AI Skilled Career Boosts Salary in India : भारतात गेली दोन दशके सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे उच्च पगाराच्या आणि स्थिर करिअरच्या संधींचे प्रमुख माध्यम मानले जात होते. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) हे चित्र काही अंशी पालटले आहे. केवळ अभियंत्यांपुरते मर्यादित न राहता विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांसाठी एआय करिअरच्या नव्या संधी निर्माण करत आहे. एआयच्या वाढत्या प्रभावामुळे बंगळुरूसारखी शहरे वर्ल्ड टेक्नोलॉजी हब म्हणून अधिक बळकट होत आहेत; यामुळे आयटी क्षेत्राला चालना मिळते आणि अर्थातच जागतिक स्तरावर सर्वाधिक मागणी असलेल्या तंत्रज्ञान कौशल्याधारित मनुष्यबळात भारतीय व्यावसायिकांचे महत्त्व वाढते.
एडटेक प्लॅटफॉर्म स्केलरने देशभरातील ११,४४४ एआय शिकणाऱ्यांच्या करिअरमधील परिणामांचा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार एआय अभियांत्रिकीच्या पलीकडे जाऊन तांत्रिक क्षेत्राबाहेरील मनुष्यबळाची फळी विकसित करत आहेत. एआयमुळे केवळ सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनाच नव्हे तर सल्लागार, मानव संसाधन (HR) क्षेत्रातील व्यावसायिक, मार्केटिंग तज्ज्ञ, वित्त अधिकारी आणि ऑपरेशन्स मॅनेजर्स यांनाही करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत, त्यामुळे एआय हे सर्वच क्षेत्रांसाठी उपयुक्त कौशल्य म्हणून उदयास येत असल्याचे दिसत आहे.
अहवालात नमूद केल्याप्रमाणे, कार्यालयीन कामकाजात ज्या प्रकारे स्प्रेडशीट्स आणि ई-मेलचा वापर अत्यावश्यक बनला, त्याचप्रमाणे येत्या काळात एआयचा वापरही सर्वसामान्य होण्याची शक्यता आहे. बदलत्या रोजगार व्यवस्थेत एआय कौशल्य असलेल्या उमेदवारांना अधिक संधी आणि स्पर्धात्मक लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
एआय व्यावसायिक कौशल्य का बनत आहे?
पूर्वी करिअरमध्ये वेगाने प्रगती करण्यासाठी एमबीएला सर्वाधिक प्रभावी मार्ग मानलं जात होतं. मात्र, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आता एआय कौशल्यवृद्धी ही एमबीएसारखीच तुल्यबळ भूमिका बजावत असल्याचे दिसते.
अहवालानुसार, एआय कौशल्ये आत्मसात केलेल्या व्यावसायिकांच्या सरासरी वेतनात १४७ टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, तीन ते सहा वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा झाला असून, त्यांच्या पगारात सरासरी १५५ टक्क्यांनी वाढ झाली; तर सहा ते नऊ वर्षांचा अनुभव असलेल्या व्यावसायिकांच्या वेतनातही १४० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
मात्र, या बदलाचा परिणाम केवळ पगारवाढीपुरता मर्यादित नाही. एआयचे कौशल्य असलेल्या व्यावसायिकांना अधिक जबाबदारीच्या भूमिका, धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि नेतृत्वाच्या संधी अधिक प्रमाणात मिळत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच एआयचे शिक्षण हे केवळ कामाची कार्यक्षमता वाढवण्याचे साधन राहिलेले नाही, तर विविध क्षेत्रांतील करिअरमध्ये प्रगतीची संधी निर्माण करणारे कौशल्य बनत आहे, यामुळेच आज एआयकडे केवळ तांत्रिक कौशल्य म्हणून नव्हे, तर प्रत्येक व्यावसायिकासाठी आवश्यक ठरणारे करिअर-केंद्रित कौशल्य म्हणून पाहिले जात आहे.
डेक्सियनचे उपाध्यक्ष, स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज आणि कंट्री हेड इंडिया, कुमार राजगोपालन हे म्हणाले की, ‘एआय हा एमबीएचा पर्याय नाही, मात्र विविध उद्योगांमध्ये करिअरला गती देणारे एक महत्त्वाचे कौशल्य म्हणून तो वेगाने उदयास येत आहे. एमबीएमुळे व्यावसायिक कौशल्ये, नेतृत्वगुण आणि धोरणात्मक विचार करण्याची क्षमता विकसित होते, तर एआयमुळे अधिक वेगाने निर्णय घेणे आणि डेटाचा प्रभावी वापर करून कामाची कार्यक्षमता वाढवणे शक्य होते. आघाडीच्या एआय परिवर्तनाच्या उपक्रमांमध्ये नेतृत्व करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यवसायातील परिणाम, नावीन्य आणि स्पर्धात्मकता मिळवण्यासाठी एआयचा कसा वापर करू शकतात यावर भर दिला जात आहे.’
गैर-तांत्रिक एआय कर्मचाऱ्यांचा उदय
एआयबाबत अनेकांच्या मनात असलेला एक गैरसमज म्हणजे हे कौशल्य फक्त सॉफ्टवेअर इंजिनिअर्स किंवा तांत्रिक क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीच उपयुक्त आहे. मात्र, उपलब्ध आकडेवारी यापेक्षा वेगळे चित्र दर्शवते.
अहवालानुसार, सध्या एआयचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक चार जणांपैकी एक जण हा गैर-तांत्रिक पार्श्वभूमीचा आहे. एवढेच नाही, तर एआयशी संबंधित उपलब्ध करिअर संधींपैकी निम्म्याहून अधिक संधी पारंपरिक अभियांत्रिकी क्षेत्राबाहेरील आहेत. सल्लागार सेवा, मानव संसाधन, विपणन, संचालन आणि वित्त यांसारख्या क्षेत्रांमध्येही एआय कौशल्य असलेल्या व्यावसायिकांची मागणी झपाट्याने वाढत आहे.
या बदलाचे स्पष्ट उदाहरण कन्सल्टिंग क्षेत्रात दिसून येते. एआयचे कौशल्य आत्मसात करण्यापूर्वी या क्षेत्रातील व्यावसायिकांचा एकूण यशातील वाटा केवळ ३ टक्क्यांच्या आसपास होता. मात्र, एआय कौशल्ये मिळवल्यानंतर हा वाटा जवळपास दुप्पट होऊन ५.६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, कंपन्या आता केवळ तांत्रिक ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांवर भर देत नाहीत, त्याऐवजी संबंधित क्षेत्रातील अनुभवासोबत एआयचा प्रभावी वापर करू शकणाऱ्या व्यावसायिकांना अधिक प्राधान्य दिले जात आहे.
जज ग्रुप इंडियाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी कनिष्क अग्रवाल यांनी असे नमूद केले की, ‘एआयमुळे विविध क्षेत्रांमध्ये मूल्यनिर्मितीची संकल्पनाच बदलत आहे. एआयच्या मदतीने तांत्रिक पार्श्वभूमी नसलेले व्यावसायिकही गुंतागुंतीच्या समस्या सोडवू शकतात, प्रक्रिया स्वयंचलित करू शकतात आणि डेटाच्या आधारे अधिक अचूक निर्णय घेऊ शकतात. एखादा मार्केटिंग प्रमुख, मानव संसाधन क्षेत्रातील अधिकारी किंवा वित्तीय विश्लेषक आपल्या क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर कसा करायचा हे समजून घेत असेल, तर काही वेळा तो अत्यंत तांत्रिक कौशल्य असलेल्या तज्ज्ञापेक्षाही व्यवसायावर अधिक प्रभाव निर्माण करू शकतो.’
महिलांसाठीही एआय करिअरमध्ये मोठ्या संधी?
अहवालानुसार, एआय-सक्षम करिअरमध्ये प्रवेश केलेल्या महिलांच्या सरासरी वेतनात १४५ टक्क्यांची वाढ झाली. ही वाढ एकूण सरासरी वाढीशी सुसंगत असल्याचे दिसते. मात्र, काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये महिलांनी पुरुषांच्या तुलनेत अधिक वेगाने वेतनवाढ नोंदवली आहे.
उदाहरणार्थ, डेटा इंजिनिअरिंग लीडरशिप पदांवर काम करणाऱ्या महिलांच्या वेतनात २८५ टक्क्यांची वाढ झाली, तर त्याच भूमिकेतील पुरुषांच्या वेतनात ११२ टक्क्यांची वाढ झाली. त्याचप्रमाणे, क्वालिटी अॅश्युरन्स (QA) इंजिनिअर पदांवर महिलांच्या वेतनात तब्बल ५७४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली, तर पुरुषांच्या बाबतीत ही वाढ केवळ २०४ टक्के होती.
तज्ज्ञांच्या मते, एआय हे केवळ उत्पन्न वाढवणारे कौशल्य नाही, तर महिलांसाठी करिअरच्या नव्या संधी निर्माण करणारे माध्यम ठरत आहे. राजगोपालन यांनी सांगितले की, ‘एआयमुळे महिलांना नवीन गोष्टी शिकण्याच्या, मार्गदर्शन (Mentorship) मिळवण्याच्या आणि अधिक प्रभावी प्रकल्पांवर काम करण्याच्या संधी उपलब्ध होत आहेत. दैनंदिन आणि पुनरावृत्तीची कामे एआयच्या मदतीने अधिक जलद पूर्ण होत असल्याने महिलांना धोरणात्मक विचार, नावीन्यपूर्ण कल्पना आणि नेतृत्वाशी संबंधित जबाबदाऱ्यांवर अधिक लक्ष केंद्रित करता येते. सोबतच वेतनवाढीसाठी आणि करिअरमधील प्रगतीसाठीही फायदेशीर ठरू शकते.’
एआयमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवी दरी निर्माण होतेय?
या अहवालातील निष्कर्ष भविष्यातील रोजगार व्यवस्थेचे बदलते चित्र स्पष्ट करतात. एआय कौशल्ये आता केवळ विशेष तांत्रिक पात्रता राहिलेली नसून, विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांसाठी मूलभूत गरज बनत असल्याचे यातून दिसून येतेय; म्हणूनच एआय भारतातील रोजगार व्यवस्थेत बदल घडवून आणेल का हा आता प्रश्न राहिलेला नाही. उलट हा बदल आधीच सुरू झाला असून त्याच्याशी जुळवून घेण्याचे आव्हान कर्मचारी, शैक्षणिक संस्था आणि नियोक्ते यांच्यासमोर उभे आहे.
सध्याचा कल कायम राहिला तर भविष्यातील रोजगार क्षेत्रातील सर्वात मोठी दरी अभियंते आणि इतर व्यावसायिकांमध्ये किंवा महानगर आणि निमशहरी भागांतील कर्मचाऱ्यांमध्ये नसेल, तर एआयचा प्रभावी वापर करता येणारे आणि एआयचे कौशल्य नसलेले व्यावसायिक यांच्यात ती दरी निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.
