मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली ट्वेन्टी-२० विश्वचषक भारताने सलग दुसऱ्यांदा उंचावला. जागतिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला. गंभीर चर्चेत असले, तरी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी पडद्यामागे कठोर परिश्रम घेतले. त्यांनी काही कठीण निर्णय घेण्याचे धाडस केले. त्याचे परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. आगरकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण का होती, त्यांचे कोणते निर्णय संघाच्या पथ्यावर पडले, त्याचा घेतलेला हा आढावा.
शुभमन गिलला डच्चू, सूर्यकुमारवर विश्वास
ट्वेन्टी-२० विश्वचषकाची संघनिवड करताना निवड समितीने इशान किशन आणि रिंकू सिंहची निवड केली. यामुळे भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा उपकर्णधार म्हणून निवडण्यात आलेल्या शुभमन गिलला विश्वचषक संघातून वगळण्यात आले. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापनाला गिलला समाविष्ट करायचे होते, परंतु आगरकर आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी गिलच्या समावेशाला नकार दिला. ‘‘तुमचे मत माझ्यापेक्षा वेगळे असू शकते,’’ असे आगरकर यांनी संघ व्यवस्थापनाला सांगितले होते. ‘‘गिल हा दर्जेदार खेळाडू आहे याबाबत आम्हाला अजिबात शंका नाही. मात्र, सध्या भारतीय क्रिकेटमध्ये चांगले पर्याय उपलब्ध आहेत,’’ असे आगरकर म्हणाले. त्याचप्रमाणे, जेव्हा रोहित शर्मा ट्वेन्टी-२० संघातून बाहेर पडला आणि एका नवीन कर्णधाराची निवड करावी लागणार होती. तेव्हा हार्दिक पंड्याला उत्तराधिकारी म्हणून पाहिले गेले. मात्र, आगरकर यांनी सूर्यकुमार यादवसाठी जोरदार युक्तिवाद केला. तसेच, आपण सूर्यकुमारवर जबाबदारी का देत आहोत हे आगरकर यांनी स्पष्ट केल्यानंतर निवड समितीतील इतर सदस्यांनाही आगरकर यांचा निर्णय पटला. हार्दिकला वारंवार होणाऱ्या दुखापतीमुळे निवड समितीला सूर्यकुमारचा पर्याय योग्य वाटला.
इशान किशनचे पुनरागमन
दक्षिण आफ्रिका मालिकेतून माघार, केंद्रीय करारातून वगळणे आणि देशांतर्गत क्रिकेट नाट्य यासारख्या वादांनंतरही, जेव्हा इशान किशनला पुनरागमनाची संधी देण्यात आली, तेव्हा पुन्हा एकदा आगरकर यांच्यावर टीका झाली. मात्र, आगरकर तेव्हाही आपल्या निर्णयावर ठाम होते. ‘‘तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वरच्या स्थानी फलंदाजी करतो. तो चांगल्या लयीतही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो यापूर्वी भारतासाठी खेळला देखील आहे. ऋषभ पंत आणि ध्रुवर जुरेल असल्याने इशानला संधी मिळत नव्हती,’’ असे आगरकर यांनी सांगितले. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघनिवडीच्या निर्णयानंतर पत्रकार परिषदा पुन्हा सुरू करण्यापासून ते खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये परत आणण्यापर्यंत, निवड समिती अध्यक्ष म्हणून आगरकर यांना धाडसी सुधारणांचे श्रेय दिले पाहिजे. गंभीरनेही त्यांची भूमिका मान्य केली आणि विश्वचषक विजय त्यांना समर्पित केला. ‘‘हा चषक अजित आगरकर यांना समर्पित करावासा वाटतो. कारण, त्यांना टीकेचा सामना करावा लागला. त्यांनी प्रामाणिकपणे आपले काम केल्याने मी त्यांचा आभारी आहे,’’ असे गंभीर विश्वचषक उंचावल्यानंतर म्हणाले होते. भारताने तीन वर्षांत तीन ‘आयसीसी’ जेतेपदे मिळवली आहेत आणि त्याचे श्रेय हे निवड समितीलाही जाते.
तारांकित संस्कृतीला तिलांजली
भारताला कसोटीत आपल्याच देशात ‘व्हाइटवॉश’ मिळत होता. ऑस्ट्रेलियातही भारताकडून निराशाजनक कामगिरी झाली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून अपेक्षित कामगिरी होत नव्हती. ऑस्ट्रेलियात जाऊन बॉर्डर-गावस्कर करंडक पटकाविणाऱ्या भारतावर यावेळी मात्र, पराभवाची नामुष्की ओढवली. रविचंद्रन अश्विनने दौऱ्यामध्येच कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे संघ व्यवस्थापन व निवड समितीला सर्वांनी लक्ष्य केले. कसोटीत अपेक्षित निकाल येत नसल्याने इंग्लंड दौऱ्यापूर्वी आगरकर यांच्या निवड समितीने रोहितला थांबण्यास सांगितले. त्यानंतर कोहलीनेही कसोटी क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंड दौऱ्यात गिलकडे संघाची धुरा सोपविण्यात आली. या दौऱ्यात भारताने मालिका २-२ अशी बरोबरीत सोडविल्यानंतर निवड समितीचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले. कोहलीने घरच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि त्याने शतकांची आतषबाजी केली. रोहित तंदुरुस्त झाला, स्थानिक क्रिकेटमध्ये परतला आणि ५० षटकांच्या प्रारूपात तो पुन्हा चमक दाखवत आहे. ‘‘या दोन्ही खेळाडूंनी त्यांना जे काही साध्य करायचे होते ते सर्व साध्य केले आहे. भविष्यात संघ कसा आकार घेतो हे आपण पाहू, पण आमच्याकडेही काही कल्पना आहेत,’’ असे या दोन दिग्गज खेळाडूंबद्दल आगरकर म्हणाले. तारांकित खेळाडूंच्या संस्कृतीत अडकलेल्या संघाबाबत यापूर्वी निवड समितीने कृती करण्याऐवजी दुर्लक्ष केले. मात्र, आगरकर यांच्या नेतृत्वात असलेल्या निवड समितीने आपले सर्वांत कठीण काम केले. त्याचे परिणामही संघात दिसू लागले.
निवड समितीचा माध्यमांशी संवाद
वर्षानुवर्षे, निवड समितीकडून संघ जाहीर केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधणे टाळण्यात येत होते. आगरकर यांनी पुन्हा पत्रकार परिषदा घेतल्या. त्यांनी माध्यमांचे सर्व प्रश्न ऐकून घेतले आणि त्यांना अपेक्षित उत्तरेही दिली. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे, अशी कल्पना समोर आणली. त्याचे परिणाम हे सर्वांना दिसून आले. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे खेळाडूही देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी आपापल्या संघांकडून सहभागी झाले. सध्या हे दोन्ही खेळाडू केवळ एकदिवसीय प्रारूपात भारताकडून खेळतात. त्यातच हार्दिक पंड्याने ट्वेन्टी-२० विश्वचषकात नियमितपणे गोलंदाजी केली. देशांतर्गत क्रिकेटमधील सामन्यांच्या परिस्थितीमुळे ते शक्य झाले.
