Air Pollution Effects on Health : वायू प्रदूषणाचा परिणाम फक्त फुफ्फुसांवरच होत नाही, तर तो मूत्रपिंडाला देखील गंभीर नुकसान पोहोचवू शकतो, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, हवेत असलेल्या PM 2.5 या अतिसूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण वाढल्यास मूत्रपिंडाची गाळण क्षमता कमी होत जाते.

या संशोधनात १२ हजारांहून अधिक व्यक्तींच्या शारीरिक स्थितीचा ६ ते १० वर्षे अभ्यास करण्यात आला. विशेष म्हणजे, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या इतर जोखीम कायम राहून PM 2.5 चा मूत्रपिंडावर होणारा दुष्परिणाम स्पष्टपणे दिसून आला.

चेन्नईतील डॉ. मोहन्स डायबेटिस स्पेशालिटीज सेंटरचे अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन यांनी सांगितले की, वायू प्रदूषणाचा विविध आजारांवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी ही संशोधन मालिका सुरू आहे. याआधीच्या अभ्यासांमध्ये वायू प्रदूषणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि रक्तातील चरबीचे (कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराइड्स) प्रमाण वाढण्याचा धोका असल्याचे आढळले होते.

वायू प्रदूषणाचा मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवरही थेट परिणाम होत असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, एखाद्या व्यक्तीला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असला किंवा नसला, तरी वायू प्रदूषणाचा मूत्रपिंडावर होणारा परिणाम दिसून आला. याचा अर्थ, वायू प्रदूषणाचा किडनीवर स्वतंत्रपणे विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामध्ये इतर घटक कारणीभूत ठरत नाहीत.

या संशोधनात दिल्ली आणि चेन्नई या दोन शहरांतील नागरिकांचा अभ्यास करण्यात आला. या दोन्ही शहरांतील वायू प्रदूषणाच्या पातळीत मोठा फरक आहे, त्यामुळे संशोधकांना प्रदुषणाचा मूत्रपिंडावर होणारा परिणाम तुलनात्मक पद्धतीने अभ्यासता आला.

डॉ. व्ही. मोहन यांच्या मते, आधीपासून मूत्रपिंडाचा कोणताही आजार नसलेली व्यक्ती जरी दीर्घकाळ सूक्ष्म प्रदूषक कणांच्या (PM2.5) संपर्कात राहिली तर मूत्रपिंडाची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ शकते.

संशोधनात नेमकं काय आढळलं?

संशोधनादरम्यान, दिल्लीतील PM2.5 चे प्रमाण चेन्नईच्या तुलनेत खूप जास्त असल्याचे आढळले. सुरुवातीला चेन्नईमध्ये PM 2.5 चे प्रमाण ३३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर (μg/m³) होते, तर दिल्लीत ते ११८ μg/m³ इतके होते. पुढील दोन तपासण्यांमध्ये चेन्नईतील प्रदूषणाची पातळी ३७ आणि ३० μg/m³ वर स्थिर राहिली, तर दिल्लीत ती अनुक्रमे १२३ आणि १३० μg/m³ इतकी नोंदवली गेली.

संशोधकांनी सहभागींच्या मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेचा अंदाज घेण्यासाठी ‘मूत्रपिंडाची रक्त गाळण्याची अंदाजित क्षमता’ (glomerular filtration rates – eGFR) तपासली. ही चाचणी मूत्रपिंड रक्त किती प्रभावीपणे शुद्ध करते, हे दर्शवते.

तपासणीत चेन्नईतील सहभागींचा eGFR हा ११२ mL/min/1.73m² (eGFR मोजण्याचे एकक), तर दिल्लीतील सहभागींचा १०६.४ mL/min/1.73m² वर असल्याचे आढळले. हे दोन्ही आकडे सामान्य मर्यादेत आहेत. तरी दिल्लीतील नागरिकांच्या मूत्रपिंडाची कार्यक्षमता सुरुवातीपासूनच तुलनेने कमी असल्याचे संशोधकांनी नमूद केले.

याव्यतिरिक्त संशोधकांनी आणखी एक धोका सांगितला आहे. PM2.5 च्या पातळीत दरवर्षी ५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरची (μg/m³) वाढ झाल्यास मूत्रपिंडाची कार्यक्षमता अधिक वेगाने घटत आहे, असे संशोधक नमूद करतात. दिल्लीतील नागरिकांमध्ये eGFR मध्ये ०.४२, तर चेन्नईतील नागरिकांमध्ये ०.३२ इतकी घट नोंदवली गेली. यावरून जास्त वायू प्रदूषण असलेल्या भागांमध्ये मूत्रपिंडावर होणारा परिणाम अधिक गंभीर असू शकतो, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे.

या संशोधनाचे सहलेखक आणि सेंटर फॉर क्रॉनिक डिसीज कंट्रोलचे कार्यकारी संचालक डॉ. दोरैराज प्रभाकरन यांनी सांगितले की, मूत्रपिंड जितका PM 2.5 च्या संपर्कात येतो, तितक्याच वेगाने मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होत जाते. वर्षभरात मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेत सुमारे ४ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. वयानुसार मूत्रपिंडाची कार्यक्षमता नैसर्गिकरित्या कमी होत असते. मात्र, सुरुवातीपासूनच ती कमी असेल, तर वाढत्या वयासोबत त्याचे परिणाम अधिक गंभीर ठरू शकतात.

भारतात सध्या सुमारे १४.३ कोटी लोक दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने (Chronic Kidney Disease) त्रस्त आहेत. यातील बहुतांश लोक जगातील सर्वाधिक PM 2.5 प्रदूषण असलेल्या भागांमध्ये राहतात. त्यामुळे वायू प्रदूषणाचा फटका केवळ फुफ्फुसांनाच नव्हे, तर मूत्रपिंडासारख्या महत्त्वाच्या अवयवांनाही बसत असल्याचे हे संशोधन अधोरेखित करते.

तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन मूत्रपिंडाचे आजार कमी करण्यासाठी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्याबरोबरच वायू प्रदूषण कमी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.