World Lung Cancer Day : ‘मी आयुष्यात कधीच सिगारेट ओढली नाही, मग मला फुप्फुसाचा कर्करोग कसा झाला?’ हा प्रश्न आज अनेक भारतीय रुग्ण डॉक्टरांना विचारत आहेत. आतापर्यंत फुप्फुसाचा कर्करोग हा प्रामुख्याने धूम्रपान करणाऱ्यांना होतो असे मानले जात होते. मात्र, आता चिंताजनक वास्तव समोर येत आहे. भारतासह जगभरात कधीही धूम्रपान न केलेल्या व्यक्तींमध्येही फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे डॉक्टर आणि संशोधकांसमोरही नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. या बदलामुळे संशोधक आणि कर्करोगतज्ज्ञांनी आता सिगारेटच्या वापरापलीकडील इतर कारणांचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

वायू प्रदूषण हा फुप्फुसाच्या कर्करोगामागील घटक ठरतोय का यावर अभ्यास केला जात आहे. भारतात वेगाने वाढणारे शहरीकरण, वाहनांमधून होणारे प्रदूषण, कारखान्यांतील धूर, शेतांमध्ये पिकांचे अवशेष जाळणे, बांधकामांमधून उडणारी धूळ तसेच अनेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी अजूनही वापरले जाणारे लाकूड, कोळसा किंवा शेणाच्या गोवऱ्यांचा धूर, यामुळे लाखो लोक दररोज प्रदूषित हवेच्या संपर्कात येत आहेत.

एकेकाळी फुप्फुसाच्या कर्करोगासाठी धूम्रपानालाच सर्वांत मोठे कारण मानले जात होते. मात्र, आता डॉक्टर आणि संशोधकांसमोर नवा प्रश्न उभा राहिला आहे. भविष्यात वायू प्रदूषण हेही फुप्फुसाच्या कर्करोगाचे मोठे कारण ठरू शकते का? तज्ज्ञांच्या मते याचे उत्तर इतके सोपे नाही.

एखाद्या व्यक्तीसाठी धूम्रपानाचा धोका आजही वायू प्रदूषणापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. मात्र, कधीही धूम्रपान न केलेल्या लोकांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढवणारा महत्त्वाचा घटक म्हणून वायू प्रदूषणाकडे आता गांभीर्याने पाहिले जात आहे. कारण मोठ्या शहरांमध्ये राहणारा जवळपास प्रत्येकजण श्वासातून प्रदूषित हवा शरीरात घेत असतो. गावांमध्येही काही प्रमाणात वायू प्रदूषणाचा परिणाम जाणवतो, त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा धोका तुलनेने कमी असला तरी लाखो लोक एकाच प्रकारच्या प्रदूषणाच्या संपर्कात येत असल्याने त्याचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो.

धूम्रपान अजूनही सर्वांत मोठा धोका

वायू प्रदूषणाबाबत चिंता वाढत असली तरी फुप्फुसाच्या कर्करोगाचे सर्वांत मोठे कारण आजही धूम्रपानच असल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात.
सीके बिर्ला हॉस्पिटल, जयपूर येथील वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ डॉ. असीम कुमार समर यांच्या मते, तंबाखूच्या धुरामध्ये हजारो हानिकारक रसायने असतात. त्यातील अनेक रसायने थेट फुप्फुसांच्या आतील पेशींना इजा पोहोचवतात. सतत होणाऱ्या या नुकसानीमुळे पेशींमध्ये आनुवंशिक बदल (Genetic Changes) होऊ लागतात आणि पुढे त्याचे रूपांतर कर्करोगात होऊ शकते.

डॉ. समर पुढे सांगतात की, कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचे प्रमाण वायू प्रदूषणापेक्षा धूम्रपानामुळे शरीरात अनेक पटींनी जास्त प्रमाणात पोहोचते, त्यामुळे फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी तंबाखूचे सेवन पूर्णपणे बंद करणे हाच सर्वांत प्रभावी उपाय असल्याचा सल्ला डॉक्टर देतात.

वायू प्रदूषणाबाबत चिंता का वाढतेय?

वायू प्रदूषणामुळे कर्करोग होण्याचा धोका अधिक नसला तरी त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे तज्ज्ञ सांगतात. हवेतील पीएम PM 2.5 सारखे अतिसूक्ष्म धूलिकण, विषारी वायू आणि इतर प्रदूषक श्वासावाटे थेट फुप्फुसांच्या आतपर्यंत पोहोचतात. अनेक वर्षे अशा प्रदूषित हवेच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे फुप्फुसांमध्ये दीर्घकालीन दाह (Chronic Inflammation), पेशींवरील रासायनिक ताण (Oxidative Stress) येण्याचे प्रमाण वाढते. परिणामी फुप्फुसाच्या कर्करोगाचाही धोका वाढण्याची शक्यता वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

धूम्रपानाचा धोका मुख्यतः धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींपुरता मर्यादित राहतो. मात्र, वायू प्रदूषणाचा मोठ्या लोकसंख्येवर परिणाम होतो. प्रदूषित शहरांमध्ये राहणारे नागरिक, धूर किंवा धुळीच्या वातावरणात काम करणारे कर्मचारी आणि अनेक वर्षे प्रदूषित हवा श्वासातून घेणाऱ्या व्यक्तींमध्ये हा धोका वाढू शकतो. याचे हळूहळू आरोग्यावर परिणाम दिसू लागतात. काही प्रकरणांत अनेक वर्षे तर काहींमध्ये दशके लोटल्यानंतर प्रदूषणाचे परिणाम दिसू शकतात.

धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही कर्करोगाचा धोका?

अलीकडच्या काळात कधीही धूम्रपान न केलेल्या व्यक्तींमध्ये, विशेषतः महिला आणि तरुणांमध्ये, फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
सीके बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. असीम कुमार समर यांच्या मते, कर्करोग वाढण्यामागे एकच कारण नसून पर्यावरण आणि बदलती जीवनशैली यांसारखे अनेक घटक एकत्रितपणे कारणीभूत असू शकतात.
डॉक्टरांच्या मते, पुढील घटक फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.

  • बाहेरील वायू प्रदूषण
  • लाकूड, कोळसा किंवा शेणाच्या गोवऱ्यांसारख्या इंधनामुळे घरामध्ये होणारा धूर
  • दुसऱ्याच्या सिगारेटच्या धुराचा (पॅसिव्ह स्मोकिंग) संपर्क
  • धोकादायक रसायने किंवा धुळीच्या वातावरणात काम करणे
  • अनेक वर्षे प्रदूषित वातावरणाच्या संपर्कात राहणे

डॉक्टरांच्या मते, धूम्रपान न करणाऱ्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे फुप्फुसाचा कर्करोग हा केवळ धूम्रपान करणाऱ्यांचा कर्करोग होतो, हा समज पुसला गेला पाहिजे.

निरोगी व्यक्तीही वायू प्रदूषणाच्या विळख्यात?

तज्ज्ञांच्या मते, वायू प्रदूषण आणि धूम्रपान यांची थेट तुलना करणे योग्य ठरणार नाही. कारण एखाद्या व्यक्तीमध्ये वायू प्रदूषणापेक्षा धूम्रपानामुळे शारीरिक गुंतागुंत वाढते. फुप्फुसाच्या कर्करोगाच्या बहुतांश रुग्णांमागे आजही धूम्रपान हेच प्रमुख कारण आहे.
मात्र, आता जवळपास प्रत्येकजण श्वासावाटे प्रदूषित हवा शरीरात घेत असतो, त्यामुळे निरोगी व्यक्तींमध्ये तुलनेने धोका कमी असला तरी सार्वजनिक आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवता आले तर विशेषतः कधीही धूम्रपान न केलेल्या लोकांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी काय करावे?

मोठ्या शहरांमध्ये प्रदूषित हवा पूर्णपणे टाळणे शक्य नसते. तरी काही सवयी अंगीकारल्या तर धोका कमी करता येऊ शकतो.
डॉक्टर सांगतात,

  • धूम्रपान करू नका, करत असाल तर ते त्वरित सोडा.
  • दुसऱ्याच्या सिगारेटच्या धुरापासून शक्य तितके दूर राहा.
  • लाकूड, कोळसा किंवा शेणाच्या गोवऱ्यांऐवजी स्वच्छ इंधन वापर करा.
  • वायू प्रदूषण जास्त असताना चांगल्या दर्जाचा मास्क वापरा.
  • घरात पुरेशी हवा खेळती राहील याची काळजी घ्या.
  • हवेच्या गुणवत्तेचा (Air Quality) अंदाज तपासा. प्रदूषण जास्त असल्यास बाहेर जाणे टाळा.
  • वायू प्रदूषण कमी करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांसाठी सहकार्य करा.

ही लक्षणे दुर्लक्षित करू नका

डॉक्टरांच्या मते, फुप्फुसाचा कर्करोग वेळेत ओळखला गेला तर उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात, त्यामुळे पुढील लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला राहणे
  • खोकल्यातून रक्त येणे
  • कोणतेही कारण नसताना वजन झपाट्याने कमी होणे
  • छातीत सतत दुखणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • वारंवार छातीचा संसर्ग होणे

अनेकदा या लक्षणांकडे साधा संसर्ग किंवा हंगामी आजार समजून दुर्लक्ष केले जाते. मात्र, अशी लक्षणे दीर्घकाळ कायम राहिल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात.