गेल्या अडीच महिन्यात अजिंठा लेणी परिसरात सहा वेळा मधमाश्यांनी हल्ले केले. कोणत्या मधमाश्या हल्ला करतात, असे हल्ले होऊ नये म्हणून काय करावे, याविषयी…..

पर्यटकांवर मधमाश्यांचे वाढले

जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा लेणीसारख्या पर्यटनस्थळी मधमाश्यांकडून अचानकपणे पर्यटकांवर हल्ला होत आहे. अशा घटना वारंवार होत आहेत. आग्या मोहळाच्या माश्यांचा हल्ला अनेक वेळा जिवावरही बेतण्याएवढा घातक असतो. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेणीच्या परिसरात मागील दीड महिन्यांत सहापेक्षा अधिक वेळा मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यामध्ये ५०पेक्षा अधिक पर्यटक जखमी झाले, यात विदेशी पर्यटकही आहेत.

हल्ला कसा व कुठून होतो?

अनेक पर्यटक बाहेर पडताना बॉडी स्प्रे, डिओड्रंट, परफ्यूम, डोक्यावरील केसांना सुगंधी तेल लावतात. या गंधामध्ये अनेक वेळा उग्रता असते. काहींचा घामही वातावरणात पसरून उग्र स्वरूपाचा असतो. अशा दर्पामुळे मधमाश्यांमध्ये अस्वस्थता पसरून असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि त्या हल्ला चढवतात. पोळ्यातील एकाही माशीने हल्ला केला की त्यातून त्यांचे शरीर फिरोमोन्स द्रव तयार करते आणि त्यातून इतर मधमाश्यांना सतर्क करून संरक्षण करण्याचा संदेश देते. मग त्याही हल्ला चढवतात. त्यांना निसर्गाकडून स्वरक्षणार्थ काटा-नांगी (स्टिंग) हे आयुध मिळालेले आहे. या नांगीमध्ये ॲपी टॉक्झिन नावाचे विष (व्हेनम) असते. तेही दोन घटकांमध्ये असते. एक मिलेटिन आणि दुसरा ॲपामाईन. तसेच वासाद्वारे परस्परांशी संपर्क ठेवण्याची त्यांना शारीर रचनाही लाभलेली आहे. अशी रचना त्यांच्यातील दळण-वळणासाठी अंगवळणाचा भाग असतो.

पोळे तयार कसे होते? रचना कशी?

मधमाश्यांचे पोळे साधारणतः षटकोनी आकाराचे असते. मानवी वस्तीपासून दूर किंवा जिथे त्यांना पोळे तयार करण्यामध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत, असेच ठिकाण त्या निवडतात. प्राणीशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. बंकट कांबळे व प्रा. डॉ. प्रवीण शेटे यांच्या माहितीनुसार, मधमाश्यांमध्ये ‘वॅक्स’ नावाची ग्रंथी असते. त्याद्वारे पोळे तयार केले जाते. मधमाश्या या सोंडेद्वारे फुलांमधील मकरंद (फ्रुक्टोज) शोषून घेत असतात. मकरंद हे एक प्रकारचे ग्लुकोजच असते. हा मकरंद पोळ्यामध्ये साठवून ठेवण्याचे काम त्यांचे सुरू असते. या पोळयाची प्रमुख असते ती राणी माशी. इतर मधमाश्या कामकरी श्रेणीतील. त्यांची संख्या अधिक असते. तर पोळ्यामध्ये ड्रोनची (नर) संख्या तुलनेने कमी असते. कामकरीकडून संरक्षणार्थचा संदेश मिळाल्यानंतर इतर मधमाश्यांना हल्ला करण्याचे आदेश राणी माशीकडूनच दिले जातात.

मधमाश्यांच्या प्रजाती किती?

मधमाश्यांच्या एकूण पाच प्रजाती आहेत. त्यातील प्रमुख तीन प्रजाती आहेत. प्रत्येक प्रजातीची म्हणून एक स्वतंत्र गुण-वैशिष्ट्ये आहेत. ॲपिस सेरेना इंडिका ही प्रजात शांत स्वभावाची. हिच्याकडून सहसा हल्ला होत नाही. ॲपिस मेलिफेरा नावाची दुसरी एक प्रजात आहे. या प्रजातीची ओळख जास्त मकरंद संकलित करणारी म्हणून आहे. हिला अस्वस्थ करणे किंवा कामामध्ये अडथळा आणलेला चालन नाही. तिसरी प्रजात आहे ॲपिस डॉरसेटा. म्हणजे आग्या मोहळातील मधमाशी. अत्यंत आक्रमक म्हणून या मधमाश्यांची ओळख सर्वश्रुत आहे. त्यांचा आकारही मोठा असतो. आग्या मोहळ उंच जागी, तसेच किमान १०० ते १५० फुटांखाली सहसा तयार केले जात नाही. उंच जागी पोळे तयार करण्याला या माशा पसंती देतात. चौथी प्रजात ही ॲपिस फ्लोरिया. लहान पोळ्यामधील ही मधमाशी चावते पण शांत स्वभावाची असते. पाचवी प्रजात ॲपिस टेट्रागोणुला मेलिफेरा. ही मध्यम आकाराची मधमाशी नांगी मारत नाही.

पोळे तयार झाल्यानंतर काय होते?

पाचही प्रजातीतील मधमाश्या त्यांच्या वॅक्स ग्रंथीद्वारे पोळे तयार करतात. काहींचे आकारमान अगदीच लहान असते तर काहींचे मध्यम स्वरूपाचे. सर्वात मोठे पोळे दिसते ते आग्या मोहळाचे. त्याचे वजन २० ते ८०-९० किलोपर्यंतचेही असते. प्रत्येक मोहळामध्ये कामकरी माशी असते. हीच माशी हल्ला करते. पोळ्याची प्रमुख असते त्या राणी माशीकडून (क्वीन बी) व्यवस्थापन किंवा आदेशाचा कारभार चालतो. एक पोळे तयार झाले की ड्रोन माशी व राणी माशींमध्ये समागम होऊन नवीन वंशावळ तयार होते. साधारण दोन ते अडीच महिन्यांनंतर ड्रोन व राणी माशी एकत्र येत असतात. नवीन वंशावळीवर लक्ष ठेवण्याचे काम राणी करते.

मधमाश्यांपासून बचाव कसा कराल?

पर्यटकांनी पर्यटनाला जाताना काही निश्चित पथ्ये पाळली पाहिजेत. वने किंवा नैसर्गिक वातावरणाच्या प्रदेशात पर्यटनस्थळ असेल तर तेथे जाताना उग्र किंवा तीव्र वासाचे परफ्यूम, बॉडी स्प्रे, अत्तर, केसांच्या सुगंधी तेलाचा वापर काळजीपूर्वकच करावा. कारण अन्यथा मधमाश्यांना अडथळा निर्माण होऊन असुरक्षित वाटल्याने त्या हल्ला चढवतात. एखाद्या ठिकाणी पोळे असेल तर त्यापासून ५०-१०० फूट अंतरावरच आपला वावर ठेवावा. मधमाश्यांचे हल्ले वारंवार घडत असतील तर पर्यटन स्थळावरील व्यवस्थापनाने गॅमेझिन (बीएचसी) पावडरची फवारणी केली तर त्या वासाने १०० फुटापर्यंत पोळे तयार होत नाही. मधमाश्यांचा डंख झाल्यानंतर शरीराच्या भागातील नांगीचा रुतलेला काटा काढून टाकणे व या ठिकाणी थंड पाण्यात बुडवलेले सुती कापड, रुमाल गुंडाळणे हा प्राथमिक उपचार आहे. किंवा कोणत्याही झाडाच्या पानाने डंख केलेल्या ठिकाणी रगडल्यानंतर अन्य मधमाश्या जवळ येणार नाहीत किंवा चावणार नाहीत. या प्राथमिक उपचारामुळे सूज येणे दाह व बधिरपणा कमी होतो. नंतर अर्थातच गरज भासल्या संबंधित व्यक्तीस दवाखाना किंवा आरोग्य केंद्रात भरती करणे हितकारक ठरते.