अकोला शहरातील धर्मादाय उपआयुक्त कार्यालयामध्ये दिवसाढवळ्या महाराष्ट्र गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष तथा व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांची साडेसहा वर्षांपूर्वी अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली होती. क्रूरपणे झालेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरले होते. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने १० जणांना जन्मठेप सुनावत ऐतिहासिक निकाल दिला.

हत्याकांड कसे घडले?

अकोला शहरातील धर्मादाय उपआयुक्त कार्यालयात गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या ६ मे २०१९ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास झाली होती. एका शैक्षणिक संस्थेच्या प्रकरणाची सुनावणी कार्यालयात सुरू होती. शैक्षणिक संस्था व मालमत्तेच्या वादातून किसनराव गवळी आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावंडे यांच्यात वाद होता. त्याच वादातून किसनराव गवळी यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला झाला. अग्निरोधक सिलिंडरसह, कार्यालयातील फर्निचर व इतर शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. क्रूर पद्धतीने किसनराव गवळी यांची शासकीय कार्यालयात हत्या झाली. या हत्याकांडामुळे अकोला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती.

अत्यंत टोकाच्या वादाचे कारण काय?

शहरातील कौलखेड भागात स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ आहे. या मंडळाच्या शैक्षणिक संस्था आहेत. मंडळाचे सदस्य व इतर कारणावरून किसनराव गवळी आणि सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्रीराम गावंडे यांच्यात वादाला सुरुवात झाली. हे प्रकरण धर्मादाय उपआयुक्त कार्यालयात पोहोचले. या प्रकरणावरून धर्मादाय उपआयुक्त कार्यालयात अनेक वेळा सुनावणी झाली. याच प्रकरणावरून ६ मे २०१९ रोजी या कार्यालयात सुनावणी सुरू होण्यापूर्वी दोन्ही गटात वाद उफाळून आला. संताप अनावर झाल्याने रागाच्या भरात किसनराव गवळी यांची हत्या झाली.

प्रकरणानंतर पोलीस कारवाई काय?

किसनराव गवळी हत्याकांड प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एकूण १५ आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा सखोल तपास करून पोलिसांनी पुरावे गोळा केले. या प्रकरणात एकूण ५५० पानांचे पहिले दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यानंतर आणखी ३० पानांचे दुसरे दोषारोपपत्र न्यायालात सादर करण्यात आले. प्रभावी बाजू मांडण्यासाठी राज्य शासनाने विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली.

न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल काय?

अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात बहुचर्चित हुंडीवाले हत्याकांड प्रकरणाची सुनावणी झाली. या घटनेचे काही प्रत्यक्षदर्शी होते. न्यायालयात एकूण २२ साक्षीदार तपासण्यात आले. या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्रीराम कसदन गावंडे, रणजीत श्रीराम गावंडे, विक्रम श्रीराम गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, विशाल शंकर तायडे, सतीश सुखदेव तायडे, प्रतीक दत्तात्रय तोंडे, मयूर गणेशलाल अहीर आणि दिनेश बादलसिंह राजपूत यांना न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

प्रत्येकी पाच हजारांचा दंडही न्यायालयाने ठोठावला असून तो न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांच्या शिक्षेचे प्रावधान केले. पाच आरोपींच्या सहभागाचे पुरावे सापडले नसल्याने त्यांच्या विरोधातील आरोप सिद्ध झाले नाहीत. प्रवीण श्रीराम गावंडे, मंगेश श्रीकृष्ण गावंडे, दीपाली गावंडे, अमृता गावंडे आणि शेख साबीर यांना सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. सहा वर्ष सात महिन्यानंतर या प्रकरणाचा निकाल लागला.

प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी होती का?

किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी आहे. अकोल्याच्या प्रथम महापौर तथा भाजपच्या नेत्या सुमन गावंडे यांचे पती, मुले हुंडीवाले हत्याकांड प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत. न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विक्रम गावंडे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष होते.

किसनराव गवळी हे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे निकटवर्तीय होते. या प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करण्यासह न्यायालयात बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी अहीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर ॲड. निकम यांनी प्रकरणाचे कामकाज पाहिले. सामाजिक, राजकीय वर्तुळात हे प्रकरण चांगलेच चर्चेत राहिले.

prabodh.deshpande@expressindia.com