Air India International Flights : पश्चिम आशियातील संघर्षामुळे विमानांना लागणाऱ्या इंधनाचा (जेट फ्युएल) तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम आता विमान सेवा पुरवणाऱ्या भारतीय कंपन्यांवर होत आहे. एअर इंडियाने जून ते ऑगस्ट दरम्यान विदेशात जाण्यासाठी पुरवल्या जाणाऱ्या विमानसेवेत (आंतरराष्ट्रीय विमानसेवा) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही मार्गांवरील विमानांची उड्डाणे कमी केली जाणार आहेत. तर काही मार्गांवरील विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय एअर इंडियाकडून घेण्यात आला आहे.

एअर इंडियाने एअरलाइन आणि फ्लाईट शेड्यूलला दिलेल्या माहितीनुसार, दर आठवड्याला उड्डाण घेणाऱ्या जवळपास २५० आंतरराष्ट्रीय विमानांची सेवा रद्द केली आहे. यात देशात येणाऱ्या तसेच देशातून परदेशात जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे. पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात विमान सेवेत कपात करण्यात आली आहे. ही विमान सेवा कपात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. दिल्ली – शिकागो, दिल्ली – नेवार्क, मुंबई – न्यूयॉर्क, दिल्ली – शांघाई, चेन्नई – सिंगापूर, दिल्ली – मेल आणि मुंबई – ढाका या आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांमध्ये कपात करण्यात आली आहे. तसेच इतर मार्गांवरील विमानसेवा देखील कमी करण्यात आली आहे.

जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सततचे हवाई मार्गांवरील तसेच हवाई क्षेत्रांवरील निर्बंध आणि विमानांच्या इंधनाचे वाढलेले विक्रमी भाव यांमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाने सांगितले. तसेच वाढलेल्या इंधन किंमतीचा नियोजित विमान सेवांवर परिणाम होत आहे. व्यावसायिक स्थिरतेवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमान सेवेत कपात करण्यात आली असली तरी दर महिन्याला १२०० हून अधिक आंतरराष्ट्रीय विमाने उड्डाण घेणार असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले.

आव्हानांवर मात करत दर महिन्याला १२०० हून अधिक आंतरराष्ट्रीय विमानांची सेवा सुरूच राहणार आहे. एअर इंडियाच्या सेवेचे पाच खंडांमध्ये पसरलेले जाळे अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उत्तर अमेरिकेला ३३ विमान, युरोपसाठी ४७ विमाने, युनायटेड किंग्डमसाठी ५७ विमाने, ऑस्ट्रेलियासाठी ८ विमाने, पूर्व, आग्नेय आशिया आणि सार्क समूहातील देशांसाठी १५८ विमाने, मॉरिशस (आफ्रिका) साठी ७ विमाने दर आठवड्याला उड्डाण घेतील, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, परिस्थिती सुधारताच विमान सेवा पूर्ववत केली जाईल. परिस्थिती अशीच असामान्य राहिल्यास विमानसेवेत बदल करण्यासाठी आणखी काही निर्णय घ्यावे लागतील, असेही एअर इंडियाकडून सूचित करण्यात आले आहे.

पश्चिम आशियात युद्ध सुरू होण्यापूर्वी भारतीय विमान कंपन्यांच्या एकूण खर्चात इंधनाचा वाटा सुमारे ४० टक्के होता. आता विमान इंधनाच्या किंमती जागतिक स्तरावर वाढल्या आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांचा इंधनावरील खर्च वाढला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या इंधनाच्या दराचा एक छोटासा भाग देशाअंतर्गत विमान तिकिटांवर टाकण्यात आला आहे. तर, आंतरराष्ट्रीय विमानांच्या तिकिटावर इंधन दर वाढीचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला आहे. तिकिटाची मूळ किंमत जवळपास दुप्पट झाल्याचे सांगितले जात आहे. एअर इंडियाने विमानांची उड्डाणे कमी करण्यामागे हे कारणदेखील महत्वाचे आहे.

२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धाचा आखाती देशांवरील हवाई क्षेत्रांवरही परिणाम झाला. भारताकडे येणाऱ्या तसेच भारतातून जाणाऱ्या विमानांसाठी आखाती देशांवरील हवाई मार्ग महत्वाचा आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेत याच मार्गाने एअर इंडियाची विमाने जातात. युद्धामुळे हा हवाई मार्ग अनेकदा निर्बंधांमुळे बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या विमानांना हा मार्ग टाळून दूरच्या मार्गाने, वळसा घालून जावे लागत आहे. यामुळे फ्लाइट ऑपरेटिंग खर्च वाढला आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले असताना विमानांना अतिरिक्त इंधन जाळावे लागत आहे. पश्चिम आशियाई हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे भारतीय विमान कंपन्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

कोणत्याही प्रकारच्या कर्मचारी कपातीचा विचार नसून खर्च वाचवण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा असे आवाहन एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना केले आहे. अनिश्चित आणि अस्थिरतेच्या परिस्थितीमुळे वार्षिक पगारवाढ किमान तीन महिन्यांसाठी पुढे ढकलली जाईल, तरीही कंपनी मागील आर्थिक वर्षाचा बोनस देईल आणि नियोजित कर्मचारी पदोन्नती लागू करेल, असे आश्वासन एअर इंडियाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.

उत्तर अमेरिका

दिल्ली-शिकागो: तात्पुरती स्थगित.

दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को: ऑगस्टमध्ये दर आठवड्याला १० विमानांऐवजी ७ विमाने.

दिल्ली-टोरंटो: जुलैमध्ये दर आठवड्याला १० विमानांऐवजी ५ विमाने; ऑगस्टपासून दररोज सेवा सुरू होईल.

दिल्ली-व्हँकुव्हर: दर आठवड्याला ७ विमानांऐवजी ५ विमाने.

मुंबई-नेवार्क: ही सेवा दर आठवड्याला ३ विमानांवरून वाढवून ७ करण्यात आली आहे.

दिल्ली-न्यू यॉर्क (JFK): ही सेवा दर आठवड्याला ७ विमानांसह नियमित सुरू राहील.

दिल्ली-नेवार्क आणि मुंबई-न्यू यॉर्क (JFK): या सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या जातील.

युरोप

दिल्ली-पॅरिस: दर आठवड्याला १४ विमानांऐवजी ७ विमाने.

दिल्ली-कोपनहेगन: दर आठवड्याला ४ विमानांऐवजी ३ विमाने.

दिल्ली-मिलान: दर आठवड्याला ५ विमानांऐवजी ४ विमाने.

दिल्ली-व्हिएन्ना: दर आठवड्याला ४ विमानांऐवजी ३ विमाने.

दिल्ली-झुरिच: दर आठवड्याला ४ विमानांऐवजी ३ विमाने.

दिल्ली-रोम: दर आठवड्याला ४ विमानांऐवजी ३ विमाने.

ऑस्ट्रेलिया

दिल्ली-मेलबर्न: दर आठवड्याला ७ विमानांऐवजी ४ विमाने.

दिल्ली-सिडनी: दर आठवड्याला ७ विमानांऐवजी ४ विमाने.

दूर पूर्व, आग्नेय आशिया आणि सार्क (SAARC)

दिल्ली-शांघाय: ऑगस्टपर्यंत तात्पुरती स्थगित.

दिल्ली-सिंगापूर: दर आठवड्याला २४ विमानांऐवजी १४ विमाने.

मुंबई-सिंगापूर: दर आठवड्याला १४ विमानांऐवजी ७ विमाने.

चेन्नई-सिंगापूर: ऑगस्टपर्यंत तात्पुरती स्थगित.

दिल्ली-बँकॉक: जुलैपासून दर आठवड्याला २८ विमानांऐवजी २१ विमाने.

मुंबई-बँकॉक: जुलैपासून दर आठवड्याला १३ विमानांऐवजी ७ विमाने.

दिल्ली-क्वालालंपूर: दर आठवड्याला १० विमानांऐवजी ५ विमाने.

दिल्ली-हो ची मिन्ह सिटी: जुलै आणि ऑगस्टमध्ये दर आठवड्याला ७ विमानांऐवजी ४ विमाने.

दिल्ली-हनोई: जुलै आणि ऑगस्टमध्ये दर आठवड्याला ५ विमानांऐवजी ४ विमाने.

दिल्ली-काठमांडू: जूनमध्ये दर आठवड्याला ४२ विमानांऐवजी २८ विमाने; जुलै आणि ऑगस्टमध्ये यात आणखी कपात करून २१ विमाने केली जातील.

दिल्ली-ढाका: दर आठवड्याला ७ विमानांऐवजी ४ विमाने.

मुंबई-ढाका: ऑगस्टमध्ये तात्पुरती स्थगित.

मुंबई-कोलंबो: दर आठवड्याला ७ विमानांऐवजी ४ विमाने.

दिल्ली-कोलंबो: दर आठवड्याला १४ विमानांऐवजी १२ विमाने.

दिल्ली-माले: ऑगस्टमध्ये तात्पुरती स्थगित.