपनीने आपल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
कर्मचारी कपातीमागे फक्त एआय हेच कारण?
मायक्रोसॉफ्टच्या स्वेच्छेने नोकरी सोडण्याच्या योजनेचा अर्थ ६० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार असा होत नाही. ही योजना पात्र कर्मचाऱ्यांसाठी एक पर्याय आहे. त्यापैकी किती कर्मचारी हा प्रस्ताव स्वीकारतात, यावर प्रत्यक्षात नोकरी सोडणाऱ्यांची संख्या अवलंबून असेल. मात्र, कर्मचाऱ्यांना निवडीची संधी देऊनही कंपन्या आपल्या कर्मचारी संख्येत कपात करू शकतात हे या योजनेतून स्पष्ट होते. तज्ज्ञांच्या मते, विविध क्षेत्रांतील कंपन्या एआयसाठी पायाभूत सुविधा उभारणे, स्वयंचलन आणि कार्यक्षमता वाढवणे यासाठी गुंतवणूक करत असतानाच कर्मचारी कपातीच्या घोषणाही करत आहेत. मात्र, या सर्व निर्णयांमागे एकच कारण असल्याचे म्हणता येणार नाही. तंत्रज्ञानामुळे नियमित आणि पुनरावृत्तीची कामे स्वयंचलित झाल्यास काही पदांची गरज कमी होऊ शकते. दुसरीकडे, कंपन्यांच्या व्यावसायिक प्राधान्यक्रमांमध्ये बदल, एकाच स्वरूपाची जबाबदारी सांभाळणारी अनेक पदे किंवा खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज यांमुळेही कर्मचारी कपात केली जाऊ शकते.
एआयमुळे नोकऱ्यांवर नेमका किती परिणाम?
नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च (NBER) या संस्थेने केलेल्या अभ्यासातूनही याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जगभरातील सुमारे ९ हजार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणावर आधारित या अभ्यासानुसार, गेल्या तीन वर्षांत एआयमुळे त्यांच्या कंपन्यांमधील रोजगारावर एकूण परिणाम झालेला नाही, असे बहुतांश अधिकाऱ्यांचे मत आहे. पुढील तीन वर्षांतही कर्मचाऱ्यांच्या संख्येवर एआयचा एकूण परिणाम कमी राहील, अशी अपेक्षा बहुसंख्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. याचाच अर्थ एआय काही नोकऱ्या कमी करत असतानाच रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण करत आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्राध्यापक सुरज श्रीनिवासन यांनी याला ‘असमान परिणाम’ असे म्हटले आहे. त्यांच्या संशोधनानुसार, ChatGPT सुरू झाल्यानंतर स्वयंचलनाचा मोठा परिणाम होऊ शकणाऱ्या क्षेत्रांतील नोकऱ्यांच्या जाहिराती कमी झाल्या आहेत. मात्र, ज्या एआयमुळे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढण्याची शक्यता असलेल्या पदांची भरतीही करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांना नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण का महत्त्वाचे?
NBER च्या अभ्यासानुसार, ८७ टक्के वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागील तीन वर्षांत एआयमुळे त्यांच्या कंपन्यांमधील रोजगारावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगितले आहे. सात टक्के अधिकाऱ्यांच्या मते, एआयमुळे रोजगारावर सकारात्मक परिणाम झाला, तर सहा टक्के अधिकाऱ्यांनी या तंत्रज्ञानामुळे कर्मचारी संख्या कमी झाल्याचे म्हटले आहे. मात्र, एआयचा वापर वाढत गेल्यास भविष्यात हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. पुढील तीन वर्षांत एआयमुळे आपल्या कंपनीतील रोजगार कमी होईल, अशी भीती २८ टक्क्यांहून अधिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. याउलट, १६ टक्के अधिकाऱ्यांना रोजगार वाढण्याची अपेक्षा आहे, तर ५७ टक्के अधिकाऱ्यांच्या मते, एआयमुळे त्यांच्या कंपन्यांतील कर्मचारी संख्येवर कोणताही परिणाम होणार नाही. एकंदरीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे पारंपारिक नोकऱ्या कमी होण्याची शक्यता असली तरीही नव्या कौशल्यावर आधारित रोजगाराच्या संधीही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या बदलांच्या काळात कंपन्यांनी केवळ नोकरकपातीवर भर न देता सध्याच्या कर्मचाऱ्यांना नव्या कामांसाठी तयार करण्यावरही लक्ष द्यायला हवे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
