AI Leads to False Memory : एखादी घटना घडून गेल्यानंतर काही दिवसांनी तिच्याबद्दलची माहिती मिळविण्यासाठी आपण अनेकदा AI ची मदत घेतो. एखाद्या बातमीचा सारांश हवा असेल, एखाद्या चर्चेत नेमकं काय घडलं हे समजून घ्यायचं असेल किंवा जुनी माहिती पुन्हा तपासायची असेल, तर काही सेकंदांत AI आपल्यासमोर त्याचा सारांश मांडतं. पण, AI नं दिलेली ही माहिती पुन्हा पुन्हा वाचताना लोकांच्या मेंदूत त्या घटनेची ‘चुकीची आठवण’ (False Memory) तयार होते.

AI कडून मिळालेल्या माहितीमध्ये एखादा महत्त्वाचा तपशील गाळला जाऊ शकतो, चुकीची माहिती जोडली जाऊ शकते किंवा वेगवेगळ्या घटनांमधील माहितीमध्ये गुंतागुंत होऊ शकते. तज्ज्ञांच्या संशोधनातून असे संकेत मिळाले आहेत की, AI नं एखाद्या घटनेचा चुकीचा किंवा अपूर्ण सारांश दिल्यास त्या घटनेत आधी काय घडलं याबद्दलची लोकांची आठवण पुसट होऊ शकते.

म्हणजेच आपण एखादी गोष्ट जशी घडली तशी आठवत आहोत की, AI नं नंतर सांगितल्यानुसार त्या घटनेची माहिती समजून घेत आहोत, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. AI आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग होत असताना ही चूक कुठे अपायकारक ठरू शकते जाणून घेऊया सविस्तर…

चुकीचा एआय सारांश खरा मानल्यास काय होतं…?

जॉर्जटाउन विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधील संशोधकांच्या नव्या अभ्यासात आपण AI टूल्सला दिलेल्या माहितीचा सारांश लिहिताना ते चुका करू शकतात, असं आढळून आलं. मात्र, या चुका केवळ त्या विशिष्ट माहितीपुरत्या मर्यादित राहत नाहीत. AI नं दिलेला घटनेविषयीचा चुकीचा सारांश वाचल्यानंतर लोक तीच चुकीची माहिती खरी मानू शकतात आणि घटनेचा योग्य संदर्भ न मिळाल्यानं ती चुकीचीच माहिती आठवणीत कायम राहू शकते.

आज मीटिंगच्या रेकॉर्डपासून पोलिसांच्या कॅमेऱ्यातील फुटेजच्या विश्लेषणापर्यंत अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये AI सारांशाचा वापर केला जात आहे. संशोधकांना आढळून आलं की, अशा चुकीच्या सारांशामुळे एखाद्या घटनेच्या वास्तवाबद्दलची समज बदलू शकते.

संशोधकांनी सुरुवातीला OpenAI च्या ChatGPT आणि Googleच्या Gemini सारखे AI टूल्स दिलेल्या माहितीचा सारांश किती अचूकपणे तयार करतात, हे तपासलं. या चाचणीत आढळून आलं की, या दोन्ही प्लॅटफॉर्मकडून वारंवार चुकीची माहिती समोर आली. विशेष म्हणजे, AI नं सारांश तयार करताना मूळ माहितीतील महत्त्वाचे तपशीलच गाळल्याचे आढळून आले.

संशोधकांच्या मते, वेगवेगळ्या प्रश्नांचा आणि विविध AI मॉडेल्सचा वापर करून केलेल्या चाचण्यांमध्ये सरासरी ५१.६ टक्के महत्त्वाची माहिती AI सारांशात समाविष्टच झाली नाही. म्हणजे एखाद्या मोठ्या मजकुराचा किंवा घटनेचा सारांश वाचताना आपल्याला महत्त्वाचा वाटणारा अर्ध्याहून अधिक तपशील त्यातून गायब झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे AI चा सारांश सोईचा असला तरी तो मूळ माहितीची पूर्ण जागा घेऊ शकतो का, हा महत्त्वाचा प्रश्न या अभ्यासातून पुढे आला आहे.

त्यानंतर संशोधकांनी आणखी महत्त्वाची बाब तपासली, AI नं दिलेला चुकीचा सारांश अन् त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आठवणी आणि घटनेच्या आकलनावर परिणाम करू शकतो का? यासाठी सहभागी व्यक्तींना आधीच्या एका घटनेचा चुकीचा AI सारांश देण्यात आला. त्यानंतर त्या व्यक्तींना मूळ घटना आठवण्यास सांगण्यात आलं.

या चाचणीत धक्कादायक परिणाम दिसून आला. AI सारांशात घटनेबद्दल चुकीची माहिती दिली गेली असेल, तर सहभागी व्यक्तींना त्यांनी आधी प्रत्यक्ष पाहिलेली घटना अचूकपणे आठवता आली नाही. म्हणजेच नंतर वाचलेली AI निर्मित चुकीची माहिती त्यांच्या मूळ आठवणीवरही प्रभाव टाकू शकते, असं या अभ्यासातून दिसून आलं.

एक महत्वपूर्ण अभ्यास

या अभ्यासातून AI च्या चुकीच्या सारांशाचा आठवणींवर नेमका कसा परिणाम होतो, हे अधिक स्पष्टपणे समोर आलं. त्यासाठी संशोधकांनी ३३१ सहभागी व्यक्तींना एक अॅनिमेटेड व्हिडीओ दाखवला. त्यात एक कार चौकात येते, तिथे असलेल्या सिग्नलनुसार चालकानं थांबायचं की पुढे जायचं हे ठरतं. त्यानंतर कार चौकातून वळते आणि रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला धडकते.

व्हिडीओ पाहिल्यानंतर २४ ते ४८ तासांनंतर सहभागी व्यक्तींना AI नं तयार केलेला त्या घटनेचा सारांश देण्यात आला. त्यानंतर संशोधकांनी सहभागी व्यक्तींना ती घटना आठवून नेमकी चूक कोणाची होती, हे ओळखण्यास सांगितलं. चुकीचा AI सारांश वाचलेल्या व्यक्तींना मूळ घटना अचूकपणे आठवण्याची शक्यता कमी असल्याचं या अभ्यासात आढळून आलं. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे AI सारांश पोलिसांच्या कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्यासह अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये वापरलं जात असल्यानं त्यातील चुकीच्या माहितीचा परिणाम गंभीर ठरू शकतो.

वास्तविक आयुष्यात AI च्या चुकांचा परिणाम किती गंभीर?

या अभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारे संशोधकांनी AI वर अतिविश्वास ठेवणाऱ्यांना सतर्क केलं आहे. या संशोधनाचं नेतृत्व करणाऱ्या जॉर्जटाउनच्या मॅककर्ट स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीमधील असिस्टंट रिसर्च प्रोफेसर मॅटिया सिम यांनी सांगितलं की, AI कडून होणाऱ्या चुका माणूस तपासून पुढे दुरुस्त करेल, अशी अपेक्षा अनेकदा केली जाते. मात्र, या अभ्यासातून वेगळंच चित्र समोर आलं आहे. AI च्या चुका दुरुस्त करण्याऐवजी माणसांच्या स्वतःच्या आठवणीच त्या चुकांमुळे बदलू शकतात.

सिम यांच्या मते, AI चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती तयार करू शकतो, यामागे त्याचा दिशाभूल करण्याचा हेतू नसतो; पण अशा माहितीमुळे व्यक्तीच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे AI नं दिलेला सारांश सोईचा असला तरी त्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मूळ माहिती तपासणं महत्त्वाचं ठरतं.

या अभ्यासाच्या पुढील टप्प्यात संशोधकांना प्रयोगशाळेतील अॅनिमेटेड व्हिडीओऐवजी वास्तविक आयुष्यातील उदाहरणांचा अभ्यास करायचा आहे. कारण- AI सारांशाचा परिणाम खऱ्या घटनांमध्ये अधिक गंभीर ठरू शकतो. विशेषतः पोलिसांच्या बॉडी-कॅमेरा फुटेजसारख्या संवेदनशील माहितीमध्ये AI नं तयार केलेल्या सारांशाचा वापर वाढत असल्यानं त्याचा परिणाम समजून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सिम यांनी याचं उदाहरण देताना पोलिसांच्या बॉडी-कॅमेरा फुटेजचा उल्लेख केला. AI नं अशा फुटेजचा सारांश तयार केल्यानंतर त्यावर आधारित पोलिसांचे अहवाल कसे दिसतात आणि त्याचा त्या घटनेबद्दल लोकांच्या आठवणींवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. AI च्या अशा वापरामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद किंवा घडलेल्या प्रसंगाबाबत लोकांच्या धारणा बदलतात का? आणि परिणामी घटनेबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनावर याचा प्रभाव पडतो का? यांसारख्या प्रश्नांचा शोध घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, असं ‘न्यूज मेडिकल लाईफ सायन्स’नं नमूद केलं आहे.