-संतोष प्रधान
झाडाची दोन पाने हे अण्णा द्रमुकचे निवडणूक चिन्ह. त्याप्रमाणेच पक्षात दोन सत्ता केंद्रे तयार झाली होती.  दोन सत्ताकेंद्रे नकोत या मागणीने पक्षात जोर धरला होता. माजी मुख्यमंत्रीद्वयी इडापल्ली पलानीस्वामी आणि ओ. पी. पनीरसेल्वम या दोघांनाही पक्षावर प्रभाव निर्माण करायचा होता. पलानीस्वामी आणि पेनीरसेल्वम ही दोन्ही प्रभावी सत्ताकेंद्रे होती. पक्षात दोन सत्ताकेंद्रे नसावीत अशी मागणी पलानीस्वामी यांच्या समर्थकांकडून केली जात होती. पक्षाच्या बैठकीचा वाद न्यायालयात गेला होता. पनीरसेल्वम गटाने बैठकीस विरोध दर्शविला. मद्रास उच्च न्यायालयाने सकाळी पक्षाची बैठक बोलाविण्यास मान्यता दिली आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पलानीस्वामी यांची पक्षाच्या हंगामी सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. यानंतर पलानीस्वामी गटाने पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केली. या साऱ्या घटनाक्रमानंतर चेन्नईतील पक्षाच्या मुख्यालयासमोर दगडफेक झाली तसेच पोस्टर्स फाडण्यात आली. अखेरीस पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. हिंसाचार झाल्याने शासकीय यंत्रणेने अण्णा द्रमुकच्या मुख्यालयाला टाळे ठोकले. अण्णा द्रमुकमध्ये पडललेली ही दुसरी फूट आहे.

अण्णा द्रमुकमधील वादाचे मूळ कारण काय ?
– तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वावरून वाद सुरू झाला. जयललिता यांची मैत्रीण शशिकला यांना पक्षाचे नेतृत्व स्वत:कडे हवे होते. तत्कालीन मुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांनी शशिकला यांना विरोध केला. शशिकला यांनी स्वत:कडे पक्षाचे नेतृत्व घेतले तसेच मुख्यमंत्रीपदासाठी स्वत:ची वर्णी लावण्याचा प्रयत्न केला. बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपांत न्यायालयाने त्यांना चार वर्षांची शिक्षा ठोठावली. यामुळे त्यांना कोणतेच पद मिळू शकले नाही. शशिकला यांनी पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी केली. मुख्यमंत्रीपदी पलावीस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे नेतृत्व पनीरसेल्वम तर मुख्यमंत्रीपद पलानीस्वामी यांच्याकडे अशी व्यवस्था करण्यात आली. या दोन नेत्यांमध्ये कधीच एकवाक्यता नव्हती. गेल्या वर्षी अण्णा द्रमुकने सत्ता गमावल्यावर पुन्हा एकदा नेतृत्वाचा मुद्दा पुढे आला. पक्षात दोन सत्ताकेंद्रे नसावीत, अशी मागणी पुढे येऊ लागली. पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये पलानीस्वामी यांना मानणारा वर्ग मोठा होता. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकचा पराभव झाला तरीही कोईम्बतूर, सालेम, नम्मकल, तिरपूर या पश्चिम तमिळनाडूतील जिल्ह्यांमध्ये अण्णा द्रमुकला अधिक जागा मिळाल्या होत्या. त्याचे सारे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री पलानीस्वामी यांना दिले गेले. ते सुद्धा याच भागातून निवडून येतात. त्यातूनच पक्षावर पलानीस्वामी यांनी वर्चस्व प्रस्थापित केले. 

Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
National Conference (NC) Party president Farooq Abdullah and Peoples Democratic Party (PDP) leader Mehbooba Mufti
इंडिया आघाडीत आणखी एक गोंधळ; महबूबा मुफ्ती यांच्याविरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सने दिला उमेदवार
raghav chadha british mp meeting
खलिस्तान समर्थकाच्या भेटीमुळे राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात

अण्णा द्रमुकमध्ये पक्षांतर्गत संघर्ष यापूर्वी कधी झाला होता का ?
– अण्णा द्रमुकचे संस्थापक, चित्रपट अभिनेते व तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर १९८७ मध्ये अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वावरून वाद झाला होता. तेव्हा रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपविण्यात आले. जयललिता यांनी जानकी यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. त्यावरून पक्षात हिंसक संघर्ष झाला होता. जानकी रामचंद्रन आणि जयललिता यांच्या वादात पक्षात फूट पडली. पक्षांतर्गत वादात अण्णा द्रमुक सरकार बरखास्त करण्यात आले तमिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. थोड्याच दिवसांत पक्षाचे नेतृत्व जयललिता यांच्याकडे सोपविण्यात आले. पुढील काळात जयललित यांची पक्षावर पोलादी पकड होती. त्यांना आव्हान देण्याची कोणाचीच हिंमत नव्हती. जयललिता यांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्वाचा वाद सुरू झाला. शशिकला यांना तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांच्यात वाद झाला. मात्र केंद्रातील भाजप नेत्यांनी या दोन नेत्यांमध्ये समझोता घडवून आणला होता.

पुढे काय होणार ?
– अण्णा द्रमुकच्या हंगामी सरचिटणीसपदी पलानीस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील चार महिन्यांत त्यांना कायमस्वरुपी सरचिटणीस म्हणून पक्षांतर्गत निवडणुकीच्या माध्यमातून निवडून यावे लागेल. पक्षातून करण्यात आलेल्या हकालपट्टीच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा पनीरसेल्वम यांनी दिला आहे. पनीरसेल्वम यांना मानणारा वर्ग पक्षात असला तरी तो तेवढा प्रभावी दिसत नाही. यामुळे पनीरसेल्वम यांचे अण्णा द्रमुकमधील स्थान सध्या तरी कठीण वाटते. पनीरसेल्वम हे शशिकला यांना बरोबर घेऊन पलानीस्वामी यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतील. कारण शशिकला व पनीरसेल्वम या दोघांचा शत्रू एकच आहे व तो म्हणजे पलानीस्वामी. पनीरसेल्वम हे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशीही एक शक्यता वर्तविली जात आहे. 

अण्णा द्रमुकचे भवितव्य काय?
– अण्णा द्रमुक हा तळागाळात पोहचलेला पक्ष आहे. पक्षाचे कॅडरही चांगले आहे. तमिळनाडूत एका पक्षाला एकतर्फी यश मिळते, असा इतिहास आहे. गेल्या वर्षी द्रमुकला सत्ता मिळाली पण एकतर्फी यश मिळाले नव्हते. अण्णा द्रमुकचे ६५ आमदार निवडून आले. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम तमिळनाडू या बालेकिल्ल्यात पक्षाने वर्चस्व कायम राखले. तमिळनाडूत गेली ५० वर्षे द्रमुक व अण्णा द्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांचेच वर्चस्व राहिले आहे. अनेक प्रयत्न करूनही या दोन पक्षांचे वर्चस्व कमी होऊ शकलेले नाही. भाजपने आता जोर लावला आहे. पण तमिळनाडूतील मतदार हे प्रादेशिक पक्षांनाच कौल देतात हा १९६७ पासूनचा अनुभव आहे. पक्षात फूट पडली तरी अण्णा द्रमुकचा प्रभाव कायम राहील, अशीच चिन्हे आहेत.