Rohit Pawar PC on Ajit Pawar Plane Crash Investigation : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यांचा अपघात होता की घातपात होता? हा प्रश्न सातत्याने विविध तांत्रिक त्रुटींच्या आधारे विचारला जात आहे. त्यातच, अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यानिमित्ताने गेल्या दोन आठवड्यात त्यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन माध्यमांसमोर अनेक अनेक बाबी उघड केल्या. एकीकडे रोहित पवारांनी अपघातावर शंका उपस्थित केलेली असताना पवार कुटुंबाने याप्रकरणी फार वाच्यता केलेली नाही. तसंच, अजित पवार गटामध्येही अमोल मिटकरी वगळता इतर कोणीही हे प्रकरण उचलून धरेलंल नाही. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित नेमकं राज्यभरात काय काय घडतंय ते पाहूयात.
अजित पवारांचा अपघात ते घातपात, नेमकी चर्चा काय?
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराकरता अजित पवार २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामती येथे निघाले. मुंबईतून निघालेलं विमान बारामतीपर्यंत सुखरूप पोहोचलं. परंतु, विमानाच्या लँडिंगवेळी आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे अवघ्या राज्यावर शोककळा पसरली. राज्यातील जनता अजित पवारांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त करत असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघातावर शंका उपस्थित केली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागतंय की काय अशी शंका निर्माण होत असतानाच महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शरद पवारांनी तत्काळ पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात राजकारण आणू नका, अशी विनंती केली. त्यानंतर, अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यदर्शन, अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्कार सुरळीत पार पडले.
अमोल मिटकरी आणि रोहित पवारांना संशय कधी आला?
अजित पवारांवर पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ही घटना वेगळ्या वळणावर येऊ पोहोचली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अपघातावर संशय निर्माण केला. त्यानंतर एकामागोमाग एक आरोप सुरू झाले. रोहित पवारांनीही सुरुवातीला अजित पवारांच्या अपघातावर थेट भूमिका घेणं टाळलं. पण नंतर त्यांनी घातपाताचा संशय निर्माण केला. त्यानंतर, थेट ९ फेब्रुवारी रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अपघातातील सर्व घटनाक्रम आणि त्यातील त्रुटी निदर्शनास आणून त्यांनी हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा गंभीर आरोप केला.
पहिल्याच पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी काय सांगितलं?
“१६ वर्षे जुने विमान अद्याप हवाई वाहतूक सेवेत कसे? विमान उड्डाण करण्याच्या स्थितीत होते का? त्याची तपासणी कुणी केली? युरोपात बंदी असताना देशात वाहतुकीला परवानगी कशी दिली गेली? अपघाताग्रस्त विमानाची देखभाल – दुरुस्ती कुठे केली जात होती? विमानात हवाई इंधन भरलेले कॅन होते का? विमानाची स्थिती सांगणारे ट्रान्सपॉन्डर बंद का होते? फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी उशिराने का आली?” आदी प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले.
रोहित पवारांनी प्रश्न उचलून धरल्यानंतर अनेकांनी या अपघाताकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली. अमोल मिटकरी यांनीही रोहित पवारांचे मुद्दे उचलून धरत त्यांच्या संशयाला धार निर्माण केली. दरम्यान, रोहित पवारांनी सातत्याने हा विषय उचलून धरल्याने नागरी उड्डाण मंत्रालयानेही १७ फेब्रुवारी रोजी परिपत्रक काढत विमानातील ब्लॅक बॉक्सचे नुकसान झाल्याची माहिती दिली. परंतु, या ब्लॅक बॉक्सच्या रिकव्हरीसाठी तज्ज्ञांची मदत घेणार असल्याचंही सांगितलं. दरम्यान, आज (१८ फेब्रुवारी) रोहित पवारांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत त्यांनी त्यांच्यापद्धतीने सुरू ठेवलेल्या तपासातील पुढचा भाग सांगितला. यावेळी ब्लॅक बॉक्स, पायलटची वैयक्तिक माहिती, कंपनीच्या मालकाचे हितसंबंध आदी विविध मुद्द्यांवर पुन्हा चर्चा केली.
दुसऱ्या पत्रकार परिषदेत काय गौप्यस्फोट केला?
विमानात अतिरिक्त इंधन साठा होता, त्यामुळे पायलटने विमान आदळल्यानंतर भीषण स्फोट झाला. मात्र, या स्फोटाचा भपका काही सेकंदापुरताच असतो, त्यामुळे विमान अपघात झाल्यानंतर तेथील कागद जळाले नाहीत. मात्र, नागरी उड्डाण मंत्रालय म्हणतंय त्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स जळाला. हे कसं शक्य आहे? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला. तसंच, पायलटला त्याच्या मृत्यूपश्चात मिळणाऱ्या इन्शुरन्सची कल्पना होती का? त्याचा पगार कमी झालेला, त्यामुळे त्याच्यावर दबाव होता का? त्याच्या कौटुंबिक त्रासामुळे त्याला कोणी ब्लॅकमेल करत होतं का? आदी प्रश्नही रोहित पवारांनी उपस्थित केले. दरम्यान, ज्या विमानाच्या इंजिनाची क्षमता जवळपास संपत आली होती, ते विमान अजित पवारांना का दिलं? विमान कंपनीच्या मालकावर कोणता राजकीय हस्तक्षेप आहे का याची चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली.
अजित पवार गटाची भूमिका काय?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजितदादांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आली. अजित पवारांचा अपघात हा साधासुधा नाही, त्यामुळे या प्रकरणी सीबीआयमार्फत तपास केला जावा अशी मागणी करण्यात आली. ज्यानंतर ही मागणी घेऊन आपण अमित शाह यांना भेटणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. “लोकांनाही या प्रकरणात घातपाचा संशय वाटतो आहे. त्यामुळे सीबीआय चौकशी केली जावी आणि जे काही घडलं आहे ते सत्य लोकांसमोर यावं अशीही मागणी करण्यात आली आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.
याबाबत माहिती देताना प्रफुल पटेल म्हणाले, महाराष्ट्र सरकारने विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे दिला होता. पण एवढ्या मोठ्या नेत्याच्या अपघातानंतर याचा सर्व बाजूंनी तपास व्हायला हवा. जर कुणी षडयंत्राचा आरोप करत असेल किंवा निष्काळजीपणा झाला असेल तर त्याही पैलूंचा तपास झाला पाहिजे. यात कोणतेही दुमत नाही.
तपास यंत्रणांचा तपास कुठवर पोहोचला?
२८ जानेवारी रोजी अजित पवारांचा विमान अपघात झाल्यानंतर २ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) कडून चौकशी सुरू झाली. तसंच, या आदेशावेळी १५ फेब्रुवारीपर्यंत प्राथमिक अहवाल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले होते. मात्र, AAIB चौकशीबाबत सरकारने काल परिपत्रक सादर करून ब्लॅक बॉक्सच्या नुकसानीविषयी माहिती दिली.
नागरी उड्डाण मंत्रालायने म्हटलंय, २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या Learjet ४५ विमान VT-SSK च्या अपघाताची विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) सविस्तर चौकशी करत आहे. विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते. अपघातादरम्यान दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर बराच काळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात होते आणि आगीमुळे त्यांचे नुकसान झाले. L3 कम्युनिकेशन्सद्वारे निर्मित डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) AAIB फ्लाइट रेकॉर्डर प्रयोगशाळेत यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला आहे. हनीवेलद्वारे निर्मित कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) ची सविस्तर तांत्रिक तपासणी सुरू आहे. यातील डेटा पुन्हा मिळावा याकरता विशेष मदतीसाठी उत्पादकाच्या मान्यताप्राप्त प्रतिनिधीशी संपर्क साधण्यात आला आहे.”
दरम्यान, हे प्रकरण चौकशीच्या अधीन आहे. त्यामुळे संबंधित तपास यंत्रणांकडून अहवाल प्राप्त होत नाही, तोवर या अपघाताबाबत अनेक प्रश्न विचारले जाणार आहेत.

