AI layoffs tech industry एआय इतक्या वेगाने प्रगती करत आहे की, त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातील विविध प्रकारच्या पदांची जागा घेण्याची क्षमता असल्याचे मानले जात आहे. एआयच्या युगात कोणतीही नोकरी पूर्णपणे सुरक्षित राहिलेली नाही. याचेच प्रत्यक्ष उदाहरण २०२५ मध्ये टेक क्षेत्रात पाहायला मिळाले आहे. कृत्रिम तंत्रज्ञान (एआय) मुळे २०२५ मध्ये ५० हजारांहून अधिक लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. ॲमेझॉनसारख्या अनेक बड्या कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. आकडेवारी काय सांगते? टेक क्षेत्रात नेमकी परिस्थिती काय? याविषयी सविस्तर समजून घेऊयात…

आकडेवारी काय सांगते?

‘चॅलेंजर, ग्रे अँड ख्रिसमस’ या कन्सल्टिंग फर्मच्या आकडेवारीनुसार, यावर्षी अमेरिकेत झालेल्या जवळपास ५५,००० नोकरकपातीसाठी एआय जबाबदार आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण ११.७ लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. २०२० मधील कोविड-१९ महामारीनंतर (जेव्हा २२ लाख नोकरकपातीची घोषणा झाली होती) ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. चॅलेंजरच्या मते, ऑक्टोबरमध्ये अमेरिकन कंपन्यांनी १,५३,००० नोकरकपातीची घोषणा केली, तर नोव्हेंबरमध्ये ७१,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले.

नोव्हेंबरमधील ६,००० हून अधिक नोकऱ्या एआयमुळे गेल्याचे सांगण्यात आले आहे. वाढती महागाई, टॅरिफमुळे वाढलेला खर्च आणि कंपन्यांची खर्च कमी करण्याची धडपड सुरू असताना, एआयचे कारण पुढे करत कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात येत आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) ने नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार, एआय अमेरिकेतील ११.७ टक्के कामगार वर्गाचे काम करू शकण्यास सक्षम आहे. यामुळे वित्त, आरोग्यसेवा आणि इतर व्यावसायिक सेवांमध्ये पगारावर होणाऱ्या खर्चात १.२ ट्रिलियन डॉलर्सची बचत होऊ शकते.

मात्र, या मोठ्या नोकरकपातीमागे एआय हे एकमात्र कारण आहे, यावर सर्वांचाच विश्वास नाही. ऑक्सफर्ड इंटरनेट इन्स्टिट्यूटमधील एआयचे सहाय्यक प्राध्यापक फॅबियन स्टेफनी यांनी सीएनबीसीला सांगितले की, हे केवळ एक निमित्त असू शकते. स्टेफनी यांच्या मते, महामारीच्या काळात ज्या कंपन्यांची कामगिरी चांगली होती, त्यांनी मोठ्या प्रमाणावर ‘ओव्हरहायरिंग’ (जास्त कर्मचारी भरती) केली होती आणि आता होत असलेली कपात ही केवळ ‘मार्केट क्लिअरन्स’ असू शकते. ते पुढे म्हणाले, “कंपन्या एआयचे कारण पुढे करत लोकांना कामावरून काढत आहेत.”

एआयमुळे नोकरकपात करणाऱ्या कंपन्या कोणत्या?

ॲमेझॉन : ऑक्टोबरमध्ये ॲमेझॉनने आपल्या इतिहासातील सर्वात मोठी नोकरकपात जाहीर केली. कंपनीने १४,००० कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. आता कंपनीकडून एआयसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिला जात आहे. ॲमेझॉनच्या ‘पीपल एक्सपिरियन्स अँड टेक्नॉलॉजी’च्या वरिष्ठ उपाध्यक्ष बेथ गॅलेटी यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एआयची ही पिढी इंटरनेटनंतरचे सर्वात क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे. आम्ही अधिक सुटसुटीत पद्धतीने काम करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून ग्राहकांसाठी अधिक वेगाने नाविन्यपूर्ण गोष्टी आणता येतील.” अमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना सावध केले होते की, एआयमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होईल.

मायक्रोसॉफ्ट : मायक्रोसॉफ्टने २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण १५,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. जुलैमध्ये केलेल्या घोषणेत ९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले होते. सीईओ सत्या नडेला यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, कंपनीला नवीन युगासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी पुर्नार्विचार करणे आवश्यक आहे. त्यांनी कंपनीसाठी एआयच्या महत्त्वावर भर दिला.

सेल्सफोर्स : सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनियोफ यांनी सप्टेंबरमध्ये सांगितले की, एआयच्या मदतीने कंपनीने ४,००० ‘कस्टमर सपोर्ट’ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, “मला आता कमी लोकांची गरज आहे, म्हणून मी कर्मचारी संख्या ९,००० वरून ५,००० पर्यंत कमी केली आहे.” बेनियोफ यांनी असेही उघड केले होते की, कंपनीतील ५० टक्के काम आधीच एआयच्या मदतीने केले जात आहे.

आयबीएम : आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा यांनी मे महिन्यात ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला सांगितले की, एआय चॅटबॉट्सनी ह्युमन रिसोर्स (HR) विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांची जागा घेतली आहे. मात्र, इतर कंपनीने सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, विक्री आणि मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांत भरती वाढवली असेही ते म्हणाले. नोव्हेंबरमध्ये कंपनीने १ टक्के जागतिक कपातीची घोषणा केली, ज्याचा परिणाम जवळपास ३,००० कर्मचाऱ्यांवर होणार असल्याचे सांगितले.

क्राउडस्ट्राइक : सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअर कंपनी क्राउडस्ट्राइकने मे महिन्यात ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आणि याचे थेट कारण एआय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीईओ जॉर्ज कुर्त्झ यांनी म्हटले की, “एआयमुळे आमच्या कामाची गती वाढते आणि उत्पादने वेगाने विकसित होतात. हे व्यवसायासाठी ‘फोर्स मल्टिप्लायर’ म्हणून काम करत आहे.”

वर्कडे : ही यावर्षी नोकरकपात जाहीर करणाऱ्या पहिल्या कंपन्यांपैकी एक होती. कंपनीने आपल्या कार्यबळाच्या ८.५ टक्के म्हणजेच सुमारे १,७५० नोकऱ्या कमी केल्या. सीईओ कार्ल एशेनबॅक यांनी सांगितले की, एआयमधील गुंतवणुकीला प्राधान्य देण्यासाठी ही कपात आवश्यक होती.