थायलंड येथील फुकेतहून मंगळवार ४ ऑगस्ट रोजी दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात (एआय २३७९) झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ आणि विमान अचानक ३०० फूट खाली जाण्याच्या प्रकरणातील उत्तेजक चाचणीमध्ये (सायकोएक्टिव्ह पदार्थांच्या सेवनाबाबत) मुख्य वैमानिकाने गांजा घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) व विमान अपघात तपास ब्युरोने (एएआयबी) गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान या घटनेमुळे वैमानिकांच्या नशेशी संबंधित सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नेमके काय घडले होते?

४ ऑगस्ट रोजी एअर इंडियाच्या एआय २३७९ या विमानाने फुकेतवरून दिल्लीसाठी उड्डाण केले होते. हे विमान एअरबस ए३२० (VT-EXO) श्रेणीतील होते. विमानामध्ये १३७ प्रवासी (यात ३ बालक) आणि ८ क्रू मेंबर्स (२ वैमानिक आणि ६ केबिन क्रू) असे एकूण १४५ जण प्रवास करीत होते.पूर्व किनाऱ्यावरून भारतीय भूमीत प्रवेश केल्यानंतर विमानाला तीव्र हवेच्या झंझावाताचा सामना करावा लागला. विमान ३०० फूट खाली आले. ९० सेकंद (दीड मिनिट) चाललेल्या या झंझावातामुळे १३ प्रवासी आणि ४ कर्मचारी जखमी झाले होते. सुरुवातीला क्लिअर एअर टर्ब्युलन्समुळे हा अपघात घडला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. विमानाची उंची अचानक कमी झाल्यामुळे सीटबेल्ट न लावलेले प्रवासी आणि कर्मचारी केबिनच्या रचनेवर आदळल्याने विमानाच्या आतील भागाचे मोठे नुकसान झाले होते.

विमानात तांत्रिक बिघाड झाला होता का?

उड्डाणादरम्यान अचानक विमानाचा ‘ऑटो-पायलट’ मोड बंद झाला होता. सह-वैमानिकाने ताबडतोब मॅन्युअली विमानाचे नियंत्रण हातात घेतले, मात्र त्यानंतर लगेचच ‘फ्लाइट कंट्रोल स्टॉल’चा संदेश स्क्रीनवर आला. विमानातील अनेक इंडिकेटर स्विचेस काही काळासाठी बंद पडले होते आणि हायड्रॉलिक सिस्टीमसह इतर तांत्रिक व मेकॅनिकल बिघाड निर्माण झाले होते. याशिवाय विमानाला हवेत मोठ्या टर्ब्युलन्सचा (हवेच्या धक्क्यांचा) सामना करावा लागला होता. ९० सेकंदात विमान ३०० फूट खाली आले होते. सुदैवाने वैमानिकांनी सर्व समस्यांवर मात करत विमानाचे नियंत्रण मिळवले आणि दिल्ली विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग केले होते.

वैमानिकाची उत्तेजक चाचणी पॉझिटिव्ह

विमानाच्या गंभीर अपघाताच्या प्रसंगी पाळल्या जाणाऱ्या नियमांनुसार घटनेनंतर दिल्ली विमानतळावरच दोन्ही वैमानिकांची ‘सायकोॲक्टिव्ह सबस्टन्स’ (मादक पदार्थ/ड्रग्ज) चाचणी करण्यात आली. यामध्ये मुख्य वैमानिकाचा प्राथमिक चाचणी अहवाल “नॉट निगेटिव्ह” (पॉझिटिव्ह) आला. यानंतर अधिकृत पुष्टीकरणासाठी त्याच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.या दुसऱ्या तपासणीतही मुख्य वैमानिकाने गांजाची नशा (पॉझिटिव्ह) केल्याचे निष्पण झाले.

आंतरराष्ट्रीय तपास आणि कारवाई

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (डीजीसीए) या घटनेला ‘गंभीर अपघात’ म्हणून वर्ग केले आहे. विमान अपघात तपास पथकाकडून (एएआयबी) या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. तपासासाठी विमानाचे ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर जप्त केले आहेत. या अपघाताबाबत निष्काळजीपणाची आणि तांत्रिक बिघाडाची दखल घेत डीजीसीएने एअर इंडियाचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांना स्पष्टीकरणासाठी समन्स बजावले आहे.

सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

भारतामध्ये नागरी विमान वाहतूक क्षेत्र गेल्या दशकात झपाट्याने वाढले आहे. वाढती प्रवासी संख्या, नवीन विमान कंपन्यांची भर आणि विमानतळांचे जाळे विस्तारल्यामुळे हवाई प्रवास अधिक सुलभ झाला आहे. अलीकडील काही मोठ्या अपघातांमुळे आणि वारंवार घडणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे नागरी विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमान बाजारांपैकी एक असल्याने या क्षेत्राच्या विस्तारासोबत सुरक्षिततेवर समान भर देण्याची आवश्यकता आहे.

नियम काय सांगतात?

नियमांनुसार वैमानिकाला किंवा उड्डाण कर्मचाऱ्याला विमान उड्डाणाच्या १२ तास आधी कोणतेही मद्य किंवा मादक द्रव्य सेवन करण्यास सक्त मनाई आहे. तसेच अल्कोहोलयुक्त माऊथवॉश किंवा टूथ जेल वापरण्यासही बंदी आहे. डीजीसीएने विमान कर्मचाऱ्यांसाठी सायकोएक्टिव्ह पदार्थांची तपासणी बंधनकारक केल्यापासून अशा घटना उघडकीस येत आहेत. प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांवर विमान कंपन्यांकडून ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले आहे. भारतात सुधारित नियमांनुसार, ०.००९ टक्के पेक्षा जास्त मद्य सेवन आढळल्यास किंवा चाचणी टाळल्यास निलंबन व कायदेशीर कारवाई केली जाते. अल्कोहोल चाचण्यांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग अनिवार्य असून रेकॉर्डिंग किमान ६ महिने सुरक्षित ठेवण्यात येते. मद्याव्यतिरिक्त अमली पदार्थ किंवा सायकोएक्टिव्ह पदार्थांच्या सेवनासाठी वैमानिकांची अचानक उत्तेजक चाचणी घेतली जाते.

शिक्षा काय?

पहिल्या गुन्हयातील चाचणीत दोषी आढळल्यास किंवा टाळण्याचा प्रयत्न केल्यास परवाना ३ महिने ते १ वर्षापर्यंत निलंबित केला जातो. वारंवार दारू पिऊन विमान चालवताना आढळल्यास वैमानिकाचा परवाना कायमचा रद्द करण्याची कारवाई केली जाते. परदेशी वैमानिकांचा तात्पुरता परवाना तत्काळ रद्द केला जातो.

प्रवाशांनी सीटबेल्ट लावला होता का?

या दुर्घटनेमध्ये टर्ब्युलन्सच्या वेळी सीटबेल्ट लावण्याची सूचना देण्यात आली होती का, प्रवाशांनी सीटबेल्ट लावण्यास टाळाटाळ केली का, यासंदर्भातही अधिक माहिती समोर आली पाहिजे, अशीही मागणी वैमानिकांकडून करण्यात येत आहे.

surekha.chopade@expressindia.com