उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी (२८ जानेवारी, २०२६) मुंबई ते बारामती हा ३५ मिनिटांचा प्रवास अखेरचा ठरला. या ३५ मिनिटांच्या हवाई प्रवासाचा शेवट एका भीषण अपघातात झाला. त्यात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्वच पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार लिअरजेट -४५ या चार्टर्ड विमानातून प्रवास करत होते. या विमानाचा नोंदणी क्रमांक VT-SSK होता. दिल्लीतील खासगी विमान सेवा पुरवणाऱ्या VSR व्हेन्चर्स या कंपनीच्या मालकीचे ते विमान होते. विमानाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी बारामतीकडे उड्डाण केले होते.
विमान अपघाताचा तपास विमान अपघात अन्वेषण ब्युरोकडून केला जात आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अपघाताशी संबंधित आतापर्यंत मिळालेली माहिती प्रसारित केली आहे. वैमानिकाने बारामती विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न तसेच अपघात होण्याआधीचा घटनाक्रम काय होता, त्याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने माहिती दिली आहे. परंतु, त्याबाबत जाणून घेण्याआधी आपल्याला बारामती विमानतळ कसं आहे, विमानतळावर लँडिंग करणं अवघड का समजलं जातं, ते समजून घेणं आवश्यक आहे.
बारामतीतील धावपट्टीवर लँडिंग करणे अवघड का जाते?
बारामती विमानतळावरील धावपट्टीचा वापर हा शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो. तसेच खासगी विमानांचे लँडिंग धावपट्टीवर होते. कमी दृश्यमानता असल्यास वैमानिकाला लँडिंग करताना आवश्यक असलेल्या मार्गदर्शक सूचना देणारी यंत्रणा बारामती विमानतळावर उपलब्ध नाही. त्यामुळे कमी दृश्यमानता असल्यास वैमानिकांना मुख्यत: धावपट्टी दिसत आहे की नाही, याची खात्री स्वत:च करावी लागते. तसेच धावपट्टीवर एखादे विमान उभे असल्यास धोका आणखी वाढतो. अशा विमानतळांवर संपर्क साधण्यासाठी वैमानिक रेडिओ कम्युनिकेशनचा वापर करतात. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत होते त्या विमानाच्या फ्लाईट ऑपरेटरने कमी दृश्यमानता असल्याने लँडिंगसाठी अडचण येत असल्याचे म्हटले होते.
बारामती विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर आहे का ?
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बारामती विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे ते विमानतळ ‘अनकंट्रोल्ड एअरफिल्ड’ (हवाई वाहतुकीवर नियंत्रण नसणारे) आहे. अशा विमानतळांवर हवाई वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी किमान एक वरिष्ठ अधिकारी असणे आवश्यक असते. बारामती विमानतळाची हवाई वाहतूक नियंत्रण करण्याचे काम तिथे असलेल्या वैमानिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षक किंवा वैमानिक करतात.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमानाचा अपघात होण्याआधी २६ मिनिटे काय झालं ? याचा घटनाक्रम दिला आहे. सकाळी ८ वाजून १८ मिनिटाला विमान पहिल्यांदा ‘बारामतीच्या संपर्कात’ आले. त्यानंतर ८ वाजून ४४ मिनिटाला विमानाचा अपघात होऊन मोठा स्फोट झाला. या २६ मिनिटांत काय झालं त्याचा घटनाक्रम मंत्रालयाने सांगितला आहे. बारामतीत विमान अपघात झाला त्याक्षणी तिथे एअर ट्रॅफिकचे व्यवस्थापन करत असलेल्या एका व्यक्तीने दिलेली ही माहिती आहे.
लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी का झाला ?
विमान बारामती विमानतळाच्या संपर्कात आल्यानंतर विमानाचा पुढील कॉल विमानतळापासून फक्त ५५ किमी दूर असताना आला. दृश्यमानतेचा अंदाज घेऊन लँडिंग करायचे अथवा नाही याचा निर्णय वैमानिकावर सोपवण्यात आला होता. पुण्याहून येणारे विमान ज्या मार्गाने लँडिंग करते, त्या मार्गाने येऊन विमान बारामती विमानतळावर लँडिंग करणार होते, अशी माहिती मंत्रालयाने दिली. वैमानिकाने लँडिंग करण्याआधी बारामती विमानतळ परिसरातील हवा व दृश्यमानतेबाबत चौकशी केली होती. त्यावेळी हवा शांत असून दृश्यमानता ३००० मीटर असल्याचे ऑपरेटरने वैमानिकाला सांगितले.
ऑपरेटरने माहिती दिल्यानंतर वैमानिकाने विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वैमानिकाला धावपट्टी (रनवे) दिसली नाही. त्यामुळे त्याने लँडिंग करण्याचा निर्णय मागे घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी त्याठिकाणी कमी दृश्यमानता होती. कमी दृश्यमानतेमुळे अपघात घडला, असे VSR या कंपनीनेही म्हटले आहे.
लँडिंगचा दुसरा प्रयत्न करताना काय घडले ?
लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बारामती विमानतळाला एक गोल चक्कर मारून विमान पुन्हा आले. विमानाचा मार्ग ट्रॅक करणाऱ्या Flightradar24 मध्ये विमान एक गोल चक्कर मारून पुन्हा आल्याचे दिसून आले. वैमानिक हे अत्यंत अनुभवी होते. त्यांच्याकडे विमान उड्डाणाचा १५००० तासांचा अनुभव होता. तर सह-वैमानिकही अनुभवी होते. त्यांच्याकडे १५०० तासांचा हवाई उड्डाणाचा अनुभव होता.
“धावपट्टी सध्या दिसत नाही”
बारामती विमानतळाभोवती एक गोल चक्कर मारून आल्यानंतर ‘क्रू’ने ‘धावपट्टी ११’ वर लँडिंग करत असल्याचा फायनल कॉल दिला. बारामती विमानतळावरील ऑपरेटरने त्यांना धावपट्टी तुम्हाला दिसतेय का ? याबाबत विचारले. त्यावर “धावपट्टी सध्या दिसत नाही”, असे उत्तर ऑपरेटरला मिळाले. त्यानंतर काही सेकंदांनी ‘क्रू’ने धावपट्टी दिसत होती, असे सांगितले. त्यानंतर ऑपरेटरने विमानाला लँड होण्याची परवानगी ८ वाजून ४३ मिनिटाला दिली होती. परंतु, त्यानंतर कोणताही प्रतिसाद त्याला मिळाला नाही, अशी माहिती मंत्रालयाने दिली.
“पुढे, ‘धावपट्टी ११’ जिथून सुरू होते त्या ठिकाणी ८ वाजून ४४ मिनिटाला मोठा आगीचा लोट दिसून आला. त्यानंतर विमानतळावरील आपात्कालीन यंत्रणांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली”, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे. विमान अपघात अन्वेषण ब्युरोचे (AAIB) अधिकारी दिल्लीहून येऊन घटनास्थळी अपघाताचा तपास करत आहेत. तसेच AAIB चे डायरेक्टर जनरल जीव्हीजी. युगंधर हे देखील हैदराबादहून बारामतीत पोहोचले आहेत.

