महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (२८ जानेवारी) सकाळी झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे. मुंबईहून बारामतीला उड्डाण केलेले विमान बारामतीत अपघातग्रस्त झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास विमान दुर्घटनाग्रस्त झाले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती दिली. अजित पवार प्रवास करत होते ते लिअरजेट-४५ विमान काय आहे ? त्या विमानबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

‘लिअरजेट-४५’ विमानाबद्दल माहिती

डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार लिअरजेट-४५ (Learjet 45) या विमानातून प्रवास करत होते. लिअरजेट-४५ हे एक मध्यम आकाराचे व्यावसायिक जेट विमान आहे. बम्बार्डियर एरोस्पेस या कंपनीने लिअरजेट -४५ या विमानांचे उत्पादन केले आहे. १९९० च्या सुमारास हे विमान विकसित करण्यात आले होते. १९९८ मध्ये या विमानांद्वारे सेवा सुरू करण्यात आली होती. लिअरजेट-४५ हे ‘सुपर लाईट’ व्यावसायिक जेट श्रेणीतील विमान आहे.

लिअरजेट-४५ विमानाने ३००० किमीपर्यंत प्रवास करता येऊ शकतो. ताशी ८०० ते ८५० किमी वेगाने हे विमान धावते. या विमानाची आसनक्षमता सहा ते आठ प्रवासी इतकी असते. ५१००० फूट उंचीवरून हे विमान उडू शकते. या विमानाची लांबी ५८ फूट, उंची १४ फूट तर पंखांची लांबी ४८ फूट इतकी आहे. या विमानाचा वापर मुख्यत: राजकारणी व व्यावसायिक करतात. विमानात फ्रेश होण्यासाठी एक बाथरूम किंवा स्वच्छतागृहाची सोय असते. प्रवासाची वेळ वाचवण्यात हे विमान मदत करते, त्यामुळे व्यावसायिक किंवा राजकारणी या विमानाला प्रवासासाठी प्राधान्य देतात. लिअरजेट-४५ विमानाला छोट्या धावपट्ट्यांवर तसेच छोट्या विमानतळांवर लँडिंग करणे इतर मोठ्या विमानांच्या तुलनेत सोपे जाते. त्यामुळे राजकीय दौरे किंवा अर्जंट प्रवासासाठी लिअरजेट-४५ या विमानाला राजकारणी तसेच व्यावसायिक प्राधान्य देतात.

VSR एव्हिएशन कंपनी कोणत्या सेवा पुरवते ?

उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान व्हिएसआर व्हेन्चर्स प्रायव्हेट लिमिटेड (VSR Aviation) या कंपनीच्या मालकीचे विमान होते. व्हिएसआर एव्हिएशन ही कंपनी उद्योगपती व्ही. के. सिंह यांनी स्थापन केली आहे. चार्टर जेट सेवा पुरवण्याचे काम ही कंपनी करते. या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय नवी दिल्लीतील महिपालपूर येथे आहे. व्हिएसआर एव्हिएशन कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, ही कंपनी व्यावसायिक प्रवासी किंवा इतर प्रवाशांना कमर्शियल विमानसेवा नसलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सेवा पुरवते. रिमोट ठिकाणी जाण्यासाठी किफायतशीर दरात ही कंपनी व्यावसायिक तसेच इतर प्रवाशांना खासगी विमान सेवा पुरवते.

VSR एव्हिएशन कंपनीकडून खासगी विमान सेवेसह इतर सुविधादेखील पुरवल्या जातात. विमान व्यवस्थापन सेवा, लायझनिंग तसेच विमानांशी संबंधित सरकारी संस्था व इतर कंपन्यांशी ताळमेळ कसा साधावा या बाबत ही कंपनी इतर विमान कंपन्यांना सल्लागार सेवा पुरवते. गृहमंत्रालय, डीजीसीए, डीजीएफटी, बीसीएएस, एएआय, एमओसीए या सरकारी संस्थांशी इतर कंपन्यांना ताळमेळ साधून देण्याची सेवाही VSR एव्हिएशन कंपनी पुरवते. खासगी विमान सेवा, खासगी जेट लिसिंग, हवाई रुग्णवाहिका ( air ambulances) या सेवा VSR एव्हिएशनकडून पुरवल्या जातात.

कोणती माहिती समोर आली ?

बारामती विमानतळाचे व्यवस्थापक शिवाजी तावरे यांनी अपघाताबाबत ‘हिंदूस्तान टाइम्स’ला माहिती दिली. अजित पवार प्रवास करत होते ते VT SSK (लिअरजेट – ४५) हे विमान धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना अपघातग्रस्त झाले. धावपट्टीवर उतरत असताना विमान धावपट्टीवरून बाजूला सरकले व विमानाचा अपघात झाला, अशी माहिती तावरे यांनी दिली. विमानाने पहिल्यांदा लँण्डिंगचा प्रयत्न केला त्यावेळी धावपट्टीवरील दृश्यमानता कमी होती. त्यामुळे विमान लँण्डिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. दुसऱ्यांदा विमान लँडिंगकरत असताना धावपट्टीवरून बाजूला सरकले व विमानाचा अपघात झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विमानाने बारामतीतील धावपट्टीवर लँडिंग करण्यासाठी पहिल्यांदा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. धावपट्टीवर दृश्यमानता कमी होती. त्यामुळे वैमानिकाने पुन्हा एकदा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. खराब वातावरणामुळे दुसऱ्यांदा लँडिंग करत असताना विमान धावपट्टीवरून बाजूला सरकले. त्यानंतर विमानाचा अपघात झाला. दरम्यान, या अपघाताची तपासणी केली जात आहे. फ्लाइट डेटा, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग्स आणि हवामानाशी संबंधित अहवाल यांची तपासणी करून या अपघाताचा घटनाक्रम काय होता, याचा तपास केला जात आहे. तपासणीनंतर विमानाचा अपघात नेमकं कशामुळे झाला याबाबत स्पष्टता येईल. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत होते त्या विमानाने सकाळी ८.१० वाजता मुंबईहून बारामतीसाठी उड्डाण केले होते. त्यानंतर सकाळी ८.४५ च्या सुमारास विमान रडारमध्ये दिसले नाही. ८.५० वाजता विमान बारामती विमानतळाजवळ अपघातग्रस्त झाले.