एअर इंडियाच्या अहमदाबाद – लंडन विमानाला (उड्डाण क्र. एआय – १७१) गतवर्षी १२ जून रोजी अहमदाबादेत झालेल्या दुर्घटनेस एक वर्ष पूर्ण होत आहेय. मात्र या दुर्घटनेमागील कारणांचा तपशील अजूनही जाहीर झालेला नाही. गतवर्षी प्रसृत झालेल्या प्राथमिक अहवालात दोन वैमिनांमधील संभाषणाचा उल्लेख होता. त्यात एका वैमानिकाने इंजिनला इंधनपुरवठा करणारा फ्युएल स्विच बंद केल्याचा उल्लेख होता. मात्र हा स्विच वैमानिकाने जाणूनबुजून किंवा चुकून बंद केला नसावा यावर अनेक आजी-माजी वैमानिक आणि काही विश्लेषक ठाम आहेत. दोष उपकरणात किंवा इंजिनला इंधनपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत निर्माण झाला असावा, असा या मंडळींचा दावा आहे. अंतिम अहवालात याविषयी आणखी खुलासा होणे अपेक्षित आहे.

प्राथमिक अहवालात काय?

अपघातामागील कारणांचा प्राथमिक अहवाल भारताच्या एअर अॅक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) ११ जुलैच्या मध्यरात्री प्रसिद्ध केला. यात दोन्ही इंजिन्सना होणारा इंधनपुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे ती बंद पडली. त्यामुळे उड्डाण घेत असताना आवश्यक ती ताकद (थ्रस्ट) विमानाला मिळालीच नाही आणि मिनिटभरातच ते कोसळले, असे नमूद आहे. पण हा अहवाल अपुरा असून तो घाईने लिहिण्यात आल्याची टीका त्यावेळी झाली. कोणत्याही दुर्घटनेनंतर ३० दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल आणि एका वर्षाच्या आत अंतिम अहवाल सादर करणे जेथे अपघात घडला त्या देशावर बंधनकारक असते. त्यानुसार ११ जुलैच्या मध्यरात्री, घटनेस ३० दिवसांची मुदत संपण्याच्या वेळी प्राथमिक अहवाल जाहीर झाला. त्यातील वैमानिकांविषयीच्या उल्लेखामुळे त्यांच्या क्षमतेविषयीच नव्हे, तर हेतूंविषयीदेखील प्रश्न उपस्थित होऊ लागले. 

वैमानिकांत अखेरच्या क्षणी काय संभाषण?

एअर इंडिया फ्लाइट एआय १७१ हे विमान १२ जून रोजी दुपारी अहमदाबादहून लंडनकडे निघाले. वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल (८६०० तासांचा उड्डाण अनुभव) आणि सहवैमानिक क्लाइव्ह कुंदर (११०० तासांचा उड्डाण अनुभव) हे अनुभवी वैमानिक हे विमान उडवणार होते. सहवैमानिक कुंदर यांच्याकडे विमानाचे सारथ्य (कमांड) होते. कॅप्टन सभरवाल यांच्याकडे देखरेखीची जबाबदारी होती. विमानाने जमिनीवरून उड्डाण घेतल्याक्षणी दोन्ही इंजिनच्या फ्युएल स्विचमध्ये `रनʼ (इंधन पुरवठा सुरू) स्थितीमधून `कट-ऑफʼ (इंधन पुरवठा बंद) असा अनाकलनीय बदल झाला.

सहसा असे होत नाही. मुद्दामहून दोन्ही इंजिन बंद केल्याखेरीज असे शक्य नाही. अचानक इंधनपुरवठा बंद झाल्यामुळे आणीबाणीची स्थिती उद्भवली. `इंधन पुरवठा बंद का केलास?ʼ असा प्रश्न एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकास विचारल्याचे कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरमधील संभाषणातून स्पष्ट झाले. आपण असे काही केले नसल्याचे दुसरा वैमानिक उत्तरला. नंतर त्वरित इंधन स्विच ऑन करण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यामुळेच एका वैमानिकाने `मे-डेʼ असा निर्वाणीचा इशारा दिला. पण विमान लगेचच कोसळले.

दुर्मिळात दुर्मिळ?

वैमानिकांच्या मूलभूत आज्ञावलीमध्ये (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) टेक-ऑफच्या वेळी दोन्ही फ्युएल स्विचेस रन पोझिशनमध्ये आणणे ही प्रक्रिया अंतर्भूत असते. विमानाने लँडिंग केल्यानंतर ते ईप्सित बे मध्ये किंवा गेटसमोर स्थिरावल्यानंतरच इंधन पुरवठा खंडित करणारे कट-ऑफ स्विच दाबले जाते. ऐन उड्डाणाच्या प्रक्रियेच्या वेळी हे कधीही होत नाही. शिवाय ऑन आणि ऑफ करण्याच्या प्रक्रियेत लॉक ही स्थिती असते. त्यामुळे चुकून हात लागून इंजिन स्विच-ऑन किंवा स्विच-ऑफ (विमानांच्या परिभाषेत रन किंवा कट-ऑफ) होणे संभवत नाही.

इंजिनच्या तपासणीमुळे विलंब

एएआयबीचे अधिकारी गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिका आणि फ्रान्स येथे जाऊन आले. या दौऱ्यांमध्ये त्यांनी अधिक सखोल तपास केला. बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर प्रकारातील या विमानाचे इंजिन जीई एरोस्पेस या कंपनीने बनवले होते. या कंपनीकडूनही इंजिनातील संभाव्य दोषाविषयी तपास सुरू आहे. त्यामुळे वर्षपूर्तीनंतरही बहुधा अंतिरम स्वरूपाचा अहवालच मिळण्याची शक्यता आहे. जीईकडून इंजिनाविषयी तपास आणखी काही आठवडे सुरू राहील, असे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे.