Ajit Pawar Plane Crash Marathi News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण दुर्घटनेच्या कारणांबाबत अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. २०२५ मध्ये गुजरातच्या अहमदाबाद शहरात एअर इंडियाच्या विमानालाही असाच अपघात झाला होता. यादरम्यान अजित पवार यांचे विमान कोसळल्याने देशातील विमान वाहतूक सुरक्षेबाबतच्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फोडले आहे. सध्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. त्याचवेळी एका वरिष्ठ वैमानिकाने इंडिया टुडेशी बोलताना विमान अपघातामागील संभाव्य कारणे सांगितली आहे. त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…
बारामतीमधील धावपट्टीच्या भौगोलिक रचनेची माहिती असलेल्या वैमानिकाने बारामती विमान अपघातामागे ‘अनस्टेबल फायनल अप्रोच’ हे कारण असण्याची शक्यता वर्तवली आहे. विमान धावपट्टीवर उतरण्याच्या शेवटच्या टप्प्यातील अस्थिर स्थितीला ‘शॉर्ट फायनल्स फेज’ म्हटले जाते. या टप्प्यावर संतुलन बिघडल्याने अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला असावा, असा अंदाज या वैमानिकाने इंडिया टुडेशी बोलताना व्यक्त केला आहे. यादरम्यान त्यांनी अपघातामागे टेबलटॉप धावपट्टीचे कारण असण्याची शक्यताही वर्तवली आहे.
टेबलटॉप धावपट्टी म्हणजे काय?
सामान्यपणे विमातळाची उभारणी ही मैदानी अथवा सपाट भागावर केली जाते. मात्र, डोंगराळ भागांमध्ये सपाट जागा नसल्याने डोगराच्या वरील भागात असे विमानतळ उभारले जातात. या विमानतळावरील धावपट्टीच्या आसपास डोंगर उतार असतो. अशा परिस्थितीत धावपट्टीच्या एका किंवा दोन्ही बाजूंना डोंगराचा उतार असू शकतो. टेबलटॉप धावपट्टी संपल्यानंतर पुढे फारशी जागा नसते. अशा धावपट्टीवर विमान उतरवणे वैमानिकांसाठी अत्यंत आव्हानात्मक असते. कारण- धावपट्टीचा अंदाज घेण्यात थोडीही चूक झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याचा धोका असतो. देशात कर्नाटकातील मंगळुरू, केरमधील कोझिकोड आणि मिझोरममध्ये टेबलटॉप धावपट्ट्या आहेत.
आणखी वाचा : Ajit Pawar Plane Crash: अजित पवार शरद पवारांच्या छायेत कसे घडले?
अजित पवार यांचे विमान कोणते होते?
अजित पवार यांच्यासह पाचजण हे लिअरजेट ४५ या विमानातून प्रवास करीत होते. या विमानाला प्रामुख्याने दोन इंजिने आहेत. साधारणत: व्हीआयपी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील उचभ्रू व्यक्ती या विमानाचा वापर करतात. छोटेखानी असलेले हे विमान वेगाने प्रवास करण्यासाठी वापरले जाते. कमी वेळातच जास्तीत जास्त अंतर कापत असल्याने या विमान प्रवासाला विशेष पसंती दिली जाते. लिअरजेट-४५ विमानाने ३००० किमीपर्यंत प्रवास करता येऊ शकतो. ताशी ८०० ते ८५० किमी वेगाने हे विमान धावते. या विमानाची आसनक्षमता सहा ते आठ प्रवाशांची आहे. त्याची लांबी व उंची अनुक्रमे ५८ ते १४ फूट इतकी असते. लिअरजेट-४५ विमानाला छोट्या धावपट्ट्यांवर तसेच छोट्या विमानतळांवर लँडिंग करणे इतर मोठ्या विमानांच्या तुलनेत सोपे जाते. १९९० च्या सुमारास हे विमान विकसित करण्यात आले होते आणि १९९८ मध्ये त्याची सेवा सुरू करण्यात आली होती.
विमानाचा अपघात कसा झाला?
सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी ‘लिअरजेट ४५’ या विमानाने अजित पवार यांच्यासह पाच जणांना घेऊन मुंबईतून उड्डाण भरले. या विमानाचे मुख्य वैमानिक सुमित कपूर हे अतिशय अनुभवी होते. त्यांच्या नावावर १६,००० तासांहून अधिक काळ विमान उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव होता. सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी हे विमान बारामतीतील धावपट्टीच्या अगदी जवळ आले होते. त्यावेळी दाट धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी असल्याने वैमानिकाने लँडिंगचा पहिला प्रयत्न सोडून दिला होता. एटीसीबरोबर संपर्क साधल्यानंतर वैमानिकाने पुन्हा लँडिगचा प्रयत्न केला. त्याचवेळी विमानावरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि बारामतीतील गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.
अपघात कशामुळे झाला असावा?
वरिष्ठ वैमानिकाने इंडिया टुडेला सांगितले की- विमान धावपट्टीवर उतरवताना ते पूर्णपणे स्थिर असणे आवश्यक असते. लँडिंगच्या शेवटच्या टप्प्यात विमानाचा वेग कमी होत असतो आणि ते जमिनीच्या दिशेने झेपावत असते. या टप्प्यावर विमानाचे फ्लॅप्स, स्लॅट्स आणि लँडिंग गियर पूर्णपणे उघडलेले असतात. अशा स्थितीत वारंवार बदलणारे वारे किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास विमान कोसळण्याची शक्यता असते. वेगाचा चुकीचा अंदाज आणि लँडिंगचा हट्ट यामुळे हा अपघात झाला असावा. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ तपासल्यानंतरच अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल. अजित पवार यांचे घेऊन जाणारे विमान धावपट्टीच्या सुरुवातीला असलेल्या सीमा भिंतीजवळ कोसळले असल्याने वरिष्ठ वैमानिकाने या दुर्घटनेला असामान्य असे म्हटले आहे.
हेही वाचा : अजित पवारांच्या जाण्याने देवेंद्र फडणवीसांसमोरील आव्हाने वाढणार? कारण काय?
विमान कंपनीची प्रतिक्रिया काय?
‘लिअरजेट ४५’ विमान कंपनीचे मालक विजय कुमार सिंह यांनी या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. विमानामध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा संशय त्यांनी फेटाळून लावला आहे. सदरील विमानात कोणतीही समस्या नव्हती आणि ते १०० टक्के सुरक्षित होते. विमानाचा क्रू बऱ्यापैकी अनुभवी होता. अपघातासाठी कदाचित कमी दृश्यमानता कारणीभूत असू शकेल. तरीही डिजीसीएच्या चौकशीतून खरे कारण समोर येईल. या अपघातात दोन्ही पायलट सुमीत कपूर आणि संभवी पाठक यांचा मृत्यू झाला आहे. आम्ही आमच्या दोन्ही पायलटला गमावले असून सर्व प्रवाशीही मृत्यूमुखी पडले आहेत, असे विजय कुमार सिंह यांनी इंडिया टुडेला सांगितले. यादरम्यान विमान अपघाताची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाचा सविस्तर तपास केला जात आहे. सध्या अपघातग्रस्त विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ आणि तांत्रिक माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे अपघाताच्या कारणाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
