AISA in Student Politics : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज १० ऑक्टोबरला सीजेपीच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आले आहे. एसआयआर प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात आवाज उठवण्यासाठी लाखो विद्यार्थी जंतरमंतर वर एकवटले आहेत. एसआयआर प्रक्रियेमध्ये कोट्यवधी मतदारांची नावे वगळल्याने सीजेपीसह AISA देखील निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरली आहे.
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील अनियमितता असल्याचे समोर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. जंतरमंतरवरील या आंदोलनात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांसोबत अखिल भारतीय विद्यार्थी संघटना (AISA) देखील सहभागी झाली आहे.
AISA चा आंदोलनांमधील सहभाग काही नवा नाही, AISA चा इतिहास संघर्षमय राहिला आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलने केली आहेत. जून-जुलैमध्ये जंतरमंतर वर सीजेपीच्या नेतृत्वात नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आले होते. तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कऱण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही याच मुद्द्यावर सीजेपीला पाठिंबा देण्यासाठी जंतर-मंतरवर उपोषण केले होते. त्याच काळात AISA नेही स्वतंत्रपणे उपोषण सुरू केले होते. त्यानंतर सुरू असलेल्या डाव्या संघटनांच्या देशव्यापी आंदोलनात AISA आणि तिच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांच्याकडे सोशल मीडियाचे लक्ष वेढले. स्टूडंट आयकॉन म्हणून त्यांना ओळख मिळाली.
विद्यार्थी राजकारणात AISA ची भूमिका नेमकी काय आहे? कम्युनिस्ट चळवळीतील विविध गटांतून या संघटनेचा उदय कसा झाला? तिची विचारधारा काय आहे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये तिचा प्रभाव किती आहे? हे समजून घेऊया
AISA संघटनेचा इतिहास
ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) ही भारतीय कम्युनिस्ट चळवळीतून पुढे आलेली विद्यार्थी संघटना आहे. १९९० मध्ये या संघटनेची स्थापना झाली. AISA ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन अर्थात CPI(ML)L ची विद्यार्थी शाखा आहे. या पक्षाची मुळे पश्चिम बंगालमध्ये काही दशकांपूर्वी सुरू झालेल्या नक्षलवादी चळवळीत रुजलेली आहेत.
आयसाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट चळवळीतील फूट आणि त्यातून तयार झालेल्या विद्यार्थी संघटनांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. १९२५ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची (CPI) स्थापना झाली होती. त्यानंतर १९३६ मध्ये पक्षाची विद्यार्थी संघटना म्हणून ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनची (AISF) स्थापना झाली. १९६४ मध्ये कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) अर्थात CPI(M) हा स्वतंत्र पक्ष उदयास आला. या पक्षाने १९७० मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ही विद्यार्थी संघटना स्थापन केली.
दरम्यान, १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात पश्चिम बंगालमध्ये CPI(M) च्या नेतृत्वातील आघाडी सरकार सत्तेवर आले होते. मात्र, पक्षातील काही नेत्यांनी बंडखोरी करत नक्षलबाडीमध्ये शेतकरी आंदोलनाला सुरुवात केली. चारू मुजुमदार आणि कानू सन्याल यांच्या नेतृत्वाखाली हा उठाव झाला. नक्षलबाडी गावातील बिमल किसन या आदिवासी तरुणाला न्यायालयाच्या आदेशानुसार स्वतःच्या जमिनीवर नांगरणी करायची होती. मात्र, स्थानिक जमीनदाराच्या माणसांनी त्याच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर शेतकरी आंदोलनाला वेग आला आणि पुढे ही चळवळ ‘नक्षलवादी चळवळ’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
मे १९६९ मध्ये चारू मुजुमदार यांच्या वैचारिक नेतृत्वाखाली भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) अर्थात CPI(ML) ची स्थापना झाली. कानू सन्याल आणि जंगल संथाल यांच्या नेतृत्वाखालील ही चळवळ नंतर पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागातून बिहार आणि आंध्र प्रदेशात पसरली. कोलकात्यातही सशस्त्र संघर्ष सुरू झाला, असे शिवाजी मुखर्जी यांनी द ऑक्सफर्ड हँडबुक ऑफ इंडियाज नॅशनल सिक्युरिटी या पुस्तकात नमूद केले आहे.
सरकारने कठोर कारवाई करून अवघ्या ७२ दिवसांत ही चळवळ दडपून टाकली. या काळात एका पोलिसासह नऊ आदिवासींचा मृत्यू झाला होता. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीलाही पोलिसांची कारवाई सुरू राहिली. राजकीय अभ्यासक पार्थ चॅटर्जी हे आफ्टर द रिव्होल्यूशन या पुस्तकात नमूद करतात की, चकमकींमध्ये शेकडो जण मारले गेले. तसेच, हजारो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले. १९७२ मध्ये चारू मुजुमदार यांना अटक झाली आणि त्याचवर्षी त्यांचा अलिपूर तुरुंगात मृत्यू झाला.
चारू मुजुमदार यांच्या मृत्यूनंतर नक्षलवादी चळवळ संपली नाही; मात्र वैचारिक मतभेदांमुळे तिचे वेगवेगळे गट तयार झाले. १९७० च्या दशकात या चळवळीचे चार प्रमुख गट पडले. त्यात १९७५ मध्ये दक्षिण देश या गटातून माओवादी कम्युनिस्ट सेंटर (MCC) तयार झाले. याशिवाय पीपल्स वॉर ग्रुप (PWG), पार्टी युनिटी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन (CPI(ML)L) हे गट उदयाला आले.
पहिल्या तीन गटांनी सशस्त्र संघर्षाचा मार्ग कायम ठेवला. गावांमध्ये तळ ठोकून शहरांना वेढा घालायचा आणि अखेर सशस्त्र मार्गाने अनेक प्रदेश काबीज करायचे, अशी त्यांची रणनीती होती. मात्र, CPI(ML)L ने १९७७ मध्ये हा मार्ग सोडून शेतकरी आणि सामान्य लोकांना संघटित करून जनआंदोलने उभारली.
आयसाच्या पहिल्या अध्यक्षपदाचे उमेदवार गोपाल प्रधान यांच्या मते, १९७० च्या दशकाच्या मध्यात जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाच्या काळात जनतेवर प्रभाव टाकण्यात सीपीआय (एम एल) वर काही मर्यादा आल्या. त्यानंतर पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत बदल करून व्यापक जनसंघटना उभारण्यावर भर दिला. या बदलानंतर पक्षाने निवडणुकीच्या राजकारणातही प्रवेश केला. १९८२ मध्ये इंडियन पीपल्स फ्रंटच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. १९८९ मध्ये बिहारमधील आरा मतदारसंघातून रामेश्वर प्रसाद निवडून आले. ते पक्षाचे पहिले खासदार ठरले. आज हा पक्ष बिहारमध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहे.
सीपीआय (एम एल)ची विद्यार्थी शाखा असलेल्या आयसा ने जवाहरलाल नेहरू विद्यापीठासह (JNU) देशातील काही प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये आपले स्थान निर्माण केले. गोपाल प्रधान यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, उत्तर प्रदेशातील प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स ऑर्गनायझेशन (PSO), पश्चिम बंगालमधील ऑल बंगाल स्टुडंट असोसिएशन आणि बिहारमधील ऑल बिहार स्टुडंट युनियन या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना नंतर आयसासोबत जोडल्या गेल्या. PSO चे अखिलेंद्र प्रताप सिंह १९८३ मध्ये अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले होते.
उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींमुळे आयसाच्या वाढीला बळ मिळाले. डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली. त्याच काळात मंडल आयोगाच्या शिफारशींच्या लागू करण्याची घोषणाही झाली होती. सामाजिक न्यायाच्या बाजूने असलेले आणि हिंदुत्वाच्या राजकारणाला विरोध करणारे विद्यार्थी आयसाकडे वळू लागले. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक विद्यापीठांच्या निवडणुकांमध्ये संघटनेला फायदा झाला, असे प्रधान सांगतात.
त्यावेळी अलाहाबाद (आताचे प्रयागराज) हे स्पर्धी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. मात्र, विद्यापीठातील विद्यार्थी राजकारणात गुन्हेगारीचा प्रभाव वाढला होता. त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करू इच्छिणारे अनेक विद्यार्थी आयसाकडे वळले, असेही प्रधान यांनी नमूद केले. १९९३ मध्ये आनंद प्रधान यांनी आयसाकडून निवडणूक लढवत बनारस हिंदू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद जिंकले. त्याचवर्षी अलाहाबाद विद्यापीठात लालबहादूर सिंह, कुमाऊँ विद्यापीठात गिरिजा पाठक आणि जेएनयूमध्ये प्रणय कृष्ण श्रीवास्तव हे आयसाचे इतर उमेदवारही निवडून आले. पुढे २०१२ आणि २०१३ मध्ये अलाहाबाद विद्यापीठात या संघटनेने उपाध्यक्षपदावरही बाजी मारली.
AISA ची विचारधारा काय आहे?
आयसा ही संघटना विद्यार्थी, सामान्य नागरिक आणि लोकशाही हक्कांसाठी लढणारी डाव्या विचारसरणीची संघटना आहे. तिच्या मते, शिक्षण आणि राजकारणात विद्यार्थ्यांचे हित डावलणाऱ्या तसेच धार्मिक आणि जातीय आधारावर समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींना विरोध करणे गरजेचे आहे. आयसा संघटना नेहमीच एनएसयूआय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना एबीव्हीपी तसेच उजव्या विचारणीच्या संघटनांची विरोधक म्हणून लढली. डाव्या चळवळीतील संधीसाधू प्रवृत्तींनाही आयसा विरोध करते.
आयसाच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे की, राजकारणात धर्माचा गैरवापर किंवा धार्मिक ध्रुवीकरण याविरोधात लढणे हा आयसाचा मुख्य उद्देश आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना आयसाने धार्मिक ध्रुवीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तीवर चिंता व्यक्त केली आहे. धार्मिक सलोखा ही भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे. मात्र, फॅसिझमचा वाढता प्रभाव या परंपरेला धोकादायक ठरत आहे. तसेच राष्ट्रउभारणी आणि लोकशाही राजकारणाचा पाया यांच्यासाठीही फॅसिझम धोकादायी आहे, असे संघटनेने म्हटले आहे.
धर्म ही प्रामुख्याने वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे धर्माचा राजकारणाशी आणि शासनाच्या संस्थांशी संबंध नसावा, अशी आयसाची भूमिका आहे. तसेच, पारंपरिक ‘सर्वधर्म समभाव’ या संकल्पनेऐवजी धर्माला राजकारण आणि शासनव्यवस्थेपासून दूर ठेवणारी ‘सर्व धर्म वर्जित’ ही धर्मनिरपेक्षतेची आधुनिक संकल्पना पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
सीपीआय (एम एल) च्या केंद्रीय समितीच्या सदस्या सुचेता डे या २०११-१२ मध्ये आयसाकडून जेएनयू विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी निवडून आल्या होत्या. त्यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना म्हटले, २०१४ पूर्वी एसएफआय आणि आयसा यांच्या भूमिकांमध्ये काही मतभेद होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत त्या मतभेदांवर अधिक चर्चा करण्यात फारसा अर्थ नाही.
“भाजपला आम्ही फॅसिस्ट म्हणतो, तर भाजपामध्ये नव-फॅसिस्ट प्रवृत्ती दिसत असल्याचे एसएफआय नमूद करते. कदाचित हाच दोन्ही संघटनांमधील एकमेव मतभेद आहे,” असे डे यांनी म्हटले.
AISA ची उपस्थिती
केरळमध्ये एसएफआयचा प्रभाव आहे, तर एकेकाळी पश्चिम बंगालमध्येही या संघटनेचा प्रभाव होता. याउलट, आयसाने उत्तर प्रदेशातील विविध विद्यापीठांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थी संघात २००३ पासून आयसाचे ११ अध्यक्ष निवडून आले आहेत. यापैकी संदीप सिंह, अकबर चौधरी आणि मोहित पांडे यांनी पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९७ मध्ये बिहारच्या सिवानमध्ये हत्या झालेले जेएनयूचे माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष चंद्रशेखर प्रसाद हेदेखील आयसाचे सदस्य होते.
आयसा आणि एसएफआय यांच्यातील आणखी एक फरक म्हणजे बिहारमध्ये आयसाने इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांमध्येही प्रभाव निर्माण केला. याउलट, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची CPI(M) सत्ता येण्याआधी प्रामुख्याने उच्चवर्णीयांनीच एसएफआयचे नेतृत्व केले. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळाल्यानंतर CPI(M) हा प्रस्थापित व्यवस्थेचा भाग बनली. याच सत्ताधाऱ्यांनी उद्योगांसाठी जमीन बळकावण्याच्या प्रयत्न केला. याउलट, CPI(ML)L ला कोणत्याही राज्यात सत्तेत नसल्याने हा पक्ष आजही प्रस्थापित व्यवस्थेचा विरोधक राहिला आहे.
२०२५ आणि २०२६ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत आयसा आणि एसएफआय यांची युती घडून आली. युतीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांना पाच हजारांहून अधिक मते मिळाली. मात्र, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि काँग्रेसशी संबंधित भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) यांच्या उमेदवारांच्या तुलनेत हा मतांचा आकडा कमी होता. मात्र आयसाचा विद्यार्थ्यांमधील प्रभाव कमी होऊ शकला नाही. विद्यापीठांमध्ये प्रभाव निर्माण करण्यापासून ते देशातील व्यापक राजकीय घडामोडींमध्ये सहभाग घेण्यापर्यंत आयसाने प्रमुख भूमिका बजावली आहे.
