AI Jobs Future in India analysis: “AI मुळे माझी नोकरी जाईल का?” हा प्रश्न सध्या आयटी इंजिनिअर्सपासून ते पत्रकार, अकाउंटंट आणि शिक्षकांपर्यंत सर्वांनाच भेडसावत आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या ताज्या अहवालानुसार AI एकाच झटक्यात नोकऱ्या संपवण्याऐवजी कामाचे स्वरूप बदलत आहे.
“AIमुळे माझी नोकरी जाईल का?”
आज हा प्रश्न केवळ सॉफ्टवेअर इंजिनिअर विचारत नाहीत. तर पत्रकार, अकाउंटंट, डिझायनर, शिक्षक, ग्राहकसेवा कर्मचारी, वकील, मार्केटिंग व्यावसायिक, रेडिओलॉजिस्टपासून ते डेटा एंट्री करणाऱ्या कर्मचाऱ्यापर्यंत अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे. पण या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ किंवा ‘नाही’ एवढे सोपे निश्चितच नाही. कारण Artificial Intelligence एखादी नोकरी एका झटक्यात संपवण्यापेक्षा त्या नोकरीतील काही कामे स्वतःकडे घेते. आणि मग उरलेल्या कामाचे स्वरूप बदलते. काही पदांची संख्या कमी होते, काही नवीन पदे निर्माण होतात आणि काही जुन्या पदांना नव्या कौशल्यांची गरज भासते, असे AI मधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या २०२५च्या विश्लेषणानुसार जगातील सुमारे चारपैकी एक कामगार अशा व्यवसायात आहे ज्यावर Generative AIचा काही प्रमाणात का होईना परिणाम होऊ शकतो; मात्र बहुतेक नोकऱ्या पूर्णपणे नष्ट होण्यापेक्षा बदलण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे खरी लढाई “AI विरुद्ध माणूस” अशी नसून ‘AI वापरणारा’ विरुद्ध ‘AI न वापरणारा’ अशी होण्याची शक्यता तज्ज्ञांना अधिक वाटते आहे.

पत्रकारांचेच उदाहरण घेऊ. पूर्वी बातमी लिहिणे, माहिती शोधणे, भाषांतर करणे, शीर्षके तयार करणे, माहिती लिहिणे करणे, डेटा तपासणे आणि सोशल मीडियासाठीची कॉपी लिहिणे आदी सर्व कामे पत्रकाराच्या कामाचा भाग होती. Generative AI यातील मुलाखत जशीच्या तशी उतरवून काढण्याचा भाग, प्राथमिक रिसर्च, भाषांतर, माहितीचा गोषवारा किंवा शीर्षकांचे पर्याय काही सेकंदांत देऊ शकते. पण म्हणून पत्रकाराची गरज लगेचच संपत नाही. पण त्याच पत्रकाराकडून आता माहितीची पडताळणी, संदर्भ समजून घेणे, मुलाखत, विश्लेषण, प्रश्न विचारणे आणि अंतिम संपादकीय निर्णय घेणे या संदर्भातील जबाबदारी वाढली आहे. यालाच लेबर इकनॉमिस्ट टास्क ट्रान्स्फॉर्मेशन किंवा ऑग्मेंटेशन असे म्हणतात.
ILOच्या २०२६च्या एम्पिरिकल एव्हिडन्सच्या आढाव्यानुसार GenAIमुळे उत्पादकता वाढताना निश्चितच दिसते आहे; मात्र पलीकडे मोठ्या प्रमाणावर अनेकांच्या नोकऱ्याही जात आहेत. त्याच वेळी तरुण कामगारांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधींमध्ये याचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे AIचा पहिला परिणाम अनेकदा नोकरीवर नाही तर नोकरीतील कामाच्या गुणवत्तेवर होताना दिसतो आहे.
नोकऱ्या खरोखर कमी होणार?
ज्या कामांमध्ये नियम स्पष्ट आहेत, प्रक्रियेची पुनरावृत्ती अधिक आहे आणि मोठ्या प्रमाणावर डिजिटल माहितीवर प्रक्रिया करावी लागते, तिथे ऑटोमेशनची शक्यता अधिक असणार आहे. उदाहरणार्थ डेटा एंट्री, बेसिक बुककिपिंग, ग्राहक सेवा, संवाद उतरवून काढणे (ट्रान्सस्क्रिप्ट), स्टँडर्ड डॉक्युमेंट प्रोसेसिंग, कंटेंट जनरेशन, भाषांतर, सॉफ्टवेअर कोडिंग आणि अॅडमिन शेड्युलिंग यांचा त्यात समावेश होतो.
वर्ल्ड इकनॉमिक फोरमच्या फ्यूचर ऑफ जॉब रिपोर्ट २०२५ मध्ये म्हटले आहे की, २०३०पर्यंत विविध व्यापक ट्रेण्डस् मुळे सुमारे १७ कोटी नवीन रोजगार निर्माण होण्याची आणि तर ९.२ कोटी लोक बेरोजगार होण्याची शक्यता आहे. म्हणजे निव्वळ सुमारे ७.८ कोटी रोजगारांची वाढ अपेक्षित आहे. ही भविष्यवाणी नसून जगभरातील कंपन्यांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या भावी रोजगारविषयक अपेक्षांवर आधारित अशी ही आकडेवारी आहे. त्याच अहवालात कारकुनी आणि सेक्रेटरी, कॅशिअर, तिकीट क्लार्क, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट यांसारख्या काही पदांमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे AI, मशीन लर्निंग, बिग डेटा, सॉफ्टवेअर आणि सायबरसुरक्षेशी संबंधित रोजगाराची मागणी वाढणार आहे. याचाच अर्थ नोकरी न जाता, कदाचित त्याचे स्वरूप बदलण्याची शक्यता सर्वाधिक आहे, असे तज्ज्ञांना वाटते.
सर्वात मोठा धोका कोणासाठी?
AI मुळे फक्त कमी कौशल्य असलेल्या कामगारांच्या नोकऱ्यात धोक्यात येतील, हा गैरसमज आहे. उलट Generative AIने उच्चशिक्षित पांढरपेशा नोकऱ्यांवर अधिक गदा येणार आहे. लेखन, कोडिंग, कायदेशीर कागदपत्रे, आर्थिक विश्लेषण, प्रेझेंटेशन तयार करणे किंवा रिसर्च असिस्टंट ही सारी कामे AI करू शकते. IMFच्या २०२६च्या अभ्यास अहवालानुसार AIशी संबंधित कौशल्यांची मागणी असलेल्या नोकऱ्यांमध्ये अधिकच्या वेतनाची शक्यता जास्त आहे. म्हणून भविष्यातील प्रश्न “मी पदवीधर आहे का?” एवढाच नसेल. तर पुढे दिलेले प्रश्न अधिक भेडसावतील.
- मी AIबरोबर काम करू शकतो, त्याचा सुयोग्य वापर करू शकतो का?
- AIने दिलेले उत्तर मी तपासून घेऊ शकतो का?
- चुकीची माहिती ओळखू शकतो का?
- समस्या मांडू शकतो का?
- आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे AIला योग्य प्रश्न विचारू शकतो का? (प्रॉपर प्रॉम्प्ट)
भारतासाठी चित्र वेगळे का आहे?
भारतातील रोजगार बाजारपेठ इतर विकसित अर्थव्यवस्थांपेक्षा वेगळी आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर असंघटित क्षेत्रात रोजगार आहे, त्याचप्रमाणे मेकॅनिकसाठी प्रत्यक्ष काम करणारी मंडळी अनेक क्षेत्रात मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे Generative AI प्रत्येक भारतीय कामगाराच्या नोकरीवर गदा आणणार नाही. २०२६मध्ये प्रकाशित भारतीय तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासाने PLFS 2023-24च्या आकडेवारीला ILOच्या ऑक्युपेशनल एक्सपोजर फ्रेमवर्कशी जोडून केलेल्या विश्लेषणात असे आढळले की सुमारे ७६.९ टक्के भारतीय कामगार दुरुस्ती-देखभालीसारखी प्रत्यक्ष शारीरिक कामे करतात, आणि शेती व बांधकाम क्षेत्रात शारीरिक काम करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तिथे AI त्यांचा रोजगार हिरावू शकत नाही. याचाच दुसरा अर्थ असा की, भारतातील AI क्रांतीचा परिणाम सर्व कामगारांवर समान होणार नाही. IT कंपनीतील प्रोग्रॅमर आणि बांधकाम मजुरासमोर AIची आव्हाने वेगवेगळी आहेत. याचा अर्थ शारीरिक कामे सुरक्षित आहेत, असे नाही. रोबटिक्स, स्वयंचलित मशिन्स आणि AI-नियंत्रित सिस्टिम्स पुढील टप्प्यात शारीरिक कामांची जागा घेऊ शकतात.
AIमुळे नोकऱ्या कमी होतील की, उत्पादकता वाढेल?
सध्या तरी या प्रश्नाचे उत्तर ‘दोन्ही’ असेच आहे. भारत सरकारच्या २०२६च्या AI@Work आढाव्यानुसार भारत AI अॅडाप्टेशनच्या दृष्टीने वेगाने पुढे जात आहे; सरकारने Stanford Global AI Indexचा हवाला देत म्हटले आहे की, भारतात AI- कौशल्यांचा रोजगारावर होणारा परिणाम जागतिक तुलनात्मक पातळीपेक्षा २.५ पट असल्याचे नमूद केले आहे. IT क्षेत्रातील बदल त्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. Reutersच्या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, Wiproमध्ये AIमुळे निर्माण झालेली उत्पादन क्षमता सुमारे २०,००० कर्मचाऱ्यांच्या क्षमतेइतकी आहे. विप्रोने १ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना अॅडव्हान्स एआय ट्रेनिंग दिले आहे. यातून एक महत्त्वाचा फरक समोर येतो. AIमुळे २०,००० लोकांची नोकरी गेलेली नाही; पण २०,००० कर्मचाऱ्यांच्या क्षमतेएवढे काम आता कमी वेळात करणे शक्य झाले आहे. आता कंपनी ती वेळेची बचत कशी वापरते. म्हणजेच कंपनी कर्मचारी कपात करणार की, आहेत त्यांच्याकडून नवीन काम करून घेणार की, त्याच कर्मचाऱ्यांकडून अधिक मूल्य असलेले काम करून घेणार, यावर या साऱ्याचा परिणाम रोजगाराचा होणार का, ते अवलंबून असेल.
Microsoftच्या २०२६ Work Trend Indexच्या भारतातील निष्कर्षांनुसार AI वापरणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये ३२ टक्के जणांना कंपनीने आघाडीचे कर्मचारी म्हटले आहे. हे कर्मचारी फक्त AI वापरकर्ते नाहीत, तर ते AIला काम वाटून देतात, आऊटपूट तपासतात, वर्कफ्लो बदलतात आणि स्वतःचे काम पुन्हा डिझाईन करतात. यामुळे भविष्यात AI कौशल्य म्हणजे फक्त प्राप्म्ट लिहिणे असणार नाही. तर त्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञता, चिकित्सक विचारपद्धती, फेरपडताळणीचे कौशल्य, संवादकौशल्य आणि सूज्ञ निर्णय प्रक्रिया यांची किंमत वाढू शकते.
पण मग AIमुळे उत्पादकता वाढली तर रोजगारही वाढेल का?
- असे होत नाही. एखाद्या कंपनीत १०० लोक १० दिवसांत जे काम करतात ते AIच्या मदतीने १०० लोक पाच दिवसांत करू शकले, तर उरलेल्या पाच दिवसांत अधिक काम मिळेलच असे नाही.
- कंपनीला अतिरिक्त उत्पादनाची मागणी नसेल तर ती कामगार कपात होऊ शकते.
- पण उत्पादन स्वस्त झाले आणि त्याचवेळेस बाजारपेठ वाढली आणि मागणीही वाढली तर लोकांच्या नोकऱ्या टिकू शकतात.
यालाच अर्थशास्त्रात उत्पादकता-रोजगार संबंध यांचा गुंतागुंतीचा भाग असे म्हणतात. म्हणून AI किती चांगले काम करते यापेक्षा AIमुळे वाचलेला वेळ आणि पैसा अर्थव्यवस्था कुठे पुन्हा गुंतवते, हे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणून भविष्यातील प्रश्न फक्त नवीन नोकऱ्या कुठे आहेत? हा नवीन नोकरीसाठी कोणती कौशल्ये महत्त्वाची ठरतील?, हा आहे.
AIच्या युगात प्रत्येकाला प्रोग्रॅमर होण्याची गरज नाही, पण कौशल्ये मात्र वाढवावी लागतील हे नक्कीच.
काय महत्त्वाचे असेल?
- Critical thinking: AIने दिलेली माहिती बरोबर आहे का हे चिकित्सकपणे तपासणे.
- Domain expertise: त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञता
- Communication: ग्राहक, सहकारी आणि AI systems यांच्यामध्ये योग्य संवाद साधण्याचे कौशल्य.
- Problem-solving: AIला उत्तर विचारण्यापेक्षा समस्या नेमकी कोणती ते अचूक ओळखणे.
- decision Making – निर्णयक्षमता – योग्य वेळी, वेगात योग्य तो निर्णय घेण्याचे कौशल्य
WEFच्या फ्यूचर जॉब रिपोर्टमध्ये वर दिलेल्या सर्व मानवी कौशल्यांचे महत्त्व कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठीचा महत्त्वाचा संदेश म्हणजे नोकरी टिकवायची तर सुयोग्य कौशल्ये संपादन करा आणि स्वतःला नोकरीच्या गरजेनुसार बदला!
संदर्भसूची
- 1)International Labour Organization (ILO)- Generative AI and Jobs: A 2025 Update, 20 May 2025.
- 2) International Labour Organization (ILO)- The Impact of GenAI on Jobs, Productivity and Work Organization: A Review of the Empirical Evidence, June 2026.
- 3) International Monetary Fund (IMF)- AI: Deployment and Disruption, Annual Report 2026.
- 4) International Monetary Fund (IMF)- Bridging Skill Gaps for the Future: New Jobs Creation in the AI Age, Staff Discussion Note 2026/001, January 2026.
- 5) World Economic Forum (WEF)- The Future of Jobs Report 2025, January 2025.
- 6) World Economic Forum- Jobs of Tomorrow: Technology and the Future of the World’s Largest Workforces, October 2025.
- 7) Government of India, Press Information Bureau- AI@Work: Driving Productivity, Jobs, and Innovation, 12 February 2026.
- 8) Mehta, Balwant Singh et al- GenAI and the Future of Work in India: Mapping Sectoral and Occupational Exposure, IASSI Quarterly, Vol. 44, Issue 4; online publication February 2026.
- 9) Reuters- Wipro’s AI push frees capacity equivalent to 20,000 workers, CTO says, September 2026.
