Akhilesh Yadav pushes for Kedareshwar Mahadev temple in Etawah: भारतीय राजकारणात मंदिरांची उभारणी करणं हा केवळ श्रद्धेचा विषय राहिलेला नाही, तर तो राजकीय रणनीतिचा भाग ठरला आहे. इटाव्यातील यादव कुटुंबाच्या बालेकिल्ल्यात पूर्वी ‘लायन सफारी’ची गर्जना होती. तिथे आता मात्र महादेव शिवाच्या आरतीच्या गजराची तयारी सुरू आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर हिंदुत्वविरोधी असल्याचा ठपका ठेवला जातो. हा ठपका पुसण्यासाठी त्यांच्या स्वतःच्याच गावी केदारेश्वर महादेव मंदिराची उभारणी करून त्यांनी राजकारणाचे नवे समीकरण मांडत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प श्रद्धा, स्थापत्य आणि राजकीय रणनीति यांच्यातील नेमका कोणता दुवा साधणार, हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वकांक्षी प्रकल्प
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी इटावा शहरापासून सुमारे ८ किमी अंतरावर, इटावा-भिंड बायपास रस्त्यालगत केदारेश्वर महादेव मंदिराच्या बांधकामाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. २०२४ साली राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेदिवशी अनुपस्थित राहिल्यामुळे भाजपाने अखिलेश यादव यांच्यावर हिंदुविरोधी असल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच त्यांनी या मंदिराचा प्रकल्प हाती घेतल्याचे मानले जात आहे.
अखिलेश यादव नेमकं काय म्हणाले?
हे मंदिर केदारेश्वर महादेव इटावा मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून उभारले जात आहे. या ट्रस्टचे मुख्य विश्वस्त स्वतः अखिलेश यादव आहेत. मंदिराची प्राणप्रतिष्ठा २०२४ साली फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती आणि त्या दिवसापासूनच भक्तांनी मंदिराला भेट देण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी मंदिराचं लोकार्पण विधानसभा निवडणुकीच्या वर्षभर आधी २०२६ मध्ये फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार आहे, असे मंदिराचे बांधकाम करणाऱ्या ‘आरआयपीएल कन्स्ट्रक्शन’चे प्रमुख मधु बोट्टा यांनी सांगितले. मंदिराच्या भूमिपूजनाचा समारंभ ७ मार्च २०२१ रोजी अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत झाला होता. गेल्या वर्षी यादव यांनी मंदिरातील बांधकामाचा एक व्हिडीओ ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता. मुख्य मंदिर संकुल पूर्ण झाले असून जलतरण टाकी, प्रदक्षिणा मार्ग, प्रशासकीय इमारत आणि कुंपणाच्या भिंतीचे काम अद्याप सुरू आहे. लखनऊ येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत यादव म्हणाले, “आमचं केदारेश्वर मंदिर पूर्ण झाल्यानंतर मी राम मंदिराला भेट देईन.”
मंदिराची वैशिष्ट्ये
मंदिराचा पाया वगळता मंदिराच्या इतर सर्व रचनेत ‘कृष्णपुरुष शिला’ या ग्रॅनाइट दगडाचा वापर करण्यात आला आहे. या मंदिराच्या स्थापत्यरचनेत उत्तर आणि दक्षिणेकडील परंपरांचा संगम साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बोट्टा म्हणाले, “सुरुवातीला अखिलेशजींनी मला नंदीची मूर्ती तयार करण्यास सांगितले. त्यानंतर, सर्व प्रमुख शिवमंदिरांचा अभ्यास करून एक आगळंवेगळं मंदिर उभारण्याचे निर्देश दिले. आम्ही सर्वाधिक दर्जेदार संसाधनांसह हे मंदिर उभारतो आहोत.” या मंदिराचे आयुष्य २००० वर्षांपेक्षा अधिक राहील, असा दावा बोट्टा यांनी केला आहे.
सुमारे ६०० टन ग्रॅनाइटकन्याकुमारीहून इटाव्यात पोहोचला असून एकूण १००० टन ग्रॅनाइट वापरण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत नंदीच्या तीन मूर्ती मंदिराच्या तीन दिशांना बसवण्यात आल्या आहेत. पहिली मूर्ती १३ फूट आणि दुसरी ७ फूट उंच आहे. तर, तिसरी मूर्ती ३ फूट उंच असून गर्भगृहात ठेवण्यात आली आहे. संपूर्ण मंदिरात १९८ कोरीव खांब असतील. इटाव्यात २५ कारागिरांची टीम त्यावर काम करत आहे. तर, या मंदिरासाठी कन्याकुमारीत १५० कामगार आणि मूर्तिकार काम करत आहेत. मंदिराला दक्षिण भारतीय गोपुरमप्रमाणे चार दरवाजे असणार आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार ५० फूट उंच असेल, तर इतर तीन दरवाजे ४० फूट उंच असतील.
मुख्य वास्तुविशारद डॉ. जे. राजेन्द्रन यांनी सांगितले की, मंदिरात नागर, पल्लव, चोल आणि द्राविड शैलीचा आगळा संगम असेल. या मंदिरासाठी श्रीलंकेत खास तयार करण्यात आलेली आणि ‘ओम’ ध्वनी प्रक्षेपित करणारी पाच फूट उंचीची कांस्य घंटा आणली जाणार आहे. सहाय्यक वास्तुविशारद बालाकृष्ण यांनी सांगितले की, गर्भगृहाची एकूण उंची ८४ फूट असून मूळ केदारनाथ मंदिरापेक्षा ती एक इंचाने कमी असेल. शिखरावर १२ फूट उंच लाकडी मंडप असून गर्भगृह आणि विमानामध्ये (शिखर) पोकळी ठेवली आहे. त्यामुळे शंख, घंटा आणि डमरूचा आवाज संपूर्ण मंदिरात घुमेल. गर्भगृह बल्ब किंवा ट्यूब लाईट्स ऐवजी दिव्यांच्या प्रकाशाने उजळवण्यात येईल.
मंदिराचा राजकारणाशी संबंध नाही
कामगारांमध्ये तमिळनाडूतील अनेक कारागिरांचा समावेश आहे. समाजवादी पक्षाचे नेते सांगतात की, मंदिराचा राजकारणाशी संबंध नाही. मात्र, खासगीत मान्य करतात की, यादव आणि पक्षावर होणाऱ्या हिंदुत्वविरोधी आरोपांना हे मंदिर प्रत्युत्तर ठरेल. २०१७ पासून सत्तेबाहेर असलेल्या समाजवादी पक्षाला आशा आहे की, हे मंदिर त्यांच्या ‘पिछडा, दलित, अल्पसंख्याक’ (PDA) गटाला धार्मिक अधिष्ठान देईल आणि जातीय राजकारणाचे आरोप खोडून काढेल.
पक्षाचा अजेंडा नाही
पक्षाचे वरिष्ठ नेते उदयवीर सिंग म्हणाले, “मंदिर बांधणं हा वैयक्तिक आणि धार्मिक निर्णय आहे. अखिलेशजींनी अर्थपूर्ण गोष्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकाला केदारनाथला जाता येत नाही. पण, आता इटाव्यात केदारेश्वर महादेव मंदिराला भेट देता येईल.” त्यांनी सांगितले की, मंदिराच्या नावावर मते मागण्याचा पक्षाचा कोणताही अजेंडा नाही. २०१६ साली मुलायम सिंग यादव यांनी सैफईमध्ये हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती, याची आठवणही त्यांनी याप्रसंगी करून दिली.
मंदिर बांधणं हे सनातन धर्माच्या वाढत्या प्रभावाचे चिन्ह
मंदिर बांधणं हे सनातन धर्माच्या वाढत्या प्रभावाचे चिन्ह आहे, असं मत भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. भाजपचे उपाध्यक्ष विजय बहादूर पाठक म्हणाले, “राहुल गांधी उज्जैनच्या मंदिरात जात आहेत, अखिलेश यादव त्यांच्या गावात शिवमंदिर उभारत आहेत. यापेक्षा मोठा सनातन धर्माचा पुरावा तो काय?”
ओबीसी, दलित यांच्या आत्मसन्मानासाठीसुद्धा मंदिर असू शकतं
२०२७ च्या निवडणुकांवर मंदिराचा प्रभाव किती असेल या प्रश्नाचे उत्तर देताना पाठक म्हणाले, “मतदार हुशार असतात, कोण काय करतं आणि त्यामागचा हेतू काय आहे हे त्यांना चांगलं माहिती असतं.” राजकीय विश्लेषक प्रा. प्रशांत त्रिवेदी म्हणाले, “हे मंदिर भाजपच्या विरोधात अखिलेश यादव यांची एक रणनीति असू शकते. या मंदिराच्या माध्यमातून ओबीसी, दलित यांच्या आत्मसन्मानासाठीसुद्धा मंदिर असू शकतं असा संदेश यादव यांनी आपल्या अनुयायांना दिला आहे. त्यामुळे भाजपाचे ‘हिंदुत्वविरोधी’ आरोपही कमी होतील.”